Sunday, August 28, 2011

पुरोगामी महाराष्ट्राचा प्रतिगामी चेहरा! (1)



प्रत्येक प्रदेशाची स्वता:ची अशी स्वता:ची संस्क्रुती असते. संस्क्रुतीत भाषा, साहित्य, कला, धर्मशास्त्र, युद्धशास्त्र, राजशास्त्र, अर्थशास्त्रादि घटकांचा आणि त्यामागील एकुणातील समाजमानसशास्त्राचा समावेश होतो. मराठी संस्क्रुतीला किमान २५०० वर्षांचा द्न्यात इतिहास आहे. सहाव्या शत्कात एका चीनी प्रवाशाने महाराष्ट्राला भेट दिली होती तेंव्हा त्याने नोंदवून ठेवले आहे कि "येथील भुमी सुपीक आहे आणि लोक अत्यंत कष्टाळु आहेत. येथील लोक जिद्न्यासु असून नव्या गोष्टी शिकण्यास तत्पर असतात. येथील लोक प्रामाणिक आणि कष्टाळु असून ते सावळे पण काटक असतात. ते मुलता: दयाळु व्रुत्तीचे व स्वभावाने साधे असले तरी शत्रुच्या बाबतीत अत्यंत कठोर असतात. त्यांना अपमान सहन होत नसून जर तसे काही झाले तर सुड उगवल्याखेरीज रहात नाहीत. संकटप्रसंगी ते एकमेकांना मदत करण्यात तत्पर असतात." हे एका परकीयाचे निरिक्षण आहे आणि ते अनेक बाबतीत खरेही आहे. आजही आपण अल्पांशाने का होईना याचा, विशेश्त: ग्रामीण महाराष्ट्रात, अनुभव घेवू शकतो.
महाराष्ट्र पुरोगामी होता कि प्रतिगामी याचा ऐतिहासिक आढावा घेणे येथे रोचक ठरेल. त्यासाठी आपल्याला आधी पुरोगामी म्हणजे नेमके काय हे समजावून घेण्याची गरज आहे.
"पुरोगामी म्हणजे प्रस्थापित अन्याय्य समाजनियम/धर्मनियम/अर्थव्यवस्था/राजकीय धारणा/नीतिशास्त्र याविरुद्ध जात नवसमाजाला अनुकुल असे समतामय नियम अस्तित्वात यावेत यासाठी संघर्ष करनारा वर्ग म्हणजे पुरोगामी होय तर जे जुने आहे तेच तसेच्या तसे अपरिवर्तनीय आहे असे मानत समाजाला पुरातनत्वाच्या पाशात ओढत राहतात ते प्रतिगामी होत."
या वरील व्याख्येनुसार आपण पुरोगामी महाराष्ट्र आणि प्रतिगामी महाराष्ट्र याची गतेतिहासातील चर्चा आधी करुयात म्हणजे आपल्याला वर्तमान अजुन घासुन-पुसुन लक्खपणे पाहता येईल आणि निर्नय घेता येईल कि खरेच आज आम्ही पुरोगामी आहोत कि प्रतिगामी. दुर्दैवाने त्याचे उत्तर प्रतिगामी असेच येते आणि त्यावरील विवेचन मी येथे करत आहे.

प्रतिगात्मतेचा इतिहास:

तो अद्न्यात चीनी प्रवासी ईस ६२० च्या आसपास महाराष्ट्रात येवून गेला. त्याच्या वर्नणावरुन मराठी मानसिकतेचा एकंदरीत प्रत्यय येत असला तरी तेंव्हाची धार्मिक/सामाजिक स्थीती नेमकी काय होती याचा त्यावरुन आपल्याला अंदाज येत नाही. देवल स्म्रुतीची रचना मात्र महाराष्ट्रात झाली आणि तिचा काळ हा इस्लामी आक्रमणे आणि धर्मांतरांनंतरचा आहे हे स्पष्ट आहे. हा काळ इस. १२ वे ते १३ वे शतक असु शकतो. याच काळात रामदेवरायाचा मंत्री हेमाडपंत याने "चतुर्वर्ग चिंतामणी" या ग्रंथाची रचना केलेली दिसते. म्हणजे या काळात जातीव्यवस्था नुसती बळकटच नव्हे तर अन्याय्य होण्यास सुरुवात झाली होती असे दिसते. एवढेच नव्हे तर काशी खालोखाल पैठण हे एक धार्मिक बाबतींत (ते ठरवतील तसे) निर्णय घेण्याची अधिकारक्षमता मिळवुन बसले होते हेही दिसते. द्न्यानेश्वरांचे उपनयन याच पीठाने नाकारले. खरे तर आळंदीकर ब्राह्मण या तिन्ही भावंडांचे उपनयन व्हावे या पक्षात होते. म्हणजे धर्मनियमही सुस्पष्ट नव्हते. पण एक धर्मपीठ म्हणुन धर्म-अधर्म बाबत निर्नय घेण्याचा अधिकार या पीठाला मिळाला होता. पहिल्या सहस्त्रकातील राजवटी पाहिल्या तर असे कसले धर्मपीठ आस्थित्वात असल्याचे दिसत नाही. उलट राजसत्ता या खुपच सहिष्णु असल्याचे दिसते. म्हणजे बौद्ध विहारांना ते आर्थिक मदत करत तशीच जैन धर्मियांना व वैदिक कर्मकांडांनाही उदारपणे मदत करत असल्याचे चित्र आपल्याला तत्कालीन शिलालेख/ताम्रपटांवरुन दिसते. सातवाहन कुळातील राजे समुद्रसंचारी बनले होते...तीन्ही समुद्रांवर अधिकार गाजवला होता व त्यांचे नौकादल बलाढ्य होते याची नोंद अगदी ग्रीक प्रवाशांनीही घेवून ठेवलेली आहे.
