Wednesday, October 5, 2011

रा.स्व. संघाचा हिंदु धर्माशी संबंधच काय?

(हिंदू धर्मासमोरील समस्या - 7)


वैदिक धर्माभिमानी जरी आज स्वत:ला हिंदु समजुन घेत असले तरी तसे वास्तव नाही. मुलत: यद्न्यप्रधान वैदिक धर्म आणि मुर्तीपुजकांचा शैवप्रधान धर्म हे पुर्णतया स्वतंत्र धर्म होते व आहेत. हिंदु नावाखाली हे दोन्ही धर्म सध्या एकत्र नांदत असल्याने एक विचित्र धार्मिक गोधळाची परिस्थिती निर्माण केली गेली आहे. त्यामुळे या धर्माच्या समस्यांची उकल होण्याऐवजी त्या वाढतच चालल्या आहेत हे लक्षात येईल. उदा. बराचसा ब्राह्मणवर्ग हा घरात व स्वजातीयांसाठी वैदिक असतो तर बाहेर समाजात शैव वा वैश्णव (मुर्तीपुजक) असतो. कोणी कोनता धर्म पाळावा हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी ब्राह्मणेतर समाज हा अवैदिक परंपरांचाच हिंदु धर्म पाळतो हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. द्विराष्ट्रवादाप्रमाणेच खरे तर हा द्विधर्मवाद वैदिक धर्मियांत जपला जात आहे व त्यातुन मुर्तीपुजक अवैदिक हिंदुंचे शोषण व दिग्भ्रमण केले जात आहे आणि ही चिंतेची बाब आहे.

येथे हे लक्षात ठेवले पाहिजे कि वैदिक धर्मात एकच स्रुष्टीनिर्माता परमेश्वर, आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म. मुर्तीपुजा, संन्यास ई. बाबींना स्थान नाही. येथे वैदिक धर्म चांगला कि वाइट यावर भाष्य अभिप्रेत नाही. कोणी कोणत्या धर्माचे पालन करायचे तो प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु हिंदुत्ववादाच्या नावाखाली नेमका वैदिक धर्माचा व संस्क्रुतीचाच प्रचार प्रसार केला जातो हे मला येथे लक्षात आणुन द्यायचे आहे. आणि त्यामुळेच हिंदु धर्माच्या एकुण विकासातच अडथळे निर्माण झालेले आहेत.

हिंदु धर्माचे रक्षण व विस्तार आणि प्रखर हिंदुराष्ट्रवाद हे दोन मुख्य मुद्दे घेवुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ मद्धे झाली. प्रखर हिंदुत्व हा या संघाचा मुलाधार आहे हे उघड आहे. परंतु रा.स्व. संघाचे हिंदुत्व हे पुर्णतया वैदिकप्रधान हिंदुत्व आहे हे गोळवलकर गुरुजींचे विचारधन नुसते चाळले तरी कोणाही सुद्न्य वाचकाच्या लक्षात येईल. रा.स्व. संघाला वेदमान्य वैदिक महता असणारे हिंदुत्व हवे आहे. रा.स्व. नेहमीच ज्या संस्क्रुतीबाबत बोलत असतो, गौरवगान गात असतो ती संस्क्रुती म्हणजे वैदिक संस्क्रुती होय. सरस्वती नदीच्या काठी वेदरचना झाली म्हणुन सरस्वती देवीचे पुजन हा त्यांच्या विगताच्या आत्मगौरवाचा भाग बनतो, म्हणुन भाजपाच्या सत्ता जेथे येतात तेथे शाळांतुन सरस्वतीपुजन आवश्यक बनुन जाते. वेदांमद्धे सर्व आधुनिक द्न्यान-विद्न्यान ठासुन भरले आहे असे दावे त्यांचे असंख्य साहित्त्यिक/विचारवंत करत असतात. सिंधु संस्क्रुती ही पुर्णतया अवैदिक असुन तिचे अपहरण करण्याचे कार्यही सद्ध्या मोठ्या प्रमानावर चालु आहे. सिंधु संस्क्रुतीचे निर्माते याद्न्यिक वैदिकच होते असे धादांत खोटे त्यांचे विद्वान सांगत असतात. हेच विद्वान एके काळी आर्य सिद्धांत डोक्यावर घेत सिंधु संस्क्रुती आक्रमक आर्यांनी नष्ट केली असे सांगत असत. नष्ट करणारे निर्माते कसे झाले...या बदलामागे वैदिक श्रेष्ठतावाद आहे हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे.

