Saturday, June 16, 2012

क्लिओपात्रा: ...माझी सर्वाधिक गाजलेली कादंबरी...



माझी आजवर सर्वात गाजलेली, विकली गेलेली कादंबरी म्हणजे "क्लिओपात्रा" ही होय. आजवर तिच्या जवळपास ५५००० प्रती विकल्या गेलेल्या आहेत. सध्या बाजारात एकही प्रत शिल्लक नसून नवीन आवृत्तीचा हट्ट अनेक वाचकांनी धरला आहे. लवकरच नवी आवृत्ती प्रसिद्ध होईल.

क्लिओपात्राकडे मी आकर्षित झालो याला कारण घडले ते म्हणजे माझी हैद्राबादच्या सालारजंग संग्रहालयाला दिलेली भेट. या संग्रहालयात क्लिओपात्राचा अत्यंत सुंदर अर्धपुतळा आहे. अन्य असंख्य ग्रीक कलाकृतींबरोबरच याही पुतळ्याने मला मोहविले. मी पुण्याला आल्यानंतर मग तिचीही माहिती जमा करायला सुरुवात केली. १९९० साली इंटरनेटचा जन्म व्हायचाच होता. त्यामुळे विदेशी संदर्भ साधने मिळवणे ही एक जवळपास अवघड अशेच बाब होती. तोवर क्लिओपात्रावरची शेक्सपियरचीच नाटके उपलब्ध होती. क्लिओपात्रावर इंग्रजीतही कोणी कादंबरी लिहिल्यचे दिसत नव्हते. अशा वेळीस माझ्या मदतीला धावले जयकर ग्रंथालय आणि फर्ग्युसन रस्त्यावरील ब्रिटिश लायब्ररी. येथे मला मुबलक संदर्भग्रंथ मिळाले. अगदी सीझरचे आत्मचरित्रही. जसजसे मी अनेक ग्रंथ वाचत गेलो, एक वेगळीच क्लिओपात्रा माझ्या डोळ्यांसमोर साकार होत गेली.

क्लिओपात्रा नुसती अद्वितीय सुंदरी नव्हती. अत्यंत ध्येयवेडी, यशासाठी प्रसंगी क्रुर होणारी, सत्तेच्या मार्गात कोणालाही आडवे न येवू देणारी, आपल्या सौंदर्याचा स्वार्थासाठी मन:पुत उपयोग करुन घेणारी पण तेवढेच आत्मविव्हळ असनारी क्लिओपात्रा. क्लिओपात्रा या नावातच एक अद्भुत मोहिनी आहे...दोन हजार वर्ष झालीत तिला होवुन, परंतु तिचे अद्भुत सौंदर्य, अचाट बुद्धीमत्ता, तिचे कुटील राजकारण, तिची प्रेम-प्रकरणे शेक्सपियरसारख्या नाटककारांपासुन ते चित्रपटनिर्माते, कवि, चित्रकार यांच्यावर एक गारुड टाकत राहिले आहे. ती होती इजिप्तची सम्राद्न्यी, पराकोटीचा संघर्ष करत तिने सत्ता मिळवली खरी...पण रोमन साम्राज्यवादाला आपण तोंड देवु शकणार नाही हे लक्षात येताच तिने शस्त्र म्हणुन आपल्या सौंदर्याचा मुक्त हस्ताने वापर केला. तिने ज्युलियस सीझर, मार्क अंटोनी आणि सीझरचाच पुतन्या ओक्टोव्हियस सीझर यांना एकामागोमाग एक आपल्या जाळ्यात ओढले...पारतंत्र्य टाळले...पण शेवटी तिने आत्मघात करुन घ्यावा लागला.