पण दुस-या सहस्त्रकाच्या आरंभकाळापासुनच कालात आपण एक उलटा प्रवास झालेला दिसतो. याच काळात वेदबंदी, शिक्षण बंदी (ब्राह्मणेतरांना) समुद्रबंदी (सर्वांना), वर्णबंदी...(म्हनजे कलियुगात फक्त दोनच वर्ण...ब्राह्मण आणि क्षत्रीय...बाकी वर्ण आस्तित्वातच नाहीत...) परशुरामामुळे क्षत्रिय हटवले हे ठीक समजा....पण वैश्य कोणत्या धर्मनियमाने हटवले? त्याबाबत पुराणे मौन पाळुन आहेत. शेतकरी हा खरे तर वर्णव्यवस्थेत वैश्य...पण त्याचे तेही स्थान हिरावुन घेतले गेले आणि त्याचा व्यवसाय कायम ठेवून त्याला सामाजिक/धार्मिक पातळीवर एक पायरी अजुनच अध:पतीत केले. अन्य जातीयांनाही त्याच पातळेवर आणुन शुद्रातीशुद्र, अस्प्रुष्य अशा समाजाचीही निर्मिती केली आणि अति-प्रतिगामी विचारांचा उदय केला. हे फक्त महाराष्ट्रात झाले असे नाही तर उर्वरीत देशातही पद्धतशीरपणे केले गेले.
का? अशी काय निकड भासली होती धर्मनियंत्यांना कि ज्या बाबी फार नसल्या तरी काही समता/सामाजिक अधिकार या बाबत काही प्रमाणात उदारत्व बाळगत असलेल्या समाज/धर्म स्थीतीला एकाच वळचणीला आणले?
हे माझे विधान धाडसी वाटले तरी मी स्पष्ट करु इच्छितो कि इस्लामी सत्ता आणि काशी/कांचीची धर्मपीठे यांनी इस्लामी सत्ता सुखनैव येथे नांदावी यासाठी सत्ताधा-यांशी काहीतरी संगनमत केले असावे, अन्यथा एकाएकी स्म्रुतीसत्ता (धर्मसत्ता हा शब्द मी मुद्दाम वापरत नाही.) एवढी बलाढ्य व सर्वोपरी होवुच शकली नसती. सर्वच ब्राह्मण यात सहभागी असण्याची शक्यताच नव्हती. किंबहुना या कथित वेदद्न्यानी आणि इस्लामीय साठगाठीमुळे सामान्य ब्राह्मण समाजाचेही पराकोटीचे नुकसान झाले. गतसहस्त्रकात द्न्यान-विद्न्यानाची प्रगती खुंटली. अभिजात साहित्याची निर्मिती थांबली. संस्क्रुत भाषा म्रुत्युपंथाकडे गेली व जनभाषा हळुहळु जनजीवन व्याप्त करु लागली. या संक्रमणाचा इतिहास आपल्याला तपासायलाच हवा. याच काळात जातीव्यवस्था कठोर झाली. खुद्द ब्राह्मण समाज ५५० जातीत वाटला गेला.
प्रश्न अर्थव्यवस्थेचा असतो...धर्मापेक्षाही आर्थिक आकांक्षा आणि जगण्याचे राजकारण नेहमीच सर्वोपरी ठरत असते. धर्म हवा तसा वाकवता येतो. अर्थव्यवस्था ही मात्र अत्यंत वास्तव असल्याने ती म्हनाल तशी कधीच वाकवता येत नाही. या विशिश्ट काळात परकीय सत्त्तांमुळे अर्थव्यवस्था कोणच्याही हातात उरलेली दिसत नाही. येत्द्देशियांच्या तर नाहीच नाही. व्यापार थांबल्यांमुळे निर्मानकर्ते...मग ते लोहार असोत कि सुतार, माळी असो कि धनगर...तेली असो कि तांबोळी...यांचे व्यवसाय मर्यादित होत होत शेवटी गावगाड्याच्या चौकटीत अडकुन बसले. आपापल्या व्यवसायात स्पर्धा नको म्हणुन ब्राह्मनच काय अन्य जातीयही जातीची चौकट अन्न्याय्य पद्धतीने विकसीत करत गेले. "माझ्या व्यवसायात अन्य कोणी पडु नये...अन्यथा आह्र त्या एकुणातील मागणीच्या स्थितीत माझे उत्पन्न थांबेल..." ही असुरक्षिततेची भावना विकसीत होत गेली. यातुन जातमाहात्म्य वाढत खरे तर प्रत्येक जात हा एक स्वतंत्र धर्म बनत गेला आणि एकुणातील धर्म हा असंख्य जातीयांचा संघ बनत गेला. जात पंचायतींची सुरुवात जर अभ्यसली तर लक्षात येते कि याच काळात त्यांचा उदय झाला आणि त्याही अन्याय्य व कठोर बनत गेल्या. या जातीय संस्था स्वता:चे कायदे पाळत होते व त्यानुसार शिक्षा देण्याचा अधिकार बळकावून बसले होते, एवढे, की राजसत्ताही तंटे निर्माण झाले तर जात-धर्मानुसार निर्णय घेत असत, स्वीकारत असत. या प्रक्रियेतुन कोणतीही जात सुटलेली दिसत नाही. आजही अनेक जातींत आपण जातपंचायतींची सार्वभौमता अनुभवत आहोत.
