Monday, May 21, 2012

धनगरांचा वाली कोण?






आज सुखा-समाधानाने नांदत असलेल्या सर्वच जागतीक संस्कृत्यांचे व धर्मांचेही निर्माते म्हणजे पशुपालक समाज. भारतात त्यांना आपण धनगर, गवळी असे संबोधतो. ऋग्वेदाचे निर्माते हेही पशुपालकच होते. येशु ख्रिस्ताला प्रेमपुर्वक "मेंढपाळ" असेच म्हटले जाते. हजरत पैगंबरही पशुपालकच होते. अगदी महाभारत जरी पाहिले नंद ते विदर्भराज विराट असे अनेक राजे आणि खुद्द कृष्ण हे गवळीच होते. सातवाहन हे औंड्र वंशीय धनगरच. महाराष्ट्रातील गड-कोट, लेणी यांची संकल्पना व निर्मितीची सुरुवात केली ती सातवाहनांनीच. फार कशाला अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विट्ठल व खंडोबा हेही धनगरांचेच दैवतप्रतिष्ठा प्राप्त करुन बसलेले सम्राटच. होळकरांनी शुन्यातुन विश्व उभारत जी एक राष्ट्रीय भावना जोपासली तीही अद्वितीयच. हा समाज देशभर पसरलेला. कोठे त्यांना धनगर म्हणतात तर "र" चा "ड" उच्चार स्थानिक भाषाभेदाने होतो म्हणुन कोठे धनगड, कोठे गडरिया तर कोठे फक्त पाल....नांव काहीही असो...व्यवसाय एकच व तो म्हनजे शेळी-मेंढीपालन व तदनुषंगाने येणारे व्यवसाय...म्हणजे घोंगड्या बनवणे वा खाटिकपणा करने. या व्यवसायवाटणीमुळे या समाजात जवळपास २२ पोटजाती बनलेल्या आहेत. ते समजा हिंदु समाज रचनेत स्वाभाविक असले तरी वर्तमानात त्याचे संदर्भ हरवले असल्याने खरे तर या पोटजातींत काहीएक अर्थ उरलेला नाही, पण महाराष्ट्रात एकुण लोकसंख्येच्या जवळपास १५-१६% असणारा हा समाज आपापसातीलच विखुरलेपनामुळे अवनतीला जावुन पोहोचला आहे.

या अवनती नुसत्या शैक्षणिक नाहीत. आर्थिक नाहीत. नुसत्या राजकीय नाहीत. खरी समस्या आहे ती ही कि हा समाज आत्मभानच हरपुन बसला आहे. राजकीय, आर्थिक, शैक्षणिक दारिद्र्यावर मात करता येते वा आहे ते जीवन सुखनैव कंठता येते. पण आत्मभानाचेच दारिद्र्य आलेला समाज कशावरही आणि कधीही मातही करु शकत नाही आणि सुखनैव, आहे त्या स्थितीतही, जगुही शकत नाही.

धनगर समाजाची नेमकी हीच अवस्था झाली आहे.



का व्हावे असे?



१. राजकीय विखुरलेपन: धनगर समाजाचे स्वत:चे असे राजकीय तत्वद्न्यान उरलेले नाही. कोणी आज शिवसेनेत असतो तर उद्या बीजेपीत. कोणी राष्ट्रवादीला आज गळामीठी घालतो तर तोच उद्या तो कोणत्याही पक्षात असु शकतो. कोणी आरेसेस मद्धे तर कोणी संभाजी ब्रिगेडमद्धे आपले कडवेपण अजमावतो. यामुळेच महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला खुद्द सर्व धनगरांचा पाठिंबा नाही. पोटजातींमुळे खुद्द मल्हाररावांचा जयंती कार्यक्रम सपशेल फसतो...का तर मल्हारराव वेगळ्या पोटजातीचे, कार्यक्रमाचे आयोजक त्याच पोटजातीचे...मग आम्हाला काय घेणे? असे असता मग यशवंतराव, विठोजीराव, भीमाबाईंची गत काय?

या प्रत्येक पोटजातींच्या संघटना आहेत. यांचे अलौकिक कार्य म्हनजे वधुवर मेळावे. जणू लग्ने जुळवणे एवढेच महत्कार्य आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रबोधन करणे हेही एक कार्य असते हेही भान या संघटनांना उरलेले नाही.