अवैदिक देवतांचे अपहरण हा तर फार मोठा आणि गंभीर विषय आहे. तर्कतीर्थ लक्षमणशास्त्री जोशी शिव या देवतेबद्दल म्हणतात, शिव ही देवता पुर्ण अवैदिक होती. परंतु पुढे वैदिकांनी त्याची ऋग्वेदातील रुद्र या देवतेशी साधर्म्य प्रस्थापित करुन त्या देवतेचा स्वीकार केला. थोडक्यात शिवाचे वैदिकीकरण करण्यात आले. तसेच ते पार्वतीचे आदितीशी तर विट्ठलाचे विष्णुशी तादात्म्य साधत अपहरण करण्यात आले. खरे तर मुर्तीपुजा ही वैदिक धर्माला मुळात मान्य नाही, पण कालांतराने त्यांचे यद्न्यच बंद पडल्याने त्यांना मुर्तीपुजक शैवप्रधान धर्मात यावे लागले. असे करतांना त्यांनी आपली वैदिक धर्मीय पाळेमुळे मात्र पुर्णतया तोडली नाहीत. वेदमाहात्म्य, वेदमान्यता, वैदिक श्रेष्ठत्व, वेदांचे अपौरुषेयत्व ते सतत सांगतच राहिले. पण वेद इतर समाजाचे कधीच नव्हते, त्यांना ते वाचायला-ऐकायलाही बंदी होती यावरुन अन्य समाज हा कधीच वैदिक नव्हता हे सिद्ध करते. यद्न्य म्हणजे अग्नीच्या माध्यमातुन हवी-द्रव्ये-समीधा अर्पण करत अवकाशस्थ देवतांना आवाहन करणे आणि ईष्ट कामना सिद्धीची प्रार्थना करणे एवढाच होता. त्यात काही वावगे आहे असे मी कोठेही सुचवलेले नाही. प्रत्येक धर्माचे एक कर्मकांड असते तसे ते वैदिक धर्माचे होते. पण वेद समाजधारणेसाठी मार्गदर्श्क तत्वे कोठेही सांगत नाही हे वास्तव आहे एवढेच मला स्पष्ट करायचे आहे.

गुढता, सांकेतिकता हा जवळपास सर्वच धर्मांत आढळते हे खरेच आहे. वैदिक धर्मही त्याला अपवाद नाही. दीर्घतमस ऋषिचे सुक्त त्या द्रुष्टीने अभ्यासनीय आहे. परंतू सर्व धर्मांत या सांकेतिकता पुरोहित वर्ग आणतो वा मित्थके तयार करतो ते धर्मविषयक गुढादर वाढवण्यासाठी. जनसमुहाला धर्मनिष्ठ बनवण्यासाठी. तुलनेने ऋग्वैदिक धर्म अत्यंत सोपा होता. प्राचीन काळी तेवढे अवडंबर नव्हते पण पुढे ब्राह्ज्मण कालात (इसपु ८०० च्या आसपास) यद्न्य हे अवडंबरच झाले. वर्षानुवर्ष चालू ठेवावे लागत असल्याने ते खर्चिक बनले. सामान्यांच्या आटोक्याबाहेर गेले. हैहय राजे तर यद्न्य करून कंगाल झाले हा इतिहास आहेच. वैदिक धर्माचे पतन तेथेच सुरू झाले. शेवटचा यद्न्य श्रुंग राजांनी दुसर्या शतकात केल्याची नोंद आहे.

