(आज १६ एप्रिल २०१२ रोजी विठोजीराजे होळकर या स्वातंत्र्यप्रेमी उठावकर्त्याला क्रुरपणे ठार मारल्याचा २११ वा बलिदान दिन...हे का आणि कसे झाले यावर प्रकाश टाकणारा हा लेख!)
अन्यायी-अत्याचारी राजव्यवस्थांविरुद्धचे उठाव जगाला नवे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनीही, प्रसंगी आप्तस्वकियांशीही संघर्ष करत मोगल राज्यव्यवस्थेविरुद्ध उठाव करुन स्वराज्याची स्थापना केली होती. सर्वच उठाव यशस्वी होत नाहीत. अयशस्वी बंडखोरांना पकडुन कैदेत टाकने अथवा ठार मारल्याच्या घटनाही अगणित आहेत. परंतु अशाच स्वातंत्र्यासाठी उठाव केलेल्या विठोजीराजे होळकर यांना मात्र जी क्रुरातिक्रुर शिक्षा दिली गेली तिला ग. ह. खरेंसारख्या इतिहास संशोधकानेही "अत्यंत नीच दर्जाचा खुनशी सुड" असे संबोधले आहे, कारण जगाच्या इतिहासात अशी शिक्षा कोनालाही दिली गेल्याचे उदाहरण नाही.
का दिली गेली अशी शिक्षा? काय पार्श्वभुमी आहे या शिक्षेची? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी थोडे इतिहासात जावे लागेल. तुकोजीराजे होळकरांच्या म्रुत्युनंतर होळकरांची सर्व संस्थाने हडपण्याचा दुसरा बाजीराव व दौलतराव शिंद्यांनी घाट घातला. त्याची सुरुवात म्हणुन दुसरे मल्हारराव होळकर या पराक्रमी वारसाची पुणे येथे मारेकरी घालुन १४ सप्टेंबर १७९७ रोजी पुणे येथे मल्हाररावांची हत्या केली गेली. विठोजीराजे व यशवंतराव होळकर या भावंडांना जीव वाचवण्यासाठी अक्षरश: पळुन जावे लागले. सारी होळकरी संस्थाने दौलतरावाने घशात घातल्याने ती पुन्हा जिंकुन घेण्याखेरीज यशवंतरावांसमोर पर्याय राहिला नाही. खानदेशात मुक्कामी असता खुद्द नाना फडनविसाने होळकर बंधुंना साकडे घातले कि बाजीरावाच्या नादानीने रयतेची रया गेली आहे. दौलतरावाचे पेंढारी सर्वत्र रयतेचीच लुट करत आहेत. सामान्य स्त्रीयांचीच काय सरदारांच्या बायकांची अब्रुही शनिवारवाड्यात लुटली जात आहे, तेंव्हा दुस-या बाजीरावास हटवुन अम्रुतरावास अथवा मनास येईल त्यास पेशवा करावे व रयतेला सुखाचे दिवस दाखवावेत. मराठेशाहीत खुद्द पेशवाच लुट करत होता.