ब्राह्मणही आपापले विशिष्ट देवांचे पुजाहक्क, धर्महक्क सांगते झाले, एवढेच नव्हे तर ते हक्क अबाधित रहावेत म्हणुन प्रसंगी मुस्लिम सत्तांच्या दरबारांतही गा-हाणे गुदरते झाले. (शंकराचार्य पदाचा वाद तर ब्रिटिश न्यायालयातही लढला गेलेला आहे...) हा सर्व लढा आपापल्या जातीय हक्कांना अबाधित राखण्यासाठी होता....आणि त्यामागे सर्वस्वी बदललेले अर्थकारण आणि राजकारणही होते हे लक्षात घेतले पाहिजे.
सांगायचा मुद्दा हा आहे कि प्रतिगामिता कशी असते याचे दर्शन महाराष्ट्राने गतकाळात घडवले आहे. चक्रधरांची हत्त्या हेमाडपंताच्या निर्देशाने केली गेली. द्न्यानेश्वर व त्यांच्या बांधवांना सामाजिक समतेचा, भले तो जात-निष्ठ असो नाकारला गेला. धर्मांतरीतांना पुन्हा धर्मात घेण्याचा जोही काही धर्मनिष्ठ/जातनिष्ठ मार्ग होता (अगदी देवल स्म्रुतीनेही सांगितलेला) तोही नाकारला गेला. थोडक्यात समान न्यायाचे मुलतत्वच सर्वांना, मग तो कोणत्याही जातीचा असो, नाकारले गेले. आणि अपरिहार्यपणे सर्वच समाजाने ते स्वीकारले.
आणि याच वेळीस राजसत्तात्मक प्रतिगामीपणा क्रमश: स्वीकारला गेला. आत्माभिमान, स्वाभिमान, शत्रुंबाबत कडवा असे म्हणवला जाणारा मराठी समाज आक्रमकांचा एकनिष्ठ चाकर बनला. दैवतवादाच्या (ही आपली गतजन्मातील पापांमुळे निर्माण झालेली अपरिहार्य स्थीति आहे असे मानत) आहारी जात याच नव्य समाजाने आपल्याच समाजाशी वैर मांडले.
मी याबाबत तत्कालीन समाजाला दोष देत नाही. चुकत होते ते धर्माचे आणि समाजव्यवस्थेचे नियंते. आणि या धर्मसत्ता सर्वसामान्य ब्राह्मनांच्या हातुनही निसटल्या होत्या. त्या केंद्रीभुत झाल्या होत्या त्या काशी, पैठण आणि कांचीच्या विद्वत्सभांहाती. शंकराचार्य पीठांचा अधिकार कधीच संपला होता. आणि पुर्वापारच्या राजसत्ताच या नव्य परकीय सत्तांचे एकनिष्ठ चाकर बनल्याने स्वकीयांच्या हिताची त्यांना काळजी वाटणे असंभाव्यच होते. यादवोत्तर आणि शिवपुर्व काळात तशी या चाकरांची समाजाशी काही बांधिलकी होती याचे निर्देश मिळत नाहीत. या चाकरांनी पराक्रम गाजवले, आपल्याच स्वबांधवांची आणि आक्रमणांच्या निमित्ताने अन्य राजकीय क्षेत्रात असणा-या प्रदेशांची (व पर्यायाने सामान्य जनतेची) धुळधान उडवण्यात कसलीही कसर सोडलेली दिसत नाही.
हे विवेचन अशासाठी कि प्रतिगामत्व कसे मुळात उद्भवले. ते कसे क्रमश: द्रुढमुल होत गेले. त्यामागील सामाजिक राजकीय स्थित्या नेमक्या काय होत्या हे आपणास पाहिले पाहिजे. पहिल्या सहस्त्रकात स्थिर सुर्य सिद्धांत (प्रुथ्वी केंद्रित) मांडण्यापासुन ते सुर्यकेंद्रित सिद्धांत (आर्यभट्टीय) मांडण्याची बौद्धिक क्षमता असणारा समाज, अद्वैततात्मक तत्वधारा मांडणारा समाज, बौद्ध असोत की जैन, यांच्याशी सहिष्णु वागणारा समाज आपापसातच एवढा वैरभावाने वागु लागला याचे समाजशास्त्रीय विवेचन अभिप्रेत आहेच. विद्न्यानाभिमुख समाज परत का अजनाभ वर्ष ते मेरु पर्वताच्या बाता करायला लागला? द्न्यानेश्वरांना "न चालता सुर्याचे चालणे" हे वैद्न्यानिक विधान करण्यासाठी मुळातील आर्यभट्टीय परंपरा उपलब्ध कोठुन झाली आणि ती लुप्त होत हाच समाज ऐहिकतेच्या बाबत उदासीन होत पारलौकिक आणि तेही जातीनिष्ठ होत कसा अध:पतीत झाला? तो एवढा कसा प्रतिगामी झाला?
