Sunday, May 22, 2011

कादंब-यांच्या जन्मकथा: सव्यसाची

बाबरी मशीद पडली. दंगे उसळले. नंतर दाउद ग्यांगने देशभर विस्फोट करुन हजारों निरपराधांचा बळी घेतला. या प्रतिगामी शक्तिंच्या प्रबळ असण्याच्या काळात (हिंदुत्ववादी असोत कि मुस्लिम) देशात एक नवी अर्थ क्रांतीही घडत होती. भारत जागतिकिकरणाच्या लाटेत, नाईलाजाने का होईना) सामील होऊ लागला होता. एरवी ज्या वर्गाने उद्योगधंद्यात पडण्याचे स्वप्नही पाहिले नसते असा नव-उद्योजक वर्ग जोमाने पुढे येवू लागला. त्यात मीही होतो. देशात वेगाने आर्थिक बदल घडु लागले. मानवी जीवनाचा चेहरा-मोहरा झपाट्याने बदलू लागला. नव्या आशा-आकांक्षांची रुजुवात व्हायला लागली. मानवी संबंधांत बदल घडु लागले. गुन्हेगारी जगही पुर्वापार मटका-स्मगलिंगच्या पारंपारिक गुन्हेगारीतुन बाहेर पडत सुपारी किंग, खंडणी बहाद्दर ते परकीय शक्तींचे हस्तक होत देशद्रोही विघातक कार्यातही गुंतू लागले. मला स्वत:ला १९९८ साली खंडणी प्रकरणाला तोंड द्यावे लागले. मी खंदणीबहाद्दरांना गजाआड केले हे खरे, पण सर्वांनाच असे साहस दाखवायला जमत नाही. एक नवी समांतर काळी अर्थव्यवस्था झपाट्याने वाढू लागली. मी १९८३ ते ९० सालापर्यंत पत्रकार होतो. तेंव्हाची पत्रकारीय नीतिमुल्येही आता झपाट्याने बदलू लागली असे मी पाहू लागलो. एकुणात सर्वच समाज घुसळला जात होता. कोठे संभ्रम तर कोठे दु:साहसवाद.

हा बदल विलक्षण होता. सामाजिक दरी वाढवणारा होता आणी मला जागतिकीकरणाचा राग यायला लागला. देशांतर्गत खुले आर्थिक धोरण आधी स्वीकारुन, लायसेंस राज नष्ट करत देशांतर्गत स्पर्धा निर्माण करत मगच विदेशी कंपन्यांना परवानगी द्यायला हवी होती असे माझे मत बनले होते. आजवर देशांतर्गत लायसेन्स राजमुळे ख-या स्पर्धेत कधीच न उतरलेले उद्योजक एकाएकी मुक्त केले म्हणजे परकीय कंपन्यांशी स्पर्धा करू शकतील हे अशक्यच होते. झालेही तसेच. भारतीय उद्योजकांनी सपाट्याने परकीय कंपन्यांशी संधान बांधत एक तर आपले उद्योग तरी विकले वा तांत्रिक-आर्थिक सहकार्य करार करत आपापले स्वातंत्र्य विकायला काढले. त्यातच पुढे शेयर बाजारात सट्टेबाजांनी या संधीचा कूफायदा घेतला त्यातुनच हर्षद मेहता प्रकरणही झाले.

या सर्व बाबी मी बारकाईने पहात होतो...चिंतन करत होतो. त्यातच राजकारणानेही वेगळे वळण घेतले होते. बाबरी मशीदीच्या पतनानंतर राजकीय समिकरणेही बदलली होती व जातीयवादी शक्ती सत्तेवर येऊ घातली होती.त्यांचेही तत्वज्ञान होते व त्या तत्वज्ञानाच्या प्रवाहात सामील होणारेही अगणित होते.

या सा-या परिवर्तनाचे, सामान्यांच्या या सा-यात होत असणा-या ससेहोलपटीचे चित्रण मला करावे वाटणे स्वाभाविक होते. मी या बदलाचा केंद्रबिंदू म्हणजे राजीवजींचे ह्त्त्या, जागतिकिकरणास सुरुवात आणि ते जातीयवादी शक्तींचा उद्रेक होत बाबरी मशिदीचे पतन एवढ्याच कालखंडात घ्यायचे ठरवून लेखन सुरू केले.

सुरुवात करतांना यात नेमकी किती पात्रे असतील, नायक कोण असेल असा कसलाही विचार मी केला नव्हता. जीवन मुजुमदार, नीलांबरी यापासुन सुरुवात करत मी जसजसा पुढे लिहित गेलो तसतशी असंख्य पात्रे आपसुक कथाक्रमात येत गेली. मानवी जीवनातील व्यक्तिगत संबंध आणि त्यावर परिस्थितीच्या दबावामुळे येणारे ताणतणाव दाखवत या सा-या कथेला मी राष्ट्रीय पार्श्वभूमी देत गेलो.

नीलांबरीचा बाप सव्यसाची हा अंडरवर्ल्डचा एक प्रमूख असावा हे काही पुर्वनिश्चित नव्हते. परंतु मला त्याही विश्वाची दखल घेत एका अवाढव्य उद्योगसमुहाच्या मालकाची पत्नी ही काळ्या जगाच्या सम्राटाचे मुलगी आहे हे दाखवणे कथौघात आवश्यक वाटले. आणि मी तेही नातेसंबंध चित्रित करत गेलो. यातील इन्स्पेक्टर बसू हे अत्यंत आव्हानात्मक पात्र असेच सुचले आणि त्याच्या माध्यमातून मला नुसती कथाच फुलवता आली नाही तर मानवी कारुण्याची अनेक रुपे दाखवता आली.