या राजकीय व सामाजिक विखुरलेपनामुळे यांच्या हाती काडीएवढीही सत्ता नाही. सामाजिक प्रभाव नाही. किंबहुना यांनी विखुरलेले राहणे सत्ताधारी गटांनाही गरजेचे आहे त्यामुळे त्यांना काय घेणे आहे? स्वत:लाच आपण कोनत्या खड्ड्यात चाललो आहोत हेच समजत नाही तर खंडोबारायाही यांना वाचवू शकत नाही.

२. आधुनिकतेची कास नाही: मला हे खेदाने नमुद करावे वाटते कि अनेक उपटसुंभ नेते या समाजात आहेत. सरकारकडे मागण्या करण्यात त्यांना आनंद वाटतो...पण एकही मागणी अभ्यासपुर्ण नसते...केली तर पाठपुरावा नसतो...जे करतात त्यांच्याही पाठीशी हे उभे रहात नाहीत. औरंगाबादचे देठे साहेब उतारवयातही शेकडो कागदपत्रे जमा करत महाराष्ट्रातील धनगरांना शेड्युल्ड ट्राइब्जमद्धे घ्यावे कारण मुळात तो केंद्र सरकारचा निर्णय आहे, असे सिद्ध करत एकाकी लढा देत आहेत. जेही धनगर आमदार सध्या आहेत त्यांनी या बाबत कसलाही प्रयत्न केलेला नाही. किंबहुना त्यांना या प्रश्नाचे महत्वच समजत नाही. धनगड हा शब्द धनगर असाच वाचावा असा केंद्र सरकारचाच अध्यादेश सांगतो...पण महाराष्ट्र सरकार तो मानायला तयार नाही. आपल्याच समाजाच्या घटनात्मक अधिकारांसाठी झगडावे ही बुद्धी यांच्या विद्यमान आमदारांना वा होतकरु वा विकावु नेत्यांना नाही. जर देशभर धनगर समाज हा एस. टी. मद्धेच आहे तर महाराष्ट्रात का नाही? यामागे विद्यमान सत्ताकेंद्रांची अडचण आहे, म्हणुन ते तांत्रिक मुद्द्यांवर या विषयाला टाळतात...टाळतात म्हनण्यापेक्षा आपली मागणी कशी सातत्याने पुढे न्यायची हेच या समाजाला माहित नसल्याने मग त्यांनाही काहीएक हालचाल करण्याची गरज पडत नाही.

३. धनगर समाजातील हजारो कुटुंबे अत्यंत हलाखीचे भटके जीवन जगत आहेत. आनंद कोकरेंसारखे अत्यंत उमदे, विचारी तरुणही जेंव्हा मी आपली मेंढरे या शेतातुन त्या शेतात घेऊन जात असतांना पहातो...दिडशे मेंढरे शेतात बसवली तर फक्त १०० रुपये दिवसाला मिळवतांना पहातो...काही गांवकरी त्यांच्याशी किती दुष्टतेने वागतात हे ऐकतो तेंव्हा मी अस्वस्थ होतो. लांडगे, तरस मेंढरांची शिकार करायला येतात तेंव्हा याच बहाद्दराने गोफणीच्या मा-याने त्यांचा कसा सामना केला हे ऐकतो तेंव्हा या बहाद्दराचे कवतुकच वाटते.

पण...जीवावरची संकटे झेलत, उन-वा-यात...धो-धो पावसात उघड्यावरचे जीवन जगतांना पाहुन मला यातना होतात.

आजकाल ब-याच समाजांच्या दयनीय स्थितींबद्दल लिहिले जाते, बोलले जाते...पण या समाजाच्या हलाखीचे विवेचन कोणी करतांना सापडनार नाही. आजचे धनगर श्रीमंतच आहेत असा भ्रम अनेकांत असल्याचे मी पाहतो, ऐकतो. हा भ्रम आहे, आजचे वास्तव नाही, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

अनेक कायदे, औद्योगिक वसाहती स्थापत सरकारने चरावु कुरणेच नष्ट केलीत...वनखात्याने आपल्या जाचक नियमांनी मेंढरांना चरायला जागाच ठेवली नाही. रासायनिक खतांना चटावलेले शेतकरी शेतात मेंढरे बसवत सेंद्रीय खत मिळवण्यास फारसे उत्सुक नाहीत...हा व्यवसाय संकटात आला आहे. जगणे कठीण झाले आहे. भटकायचे मेंढरे घेवून, पण जायचे कोठे?

पण...

याच धनगरांना स्थिर मेंढीपालन कसे करावे, व्यवस्थापन कसे करावे हे कोण शिकवणार?

