हा लेख केवळ एक सांगायचे म्हणुन. एका मित्राने माझ्या एका लेखावर प्रतिक्रिया देतांना विचारले कि "तुम्ही "God" वर विश्वास ठेवता का?" तेही एका शब्दात...हो अथवा नाही. मी नाही असे लिहिले. ते खरेच आहे. या यच्चयावत विश्वात मनुष्यावर पुजा-प्राथना-यद्न्यादि कर्मकांडाने संतुष्ट होईल आणि तुमच्याबाबत दयाळु अथवा शापाळु देव/परमेश्वर मुळात कधी अस्तित्वातच असु शकत नाही. हे मी माझ्या ब्रह्मसुत्र रहस्य या ग्रंथात अधिक स्पष्ट केले असले तरी त्याबाबत येथे थोडेसे.
मी जेंव्हा परमेश्वरावर विश्वास ठेवत असतो तेंव्हा तो केवळ आणि केवळ माझ्यावर विश्वास ठेवत असतो कारण मीच परमेश्वर आहे. मीच देव आहे.
माझ्याबाहेर कोणीतरी देव आहे आणि तो माझ्यावर सत्ता चालवतो, आपल्या इच्छेनुसार माझे जीवन घडवतो हे मला मुळीच मान्य नाही. मुळात असा इश्वर अस्तित्वातच असु शकत नाही ही माझी खात्री आहे. मी का मी आहे आणि मी तसा का नाही हे फालतु प्रश्न मला कधीच पडत नाहीत कारण मी एक वैश्विक अपघातातुन निर्माण झालेली व्यक्ती आहे. त्यामागे कोणाचे काही नियोजन वा पुर्वप्रयोजन होते असे मानत नाही कारण मुळात ते वास्तव नाही.
मी कोणताही धर्म मानत नाही. धर्म हे मानवाला गुलाम करण्याचे पुरातन साधन आहे. मी सर्वच धर्मांची चिकित्सा करतो ते त्यांची मानवी जीवनातील वास्तव स्थाने दर्शवण्यासाठी. वस्तुत: तत्वद्न्यान नाही तोच धर्म असतो आणि ज्यालाही तत्वद्न्यान आहे ते धर्म नसुन गुलामीच्या बेड्या आहेत असेच मी मानतो.
मी आहे म्हणुन हे विश्व आहे. मी नसेल तेंव्हा हे विश्व अस्तित्वात असणार नाही. मी एक भ्रम आहे म्हणुनच हे विश्वही एक भ्रम आहे. हे विश्व आणि मी एकच असुन मी आहे म्हणुन विश्व आहे यावर माझा विश्वास आहे. विश्वाने मला निर्माण केले नसुन मीच माझ्यासाठी हे विश्व निर्माण केले असल्याने परमेश्वर मीच आहे.
प्रत्येक जीवमात्र ते जडवस्तुंसाठी हेच अंतिम सत्य आहे. कारण त्या जडवस्तुही मीच आहे आणि सजीवही मीच आहे.
काळ हा पुढुन मागे येतो आणि आम्ही मागुन पुढे जातो. तेंव्हा भुतकाळ हा फक्त भावनीक-मानसीक असुन काळ ही राशी अंतर्विरोधाने भरलेली आहे. काळाचे अस्तित्व आहे म्हणुन आम्हाला जीवंत असल्याचा आभास मिळतो...पण आम्ही जीवंत आहोत असे मुळात कशावरुन? काळ ही राशी वजा केली तर आम्ही जीवंत नसुन फक्त आभास आहोत एवढेच सत्य प्रतीत होते.
पण आम्ही जीवंत आहोत अशा भासात का होईना आम्ही आहोत तर मग तो भासमय काळही आम्हीच आहोत आणि आम्हीच महांकालेश्वर आहोत.
मी महांकालेश्वर आहे कारण माझा माझ्या परिप्रेक्षातील काळ मीच आहे. तुम्ही तुमच्याच काळाच्या सीमेत आहात. तुम्ही तुमचे इश्वर आहात तर मी माझा इश्वर आहे.
काळ पुढुन मागे येतो कि मागुन पुढे जातो याची चर्चा कशाला?
कारण त्याचे अस्तित्वच मुळात भासात्मक आहे.
तेंव्हा मीही भासात्मक आहे...तुम्हीही भासात्मक आहात...आणि इश्वर हाही एक भास आहे.
मी इश्वर आहे.