Tuesday, April 17, 2012

"पानिपत असे घडले..." संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर या इतिहास संशोधकाचा "पानिपत असे घडले..." हा अत्यंत मौलिक असा ग्रंथ १७ मे २०१२ रोजी ठाणे येथे प्रसिद्ध होत आहे. या ग्रंथाला मी लिहिलेली ही प्रस्तावना.
================================================================

पानिपत युद्धाला यंदा २५१ वर्ष पुर्ण झालीत. हे युद्ध व त्यातील मराठ्यांचा पराजय हा मराठी मनाला लागलेला जिव्हारी घाव मानला जातो. या युद्धात महाराष्ट्रातील घरटी बांगडी फुटली असेही मानले जाते. या युद्धातील पराजयामुळे मराठी साम्राज्याला उतरती अवकळा लागली असेही मानले जाते. असे समजा असले तरी सन १९६१ मद्धे पानपतच्या २०० व्या स्म्रुतीदिनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या त्र्यं.श. शेजवलकर यांच्या ऐतिहासिक संशोधनात्मक ग्रंथांव्यतिरिक्त किती ग्रंथ मराठीत प्रकाशित झाले याचा आढावा घेतला तर निराशाच पदरी पडेल. शेजवलकरांच्या ग्रंथापुर्वी ना. वि. बापटांची "पानिपतची मोहीम", भारताचार्य चिं. वि. वैद्य यांची "दुर्दैवी रंगु" आणि रियासतकार गो. स. सरदेसाई, वि. गो. दिघे, रा. वा नाडकर्णी इ. लेखकांचे काही मोजके लेख वगळता मराठीत या संग्रामाबाबत कसलेही सर्वांगीण विवेचन आढळत नाही, ही एक आश्चर्यकारक घटना आहे. वैद्यांची "दुर्दैवी रंगु" ही एका इंग्रज लेखकाच्या कादंबरीची मराठी आव्रुत्ती आहे व ती पुरेपुर रोम्यंटिसिझमने भरलेली आहे एवढेच. खरे तर पाश्चात्य देशात अशा दुर्दैवी युद्धाचे विविधांगांनी विचार करणारे लेखन झाले असते. वाटर्लू युद्धाबाबत असे शेकडो ग्रंथ फ्रांसिसी इतिहासकारांनी लिहिलेले आहेत.

कै. त्र्यं. शं. शेजवलकरानंतर १९८८ साली विश्वास पाटील यांनी आपल्या "पानिपत" या कादंबरीच्या माध्यमातुन पानिपतचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. या कादंबरीला वाचकांनी डोक्यावर घेतले. आजमितीस या कादंबरीच्या किमान ३३ आव्रुत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत आणि हे कादंबरीकाराचे नि:संशय यश आहे. मराठी बांधवांना पानिपतच्या शोकांतिकेचे अद्भुत आकर्षण आजही आहे हे या निमित्ताने सिद्ध झाले. "पानिपत" कादंबरीच्या अखेरीस विश्वासरावांनी ६१ मराठी, दोन हिंदी, ४७ इंग्रजी संदर्भसाधनांची यादी दिलेली आहे. ही साधने प्रत्यक्ष तपासली असता माझे मत असे बनले आहे कि विश्वास पाटील यांनी शेजवलकरांच्याच ग्रंथाचा (पानिपत:१७६१) मुख्य आधार घेतला असुन बाकी दिलेली संदर्भसाधने वाचायचेही फारसे कष्ट घेतलेले दिसत नाहीत. घेतले असते तर त्यांचे प्रतिबिंब पडुन कादंबरी कदाचित वेगळी बनली असती. थोडक्यात विश्वास पाटील यांची कादंबरी म्हणजे बव्हंशी शेजवलकरांच्याच मांडणीचा कादंबरीमय विस्तार आहे.