पण सर्वात महत्वाचे पात्र म्हणजे डेबु...एक साधा झोपडपट्टीतला गुंड... त्याची बायको आणि त्याची रखेली. या पात्रांच्या माध्यमातून मी एकून कथेला सुसंगत, पण वेगळेच विश्व चितारले.

ही कादंबरी लिहित असता मी दर वेळीस विचार करायचो...पुढच्या तरी प्रकरणात मी या कादंबरीचा खरा नायक सव्यसाचीला पुढे अणेल. पण जसजसे लिहित गेलो तसतसे मला त्याची आवश्यकता वाटेना झाली. सव्यसाची हे त्या काळाचे प्रतीक म्हणुनच ठेवायचे असा निर्णय मी घेतला. त्यामुळे संपुर्ण कादंबरीत प्रत्यक्षात हे पात्र कोठेच अवतरत नाही. पण त्यामुळे कादंबरीला वेगळेच परिमाण प्राप्त झाले हेही तेवढेच खरे. एक नवी प्रतिकात्मता मिळाली.

या कादंबरीत असंख्य व्यक्तित्वे आहेत. त्या अर्थाने या कादंबरीला नायक नाहीच. या कादंबरीत सर्वच स्तरांवरील पात्रे आहेत. आणि ती सर्वच कोणत्या ना कोणत्या पातळीवर जनसमाजाचे प्रतिनिधित्व करतात.

या कादंबरीचा शेवट हा मात्र माझा अत्यंत लाडका आहे कारण आपली पत्नी दुस-यापासून गरोदर आहे हे कळुनही हरलेला खचलेला जीवन मुजुमदार जेंव्हा हुगळीच्या काठी वैश्विक परिप्रेक्षात जीवनाचा...त्यातील अनिश्चिततेचा विचार करतो...चिंतन करतो आणि क्षमाशील बनतो...हा भाग लिहितांना आव्हानात्मक होता.

या कादंबरीतील अनेक प्रसंग मुळातच वाचावे असे आहेत.

ही कादंबरी मी कलकत्त्याच्या पार्श्वभूमीवर लिहिली. त्यासाठे मी आधी कलकत्त्याला जावून २ महिने राहिलो...तेथील गल्ल्याबोळ ते उच्चभ्रु अशा साल्ट लेक सिटी परिसरातही राहिलो. बंगाली रीतिरिवाज-संस्क्रुती समजावून घेतली. ते आवश्यकच होते.

का?

या प्रश्नाचे उतर तत्कालीन स्थितीत दडलेले आहे आणि ते नंतर जेंव्हा खुद्द दैनिक सामनात या कादंबरीचे परिक्षण आले त्यातही गर्भित आहे. सामनात म्हटले आहे कि लेखकाने खरे महाराष्ट्रातील कथानक कलकत्त्यात नेवून चतुराई केली आहे कारण त्यातील अनेक पात्रे महाराष्ट्रातील वास्तवाशी जुळतात...अन्यथा ही कादंबरी आणि ती छापणारा प्रेस जाळून टाकला गेला असता. आणि ते खरेही आहे. हिंदुत्ववादी मंडळी या कादंबरीवर खूप नाराज होती. त्यांनी मला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेक धमक्याही दिल्या...पण बधणारा मी थोडाच?

ते महत्वाचे नाही. बंगाली संस्क्रुतीचे मला लहाणपणापासुनचे आकर्षण आहे. मी असंख्य बंगाली कादंब-या वाचल्या आहेत एवढेच नव्हे तर मी थोडीफार बंगाली शिकलेलोही आहे. शिल्पी नावाची एक बंगाली तरूणी माझे मैत्रीणही होती आणि तिचे नाव मला एवढे आवडायचे कि मी एका कादंबरीचे नावच "शिल्पी" असे केले होते.

असो. ही कादंबरी माझी आजवरची सर्वात मोठी कादंबरी. ५५० वरच्या पानांची. तिचे स्वागत चांगले झाले. दुसरी आव्रुत्ती वर्षभरात निघाली. असे भाग्य शक्यतो ऐतिहासिक कादंब-यांनाच महाराष्ट्रात मिळते. मराठी माणूस हा वर्तमान, वर्तमानातील प्रश्न याबाबत असंवेदनशील असतो....धड माहित नसलेल्या इतिहासाबाबतची त्याची संवेदनशिलता मात्र टोकाची असते हे आपण आजही पहात आहोतच.

तरीही या कादंबरीचे व्यापक समिक्षा झाली. वाचकांनी या कादंबरीचा दुसरा भाग लिहावा यासाठी गा-हाणी घातली. पण दुसरा भाग मी लिहायचा विचारही केला नाही कारण...दुसरे भाग हे दुय्यमच होतात...लेखक आपल्यच मानसपुत्रांच्या प्रेमात पडलेला असतो...शेवटी पहिल्या धारेची ती पहिल्या धारेची...

http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5510253221764501349?BookName=Savyasachi

जगाचे भविष्य आमच्याच हातात!

मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...