इस्लामी आक्रमणे आणि त्यांची सत्ता स्थिरस्थावर झाल्यावर येथील धर्मनियंते/समाजनियंते पराकोटीचे बदललले दिसतात याला मी योगायोग मानत नाही. समाजनियंते सत्ताधारी जसे या नव्य सत्तांचे एकनिष्ठ चाकर बनले तसेच धर्मसत्तेनेही केले असे मी वर म्हणालो आहे ते यापोटीच.
हा प्रतिगात्म्तेचा इतिहास आपल्याला ब्रिटिश काळात वेगळ्या पद्धतीने विकसीत झाला आहे असेही दिसते. माक्स्मुल्लर या जर्मन विद्वानाने आर्य सिद्धांत भाषिक परिप्रेक्षात मांडला. त्याचे विघातक परिणाम लक्षात घेवून त्याने तो मागेही घेतला...पण येथील विद्वान अधिक अक्कलवान होते. त्यांनी आर्य सिधांतामुळे ब्रिटिश आणि ब्राह्मण हे एकाच मुळाचे ठरतात अशी समजुत करुन घेतली. विष्णुशास्त्री चिपळुनकर हे तर ब्रिटिशांना "आमच्या आर्य रक्ताचे पुरातन बांधव..." असे उद्देशुन म्हणु लागले. टिळकांनी यावर तर कळस चढवला. ओरायन असो कि आर्क्टिक होम इन वेदाज...ते ब्राह्मण (आर्य) हे उत्तर खंडातुन भारतात आले असे हिरिरेने सिद्ध करु लागले. बरे हे सांगणारे टिळक हे त्याच वेळी राष्ट्रीय पातळीवरील नेते होते...त्यामुळे त्यांच्या विवेचनाचा समाजमनावर प्रभाव पडणे स्वाभाविक होते. ब्राह्मण या संशोधनामुळे शेफारले तर बहुजनीय वर्ग ब्राह्मण हे पर्कीय असुन आपल्यावर आपली धर्मसत्ता लादणारे आहेत अशी प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. राजकीय चळवळीवरही या नव्य-संशोधनाचा परिणाम झाला. ब्रिटिशांच्या चाक-या करण्यात कमीपणा वाटणे आता शक्य नव्हते कारण ब्रिटिशही आर्य वंशाचेच...पुढेही या मित्थकावर समाज विश्वास ठेवत गेला. त्यावर कसलाही अंकुश राहीला नाही. बाबासाहेबांनी "आर्य हा वंश नसुन जोही काही पुरातन काळात संघर्ष झाला तो धर्मश्रद्धांबाबत होता...वांशिक नव्हे..." हे स्पष्ट करुनही आजही त्यांचे अनुयायी म्हणवणारे काही लोक त्यांचेच विधान ऐकत न्नाहीत. मान्य करत नाहीत. "आर्य वंश हा एक तिढा आहे." असे वरकरणी मान्य करत डा. मधुकर ढवळीकरांसारखे संशोधक आर्य हेच सिंधु संस्क्रुतीचे निर्माणकर्ते होत असे मत मांडतात. (पहा...आर्यांच्या शोधात...ले. मधुकर केशव ढवळीकर). अगदी तर्कतीर्थ लक्षमण्शास्त्री जोशीसुद्धा आर्यवादाचे (म्हनजे आर्य नामक लढावु वंश भारतात प्रवेशला व त्यांनी येथील अडाणी-रानटी संस्क्रुतीला जिंकुन त्यांना मानसाळवले व आपल्या व्यापक सांस्क्रुतिक परिप्रेक्षात सामावून घेतले, त्यांच्या रानटी देवतांना (शिव/शक्ती आदि) वैदिक अलंकार चढवून आपलेसे करुन घेतले....) खंदे समर्थक होतेच. पण आर्यवादाने समाजाला प्रतिगामी बनवण्यात १९ व्या शतकात फार मोठा हातभार लावला. वेदांची निर्मिती येथील सरस्वती नदीच्या खो-यात नव्हे तर हेल्मंड नामक अफगानिस्तानातील सरस्वतीचेच मुळ नाव असणा-या नदीच्या काठी झाला असे उच्च रवाने सांगितले जावू लागले. आर्य हा एक प्रबळ, शक्तीशाली, विजिगिषु लोकांचा समुदाय होता व त्यांनीच जगभर विखरुन नवी सम्स्क्रुती घडवली असे हिरिरीने प्रतिपादन केले जावू लागले. यात कसलीही तार्किकता नव्हती, ऐतिहासिक पुरावेही नव्हते...पण तरीही ही प्रतिगात्म भावना अंतत: विघातक ठरली हे मात्र खरे.