खुद्द इतिहासकारांचा शेजवलकरांवर त्यांच्या "पानिपत: १७६१" वर आक्षेप असा आहे कि ते क-हाडे ब्राह्मण असल्याने त्यांचा कोकणस्थ...विशेषत: चित्पावनी ब्राह्मणांवर रोष होता व त्याचा अंश त्यांच्या याही ग्रंथात डोकावतो. हे खरेच आहे. शेजवलकरांचा ग्रंथ हा पक्षपाताने भरलेला आहे. त्यामुळे पानिपतचा इतिहास सांगतांना त्यांनी शाब्दिक कोलांट-उड्या मारलेल्या स्पष्ट दिसतात. उदा. सुरुवातीला भाऊसाहेब पेशव्यावर व त्याच्या योग्यतेवर टीका करणारे शेजवलकर आपल्याच ग्रंथाच्या उत्तरार्धात भाऊच्या प्रत्येक क्रुतीचे समर्थन करतांना दिसतात. हीच री विश्वास पाटील यांनीही ओढली आहे.

इतिहास हा भावनिक नसतो. तो प्रसंगी क्रुर, काटेरी आणि घटनांचे व त्यामागील कारणपरंपरेचे यथार्थ दर्शन घडवणारा असतो...असायलाच हवा. मग कोणाच्या रुष्टतेची वा खुशीची पर्वा नको. परंतु आपले इतिहासकार हे प्राय: भावनिक असल्याने व त्याला जातीय संदर्भ असल्याने पानिपत युद्धाची कारणमिमांसा तटस्थने कोणी केल्याचे उदाहरण नाही. अलीकडेच "पानिपतचा रणसंग्राम" हा सच्चिनानंद शेवडे यांचा ग्रंथही प्रसिद्ध झाला. पण तो अत्यंत जातीविशिष्ट द्रुष्टीकोनातुन लिहिला गेल्याचे अभिप्राय महाराष्ट्र टाईम्स सारख्या व्रुत्तपत्रात आल्याने, दखल घ्यावी असे नाविण्य त्यात काहीच नाही. उलट इतिहासाची मोडतोड आहे.

जर पानिपत युद्धातील पराजयामुळे एवढा हाहा:कार उडाला असा इतिहासकारांचाच अभिप्राय आहे तर त्या युद्धाची विविधांगी सखोल मीमांसा किमान माहाराष्ट्री इतिहासकार, विचारवंत वा कादंबरीकारांनी का केली नाही हा प्रश्न निर्माण होतो. इन मीन चार कादंब-या, एक-दोन नाटके...दोन इतिहास सांगणारे म्हणवणारे ग्रंथ आणि फुटकळ लेख सोडले तर पानिपतची सर्वांगिण चिकित्सा आजवर झालेली नव्हती. याला आपण आपल्याच इतिहासाबद्दलची अनास्था म्हणावे काय? असो.

खरे तर पानिपतचे सर्वांगिण आकलन करुन घेण्यात शेजवलकरांसहित सर्वच इतिहासकार आणि त्यानुकुल कादंब-या लिहिणारे रंजक लेखक कमी पडले एवढेच येथे नमुद करतो.

संजय क्षीरसागरांच्या या प्रस्तुत ग्रंथात असे वेगळे काय आहे कि मी शेजवलकरांसारख्या श्रेष्ठ इतिहासकारावरही टीका करत आहे? याचे उत्तर स्पष्ट आहे. शेजवलकरांना जो जातीय अभिमान होता ज्यापोटी ते भाऊंवर तुटुन पडले आणि नंतर सावरुन घेण्याचा प्रयत्न केला तसे काही या इतिहासकाराने केलेले दिसुन येत नाही. या ग्रंथात अत्यंत तारतम्याने, शेकडो संदर्भ देत, पानिपत युद्धापर्यंतचा आणि नंतरचा प्रवास अत्यंत तटस्थतेने नोंदवत ज्याचे माप त्याच्या पदरी घातले आहे. भाऊवरील जेही आक्षेप इतिहासकारांनी घेतले आहेत, वा कादंबरीकारांनी ज्या आक्षेपांना रोम्यंटिक बनवले आहे, त्यांचा मुळातुन वेध घेत खरे आक्षेप कोणते आणि खोटे आक्षेप कोणते हेसुद्धा पुराव्यांनिशी स्पष्ट केले आहे.

