Tuesday, July 10, 2012

त्यांनी पुरोगामित्वतेचा टेंभा मिरवु नये...


प्रा हरी नरके यांना यंदा १ जुन रोजी महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानतर्फे पहिला "महाराजा यशवंतराव होळकर पुरस्कार प्रदान केला गेला. कसे नकळे राहुन गेले, त्यांना दिल्या गेलेल्या मानपत्रातील मजकुर मी द्यायला विसरलो. एका मानपत्रात बसावे एवढे त्यांचे कार्य छोटे नाही. मी ते मानपत्र येथे उद्घृत करत असून माझे एक चिंतन त्याखाली मांडत आहे.


"मानपत्र


गेली चौतीस वर्ष बहुजनांच्या आत्मिक, बौद्धीक आणि वैचारिक उत्थानासाठी अहर्निश संशोधन, लेखन, व्याख्याने याद्वारे महाराष्ट्राचे प्रबोधन करणारे श्रेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांस हे मानपत्र आणि पहिला "महाराजा यशवंतराव होळकर सन्मान" बहाल करतांना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. शालेय जीवनातच, वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात आपण झोकुन दिले व एक महिन्याचा तुरुंगवासही भोगला. हे आपले फुले-आंबेडकरी तत्वधारेच्या महामार्गावरील पहिले पावूल होते. महात्मा फुलेंची बदनामी करणा-या लेखनावर आपण वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी "महात्मा फुले यांची बदनामी:एक सत्यशोधन" हा मौलिक ग्रंथ लिहुन सनातन्यांना सडेतोड उत्तर दिले व बहुजन महाराष्ट्राला अत्यंत संशोधकीय व वैचारिक बैठक असलेल्या एका तरुण विचारवंताचा उदय झाल्याची साक्ष पटली. त्यानंतर आपण ३५ ग्रंथ लिहिले, जवळपास चाळीस विद्यापीठांत आपण शोध-प्रबंध सादर केले, पाचशेहुन अधिक लेख देशभरातील महत्वाच्या वर्तमानपत्रांत व नियतकालिकांत प्रसिद्ध झाले. महात्मा फुले व डा. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचे संपादन हे आपले कार्य चिरस्मरणीय व अतुलनीय असेच आहे. आपल्याचे प्रेरणेने व पुढाकाराने महात्मा फुलेंचे पुण्यातील स्मारक, महात्मा फुलेंच्या पुतळ्याची संसदभवनात उभारणी, नायगांव (सातारा) येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक ही महत्कार्ये घडली.    
आपण देशातील आजचे सर्वोत्कृष्ठ वक्ते आहात व आजवर सहा हजारांपेक्षा अधिक व्याख्याने देश-विदेशात दिली आहेत. आपल्या माय मराठीला "अभिजात" भाषेचा दर्जा मिळावा म्हणुन आपण जे अतुलनीय कार्य करत आहात त्याबाबत समस्त मराठी भाषक आपले आजीवन कृतद्न्यच राहतील. 
आपले जीवन म्हणजे समाजाला जागृत करण्याचा झंझावाती प्रवास आहे. त्याला प्रगल्भ बुद्धीनिष्ठ वैचारिकतेचा तेजाळता पाया आहे. आज सर्वच बहुजनीय जनता आपल्या स्वतंत्र वैचारिक प्रतिभेने नुसते दिपली आहे असे नाही तर त्यांच्यातही जे वैचारिक परिवर्तन होत आहे ते पाहता हा महाराष्ट्र ख-या अर्थाने पुरोगामित्वाच्या दिशेने चालु लागला आहे हे जाणवते आणि त्याचे सर्वस्वी श्रेय आपल्याकडेच जाते हे नमुद करतांना आम्हाला अनिवार आनंद वाटतो. आपणास आजवर असंख्य सन्मान, पुरस्कार मिळालेले आहेत, भविष्यातही मिळतच राहतील, परंतु आपल्याप्रती कृतद्न्यता, आपल्या कार्याला शुभेच्छा आणि पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आम्ही आपणास हे मानपत्र व महाराजा यशवंतराव होळकर सन्मान डा. स. दा. तुपे यांच्या हस्ते प्रदान करत आहोत."