या आर्यवादापुर्वी भारतात वा कथित हिंदु धर्मात ब्राह्मण ष्रेष्ठत्वतावाद होताच. पण तो जातीय परिप्रेक्षात. त्याला या माक्समुल्लरपर्यंत आणि टिळकांनी सैधांतिक रुप देईपर्यंत तो एकाच समाजसमुहातील अंतर्गत वाद होता...पण आर्यवादाने त्याची व्यापकता वंशश्रेष्ठत्वता वादापर्यंत वाढवली. हा प्रतिगामीपणा भारताला केवढा महागात पडला आहे याचे विवेचन मी पुढे करतच आहे. पण आपल्या धर्माचे नियंते हे आपल्या वंशाचे नाहीत, या भुमीचे नाहीत, स्वकीय नाहीत ही जाण याच मुढांनी वंशष्रेष्ठत्वाच्या वल्गना हाकण्याच्या नादात स्वता:च्याच पायावर कुर्हाड मारुन घेतली. महात्मा फुलेंनी ब्राह्मण वर्गावर जे आघात केले त्यात "आर्यभट" हा शब्द संतापाने का येतो याचे कारण फुलेंना शिव्या घालना-यांना आजही नाही.
महाराष्ट्रात ब्रिटिश काळात निर्माण झालेला हा आर्यवंश वाद आणि आर्यवंशीय समजणारा परकीय ब्राम्हणसमाज हे मात्र ब्राह्मण समाजाने प्रतिगामत्वाचे गाठलेले टोक होते. (फक्त ब्राह्मणच का तर...क्षत्रिय आणि वैश्य हे वर्ण नंतर कलियुगी नाहीतच ही पौराणिक धारणा होती म्हणुन...तसे पाहिले तर आजही स्वत:ला क्षत्रिय/वैश्य म्हनवणारे आहेतच...आर्यवाद ग्रुहित धरला तर तेही परकीय ठरतात...मग फक्त ब्राह्मणांनीच देशाबाहेर चालते व्हावे हे त्यांना म्हणता येणार नाही.)
प्रतिगामत्वाचे दुसरे सामाजिक रुपही आपल्याला पहायला हवे. सती प्रथा खरे तर भारतात रजपुत या भारतीय क्षत्रीय बनलेल्या पण मुळात सिथियन मुळाच्या परकीयांनी दिलेली देणगी. शक, हुण, कुषाणांतही या प्रथा होत्याच. कारण मुळात या भटक्या टोळ्या. युद्धे झाली तर जिंकलेया पुरुषांना ठार मारायचे आणि स्त्रीयांवर अनन्वित शारीरिक अत्याचार करायचे. समाजशास्त्राचे चिंतक प्रा, हरी नरके याबद्दल म्हणतात "स्त्री हा कोनत्याही सामाजिक अत्याचाराचा पहिला बली ठरतो कारण त्यामागे एखाद्या पराजित समुदायाचा पराकोटीचा अवमान करणे हा मुलभुत हेतू असतो.". मी त्यांच्या मताशी सहमत आहे. खरे तर अखिल मानवी इतिहास हा स्त्रीयांवरील अत्याचाराचा कधीच न लिहिल्या गेलेल्या वेदनांचा इतिहास आहे.
पण सातवाहन काळापर्यंत तरी आपण स्त्रीसत्तेचे मोहक रुप पाहु शकतो. सम्राद्न्यी नागणिकेची महत्ता पाहु शकतो. एवढेच नव्हे तर अनेक राजे आपल्या आयांचे नाव अभिमानपुर्वक लेत आहेत असेही पाहु शकतो. (उदा. गौतमीपुय्र सातकर्णी, वासिष्ठीपुत्र सातकर्णी...)
पण गत सहस्त्रकात स्त्रीयांना संपुर्ण अंधारात फेकले गेले. आणि आस्चर्य असे कि या स्त्रीया बव्हंशी धर्मसत्तात्मक घराण्यातील होत्या. सती प्रथा राजपुत इतिहास पाहिला तर खरे फक्त लढवैय्या घराण्यांत हवी. म्हणजे योद्धा रणात पडला, पराजय झाला तर अत्याचार/बलात्कारांची वेळ येवू नये म्हणुन, विटंबणा नको म्हणुन. भारतीय (इस्लामपुर्व व परकीय शक-हुण-कुशानादी आक्रमकांशीचा) युद्धेतिहास पाहिला तर स्त्रीयांना अवमानास्पद वागणुक दिल्याचे उदाहरण सहजी सापडत नाही. उत्तरकाळातही मराठी सत्ताधारी वर्गातील स्त्रीयांनी सतीप्रथा अभावानेच पाळलेली दिसते, तेही धर्माद्न्या कठोर होवु लागल्यानंतर. जिजाबाई सती गेल्या नाही. शिवाजीमहाराजांची एक राणी सोडली तर सोयराबाई व अन्य राण्या सती गेलेल्या नाहीत. (सती गेलेल्या पुतळाबाईस नेमक्या कोण यावर आता काही लोक वाद घालत आहेत हे वेगळेच!)
