श्री. प्रशिल पाझारे या माझ्या मित्राने पुस्तक प्रकाशन व Copyrights संदर्भात काही प्रश्न विचारले आहेत. सर्व होतकरु लेखकांना उपयोग होईल म्हणुन मी येथे त्या प्रश्नांची उत्तरे देत आहे.
१. कोपीराइट म्हणजे काय? यालाच लेखकाचे स्वामित्व अधिकार म्हणतात काय?
- होय. copy right शब्दाचा हाच मराठी अर्थ आहे. लेखक जे सृजन करतो ते प्रसिद्ध/प्रकाशित होताच लेखकाचे त्या कृतीवर स्वामित्व अधिकार आहेत असे मानले जाते. अनेक लेखक Indian Copyright Act 1957 अन्वये आपल्या लेखनाचे स्वामित्व अधिकार पुस्तक प्रकाशित होण्यापुर्वी नोंदवुन घेतात. विशेषत: इंग्रजीत लिहिणारे लेखक. प्रादेशिक भाषांतील लेखक जवळपास या भानगडीत पडत नाहीत. याचे कारण म्हणजे मर्यादित बाजारपेठ. नोंदणीची खर्चीक प्रक्रिया. शिवाय लेखन प्रसिद्ध होताच आपोआप लेखकाकडेच स्वामित्वाधिकार येत असल्याने समजा उद्या कोणी त्यातील कथेची, भागाची चोरी केली तरी कायदेशीर अधिकार सुरक्षेत असल्याने असे चौर्य करणा-या व्यक्तीला (दुस-याचे लेखन जसेच्या तसे वा काही भाग बदलत) न्यायालयात खेचु शकतो.
२. लेखकाने आपली कोणतीही रचना प्रकाशित करतांना कोणती काळजी घ्यावी?
-येथे आपण स्वत: प्रकाशित करत आहोत कि प्रकाशकामार्फत यावर आधी चर्चा करुयात. समजा स्वत: जरी प्रकाशित करत असाल तर नेहमी अशा स्वयं-प्रकाशकाकडुन साधारणपणे खालील चुका हमखास होतात ज्या टाळायला हव्यात.
अ. लेखनाचे संपादन त्या त्या क्षेत्रातील माहितगाराकडुन करुन घ्यावे. केवळ ओळखीचा आहे म्हणुन नको.. त्याच्या सुचनेप्रमाने बदल, पुनर्लेखन करावे...यात कंटाळा करु नये.
ब. पुस्तकाचा आकार (डेमी अकि क्राउन...)तो ठरवावा. यासाठी मुद्रकाचे मार्गदर्शन घ्यावे.
क. पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे चित्र. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यामुळे पुस्तकांचीच कव्हर्स करतात अशाच चित्रकाराकडे ते काम द्यावे. आधी त्याला ३-४ नमुना चित्रे बनवुन द्यायला सांगुन, त्यातील निवडुन मगच सुचना करत अंतिम चित्र बनवायला सांगावे.
ड. छपाई व पुस्तक बांधणी आजकाल सर्वच मुद्रक करत असल्याने ज्याला पुस्तके छापण्याचा अनुभव आहे अशाच मुद्रकाला छपाईचे काम द्यावे. तत्पुर्वी मुखपृष्ठ व आतील कागदाबाबत निर्णय घ्यावा. बाजारात विविध किंमतींचे/दर्जाचे कागद उपलब्ध असतात. ती माहिती व आपण कोनत्या प्रकारचे कागद वापरायचा याचा निर्णय घ्यावा.
हे सर्व करत असतांना, किंबहुना प्रकाशन करण्यापुर्वीच आपण आपले पुस्तक कसे विकणार याचा विचार करायला हवा. एकच पुस्तक असेल तर ते वितरण करण्याचाच खर्च मोठा. वसुली जवळपास अशक्यप्राय असते हे येथे लक्षात घ्यावे. अधिक कमिशनने पुस्तके घेवुन विकनारे काही विक्रेते आहेत....पण मग ते किमान ८५ ते ९०% कमिशन मागतात. शिवाय संपुर्ण आव्रुत्ती (जी मराठीत १०००चीच असते) विकत घेत नाहीत. त्यामुळे स्वत:च्या मित्र-परिवारात/ओळखीत आपण किती प्रती विकु शकतो याचा किमान अंदाज घ्यायला हवा. आपले पुस्तक बेस्ट सेलर असणार हा विश्वास प्रत्येक लेखकाचा असतो, पण ते वास्तव नसते.
समजा तुम्हाला अन्य व्यावसायिक प्रकाशकाकडुन पुस्तक प्रकाशित करायचे असेल तर:
अ. आपल्या लेखनाचा विषय कोणता, तशा विषयाशी संबंधीत पुस्तक प्रकाशित करणारे प्रकाशक कोनते याची माहिती घ्यावी व त्यांनाच हस्तलिखित पाठवावे. मुळ प्रत कटाक्षाने आपल्याकडेच ठेवावी.