मुक्त चिंतन:

पुरोगामित्व म्हणजे नेमके काय असते हा प्रश्न विचारला कि पुरोगामी म्हणवणारे उत्तर देतील कि फुले-शाहु-आंबेडकर हे एकोणिसाव्या व विसाव्या शतकात होवून गेलेल्या महनियांच्या व पुरातन काळाबाबत बोलायचे तर चार्वाक-बुद्धाच्या तत्वज्ञान व विचारांचे अनुसरन करतो तो पुरोगामी होय. मला वाटते आधुनिक पुरोगाम्यांची ही प्रतिगामी आत्मवंचना आहे. प्रत्यक्ष जीवन, आचरण आणि विचार हे नाममात्र दाखवण्यापुरते पुरोगामी असून प्रत्यक्षात प्रतिगामित्वाचे जहर या पुरोगाम्यांतही भरलेले आहे. हे कसे ते आपण थोडक्यात पाहुयात.
त्यासाठी काही प्रश्न विचारता येतील:
१. या कथित पुरोगाम्यांपैकी कितींनी आंतरजातीय विवाह केला आहे व करवण्यात हातभार लावला आहे?
२. चार्वाक व बुद्धाचे तत्वज्ञान यांना खरोखर कितपत समजले आहे कि केवळ विशिष्ट स्वार्थासाठी, अनुनयासाठी वा स्वतंत्र आयडेंटिटी सिद्ध करण्यासाठी त्यांची नांवे घेतली जात आहेत?
३. परमेश्वर यांनी खरेच नाकारला आहे, जातीय बंधने खरेच नाकारली आहेत कि ते फक्त आपले इतरांपेक्षा वेगळे दाखवण्याचे एक ढोंग आहे?
४. भारतात जन्माला आलेले सारेच धर्म एन-केन स्वरुपात देवतांना मानतात. एकही अपवाद नाही. जातीत धर्म आणि धर्मात जात हे वास्तव मान्य करत त्यांपार जाण्यासाठी यांच्याकडे नेमका काय कार्यक्रम आहे? एका दैवताला अमान्य करत दुसरी दैवते स्वीकारणे याला पुरोगामी म्हणतात काय?
५. वैदिकांत ब्राह्मण श्रेष्ट तर बौद्ध धर्म तत्वज्ञानात खतीय (क्षत्रीय) श्रेष्ठ अशीच जर उतरंड असेल तर खरेच या देशात समतेचा धर्म कधी खरोखर निर्माण झाला काय? संतांनाही जातीय अभिमान वा हीनगंडात्मक मानसिकतेने ग्रासलेले इतिहासात दिसत नाही काय? या वर्चस्वतावादी वा हीणगंडात्मक मानसिकतेला या वर्तमानातील पुरोगाम्यांनी नेमके काय उत्तर शोधले आहे? आजही सर्व बहुजनीय जातींतील ९९% लोक आपली पाळेमुळे पुरातन काळातील ब्राह्मण वा क्षत्रिय कुळांत शोधत असतात, या न्युनगंडात्मक मानसिकतेतून समाजाला सोडवण्याचे कार्य/प्रयत्न कोणत्या वर्तमानातील पुरोगाम्याने केले आहे?
असो. प्रश्न खुप आहेत, पण येथे विश्राम घेत पुढील मुद्दे चर्चेला घेतो. वरील प्रश्नांची उत्तरे मी या पुरोगाम्यांवर सोडुन देतो. त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे उत्तरे द्यावित एवढीच अपेक्षा.
महाराष्ट्रात सांस्कृतिक गोंधळ जेवढा या पुरोगाम्यांनी निर्माण केला आहे तेवढा यांच्याकडुन गालीप्रदान केल्या जाणा-या प्रतिगाम्यांनीही केला नसेल. हे विधान नीट समजावून घेतले पाहिजे. काळाच्या ओघात मनुष्याच्या वैचारिकतेत प्रगती होत असते व स्वाभाविकपणे समाजाचीही प्रगती होत असते...कालचे विचारवंत आज, त्यांच्याबद्दल आदर ठेवुनही, खुजे व्हावेत अशी झेप नव्या पिढ्यांनी घ्यावी अशी अपेक्षा असते. स्थितीस्थापकता म्हणजे प्रतिगामीपणा होय, तर विकसनशीलता (मग ती वैचारिक असो, आध्यात्मिक असो, आर्थिक असो अथवा राजकीय) म्हणजे पुरोगामीपणा होय. काळ तर अव्याहतपणे पुढे जाणारच. पण जसे शिव्या खायच्या लायकीचेच असणारे काही वैदिक (जसा आमिरखानाच्या कार्यक्रमातील काशीचा बडवा जो घटनाच मानत नाही...व तसे अनेक आणि संघवादीही) जसे जुण्याला चिकटुन बसलेत ना तसेच हे फुले शाहु आंबेडकर आणि पार बुद्धालाही चिकटुन बसणार! जणु त्यांच्यानंतर काही नाही आणि त्यांच्यापुर्वीही काही नाही. आणि समजला तर एकही नाही.
मी याला सरळ ग्राम्य शब्दात सांस्कृतीक अडानचोटपना म्हणतो.
यांना मी पुरोगामी म्हणुच शकत नाही.
कोणत्याही व्याख्येवर ही पुरोगामित्वाची आख्याने टिकु शकत नाहीत.

