फुले-आंबेडकरांच्या काळी ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला काहीतरी एक अर्थ होता. हे दोन्ही महामानव अत्यंत कुशाग्र आणि तर्कनिष्ठ व अभ्यासपुर्ण बुद्धीनिष्ठ्तेच्या बळावर ब्राह्मणी सत्तेला यशस्वी आव्हान देवू शकले. त्यांच्या कार्याची बहुमोल फळे चाखणारे, चळवळीचे नेते ते पाईक समजनारे हे शतमुर्ख मात्र द्न्यानाच्या क्षेत्रात मात्र शिक्षणाच्या सर्व सोयी मिळुनही विद्वत-अडानी राहिले ते राहिलेच. ब्राह्मणांना शिव्या दिल्या म्हनजे आपण चळवळीचे पाईक झालो या भ्रमातुन हे लोक बाहेर कधी येतील ते येवोत.
"वाद" या शब्दाचा अर्थ तरी यांना नीट कधी समजला आहे काय? वाद तुल्यबळ वैचारिक पक्षांमद्धेच होवू शकतो. ज्यांना मुळात "विचार" कशाशी खातात याचेच द्न्यान नाही त्यांनी ब्राह्मण-ब्राह्मनेतर वादात पडुन स्वत:चेच नाक छाटुन घ्यायचा चंग बांधला आहे. अर्धवट द्न्यानावर आधारीत हे पुस्तके लिहितात, स्वत:च्या समाजात विचारवंत म्हणुन मिरवुन घेतात. त्यावर कोणीही टीका केली तर लगेच "भटाळलेला", "आरेसेसने दत्तक घेतलेला" वगैरे शेलकी विशेषणे वापरुन मोकळे होतात. यात या मंडळीला काय विकृत आनंद होत असेल तो असो, पण बहुजन म्हणवना-यांचे वाटोळे मात्र करण्यात आज ब्राह्मण नव्हेत तर असेच उथळ बहुजनीय विचारवंत आघाडीवर आहेत हे दुर्दैव आहे.
द्न्यानसत्ता निर्माण करण्यात एक द्न्यानावरील निष्ठा लागते. ब्राह्मनांचे वर्चस्व झुगारायचे असेल तर त्याच तोडीचे, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक द्न्यान निर्माण करावे लागते याचा विसर सर्वच समाजाला पडला आहे. फुले-बाबासाहेबांना अंतिम मानत कधीही द्न्यानवृद्धी होणार नाही हे यांच्या गांवीही नाही. त्यांचे काय मानावे? तर त्यांची अगाध द्न्याननिष्ठा, तर्ककठोर होत स्वत:ची मते तपासत पुढे जाण्याची प्रवृत्ती. यांना फुले आंबेडकर मुळात समजलेलेच नाहीत असा माझा ठाम विश्वास आहे. अपवाद असतात...पण अपवादांनीच नियम सिद्ध होतो.
जुनी दैवते नष्ट करायचा अथक प्रयत्न करायचा आणि नवी दैवते निर्माण करण्यात मात्र कुचराई करायची नाही आणि वर म्हणे हिंदु धर्म संपवायचा...हे असे करत राहिले तर बापजन्मी त्यांना हिंदु धर्म संपवता येणार नाही. नवीन धर्म स्थापन करायचा...सर्वांना प्रिय वाटेल म्हणुन शिव हे नांवही द्यायचे...मग मुळात जो शैव धर्म पुरातन काळापासुन अस्तित्वात आहे, एवढे अवाढव्य तत्वद्न्यान उपनिषदे, तंत्रशास्त्रे ते आदी शंकराचार्यांनीच निर्माण करुन ठेवले आहे त्यांचाच उद्घोष करायचा तर नवीन धर्म आणि नवी धर्मसंहिता. म्हणजे त्यांना अभिप्रेत "शिव" हा शिव शंकर नसून अन्य कोणीतरी शिव या जातीयवाद्यांना अभिप्रेत असावा असे म्हणने क्रमप्राप्त आहे. मग शिव हा देशाला जोडनारा धागा आहे असे म्हनने गैर आहे. काहीतरी दडवण्याची ही चाल आहे.
गौतम बुद्धाला पुराणकारांनी विष्णुचा दहावा अवतार का ठरवले यावर यांनी खरे तर मुलभुत विचार करायला हवा. "असुरांमद्धे मायामोह" निर्माण करुन त्यांना पथभ्रष्ट करण्याचे कार्य बुद्धाने केले म्हणुन बुद्ध हा दहावा अवतार (काही पुराणांत नववा अवतार) ठरवण्यात आला हे यांच्या गांवीही नसते...कारण अभ्यास कोणी करायचा? पुराणे जाळुन टाका हे म्हनने सोपे असते परंतु त्यांचा तटस्थ अभ्यास करत त्यांतील खोट वा सत्य शोधायचे कोणी?