परंतु बालविवाहामुळे सर्वच समाज एका धुंदीत गेला. बालविवाहामागे तत्कालीन सामाजिक कारणे असतीलही. पण ती नक्कीच भुषणास्पद नाहीत. इस्लामी अत्याचारापोटी काही काळ अशी प्रथा आली असे समजुन घेतले तरी मग जेंव्हा काही काळ का होईना जेंव्हाही (पेशवाईसह) एतेद्देशीय सत्ता देशावर नांदत होत्या त्याही काळात ही प्रथा चालु ठेवण्यात प्रतिगामीपणाच होता. खरे तर त्याही पुर्वी स्त्रीयांना आपले वर निवडण्याचे स्वातंत्र्य होते. एवढेच नव्हे तर विधवांना हव्या त्या पुरुषाशी संबंध ठेवायला सामाजिक मान्यता होती. (पहा...कामसुत्र...वात्स्यायन...) पण नंतर स्त्रीयांना (त्यांना पुन्हा उजेडाची संधी देण्याची सोय असतांनाही) अक्षरश: गुलामापेक्षा हीण/उपभोग्य पातळीवर आणुन ठेवले कसे गेले?
याचे उत्तर आपल्या प्रतिगामीपणातच आहे. आजही आहे पण ते कसे यावर नंतर.
सती प्रथा ही मुळात अभारतीय/अहिंदु असुनही तिचे अनुसरण करणारा हा महाराष्ट्र. (माद्रीचे उदाहरण खोटे आहे कारण माद्री सती गेली नाही. पांडुचे शव घेवुनच कुंती हस्तिनापुरला आली होती व तेथे त्याचे उत्तरकर्म केले गेले.) स्त्री सती जाणार नसेल तर तिला विद्रुप करण्याची चाल आणनारा हा प्रतिगामी महाराष्ट्र. खरे तर हिंदु धर्मात जेही काही धर्मनियम आहेत त्यातही न बसनारा हा विक्रुत प्रकार महाराष्ट्रात प्रचलित केला तो या प्रतिगाम्यांनी. विधवांनी केशवपन करावे, अंधा-या खोलीत बसावे, लाल वस्त्रे नेसावीत...असे काही कोणत्याही धर्मशास्त्राने लिहिलेले नव्हते.
ज्या बाबी धर्मशास्त्रांतही लिहिलेल्या नाहीत त्या बाबी धार्मिक बनवण्याचा अट्टाहास हे प्रतिगामत्वच होते. पानिपत युद्ध प्रसंगी बळवंतराव मेहंद्ळ्यांच्या पत्नीचे सती जाण्याचे उदात्तीकरण करुन वर्तमानातील साहित्तिकाने सांगणे/लिहिणे हेही प्रतिगामत्वच होते. या प्रतिगामत्वाचा वारसा आपण नुसता जपलाच नाही तर त्याला नवीन आधुनिक आयाम देत फोफावत नेत आहोत याचे भान आपल्या समाजाला नाही.

अर्थव्यवस्थेने निर्माण केलेले प्रतिगामत्व

अर्थव्यवस्था हीसुद्धा एक प्रतिगामित्वाची कारणीभुत सत्ता बनली. या अंधयुगात बलुतेदारी प्रथा व वेठबिगारी सम्स्था निर्माण झाल्या. बलुतेदारी प्रथा सर्वस्वी अन्न्याय्य आणि तत्कालीन प्रागतिकतेला फार मोठा अडथळा बनणारी ठरली. अर्थव्यवस्थेचा पहिला नियम असतो तो हा कि निर्मिती करणा-यास वा सेवा देणा-यास, आपले द्न्यान/कुशलता आपापल्या क्षेत्रात वापरत समाजोपयोगी वस्तु/पदार्थ बनवणा-यास त्याच्या श्रमाचा उचित मोबदला, तोही विक्रेता ठरवेल त्यानुसार मिळायला हवा. बलुतेदारीत हे असंभाव्य झाले. बलुत हा हक्क नव्हे तर भीक बनली. वास्तव मोबदल्याशी नाळ तुटली. त्यामुळे तत्पुर्वी भारतात जी नवनवी संशोधने होत होती, कौशल्यांना वाढवण्याची प्रेरणा मिळत होती वास्तव समस्यांना सोडवण्यासाठी उत्तरे शोधण्याची, प्रयोग करण्याची जी परंपरा होती तीही संपली. शेतीविषयक संशोधनात्मक ग्रंथ एके काळी लिहिले जात होते पण पराशरानंतर अभावानेच त्याबाबत नवीन संशोधन झालेले दिसते.