नाबार्डच्या अनेक योजना या व्यवसायासाठी आहेत...पण त्यांचा फायदा घेणारे व बुडवणारे लोक अन्यच आहेत...पण अर्धा टक्का धनगरांनीही या योजनांचा फायदा घेतला नाही...कारण अशा योजना आहेत हेच त्यांना माहित नाही. आणि त्या त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचवतही नाही.

शेळी-मेंढी विकास महामंडळ अशा तत्सम नांवाचे एक कागदोपत्री महामंडळ आहे. हे नेमके काय करते? प्रश्न निरर्थक आहे कारण ते काहीच करत नाही. एखाद्या धनगर नेत्याची वर्णी अध्यक्षपदी लागली आणि अहिल्यादेवी वा मल्हाररावांचे नांव असले कि संपले...अशी वृती कसे यश देईल? या महामंडळाने व्यापक कार्य करावे, पशुपालन व्यवसायात आधुनिकता आणलीच पाहिजे असे प्रबोधन करत प्रशिक्षण देणे अभिप्रेत असतांनाही, मुळात निधीच नसल्याने काहीएक कार्य होत नाही. तसा पुरेसा निधी मिळावा यासाठे संघर्ष करत व खरोखर आहे त्या व्यवसायात बदल घडवुन अर्थक्रांती घडवुन आणावी अशी इच्छा वा दृष्टी जर या नेतृत्वातच नसेल तर अन्य समाजीय नेते काय म्हणुन यांच्या पाठीशी उभे राहतील?

जर असेच घडत राहिले तर हा मेंढपाळी पुरातन उद्योग अन्य बलाढ्य भांडवलदारांच्या हाती जाणार यात शंका नाही. खरे तर जगाच्या अंतापर्यंत हा उद्योग टिकणारच आहे, कारण त्याची गरज आहे. फक्त हा उद्योग धनगरांच्या हातुन निसटला असेल, कारण परंपरागत पद्धतीने ते कधीही या व्यवसायात टिकु शकणार नाहीत. अनेक कंपन्या सध्या आधुनिक पद्धतीने या व्यवसायात उतरु लागल्या आहेत. यात बोगस कंपन्यांचीच संख्या जास्त आहे. पण उद्या यात अवाढव्य भांडवलदार उतरणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. रिलायंससारख्या कंपन्या जर भाजी-पाला विकण्याच्या धंद्यात पडु शकतात तर ते मांसाची गरज भागवण्यासाठी पशुपालनात उतरणार नाहीत हे म्हनणे तद्दन वेडेपणाचे लक्षण आहे.

थोडक्यात धनगर समाजाला अर्थक्रांती घडवायची असेल तर सर्वप्रथम पशुपालन परंपरागत पद्धतीने न करता आधुनिक व्यवस्थापनाची जोड देत स्थिर पशुपालन करायला लागणार आहे. बाजारपेठेचे गुलाम न होता मांस व लोकरीची बाजारपेठच ताब्यात घ्यावी लागणार आहे. यात अवघड काहीच नाही. फारशा भांड्वलाचीही गरज नाही. लागणार आहे ती फक्त मानसीक तयारी.



मल्हारराव, यशवंतरावांनी शुन्यातुन साम्राज्ये उभी केली हा ताजा इतिहास आहे. ते यशस्वी झाले कारण धोके पत्करण्याचा, आधुनिकतेची कास धरण्याचा स्वभाव व दुरदृष्टी...

आज ती कोठे गेली आहे? त्यांचे नांव घेत जयंत्या-पुण्यतिथ्या साज-या तर करायच्या पण अनुकरण काहीएक करायचे नाही, त्यांच्यापासुन काही शिकायचे नाही, हीच वृत्ती राहिली तर या समाजाचे सर्वच आघाड्यांवर "पानिपत" होणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.



जो समाज आपल्याच कोषात जगतो, गतकालीन वैभवातच फक्त रमतो, त्या समाजाला वर्तमानही नसतो आणि भविष्यही...हे माझ्या धनगर बांधवांनी समजावुन घ्यावे ही कळकळीची विनंती आहे.

उठा...जागे व्हा...आधुनिकतेच्या काळात पाय ठेवा...

भविष्य तुमचेच असेल!

फक्त तुम्हालाच तुमचे वाली व्हावे लागेल...



भवितव्यातील धोके

सध्या ज्या वेगाने कृत्रिम बुद्धिमत्ता प्रवास करते आहे तो वेग असाच भूमिती श्रेणीने वाढत राहीला तर ज्ञानाच्या क्षेत्रात मक्तेदारीची स्थि...