खरे तर ऋग्वैदिक मंत्ररचना कोठेही समाजाला मार्गदर्शक म्हणुन नाही. ऋग्वेद म्ह्णजे जवळपास ६०० देवतांना यद्न्यप्रसंगी आवाहन करणा-या मंत्रांचा (ऋचांचा) संग्रह आहे. इतिहासदर्शक काही सुक्ते आहेत ती फक्त दाशराद्न्य युद्धाशी निगडीत आहेत. थोडक्यात तो निखळ यद्न्यधर्मियांचा एक प्रकारचा प्रार्थनासंग्रह आहे. यद्न्यासाठी या मंत्रांची गरज होती म्हणुन ते बनवलेही गेले. समाजबांधणी करण्यासाठी ते लिहिले असे म्हनण्याऐवजी ती धार्मिक निकड होती असे म्हनणे संयुक्तिक राहील. दुसरे असे कि दुध ते तुप हा क्रम येथे येत नाही. तत्वद्न्यांसाठीच तो फक्त लागू करता येतो...धर्मद्न्यांसाठी नाही, कारण धर्म ही मानवी समाजाला विशिष्ट धार्मिक आचार-विचार व्युहात बंदिस्त करण्यासाठी असतो, तो बव्हंशी बंधनात्मक असतो. उदा. ऋग्वेदात व्रत करणारे व्रात्य, व्यापार करणारे पणी, संन्यास घेणा-या श्रमनांवर तसेच शिवावर यथेछ्छ टीका केलेली आहे. गणपतीला तर मुंजवत पर्वतावर हाकलुन लावण्यासाठीच्या अनेक ऋचा ऋग्वेदात आहेत कारण वैदिक धर्मियांसाठी गणपती (विनायक) हा विघ्नकर्ता होता, विघ्नहर्ता नव्हे. म्हणजेच प्रत्येक धर्म व धर्मद्न्य हा अन्य धर्मियांबद्दल कसा असहिष्णु असतो याचे हे उदाहरण नव्हे काय? अयद्न्य लोकांची, मुर्तीपुजकांची (शिस्नपुजकांची) भरपुर नालस्ती ऋग्वेदात आहे.

थोडक्यात रा.स्व. संघाचा हिंदुत्ववाद हा मुलत: वैदिकवाद आहे हे येथे स्पष्टपणे लक्षात घेणे आवश्यक आहे. ऋग्वेद, सामवेद व यजुर्वेद यांचा मुर्तीपुजक शैवप्रधान हिंदुंशी काहीएक संबंध नाही. हे वेद सरवस्वी यद्न्यांद्वारे आपल्या जवळपास सहाशे देवतांना आहुत्या देत संतुष्ट करत इहलोकी सुखाची कामना करणा-या धर्मियांशी संबंधीत आहेत. वैदिक संस्क्रुती ही सर्वत: स्वतंत्र असुन त्या संस्क्रुतीची पाळेमुळे वेगळी सहज दाखवता येतात. आजही या ६०० तर सोडाच, वैदिकांच्या इंद्र, वरुण, अदिती, मित्र, नासत्य, प्रजापती इ. देवतांची अन्य कोणीही पुजा करत नाही वा त्या देवता महत्वाच्या वाततही नाहीत, त्यांची मंदिरेही कोठे नाहीत.

