पाणिनी हा अभिजात संस्क्रुतचा पहिला व श्रेष्ठ व्याकरणकार मानला जातो. हा नेमका कोणत्या काळात झाला याबाबत मतभेद आहेत. एवढेच नव्हे तर पाणिनी हे गोत्रनाम आहे कि व्यक्तिनाम याबाबतही विद्वानांमद्धे एकमत नाही. बौधायनाच्या मते पणिने हे गोत्रनाम असावे. परंतु भट्टोजी दीक्षित यांच्या मते "पणीचे पुरुष अपत्य तो पाणिन तर त्याचा नातु तो पाणिनी." पाणिनीला वाहिक, शालंकी, दाक्षीपुत्र व शालातुरीय अशाही संद्न्या काही उत्तरकालीन वाड्मयात दिल्यचे आढलते. यावरुन पाणिनी हा वाहिक या गांधार देशातील प्रदेशात रहात होता व शालातुरीय हे नांव त्याच्या गांवावरुन पडले असावे असाही अंदाज आहे. शलातुर गांव सध्या लहुर नांवाने ओळखले जाते असाही विद्वानांचा कयास आहे.
इसवी सनाच्या सातव्या शतकात चिनी प्रवासी युवान श्वांग याने शलातुर गांवाला भेट दिली होती. त्याने तेथे पाणिनीविषयक ज्या दंतकथा ऐकल्या त्या अशा:
"अतिप्राचीन काळी सहित्याचा विस्तार मोठा होत. कालक्रमाने त्यांचा -हास झाला. देवांनी मग अवतार घेवून व्याकरण व साहित्य जन्माला घातले. पुढे व्याकरणाचा विस्तार होवू लागला व ते खुप वाढले म्हणुन ब्रह्मदेव व इंद्र यांनी लोकांच्या गरजेला अनुसरुन व्याकरणाचे काही नियम बनवले व शब्दांची रुपे स्थिर केली. पुढे वेगवेगळ्य व्याकरणकारांनी आपापल्या मतांना अनुसरुन वेगवेगळी व्याकरणे रचली. पण त्यांचे सर्वांना आकलन होईना त्याच काळात पाणिनीचा जन्म झाला. ईश्वरदेव नामक प्रकांड पंडिताच्या मार्गदर्शनाने त्याने प्रकांड अभ्यास करुन अष्टाध्यायी हा व्याकरणावरील ग्रंथ लिहिला व पाटलीपुत्र येथील नंद राजाकडे पाठवला."
ही दंतकथा असली तरी नंद राजाच्या नांवाच्या निर्देशामुळे इसपु ४५० (महापद्म नंद) ते सनपुर्व ३०० मधील धनानंद यापैकी तो कोणत्यातरी नंद वंशीय राजाच्या समकालीन असावा असा अंदाज बांधला गेलेला दिसतो.
कथासरित्सागर (मुळचे गुणाढ्याचे पैशाची भाषेत लिहिले गेलेले "ब्रुहत्कथा." ) या ग्रंथात येणारी माहिती खालीलप्रमाणे...
" हर्ष नावाच्या एका आचार्याकडे कात्यायन व पाणिनी शिकत होते. कात्यायन हा कुशाग्र बुद्धीचा तर पाणिनी हा मंदबुद्धीचा होता. यामुळे पाणिनी मागे पडे. याला कंटाळुन पाणिनी हिमालयात निघुन गेला. तेथे त्याने शिवाची घोर तपस्या केली. तपाने प्रसन्न होवून शिवने त्याला प्रतिभाशाली बुद्धी दिली. पाणिनीसमोर न्रुत्य करत शिवाने चौदा वेळा डमरु वाजवून जे ध्वनी निर्माण केले त्यांना अनुसरुन पाणिनीने चौदा प्रत्याहार सुत्रे लिहिली व त्यांनाच आधार घेत अष्टाध्यायीची निर्मिती केली." (कथासरित्सागर १.४)
ब्रुहत्कथेची निर्मिती ही गुणाढ्याने पैशाची या प्राक्रुत भाषेत सातवाहन काळात इसपु पहिले ते इसचे पहिले शतक या कालात कधीतरी केली याबाबत विद्वानांच्या मनात शंका नाही. हा ग्रंथ विंध्य पर्वतराजीत त्याने लिहिला. हा ग्रंथ महाभारतापेक्षा श्रेष्ट असुन मुळ ग्रंथ आज उपलब्ध नाही हा भारतीय साहित्यातील एक फार मोठा अनर्थ आहे असे मत आर्थर ब्यरिडेल कीथ यांनी आपल्या "A History of Indian Literature: Volume 3 -( Page 346) ग्रंथात नोंदवुन ठेवलेले आहे.