स्वत: होळकरांनी हा अन्याय डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला असल्याने व त्या दोघा भावंडांच्या बायका व नवजात मुलेच नव्हे तर होळकरी गादीचा वारस अल्पवयीन खंडेरावही शिंद्यांच्या कैदेत असल्याने त्यांच्याही मनात बाजीरावाबद्दल चीड होतीच. परंतु आधी उत्तर हिंदुस्तान स्वतंत्र करायचा हे यशवंतरावांचे ध्येय असल्याने त्यांनी दक्षीणेची जबाबदारी विठोजीराजेंवर सोपवली. त्यानुसार विठोजीराजे अवघी तीन-चारशे स्वारांची फौज घेवुन पुण्याकडे निघाले. वाटेत त्यांना अनेक असंतुष्ट छोटे-मोठे सरदारही सामील झाले. मग विठोजीराजेंनी एकामागुन एक पेशवे व शिंद्यांची ठाणी ताब्यात घ्यायला सुरुवात केली. कर्नाटक ते पार आंध्रापर्यंत धडका मारल्या. संपुर्ण महाराष्ट्र पेटला. खुद्द अम्रुतराव पेशव्यांनी विठोजीराजेंना सनदा लिहुन दिल्या. नाना फडनविसाचा मागुन पाठिंबा होताच. या प्रकाराने हबकलेल्या पेशव्याने नानाला अटक करुन मग बालक्रुष्ण बावनपागे या सरदारास प्रथम विठोजीराजेंवर पाठवले. परंतु खुद्द बावनपागेंचा बाजीरावाच्या अन्यायी वर्तनाचा रोष असल्याने ते विठोजीराजेंनाच सामील झाले. याशिवाय येसाजी रामक्रुष्ण, बाजीबा व क्रुष्णराव मोदी असे अनेक शिंद्यांचे सरदारही येवुन सामील झाले. या सर्वांचे नेत्रुत्व स्वीकारत विठोजीराजेंनी सोलापुर, करकुंभ, पंढरपुर अशी अनेक स्थाने त्यांनी मुक्त केली. दरम्यान बाजीरावाने सरदार पानशांना विठोजीराजांचे व त्यांना सामील सरदारांचे पारिपत्य करायला पाठवले. पण सोलापुर येथे विठोजीराजांनी पानशांचा पुर्ण पराभव केला. इतका कि पानशांना तोफखाना सोडुन पळुन जावे लागले. हीच गत बाळाजीपंत पटवर्धन या पेशव्याच्या सरदाराची झाली.
आता आपली पेशवाई रहात नाही हे लक्षात येताच बाजीरावाने १८०० च्या डिसेंबरमद्धेच इंग्रज रेसिडेंट क्लोजमार्फत इंग्रजांचे संरक्षण मिळवायचा प्रयत्न सुरु केला. हे समजल्यावर विठोजीराजे अजुनच चवताळले...त्यात नाना फडनविसाला बाजीरावाच्या छळामुळे म्रुत्यु झाला होता. त्याच्या विधवला कैदेत टाकुन त्याची सारी संपत्ती जप्त केली होती. सारी जनता व सरदारही नाराज झालेले होते.
अशात इंग्रजांशी पेशव्याने करार केला तर स्वराज्य बुडाले हे विठोजीराजांना समजत होते. यशवंतराव होळकरही या व्रुत्ताने अस्वस्थ झाले. त्यांच्या सल्ल्याने विठोजीराजे वेगाने पुण्याच्या दिशेने निघाले. बाजीराव हे व्रुत्त समजताच घाबरला. त्याने तातडीने नाना पुरंदरे, गणपतराव पानसे व बापु गोखले या मातब्बर सरदारांना सर्व फौजेनुसार विठोजीराजेंना अटकाव करण्यास पाठवले. मार्च १८०१ मद्धे जेजुरीजवळ उभयपक्षांमद्धे धमासान युद्ध झाले. या युद्धात विठोजीराजेंचा पराजय झाला. त्यांना अटक करुन पुण्यात आणण्यात आले. विठोजींना क्रुर शिक्षा द्यायचा दुस-या बाजीरावाचा बेत आहे हे समजताच नरसिंह विंचुरकर हे मातब्बर सरदार धावत बाजीरावास भेटण्यास आले व विठोजीराजांना मारु नये अशी विनवणी केली. पण रियासतकार सरदेसाई यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे..." परंतु व्यसनांध मनुष्याप्रमाणे बाजीरावाने विंचुरकरांचे म्हणणे झिडकारले...." बाजीराव त्याकाळी सर्वस्वी सर्जेराव घाटगे, बाळोबा कुंजीर व दौलतरावाच्या आहारी गेलेला होता. त्याने विठोजीराजेंना शिक्षा काय द्यायची याची विक्रुत आखणी करुन ठेवलेली होती.