त्यामुळे रा. स्व. संघाचा हिंदुत्ववाद स्वीकारता येणे शक्य नाही. तो कोणी स्वीकारुही नये. रा. स्व. संघाचा हिंदुत्ववाद हा हिंदु नावाखाली घेतलेला वैदिक बुरखा आहे. इस्लाम-ख्रिस्तीद्वेषाच्या नावाखाली हिंदुंना भयभीत करुन अवैदिक हिंदुंना आपल्या कळपात ओढण्याची ती चाल आहे. रा. स्व. संघाला खरे तर गोहत्याबंदीची मागणी करण्याचा कसलाही नैतीक अधिकार नाही कारण यद्न्यात गोवंशबळी व आहार ऋग्वेदात ठायीठायी आहे. बुद्ध धर्माच्या उदयानंतर गोहत्या वा अन्य पशुहत्या वैदिकांना सोडाव्या लागल्या असल्या तरी आज मुस्लिम लोक गोहत्या करतात त्यांना विरोध म्हणुन धर्म व संस्क्रुतीचे नाव सांगत गोहत्याबंदीची मागणी ते करत असतात. स्त्रीयांबद्दलचा त्यांचा वैदिक द्रुष्टीकोण आजही बदललेला नाही. उदा. रा.स्व. संघात स्त्रीयांना प्रवेश नाही. सती प्रथेचे उदात्तीकरण केले जाते. उद्या हे स्त्रीयांना द्न्यानबंदी पुन्हा घालतील अशी रास्त शंका वाटणे स्वाभाविक आहे. अवैदिक प्रथेतच स्त्रीयांना समता आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.

स्ध्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद चालु आहे असे जे समजतात वा तशा चलवळी करतात त्यांचे आकलन अत्यंत च्घुकीचे आहे. खरा संघर्ष वैदिक विरुद्ध अवैदिक असाच आहे आणि पुरातन काळापासुन हाच संस्क्रुती संघर्ष होता. आता हिंदुत्वाचे नाव घेत जो वैदिक वर्चस्वतावाद वाढवला जात आहे त्याचा प्रतिकार करणे अत्यावश्यक बनुन गेले आहे.

हा लेख संपवत असता मला मागील लेखांवर रा.स्व.संघाबाबत प्रतिक्रिया दिल्या होत्या त्यावर थोडे विवेचन करतो. रा.स्व. संघ आपल्या काही उपसंघटनांमार्फत आदिवासी-वनवासींसाठी खुप काम करतो तर तो वाईट कसा हा तो प्रश्न. खरे तर एक गोष्ट सारे विसरतात ती ही की भारतातील आदिवासींचा हिंदु (वैदिक/अवैदिक मुर्तीपुजाप्रधान) काहीएक संबंध ब्नाही. ते मुळात हिंदुच नाहीत. त्यामुळे ज्या कारणासाठी ख्रिस्ती मिशनरी त्यांचे धर्मांतर करत आहेत त्याच कारणासाठी संघ त्यांचे वैदिकीकरण करत आहे. त्याचा हिंदु धर्माशी वा त्याच्या वाढीशी संबंध नाही. आदिवासींसाठी काम करण्यामागे काही मानवतावादी द्रुष्टीकोन असता तर त्याचे अवश्य स्वागत करता आले असते हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

थोडक्यात संघ, सनातन प्रभात, अभिनव भारत इ. हिंदुत्ववादी संघटना ज्या हिंदुत्वाचा घोषा लावत अवैदिक हिंदुंना फसवत दिशाभुल करत आपल्या वैदिक कंपुत ओढण्याचा प्रयत्न करत असतात त्याबाबत सावध होणे आवश्यक आहे. एका अर्थाने असे केल्याने धर्मांतर्गतचे (दोन्ही धर्मांना एकत्रीत हिंदु म्हटले जात असल्याने...पण ते खरे वास्तव नाही...) धर्मांतर होते आणि त्याला रोखने अवैदिक हिंदुंच्या द्रुष्टीने अत्यावश्यक आहे.



णमोकार मंत्र

णमोकार मंत्र- (पर्यायी नावे- पंच-णमोक्कारा, नमोकार, नवकार, नमस्कार मंत्र)- णमोकार मंत्र जगभरातील बहुतेक सर्व जैन दररोज किंवा कधीकधी अनेक वेळ...