येथे मी ब्रुहत्कथेच्या निर्मितीच्या खोलात आताच न जाता, पाणिनीचा कालखंड ठरवण्यावर जास्त भर देवुयात.
वर आपण पाणिनीबाबतच्या दंतकथा पाहिल्या आहेत. स्वत: पाणिनी स्वत:बद्दल कोठेच माहिती देत नाही. पाणिनीबाबत आपल्याला दोनच मुळ स्त्रोत उपलब्ध आहेत ते म्हनजे युवान श्वांगने सातव्या शतकात ऐकलेल्या दंतकथा व इसपु पहिले ते इसवी सनाचे दुसरे शतक या काळात कधीतरी लिहिली गेलेली ब्रुहत्कथा.
कात्यायन व वररुची हे एकच आहेत असे मानण्याचा प्रघात आहे. कात्यायन व पाणिनी एकाच काळातील होते कि वेगवेगळ्या हेही येथे तपासायला हवे.
कात्यायनाची "सर्वानुक्रमणि" ही वररुचीच्याही नांवावर आढलते असे प्रतिपादन फ्रेडरिक म्यक्सम्युल्लर या विद्वानाने आपल्या हिस्टरी ओफ अन्शंट संस्क्रुत लिटरेचर" या १८६० मद्धे प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात केले आहे. याच ग्रंथात म्यक्समुल्लर म्हणतात कि हेमचंद्रांनी आपल्या कोषात कात्यायन व वररुची ही एकाच व्यक्तीची नांवे आहेत. याच कात्यायनाने पाणिनीचे व्याकरण वर्तिका ग्रंथाच्या माध्यमातुन पुर्णही केले व पाणिनीचे दोष वगळत सुधारीत स्वरुपात जगासमोर ठेवले. वररुचीचे प्राक्रुतप्रकाश" हे प्राक्रुत भाषेचे व्याकरणही प्रसिद्ध आहे. किंबहुना प्राक्रुतप्रकाश हा ग्रंथ सिद्ध करुन मग वररुची तथा कात्यायनाने वार्तिका लिहिल्या असे दिसते.
येथे हे लक्षात घ्यायला हवे कि राजतंगिणिचा लेखक कल्हन कात्यायन व पाणिनी हे नंदाच्या समकालीन असल्याचे नमुद करतो.
येथे नंद हा नेमका कोणत्या राजघराण्याचा या प्रश्नात फारसे जावुन उपयोग नाही कारण समान नांवाचे अनेक राजे होवून गेले आहेत. परंतु कात्यायन तथा वररुची व पाणिनी समकालीन होते याबाबत म्यक्समुल्लरला तरी शंका नाही. आणि आपण वर पाहिलेल्या दंतकथा हीच बाब सुचीत करतात.
आता वररुची/ कात्यायन एकच आहेत याबाबत शंका नाही. वररुची तथा कात्यायन हा ब्रुहत्कथेतील महत्वाचे पात्र आहे. गुणाढ्य हा सातवाहनाच्या दरबारातील महत्वाचा कवि होता. त्याने आपला ग्रंथ पैशाची भाषेत सिद्ध केला. यालाही शैव पार्श्वभुमी आहे. या संदर्भातील दंतकथाही आपण पुढे लक्षात घेणारच आहोत. शिवाने पार्वतीला एकांतात सांगितलेली कोणीही न ऐकलेली कथा एका विद्याधराने ऐकली व ते शिवाला समजल्यावर त्याला जो शाप दिला त्यातुन त्याचा मानवी अवतार व त्याने या कथांचे पैशाची भाषेत केलेले रुपांतर अशी ही एकुणातील कथा आहे. पण त्याबद्दल आपण नंतर विचार करुयात.
आपण युवान श्वंगने सागितलेली दंतकथा पाहिलीच आहे. त्याच्या मतानुसार गांधार प्रांतातील शलातुर या गांवी पाणिनीचा जन्म झाला. ही दंतकथा श्वांगने सातव्या शतकात ऐकलेली आहे. म्हनजे तिला फारसे विश्वसनीय मानता येत नाही. पाणिनी जर इसपुच्या पाचव्या वा चवथ्या शतकात जन्माला आला होता असे ग्रुहित धरले तर किमान हजार वर्षांनी श्वांगने ही कथा ऐकलेली आहे. पाणिनी समजा पहिल्या शतकातील असला तरी त्याने ही कथा किमान सातशे वर्षांनी ऐकलेली आहे. भारतात दंतकथांची व स्थानमाहात्म्य वाढवण्याची एकुणातील प्रव्रुत्ती पाहिली तर जसे पांडव जवळपास सर्वच गांवांत येवुन गेल्याच्या दंतकथा असतात तशीच दंतकथा पाणीनीबाबत असंभाव्य म्हणता येत नाही.