जातीबाहेर जाणा-यांना जातींत ढकलणारे हरामखोर...

प्रा. नरकेंना यशवंतराव होळकर पुरस्कार मिळाला तर खुद्द काही धनगरांना खटकते. माळ्यांनी बोलवलेल्या कार्यक्रमांत ते माळ्यांच्या उणीवा परखडपणे सांगतात तर माळी नाराज. पुर्व-दलितांसाठी आयुष्य घालवत बाबासाहेब समजावून द्यावेत तर बामसेफ...भारत मुक्ती मोर्चाने पार त्यांच्या डी.एन.ए. चाचणीची मागणी करावी. मराठा सेवा संघाने केवळ मराठा आरक्षणाला विरोध केला म्हणुन त्यांनी नरकेंचा पत्ता हर प्रकारे काटायचा प्रयत्न करायचा. मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळावा या रास्त मागणीला खुद्द मराठीचे सारस्वत म्हणुन मिरवणा-यांनी "मराठी ही भाषा अभिजाततेचा दर्जा मिळायला लायक नाही" हे स्वयंघोषित शंकराचार्यांप्रमाणे घोषित करत पोरांना इंग्रजी शाळांचा रस्ता दाखवायचा. मराठी साहित्यिक म्हणुन मानसन्मान घ्यायचे ते घ्यायचे...नरकेंनी "जर ओबीसी मुस्लिमांना आधीच ओबीसींचे आरक्षण आहे तर वेगळे (ओबीसी कोट्यातुनच) साडेचार टक्के निर्माण करणे हे अश्रफ आणि अजलाफ मुस्लिमांपैकी अजलाफांचेच नुकसान करेल हे तथाकथित पुरोगामी मुस्लिमही समजावुन घेत नाहीत. चीप प्रसिद्धीच्या नादात अविचारी होत फसव्या विचारव्युहांशी शरणागती पत्करणारे हे कधीच समजावून घेवू शकत नाहीत.
भारतीय समाज हा लबाड, खोटारडा, आत्मवंचना करनारा...समाजालाच काय...स्वत:लाही फसवणारा आणि दांभिक आहे हे माझे स्पष्ट मत आहे. आणि त्यांत पुराणे व जुना इतिहास सांगणारे ब्राह्मण जेवढे वरील आक्षेपांना जबाबदार आहेत तेवढेच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त, आजचे बोलायला गेलो तर, हे कथित पुरोगामीही आहेत.
यांना सत्य काय आणि असत्य काय यातील मुळात फरकच माहित नाही. पुन्हा वर तुकोबांचे "सत्य असत्याशी मन केले ग्वाही" म्हणायला चोरासारखे तयार कि! चोरही एवढे निगरगट्ट नसतात.
प्रा. नरके या सामाजिक "हिग्ज फिल्ड"च्या दाय-यातुन वस्तुमान घेत समाजाला समाज का म्हणावे, तो कसा बनतो आणि तो कसा चिरकाळ टिकेल यासाठी असा कोणता "सामाजिक बोसान" कण सापडेल याचा शोध घेत आहेत. ते विश्वनिर्मिती वगैरे ही काही या मराठी जनांची महत्वाची बाब नाही...आपण असेच का आहोत आणि असे आपच्याच म्हनवणा-यांकडुन का अविरत छळले जात आहोत या अत्यंत मुलभुत प्रश्नांची उत्तरे जोवर मिळत नाहीत तोवर आम्हाला आमचे सामाजिक अस्तित्व निर्माण करनारे हिग्ज-बोसान कण शोधावे लागणार आहेत. त्याशिवाय या विश्वाकडे आम्ही कधीही उघड्या डोळ्यांनी पाहु शकणार नाही. हे विश्व तसेही आम्हासाठी कालांधार आहे. आमच्याच लोकांकडुन जसे आहे तसेच आमच्यातल्याच लोकांकडुनही आहे.