पानिपत युद्धाबाबत अनुत्तरीत प्रश्न अनेक आहेत. त्याहीपेक्षा पानिपतपुर्व...अगदी भाऊ उत्तरेला जायला निघाला तेंव्हा उत्तरेत शिंदे-होळकर काय करत होते...? त्यांनी अब्दालीला कसे सळो कि पळो करुन सोडत तह करायला भाग कसे पाडले? खुद्द भाऊसाहेब पेशव्याला नानासाहेबांनी नेमके काय अधिकार दिले होते? पानिपतच्या पराजयाची नेमकी कारणे काय? पानिपत युद्धातील पराजयामुळे मराठ्यांचा उत्तरेतील प्रभाव खरेच नष्ट झाला काय? या व अशा असंख्य प्रश्नांवर ऐतिहासिक उपलब्ध साधनांच्या आधारे, माझ्या मते, आजतागायत कोणत्याही पानिपतविषयीच्या इतिहासकारांनी मांडणी केल्याचे दिसुन येत नाही. परंतु हा सर्व इतिहास व साधार विवेचन या ग्रंथात आलेले आहे. पानिपत येथील मुक्काम काळात आणि खुद्द पानिपत युद्ध ज्या १४ जानेवारी १७६१ रोजी घडले त्या दिवशीचा साद्यंत व्रुत्तांत ज्या पद्धतीने या तरुण इतिहासकाराने दिला आहे तो अत्यंत प्रशंसनीय असाच आहे. असा प्रयत्न अगदी शेजवलकरांनी वा अन्य कोणत्याही पानिपत इतिहासकाराने केलेला नाही. याबाबत प्रत्यक्ष पुरावे जवळपास अत्यल्प असले तरी त्या धामधुमीचे कालनिहाय वर्णन करत अनेक बाबींवर प्रकाश टाकला आहे. उदाहरणार्थ. शिंदे व होळकर यांची गोलाचा लढाईत गोलाच्या पश्विम बाजुला, हुजुरातीपासुन किमान ३ किलोमीटर दूर नियुक्ती केली होती तर मग जनकोजी शिंदे आणि होळकरांचा महत्वाचा सरदार संताजी वाघ हे हुजुरातीत, एवढ्या धुमश्चक्क्रीतही एवढे अंतर ओलांडुन का आणि कसे आले? भाऊ आणि संताजी वाघ यांची प्रेते शेजारी सापडावी याचा नेमका अन्वयार्थ काय? होळकर खरेच आधीच निघुन गेले असते तर त्यांचाच सरदार संताजी वाघ भाऊसोबत कसा मेला?

प्रश्न एवढेच नाहीत. अनेक आहेत. संजय क्षीरसागर यांनी पानिपत युद्धाच्या संदर्भात जवळपास सर्वच प्रश्नांचा उपलब्ध पुराव्यांच्या प्रकाशात वेध घेतला आहे. तत्कालीन सर्वच पत्रे, बखरी, मराठी ते फारसी साधने यांतील ठिकठिकानी उद्घ्रुते देत, जरी अनेक साधनांत विसंगती असल्या तरी त्या टिपत त्याचेही विश्लेशन करत तर्कबुद्धीने आपले निष्कर्ष वाचकांसोबत ठेवले आहेत.

माझ्या मते आजवर पानिपतबाबत एवढा सखोल संशोधन मांडणारा ग्रंथ झालेला नाही. एकतर शेजवलकरंवर जसा जातीय द्रुष्टीकोणाचा आरोप झाला तसा प्रकार या ग्रंथात कोठेही आढळुन येत नाही. या संशोधकाने उपलब्ध साधनांतुन शक्य तेवढा प्रामाणिक अर्थच काढला आहे. आणि लेखकाचा नि:ष्कर्ष पटला नाही तरी त्यांनी ठाई-ठाई मुळ संदर्भासाधनांतील उद्घ्रुतेच दिली असल्याने प्रत्येक वाचक आपापले निष्कर्षही सहज काढु शकतो...इतिहासकाराच्या मतांशी असहमत राहण्याचा अधिकार राखु शकतो...

आणि यालाच इतिहासलेखन म्हणतात. मी या तरुण इतिहासकाराला शुभेच्छा देतो.
धन्यवाद.

-संजय सोनवणी

भवितव्यातील धोके

सध्या ज्या वेगाने कृत्रिम बुद्धिमत्ता प्रवास करते आहे तो वेग असाच भूमिती श्रेणीने वाढत राहीला तर ज्ञानाच्या क्षेत्रात मक्तेदारीची स्थि...