त्यामुळे ब्रुहत्कथेतील कथा हीच जवळपास सत्याच्या जवळ जाणारी आहे असे म्हनता येते. कात्यायन व पाणिनी हे समकालीन असून पाणिनीच्या व्याकरणातील दोष कात्यायनाने दुर केले असे म्हणता येते. दुसरे असे कि, "एखाद्या भाषेचे व्याकरण रचण्याचा प्रयत्न करणे ही एक अयोग्य गोष्ट आहे. जी जीवंत भाषा असते तिचे वेगवान स्त्रोत हे ग्रंथांच्या बाहेरच आढळतात. गांवे, जनपदे, नगरे, राजदरबार, शासन व्यवहार, सैन्याची विविध क्षेत्रे, व्यापारी श्रेण्या व निगम, श्रमिकांच्या कर्मशाला ई. क्षेत्रांत नित्य नवे शब्द, लोकोक्ति व म्हणी, वक्यप्रयोग जन्माला येत असतात व ती तोंडो-तोंडी त्या-त्या प्रदेशात प्रसार पावत असतात. नवे व्याकरण लिहायचे असेल तर त्या सर्व शब्दांचा संग्रह करने आणि व्याकरणद्रुष्ट्या त्या सर्व शब्दांना नियमबद्ध करणे आवश्यक आहे. ( भारतीय संस्क्रुती कोश, संपादक पं. महादेव शास्त्री जोशी, खंड पाचवा प्रुष्ठ ५०३)
कात्यायन जर दक्षीण देशी विद्वान होता तर मग पाणिनी नेमका कोठला होता हेही येथे तपासुन पहाणे उचित ठरेल. पाणिनी हा गांधार प्रांतातील शलातुर गांवचा निवासी होता हे युवान श्वांगचे मत आपण पाहिले आहेच. प्रश्न असा पडतो कि त्या काळी (पहिले शतक असो कि इसपुचे पाचवे शतक) गांधार प्रांताची नेमकी भाषा काय होती? जोही ज्या प्रदेशात जन्म घेतो तेथील प्रचलित भाषा हीच प्रत्येकाची मात्रुभाषा असते. मग या प्रांताची या कोणत्याही निर्दिष्ट काळी नेमकी काय भाषा होती? समजा त्याकाळी या प्रदेशतील भाषा संस्क्रुतच होती तर आता तेथे ती भाषा अवशिष्ट तरी आहे काय?
प्रचीन बुद्धीष्ट ग्रंथ हे गांधार प्रांतातील प्राक्रुत भाषेला "गांधारी" भाषा असे उल्लेखतात. ही भाषा खरोश्टी लिपीत लिहिली जात असे. या प्रांतात बुद्धिझम इसपु ३०० च्या आसपासच पसरला होता. आजही या भाषेची अवशिष्ट रुपे हिंदको वा कोहिस्तानी या भाषांच्या रुपात अवशिष्ट आहेत. संस्क्रुताचे मात्र अस्तित्व नाही. समजा पाणिनी हा इसपु च्या चवथ्या वा पाचव्या शतकात जरी झाला असता तरी त्याने जे व्याकरण लिहिले असते ते अस्तित्वातील भाषेचे. समजा तेंव्हा संस्क्रुत हीच महत्वाची भाषा होती तर केवळ दोनशे वर्षांत संस्क्रुत त्या भागातुन कशी नामशेष झाली याचे उत्तर यातुन मिळत नाही. बरे, गांधारी भाषेची अवशिष्टे पाणिनीच्या व्याकरणात आहेत हेही खरे आहे. परंतु गांधार प्रांताला लागुन असलेल्या, व ऋग्वेद ज्या मुळ भाषेत लिहिला गेला होता त्या व्रचदा प्राक्रुताचा तो खरा प्रभाव आहे. सिंध प्रांत आणि गांधारच्या सीमा लागुन असल्याने अनेक भाषिक साधर्म्ये या भाषांत असणे स्वाभाविक आहे, जसे हे जगभर आढळते.
पाणिनी हा मुळचा गांधार प्रांततील असुच शकत नाही हे त्याच्याच शिवसुत्रांवरुन सिद्ध होते. शिवसुत्रांना महेश्वर सुत्रे असेही म्हणतात. उलट तो दक्षीणेतीलच होता व त्याचा काळ इसपुच्या पहिल्या शतकापार जावु शकत नाही हे सिद्ध होते. अर्थात त्याबाबत पुढील प्रकरणात.
-संजय सोनवणी.