मला नुकताच एका मित्राचा फोन आला होता, त्यांना माझ्याकडुन एक लेख हवा होता. माझ्यावर कोणाचा प्रभाव आहे असे विषद करणारा लेख त्यांना माझ्याकडुन हवा होता. मी त्यांना नम्रपणे विचारले कि तुम्हाला नेमके काय अभिप्रेत आहे? त्यांनी मला सांगितले कि फुले शाहु किंवा आंबेडकर...यांपैकी तुमच्यावर कोणाचा प्रभाव पडला यावर विवेचन अभिप्रेत आहे.

मी क्षमा मागुन म्हणालो...मला सर्वच महापुरुषांबद्दल आदर आहे...

पण माझ्यावर प्रभाव कोणाचाही...अगदी कोणाचाही नाही!

माझे जीवन वा विचार हे कोणत्याही एखाद्या गतकालातील असो कि वर्तमानातील...प्रभावात नव्हते व नाही.
मित्राला आश्चर्य वाटले. त्याच्या अपेक्षा मी पुर्ण करु शकलो नाही याचा खेद आहे. पण मी मित्राला खुश करण्यासाठी काही लिहिले तर ते लिहिणे हाच अनादर ठरेल...त्या महनियांबाबत. मी त्यांचा आदर करतो पण माझ्यावर एकाही विगतातील महनियाचा प्रभाव नाही.

आणि तो नसण्यातच माझे असतेपण आहे!

त्यामुळेच आजकाल काही भोट प्रा. नरकेंना जेंव्हा भटाळलेला म्हणतात तेंव्हा फक्त त्यांची विद्वेषाची फुत्कारती द्विधा जिंव्हा तेंव्हा तळपत असते...असल्या वांड सर्पांना कसे थप्पड मारुन ठिकाणावर आणायचे हाच प्रश्न आहे आणि सुटेल तो लवकर. ज्यांना वैचारिकता समजत नाही , ते फक्त हमरीतुमरीवर येवु शकतात, तोडफोड सोडुन ज्यांना काहीच समजत नाही...उमजत नाही...ते कालौघात दफनच होत जाणार. जगात प्रेतांच्या राशी उठवणारे क्रुरात्मे आज कोणत्या मातीत (वा समुद्रात) दफन झाले हे सुसंस्कृत जगाला माहित करुन घ्यायची गरज नसुन उद्याची स्नेहमय सह-संस्कृती कशी उभी करायची व त्यासाठी कोणत्या त्यागांना आजसाठी का होईना सिद्ध व्हायचे हाच खरा प्रश्न आहे.

मला वाटते, हिग्ज-बोसान कण असतील अथवा नसतील...आम्हाला आमचा समाज विकृत करणारे विषकण मात्र शोधुन त्यांचा विनाश करणे क्रमप्राप्त आहे...अन्यथा हा एकुणातीलच समाज एबढा क्रमाक्रमाने विषमय होत जाईल कि विश्व कसे बनले हे कधीकाळी समजायच्या आतच हे मनोविकृत ज्या जगामुळे विश्व समजु शकेल कदाचित ते मानवी जगच नष्ट करुन टाकतील!

कोणी कोणाला नष्ट करण्याच्या व आज एक वांझ सत्ता हाती आहे म्हणुन दुस-यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न जे करतात ते षंढच असतात.

सर्व समाज संपुर्ण आत्मशक्तिने प्रेरित होत पुढे जाणारच आहेत...वैचारिक मतभेदांसहित...
पण ज्यांची विचार करायचीच मुळात लायकी नाही त्यांनी पुरोगामित्वतेचा टेंभा मिरवु नये...

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...