१. जीवन दु:खमय नाही कि आनंदमयही नाही.
२. जीवन वास्तव आहे...आनंद आणि दु:ख मात्र फक्त मानसिक संवेदना आहेत.
३. एकाला ज्यामुळे आनंद वाटतो त्याचमुळे दुस-याला आनंद वाटेल असे नाही तसेच ज्यामुळे एकाला दु:ख वाटेल त्यामुळे इतरांना दु:खच वाटेल असेही नाही.
४. एवतेव आनंद आणि दु:ख या फक्त भावना असुन त्यांना चिरकालिक अस्तित्व नाही.
५. म्हणजेच, आज ज्यामुळे दु:ख वाटते त्यामुळेच उद्याही दु:ख वाटेल असे नाही वा आज ज्यामुळे आनंद वाटतो त्यामुळे उद्याही आनंद वाटेलच असेही नाही.
६. कारण आनंद आणि दु:ख या मानवी जीवनावर भावनात्मक माणसाने आरोपित केलेल्या फक्त भावना आहेत. ते वास्तव नाही.
७. जीवन दु:खमय आहे म्हणुन निर्माण केले गेलेले तत्वज्ञान जेवढे असत्य तेवढेच जीवन आनंदमय आहे म्हणुन निर्माण केले गेलेले तत्वज्ञानही असत्य. खरे तर जीवन म्हणजे आनंदही नाही कि दु:खही नाही.
८. आनंद आणि दु:ख या क्षणिक भावना आहेत. प्रिय पुत्र वा पत्नी गेली म्हणुन दु:खी झालेला अनंत काळ दु:खात राहत नाही तसेच हे.
९. मुळात भावना क्षणिक असल्यानेच भावनांचे मुल्य क्षणिक आहे म्हणुन ते क्षणिक मुल्यही महत्वाचे आहे...पण ते चिरकालिक महत्तेचे नाही.
१०. आनंदी व्हायचे कि दु:खी हे प्रत्येकाच्या मनावर अवलंबुन असते. कृत्रिमतेने या दोन्ही बाबी लाभत नाहीत.
११. जो स्वत:ची निष्ठेने आराधना करतो तोच कोणत्याही स्थितीत नेहमी आनंदी राहू शकतो.
१२. स्वत:वर ज्याचे प्रेम आहे तोच दुस-यांवर प्रेम करु शकतो. तसेच हे.
१३. परंतु आनंद अथवा दु:ख ही मानवी प्रेये नव्हेत. साध्यही नव्हे कि साधनही.
१४. प्रेयासाठी जो साधन शोधतो वा साध्य ठरवतो त्याला प्रेय लाभण्याची शक्यता नाही.
१५. दु:ख आणि आनंद या भावनिक बाबी असल्याने जर कोणी त्यांच्या नाशाबद्दल बोलत असेल तर तो असत्य बोलत आहे. सुख आणि दु:खाला समान माना असे म्हनणे भ्रामक आहे ते यामुळेच.
१६. ज्याला आनंद हवा असतो त्याला दु:खही मिळनारच. ज्याला काहीच नको आहे त्यालाच आनंद लाभण्याची शक्यता अधिक.
१७. भावनिक असणे हे मनुष्यत्वाचे नैसर्गिक लक्षण आहे. योग-तपादिंनी मनुष्य भावरहित तटस्थ होतो असे म्हनणे अनैसर्गिक व म्हणुनच असत्य आहे.