अवघ्या सत्ताविस वर्षांच्या विठोजीराजेंना १६ एप्रिल १८०१ रोजी शनिवारवाड्यासमोर आणले गेले. बेड्या तोडल्या व अपमानित करत मार मार मारले. मग वेळुच्या फोकाने (कमचा) पाठीवर दोनशे फटके मारले. हे द्रुष्य त्यांची पत्नी व कोवळा मुलगा असहाय्यपणे पहात, वर नगारखान्यात बसलेल्या व या द्रुष्याची मौज घेणा-या बाजीरावाला, आक्रोश करत विठोजीराजांचा छळ करु नये अशा विनवण्या करत होती. पुणेकर हतबुद्ध होवुन हे द्रुष्य पहात होते...पण बाजीरावाला दया आली नाही. वेळुच्या फोकाने मारुन झाल्यावर विठोजीराजांना हत्तीच्या पायी बांधण्यात आले...संपुर्ण शनिवारवाड्याभोवती फरफटवत प्रदक्षणा घालण्यात आली. या द्रुष्याचा तत्कालीन एक लेख सांगतो कि एवढा मार बसुन वा फरफटवले जात असतांनाही विठोजीराजांनी कसलीही दयेची भीक मागितली नाही. पुन्हा शनिवारवाड्यासमोर आल्यानंतर जसा बाजीरावाने इशारा केला, हत्तीच्या पायाखाली त्यांचे मस्तक-शरीर चिरडुन त्यांना ठार मारण्यात आले.
ही विटंबना येथेच संपली नाही. आपल्या द्रुष्टीसुखासाठी बाजीरावाने विठोजीराजेंचे छिन्न-भिन्न प्रेत तसेच २४ तास शनिवारवाड्यासमोर उघड्यावर पडु दिले. खरे तर पेशवाईच्या अस्ताची ही म्रुत्युघंटा होती. विठोजीराजांचे क्रियाकर्म त्यांच्या कारभा-यांच्या विनवण्यानंतर करायला परवानगी मिळाली. पत्नीला सहगमन करण्याची परवानगी नाकारुन तिला पुन्हा कैदेत टाकण्यात आले. तिची व आपल्या पत्नीची मुक्तता नंतर यशवंतरावांनी केली.
का?
बाजीराव हा मुळात खुनी राघोबादादाचा पोरगा. राघोबादादाने कोवळ्या वयाच्या नारायणराव पेशव्याचा खुन घडवुन आणला. सवाई माधवराव वेडाच्या भरात आत्महत्या करुन मेला. बाजीरावाचे बालपण कैदेतच गेले...कारण बापाचे पाप. त्याला पेशवाई मिळाली ती दौलतराव शिंद्यांमुळे. दौलतरावही स्वार्थी. समानशीलेशु अशी युती जुळाली. बाजीरावाचा स्वभाव संशयी. तो विषयांध एवढा कि कोणा सरदाराची स्त्री त्याने सोडली नाही. त्याचा सासरा सर्जेराव घाटगेही त्याला स्त्रीया पुरवायचा धंदा करायचा.