ब. प्रकाशक निर्णय द्यायला भरपुर वेळ घेतात. त्यांच्याकडे आधीच हस्तलिखिते भरपुर येत असतात. त्यांचा सातत्याने पाठपुरावा केला तर तुमचे पुस्तक प्रकाशित न होण्याचाच धोका असतो. प्रकाशक एकतर स्वत: वाचतो वा अन्य तद्न्यांकडुन वाचुन घेवुन अभिप्राय घेतो. त्यासाठी त्याला पुरेसा अवधी देणे आवश्यक असते.
क. तुमचे हे पहिलेच पुस्तक असेल, तुमचे अन्य क्षेत्रातही नाव प्रसिद्ध नसेल तर प्रकाशक स्वखर्चाने पुस्तक प्रकाशित अत्यंत अपवादात्मक स्थितीत करतात. (आत्मचरित्र, चरित्र ई. प्रकारांत ही शक्यता फारशी नसते...पण मग त्या लेखनात ताकदही तेवढीच हवी.) एक तर ते पुस्तक प्रकाशित करायला नकार देतात वा लेखकाकडे १००% ते किमान ५०% प्रकाशन खर्च उचलण्याची अपेक्षा बाळगतात. मराठीत पुस्तक कितीही (कथा-कादंबरी) कितीहे चांगली असली तरी पहिली आवृत्ती संपायला किमान ३ वर्ष लागतात. भरपुर प्रसिद्धी केली तरी दीड वर्ष लागते. कवितांना बाजारपेठ नाही. त्यामुळे प्रकाशक नवीन लेखकांत आपली गुंतवणुक करणे शक्यतो टाळतात.
ड. प्रकाशकाशी, ज्याही अटींवर पुस्तक प्रकाशित केले जाणार असेल, त्या अटी-शर्तींचा करार करावा. प्रकाशक ओळखीचा असेल तर तसे करण्याची गरज नाही...उदा. मी आजतागायत एकाही प्रकाशकाशी करार केलेला नाही.
इ. लेखकाला (कथा-कादंबरी-आत्मचरित्रात्मक लेखक) मानधन (पहिले ते किमान पाचवे पुस्तक प्रसिद्ध होईपर्यंत) मिळत नाही. लेखनावर मराठीत कोणी लेखक जगु शकत नाही. लेखकाच्या म्हणुन १५ प्रती देण्याची प्रथा अहे. पुढे प्रती लागल्यास त्या विकत घ्याव्या लागतात.
फ. पहिली आवृत्ती संपल्यानंतर प्रकाशकाला पुढील आवृत्ती काढण्याची लेखकाची परवानगी घ्यावी लागते. समजा लेखकाला प्रकाशक बदलायचा असला तर त्यानेही प्रकाशकाची परवानगी घ्यायला हवी.
कोणत्या मार्गाने जायचे हे प्रत्येक लेखकाने ठरवायला हवे.
३. प्रकाशनाचे सर्वाधिकार तो करार पद्धतीने विकू शकतो काय? त्याची गरज काय?
- तो नक्कीच विकु शकतो. अर्थात तुम्ही नवलेखक असाल तर तसे सर्वाधिकार मुळात कोणी विकत घेणार नाही. प्रसिद्ध लेखक आर्थिक कारणांमुळे वा नंतर कोणी वारसच नसेल तर सर्वाधिकार विकतात. उदा. जी. ए. कुलकर्णींनी आपल्या सर्वच साहित्याचे सर्वाधिकार विकले होते.
४. आय.एस.बी.एन. (ISBN) बद्दल आपण विचारले आहे. या पत्त्यावर त्यासाठी अर्ज करावा लागतो. Raja Ram Mohan Roy National Agency for ISBN, West Block - 1, Wing-6, 2nd Floor, Sector - 1,R.K. Puram, New Delhi - 110 066.
या दुव्यावर अर्जाचा नमुना आहे. http://mhrd.gov.in/sites/upload_files/mhrd/files/isbnproforma-revised.pdf
आय. एस. बी. एन. चा विस्तार "इंटरन्यशनल स्ट्यंडर्ड बुक नंबर" असा होतो. जगभर प्रसिद्ध होना-या पुस्तकांची स्वतंत्र ओळख असावी म्हणुन हा नंबर घेतला जातो. यासाठी कोणीही (लेखक, प्रकाशक, शैक्षणिक संस्था ई.) अर्ज करु शकतो. यासाठी संस्था कसलाही चार्ज आकारत नाही.
५. सर्वात महत्वाचे म्हणजे ही सारी सव्यापसव्ये करण्यापुर्वी आपल्या लेखनाचा दर्जा खरोखर कसा आहे याचे तटस्थ मुल्यांकण करता आले पाहिजे अथवा अन्य वाचकांची मते विचारात घ्यायला पहिजे. नंतरच या कामाला लागावे, अन्यथा पैसे व वेळ वाया जाण्याचीच शक्यता अधिक असते.
फरसा खर्च करायचा नसेल तर ई-बुक हा सध्यचा आधुनिक प्रकाशन प्रकार आलेला आहे. अजुन तो एवढा व्यापक झाला नसला तरी भविष्यात ई-बुक्सची मागणी वाढेल असे तद्न्यांचे अंदाज आहेत.
माझ्या मते मी बहुतेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत व ती सर्वच नवलेखकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे. तरीही कोणला अजुन काही शंका असल्यास नि:संकोचपणे विचाराव्यात. मी यथाशक्ति उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल.