आत्म्याबद्दल...
१. आत्मा आहे असे म्हटल्याने आत्मा आहे असे होत नाही अथवा आत्मा नाही असे म्हटल्याने आत्मा नाही असेही होत नाही.
२. मन, बुद्धी आणि काळ यांना जोडणारे सूत्र म्हणजे आत्मा होय. आत्मा केवळ बुद्धीगम्य असून त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही.
३. आत्मा नव्हे तर चेतना हेच मनुष्याच्या जीवित असण्याचे कारण आहे.
४. आत्म्याला स्वता:चे कोणतेही विकार नसुन मन, बुद्धी व काळामुळे त्याच्यावर विकार आरोपित होतात.
५. काळाच्या सहास्तित्वाने मनाच्या व बुद्धीच्या -हासाबरोबरच आत्म्याचा -हास होतो तर उत्थानाबरोबरच उत्थान.
६. बुद्धीची परमोच्च संपृतावस्था म्हणजे प्रज्ञा होय. मन आणि बुद्धी यांच्यातील आंतर्विरोधात मनाचा वा बुद्धीच -हास झाला कि जी अवस्था निर्माण होते, तिलाच आपण आत्म्याचे अध:पतन म्हणतो....कारण मन व बुद्धी यांच्यातील दरी वाढल्याने आत्म्याचे कारण घटलेले असते.
७. आत्मा, बुद्धी व मनाचे कारण चेतना असून आत्मा कशाचेच कारण नाही तर उपफल आहे.
८. चेतना जीव ते जडजगताचे अहेतुक कारण आहे. चेतनेचे अस्तित्व विश्वाच्या अस्तित्वाने लक्षात येते...तिचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही.
परमेश्वराबद्दल...
१. परमेश्वर ही मानवी प्रज्ञेची मानसिक प्रक्षेपणरुप कल्पना असून, मानवी समुहाच्या एकत्रीत प्रक्षेपणांतुन निर्माण झालेली प्रतिमा आहे.
२. मानवी मन व प्रज्ञा यांच्या कालसंदर्भ चौकटीत आत्म्याच्या सूत्रांतील क्षीणपनामुळे निर्माण होणा-या संवेदनांचे मानसिक वा प्रत्यक्ष प्रतीकरुपाने मनुष्याकडुन होनारे प्रकटन म्हणजे परमेश्वर होय.
३. परमेश्वराला मानवी अस्तित्वाखेरीज स्वतंत्र अस्तित्व नाही.
४. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र प्रतिमात्मक परमेश्वर असून एकुणातील मानवी समुदायाचे सामुदायिक परमेश्वर-स्वरुप प्रक्षेपणाचा समुच्चय म्हणजे एकुणातील परमेश्वर.
५. या परमेश्वररुपी प्रतीकांचे पुजन म्हणजे अप्रत्यक्षपणे स्वपुजनच असते, परंतु "स्व" पेक्षा अधिक श्रेष्ठत्वाच्या शोधात हा विभेद लक्षात येत नाही.
६. खरे तर आहे त्यापेक्षा आपला "स्व" श्रेष्ठ व्हावा या आदिम परिप्रेक्षात स्वत:पेक्षा श्रेष्ठ परमेश्वराची मानस अथवा प्रतीक प्रतिमा मनुष्य निर्माण करतो आणि हेच त्याच्या श्रेष्ठत्वाचे खरे लक्षण आहे.
७. बुद्धी, मन आणि प्रज्ञा काळाच्या चौकटीत विक्षेप निर्माण करत असल्याने मनुष्य "स्व" चे प्रतिबिंब विराट स्वरुपात बाह्य विश्वात परमेश्वर रुपात पाहतो. तेही त्याचे श्रेष्ठत्वच आहे.
८. मनुष्य दयाळु असेल तरच परमेश्वर दयाळु आहे. मनुष्य कृतघ्न असेल तर परमेश्वरही कृतघ्न आहे. मनुष्य दुष्ट असेल तर त्याचा परमेश्वरही दुष्ट आहे. परमेश्वर वा देवता या सर्वच मानवी मनांचे प्रक्षेपण आहेत. म्हणुन जसा माणुस तसा त्याचा परमेश्वर असतो.
९. मनुष्य भक्ती करतो ती परमेश्वराची नाही तर तो जसा आहे तसा आहे त्या परमेश्वराची...मानवावर कोणी प्रसन्न वा अकृपाळु होत नसतो तर तो स्वत:वरच प्रसन्न वा अकृपाळु होत असतो.