वेठबिगारी हा प्रतिगामी महाराष्ट्राचा एक चेहरा होता. आज त्याचे स्वरुप बदलले आहे एवढेच. कुशल सेवांचे एक मुल्य असते हा मुळ अर्थशास्त्रीय सिद्धांत या वेठीने पुरता धुडकावून लावला. या वेठीवर सुतार, गवंडी, लोहार, पाथरवट ते महार-मांग शासनांनी राबवुन घेतले. या प्रथेबाबत कोणी सहसा बोलत नाही, कारण ही वेठ व्यवस्था ब्राह्मणांनी नव्हे तर सत्ताधारी समाजाने निर्माण केली. सत्तेचा अंकुश निरंकुशपणे वापरला गेला. त्यामुळे समाजाची आर्थिक प्रगती ज्या प्रमाणात व्हायला हवी होती ती झाली नाही...त्याचीच परिणती म्हणजे समाजाची क्रयक्षमता कमी होणे आणि एकुणातील अर्थव्यवस्थेचा बळी घेणे. बरे या काळातील कररचना/सारापद्धती (शिवकाळातील अपवादात्मक भाग सोडला तर) लुटारुपणाचे हद्दच होती. जित सरदार/सत्ता ज्या खंडण्या लादायचे त्याची वसुली अंतता: प्रजेकडुनच स्वकीय शासक करत. यात आहे त्या विपन्नावस्थेतील प्रजेची केवढे ससेहोलपट होत असेल याची कल्पना आपण करू शकतो.
खरे तर हा साराच मध्यकाळ हा लुटालुटीचा काळ आहे. त्यातुन अपवाद म्हणता येईल असा एकही नाही. येथील जितांनी अन्य प्रांतांच्या लुटी केल्या/खंडण्या वसुल केल्या वा उलटे घदले...पण कोठलाही असो, समाज या आपत्तीतुन सुटला नाही, वा आपल्या जेत्यांनी लुट आणली/खंडण्या आणल्या त्याचा प्रत्यक्ष अर्थशास्त्रीय लाभ येथील जनतेला झालेला नाही.
सातवाहन काळी ते पार राष्ट्रकुट काळापर्यंत शहरोशहरी प्रत्येक जातींच्या श्रेण्या असत. त्यांचे काम आताच्या पतपेढ्यांप्रमाणे तसेच खरेदी-विक्रीतील माध्यमासारखे असे. प्रत्येक व्यावसायिक जात आपापला माल ठिकठिकाणी विकत असे. त्यातुन अर्थव्यवस्थेची सम्म्रुद्ध वाढ होत होती. त्यातुन मराठी जनतेला संपन्नतेचा अर्थ समजत होता. कररचना अत्यंत सौम्य होती. पुढे ही व्यवस्था अल्पांशाने व फक्त अत्यंत मुल्ल्यवर्धीत मालापर्यंत सीमित झाली. अर्थव्यवस्थेचा इतिहास पुरता पुसला गेला आणि तो उरला फक्त युद्धांचा इतिहास. त्यातील हारजीता, पराक्रम, वीरोन्मेष वाचायला लोकांना खुप आवडते, पण समाज हे या सर्वांचे अधिष्ठानच नव्हते याला काय म्हणायचे? युद्धे होतात ती लोकांच्या/स्वकीयांच्या रक्षणासाठी, त्यांच्या स्थैर्यपुर्ण जीवनासाठी...हा मुलभुत गाभा या काळात हरपला होता...एवतेव...हा प्रतिगात्मकतेचा एक आविष्कारच होता.
मग या परिवर्तनाच्या काळात असंख्य व्यावसायिकांना दिवाळे काढावे लागले नसेल तरच नवल. गावातला ब्राह्मण काय आणि महार काय कमीअधिक प्रमानात या व्यवस्थेचा शिकार झाला. वेठबिगारीने त्यावर कळस चढवला. दारिद्र्य वाढत गेले कि मनुष्य दैववादी बनतो. स्व-प्रयत्नांवरील विश्वास उठतो. सारे काही नशीबावर ढकलण्याची व्रुत्ती बनते. जगण्याचा संघर्ष सर्वोच्च प्राथमिकता बनते....अणि ती एका परीने ईश्वरी क्रुपा बनते. मानवी प्रयत्नांना स्थान रहातच नाही. "ठेविले अनंते तैसेची रहावे..." असा मित्थ्यावाद जन्माला येतो. प्रयत्नवाद नव्हे तर दैववाद बोकाळतो. याला धर्म नव्हे तर एकुणातील व्यवस्था जबाबदार असते. सारी पापे धर्मावर ढकलुन उपयोग बसतो.
महाराष्ट्री समाज या समाजमानसशास्त्रीय संक्रमणातुन गेला आहे. आणि असे संक्रमण सहसा पुरोगामी नसते तर प्रतिगामी असते.
ते अशासाठी कि आर्थिक स्त्रोतांच्या अभावी मनुष्य जे काही उपलब्ध होते ते समाधानी होवून त्यातच चरितार्थ चालवावा ही मन:स्थीति नकळत बनते. परलोकवादाचा पगडा अशा स्थीतित वाढत जातो. आजही मनुष्य या मुलभुत प्रतिक्रियेच्या बाहेर पडलेला नाही. अमेरिकेत मंदी आला तर रविवारी चर्चला जाणा-यांची संख्या अभुतपुर्व वाढली होती आणि आहे यात सारे काही आले.