अहिल्याबाईंवर चालुन जात त्यांची संस्थाने जिंकुन घ्यायचा अयशस्वी पराक्रम राघोबादादाने केला होताच. त्यांचा व नंतर तुकोजीराजेंचा म्रुत्यु झाल्यानंतर आता तरी होळकरी संस्थाने हडपता येतील हा बाजीराव व दौलतरावाचा होरा होता. त्यासाठी त्यांनी काशीराव या अत्यंत दुर्बळ वारसाला हाती धरत दुस-या मल्हाररावाची हत्या केली. यशवंतराव व विठोजीराजेंना आपण हा हा म्हणता नेस्तनाबुत करु याचा त्यांना विश्वास होता. पण तसे व्हायचे नव्हते. उत्तरेत यशवंतरावांनी शिंद्यांचा धुव्वा उडवायला सुरुवात केली तर इकडे विठोजीराजेंनी महाराष्ट्रात खुद्द पेशव्यावर संक्रांत आणली. शिंदे व पेशव्यांचे जवळपास अकरा सरदार विठोजीराजेंना मिळाले. त्यात नाना सारख्या मुत्सद्द्याचा त्यांना पाठिंबा. असे घडत राहिले तर आपली पेशवाई गेल्यात जमा आहे हे न समजण्याएवढा बाजीराव मुर्ख नव्हता. सन अठराशेत नानाचा त्याच्या छळानेच म्रुत्यु झाला असला तरी नानाचे समर्थक राज्यभर हयात होतेच व त्यांचा अप्रत्यक्ष/प्रत्यक्ष पाठिंबा विठोजीराजेंच्या उठावाला होताच!
विठोजी पराक्रमी आहे हे त्याने अनुभवले होतेच. त्याच्या सरदारांतही गळती सुरु झालेली होतीच. अशात त्याच्या सुदैवाने विठोजीराजे त्याच्या हाती लागल्यानंतर त्याने संपुर्ण उठाव चिरडण्यासाठी या क्रुर हत्येचा निर्णय बाळोबा कुंजराच्या सल्ल्याने घेतलेला दिसतो. पण हा निर्णय त्याला नव्हे...तर स्वराज्यालाच महाग पडला. त्याने अवघा महाराष्ट्र दुखावला. स्वराज्यावरचे लोकांचे प्रेम संपले. महारक्ख समाज तर बाजीरावाच्या भयंकर जाचाने तुटला होताच. यशवंतरावांसारख्या महामानी माणसाला दुखावले...यशवंतरावांनी बाजीरावाला पुण्यातुन पळुन जायला लावले. यशवंतराव दयाळु म्हणुन बाजीराव वाचला...अन्यथा बाजीरावाचा अंत यशवंतराव लीलया घडवुन आणु शकत होते...आणि त्यांना अटकाव करु शकेल अशी शक्ती त्यावेळी इंग्रजांहातीसुद्धा नव्हती...महारक्खांनी मग १८१८ च्या भीमा कोरेगांवच्या लढाईत त्याचा पुरेपुर सुड घेतला... पळपुटा बाजीराव पळत सुटला तो सुटलाच...नारायणरावाच्या भुताने शेवटी त्याला त्रस्त केले. कर्नल मनोहर माळगांवकर म्हनतात...एवढा क्रुर, सुडी, निघ्रुण प्रव्रुत्तीचा पेशवा मराठेशाहीला लाभावा हे मराठी साम्राज्याचे दुर्दैव होय...आणि ते खरेच आहे.
विठोजीराजांना क्रुरपणे मारण्याच्या बाजीरावाच्या या नादान क्रुतीमुळे स्वराज्य एका रयतेच्या हिताची चाड असना-या स्वातंत्र्यप्रेमी महावीरास मुकले. "तुकोजी होळकराचे तिन्ही मुलगे पराक्रमी असता त्यांचा उपयोग बाजीरावाने राष्ट्रकार्यासाठी केला नाही, हे पाहुन उद्वेग वाटतो..." हे रियासतकारांचे मत अत्यंत योग्य असेच आहे. आज या महावीराच्या २११व्या कटु स्म्रुतीदिनानिमित्त विठोजीराजे होळकरांना विनम्र अभिवादन.
-संजय सोनवणी
Sunday, April 15, 2012
Subscribe to:
Comments (Atom)
भवितव्यातील धोके
सध्या ज्या वेगाने कृत्रिम बुद्धिमत्ता प्रवास करते आहे तो वेग असाच भूमिती श्रेणीने वाढत राहीला तर ज्ञानाच्या क्षेत्रात मक्तेदारीची स्थि...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...