प्टोलेमी (७ वा) या ग्रीकवंशीय सम्राटाची ही एक मुलगी, तिचा जन्म सनपुर्व ६९ मद्धे झाला. तिचा भावु प्टोलेमी (८ वा) जरी तिच्यापेक्षा लहान असला तरी महत्वाकांक्षी होता...त्याने क्लिओपात्राचा अडसर नको म्हणुन तिला व एका लहान बहिणीला (आर्सिनी)इजिप्तबाहेर हाकलले...पराकोटीचा यातनादायक विजनवास भोगत तिने प्रथम पोम्पी या रोमन योद्ध्याची मदत घेतली...पण इजिप्तवरचे त्याचे आक्रमण फसले...त्याचा अलेक्झांड्रियाच्या बंदरावर उतरताच खुन करण्यात आला. निराश न होता ती सीझर या महायोद्ध्याच्या प्रेमात पडल्याचे नाटक करुन त्याची मदत घेवुन सम्राद्न्यी बनली. सीझर व तिचे प्रेमप्रकरण फार काळ टिकले नाही...सीझरचा रोममद्धे खुन झाला. (या हत्येत तिचाही अप्रत्यक्ष सहभाग होता.) मग ती मार्क अंटोनी या सीझर खालोखाल दबदबा असलेल्या वीराच्या प्रेमात (?) पडली...पण सीझरचा पुतन्या ओक्टोव्हियस सीझरचा डोळा इजिप्तवर होता. त्याने आक्रमण करताच अंटोनी क्लिओपात्राच्या बाजुने युद्धात उतरला खरा...पण सौन्दर्याचा वापर सत्तेसाठी करण्यास चटावलेल्या क्लिओपात्राने ओक्टोव्हियसवर जाळे फेकायला सुरुवात केली.. पण हे कळताच व्यथित अंटोनीने आत्मघात करुन घेतला. ओक्टोव्हियस मात्र आपल्या जाळ्यात फसत नाही...इजिप्तचे साम्राज्य वाचत नाही आणि अंटोनीने आपल्यावरील अतीव प्रेमामुळे आत्मघात करुन घेतला आहे हे कळताच तिने स्वता:ला विषारी सापांचा दंश करुन घेउन आत्महत्या केली.

जागतीक इतिहासात असे गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व झाले नाही त्यामुळे साहित्यिक-कलावंतांवर तिच्या व्यक्तित्वाची मोहिनी आहे...तिच्या व्यक्तिमत्वाचे पदर वेगवेगळ्या द्रुष्टीकोणातुन उलगडण्याचे असंख्य प्रयत्न झाले आहेत आणि पुढेही होतील.

मी प्रथमच या अलौकिक व्यामिश्र अशा व्यक्तिमत्वावर मराठीत कादंबरी लिहिली. (तोवर बहुदा इंग्रजीतही तिच्यावर कादंबरी नव्हती.) क्लिओपात्राचे व्यक्तिमत्व शब्दांत उतरवणे हे आव्हानच होते. बरे तिचा जीवनपट तसा अवाढव्य...असंख्य आणि तीही भव्यदिव्य व्यक्तिमत्वे...ब्रुटस हा खलपुरुष म्हणुन आपल्याला माहित असला तरी अत्यंत भावनाप्रधान व लोकशाहीवर अतुट श्रद्धा ठेवणारा, सीझरचा मित्र असुनही केवळ लोकशाही सुरक्षित रहावी म्हणुन सीझरवर शेवटचा वार करणारा...यातील सर्वच पात्रे चितारणे एवढे सोपे नव्हते. त्यांच्या, विशेषत: क्लिओपात्राच्या, भाव-भावनांचे कल्लोळ व्यक्त करणे हे एक आव्हान तर होतेच...पण त्याहीपेक्षा मोठे आव्हान होते ते मराठी वाचकांपर्यंत क्लिओपात्रा नीट पोहोचवणे. याचे कारण म्हणजे मराठीत शिवकाळ, पेशवाई काळ ते सरळ रामायण-महाभारतातील कथा/व्यक्तित्वांवरच कादंब-या वाचण्याची सवय असणा-या वाचकांना ही परकीय क्लिओपात्रा कितपत भावेल अशी शंका मला व माझ्याहीपेक्षा माझ्या प्रकाशकाला होती.

पण क्लिओपात्राने इतिहास घडवला. न. सं. इनामदारांसारख्या प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीलेखकानेही या कादंबरीचे जाहीर कौतुक केले. जवळपास सर्वच वृत्तपत्रांनी या कादंबरीची परिक्षणे प्रसिद्ध केली. हजारेक प्रतींच्या आवृतीची सवय असलेल्या मराठी प्रकाशन विश्वाला दहा-दहा हजार प्रतींची आवृती असू शकते हे क्लिओपात्राच्या निमित्ताने कळाले.  ही कादंबरी वाचुन अनेकांनी इजिप्तला भेटीही दिल्या व आधी आणि आल्यावरही माझ्याशी संवादही साधला आहे.


हे यश अर्थात माझे नसुन क्लिओपात्रा या अनवट गुढाला आहे. ही कादंबरी लिहुन मी मराठीत परकीय इतिहासाच्या पार्श्वभुमीवर आधारीत कादंबरीलेखनाची मुहुर्तमेढ रोवली, याचाही मला अभिमान अर्थातच आहे.



-संजय सोनवणी

भवितव्यातील धोके

सध्या ज्या वेगाने कृत्रिम बुद्धिमत्ता प्रवास करते आहे तो वेग असाच भूमिती श्रेणीने वाढत राहीला तर ज्ञानाच्या क्षेत्रात मक्तेदारीची स्थि...