बलुतेदारी आणि वेठबिगारी ही (मी महाराष्ट्रापुरतेच लेखन सीमित ठेवत असल्याने) महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचाच बळी घेवुन थांबली नाही तर प्रागतिकता संपवुनच थांबली. समाज नुसता श्रद्धाळु नव्हे तर अंधश्र्द्धाळु बनत गेला. तो प्रतिगामी होत गेला. याच काळात स्त्रीयांची महत्ता संपली. ती अगदी ब्राह्मणी असली तरी शुद्र ठरली. आपल्या नैराश्याचे बळी प्रथम स्त्रीयाच होतात. आपले नैराश्य त्यांच्यावर काढणे सुलभ असल्याने धर्मनियंते काय आणि त्याच नैराश्यात जगणारे सामान्य काय...स्त्रीयांना सर्वस्वी सर्व पापांचे कारण ठरविण्यात सहज यशस्वी झाले यात नवल नाही.
परंतु यात तत्कालीन समाज अधिकाधिक विवाह करणे, पोसता येता येनार नाही एवढे पोरांचे लेंढार वाढवणे यात कमी नव्हताच. एकपत्नीत्वाची रामायणक्रुत ग्वाही तत्कालीन पुराणीक/किर्तनकार देत नसतील असे नाही...पण त्याचे अनुकरण अभावानेच आणि तेही मानसिकतेला परवडत नसल्याने झालेले असेल. खुप पोरे रोगरायांनी मरत असतील म्हणुन वा वंशाला दिवा असावा म्हणुन अधिकाधिक संतती होत होती एवढे म्हनणे पुरेसे नाही...खरे तर स्त्रीभोगेच्छा, तेही तिचे स्वातंत्र्य नाकारत वाढत गेली हेही या प्रतिगामीत्वाचे कारण आहे.
ते कसे? प्रश्न स्वाभाविक आहे. मानसशास्त्र सांगते कि मानवी समाज जेंव्हा पराभुत मनोवस्थेत येतो तेंव्हा तो सर्वप्रथम आपल्याच सोप्या, सहजप्राप्य लोकांवर अत्याचार करायला प्रेरीत होतो. स्त्रीया त्यातीलच एक अत्याचारित घटक बनल्या. महार/मांग/पारधी/रामोशी....असे समाजातील त्यांनीच ठरवलेले त्याज्ज्य आणि आता पुर्वी होते तसे उपयुक्त न ठरणारे घटक त्यांच्या मनोविक्रुत रोषाला बळी पडले. त्यातुनच कालौघात एकामागुन एक नवे असे तत्वद्न्यान प्रस्रुत होत गेले. आणि ते क्रमशा: प्रतिगामी बनत गेले. आणि दुर्दैव असे कि त्याचा प्रतिकार करनारे समाजात अभावानेच उरले असे आपण द्न्यात इतिहासातुन पाहु शकतो.

म्लेच्छांची सेवा करणे हे काही धर्माने मान्य केलेले नव्हते. कलियुगी भारतावर म्लेंछ राज्य करणार ही भविष्यवानी पुराणांनी केली हे खरे पण एकाही पुराणाची रचना मुळात इसपु. २०० पुर्वी झालेलीच नाहीहे. कलिवर्ज्य प्रकरण समजा इसपु ३००१ मद्धे आले असेल तर तदनंतर जवळपास ४००० हजार वर्षांनी ते प्रकरण प्रत्यक्षात कसे लागु झाले बरे? कलियुगाची सुरवात आजचीही ज्योतीश्बास्कर देतातच कि नाही त्यांच्या क्यलेडरमद्धे? पण हे कलिवर्ज्य प्रकरण भारतीय समाजाने इसच्या पहिल्या सहस्त्रकात तरी स्वीकारलेले दिसत नाही. म्हणजे ती लबाडीच होती. किंवा इस्लामी सतांना येथे सुखनैव राज्य करता यावे यासाठी ही तत्वधारा प्रस्रुत केली गेली. हे पाप कोणाचे यावर सहसा चर्चा होत नाही, पण या निमित्ताने तीही व्हावी ही अपेक्षा. पुराणे ही पुरातन नव्हेत तर त्यांत कालौघात १८ व्या शतकापर्यंत भर पडत गेली आहे हे तर आता सिद्धच आहे. म्हणजे मग म्लेच्छांची सेवा कोठुन आली? तेच राज्य करणार अशी सर्वसमाजावर प्रभाव टाकणारी भविष्यवाणी कोठुन आली?
त्यामागे कोणते धर्मकारण होते?
त्यामागे कोणते राजकारण होते?
आणि गावोगावचा ब्राह्मण असो कि कथित क्षत्रीय....या भविष्यवाणीला बळी पडला कि नाही?
प्रश्न महत्वाचे आहेत आणि त्याकडे नीट लक्ष द्यायला हवे.
येथे प्रश्न आहे एके काळी पुरोगामी असणारा, अगदी कथित शुद्रांनाही शेकडो वर्ष सत्ता गाजवू देणारा, जगानेही तोंडात बोटे घालवीत अशा कलाक्रुती/शैलग्रुहे/शिल्पाक्रुती निर्माण करणारा पहिल्या सहस्त्रकातील महाराष्ट्र एवढा प्रतिगामी कसा झाला? सामाजिक अन्यायाच्या परिसीमा त्याने कशा बिनदिक्कतपणे ओलांडल्या?
मला वाटते वरील मी आधीच केलेले विवेचन त्यासाठी वाचकांस विचारप्रेरीत करेल.

(kramasha:)

जगाचे भविष्य आमच्याच हातात!

मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...