ब्राह्मनांना वेदांची-स्मृतींची चिकित्सा कधीच मान्य नव्हती आम्हालाही बहुजनीय महापुरुष, त्यांनी स्थापलेले धर्म वा त्यांच्या विचारांची चिकित्सा मुळीच मान्य नाही. काय फरक उरला? द्न्यान फक्त चिकित्सेनेच पुढे जावु शकते याचे भान नको कि काय? ब्राह्मण समाज शिव्या घालायला सोपे टार्गेट आहे. त्यांना शिव्या द्यायला फार धाडसाची गरज नसते. त्यांनाही अशा शिव्यांमुळे काहीएक फरक पडत नाही. उलट ते आत्मकेंद्रित होत एक दिवशी अत्यंत थंड डोक्याने बहुजनांचा असा बौद्धिक काटा काढतील कि हे सैरभैर होत भरकटत जातील. उथळ लोक सांस्कृतिक संघर्ष कधीच जिंकु शकत नसतत हा जगाचा इतिहास आहे. ब्राह्मण काही आकाशातुन पडलेले नाहीत...किंवा ते बाहेरुनही आलेले नाहीत. समजा ते आले असले तरी मग त्यांच्याबरोबर कथित क्षत्रीय, वैश्यही आलेच कि! मग तुम्ही क्षत्रीय-वैश्यांना कोणत्या नियमांनी एतद्देशीय ठरवता? तेही तुमच्याइतकेच याच देशाचे, सम्स्कृतीचे भाग आहेत. होते आणि राहतील.
गतकाळातील द्न्यात-अद्न्यात अन्यायांबद्दल गळे काढणे सोपे असते. ब्राह्मनांनी शिक्षणबंदी घातली...ठीक आहे. मग एवढ्या बहुजनीय संतांनी आपापले अभंग लिहिले कसे? का प्रत्येक संताला एक ब्राह्मण लेखनिक भेटला होता? भेटला असेल तर ब्राह्मणांना बहुजनियांचे अभंग लिहिण्यात कमीपणा वातला नाही हे तरी सिद्ध होते किंवा त्यांना लिहिण्या-वाचनावर बंदी नव्हती एवढेच सिद्ध होते. चोखा मेळा, कर्ममेळा, सोयराबाई, बंका हे जर अस्पृश्य होते तर कोण ब्राह्मण त्यांचे अभंग लिहून घ्यायला जाईल? म्हणजे चोखादि संतांना लिहिता येत होते. त्यांच्यावर असलीच तर वेदबंदी होती...द्न्यानबंदी नव्हती. वेदबंदीने तसाही काही फरक पडनार नव्हता कारण ते त्यांच्या धर्माचे प्रतीक नव्हतेच! शिकायच्या बाबतीत बहुजन समाज आजही आळशी आहे. शाळांतुन गळत्या होतात त्या यांच्याच. तेथे काही प्रबोधन करायचे नाही आणि सारी खापरे दुस-या जातीवर थोपुन मोकळे व्हायचे हा धंदा कसा चालेल?
मी याला संभ्रमावस्था म्हणतो. संभ्रमी समाजाचा अंतता विनाशच होतो. एखाददुस-याबाबत संभ्रम आपण समजु शकतो पण जे द्न्यान नव्हे तर फक्त संभ्रम निर्मितीचे अवाढव्य कारखाने बनले आहेत ते समाजघातकी आहेत असेच म्हणावे लागते.
स्वत:च्या टिर्या बडवत द्न्यानसाधना होत नसते. द्न्यानाला शुद्ध करायचे कि अर्धवट द्न्यानाने विकृत कृत्या करायच्या? बाबासाहेबांनी जेही लिहिले ते साधार व सप्रमाण लिहिले. कोठेही कधीही अश्लाघ्य भाषा वापरली नाही. फुलेंनी तर्ककठोर युक्तिवाद करत बहुजनवादाचा पाया घातला. आज बहुजनवादाचा गळा घोटण्याचे कार्य फुले-आंबेडकरांचेच नांव घेत केले जात आहे याचा खेद आहे.
आजचा बहुजनवाद हा सृजनशील नाही. आणि सृजनात्मक विचारधारा जे निर्माण करु शकत नाहीत त्यांचा विनाश हा अटळ असतो. कत्तली, दंगली, तोडफोड अशी भाषा करायला अक्कल लागत नाही...पण मग अशी भाषा करत बाबासाहेबांच्या संविधानात्मक तरतुदींचाच घोर अवमान करत असतो हे कधी समजणार?
आपलीच आराध्ये पायतळी तुडवणा-या अशा महामुर्खांना आपल्या अशा कृत्यांची-विधानांची शरम कधी वाटणार?
इतिहास हा धादांत असत्ये ठोकत नव्याने लिहावा लागत नसतो तर त्याची परखड चिकित्सा करत समोर आणावा लागतो. इतिहास ही गोष्ट भेळ-भजी खाण्याची वा चकाट्या पिटण्याची बाब नसते.
आणि सर्वात महत्वाची बाब असते ती ही कि इतिहास घडवायचा असतो! नव्या पिढ्यांना भावनीक आत्मविश्वास देनारा...दिगंताकडे पुढे जायला प्रेरीत करनारा इतिहास.
पण आज हे बहुजनीय म्हनवणारे विचारवंत जो इतिहास घदवत आहेत त्यांवर पुढील पिढ्याच थुंकतील...
ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद हाच एक कायमचा इतिहासात जमा होईल!