Thursday, August 9, 2012

वैश्विकतेला कवेत घेणारा मराठी समीक्षक: शंकर सारडा



शंकर सारडा म्हणजे साहित्य क्षेत्रातील तरुणांनाही लाजवेल असे अत्यंत उत्साही व सळसळते चैतन्य. ते दोन सप्टेंबर रोजी पंचाहत्तर वर्षांचे होत आहेत यावर त्यांच्याकडे आणि त्यांच्या आजही अविरत सुरु असलेल्या साहित्यसेवेकडे पाहुन विश्वास बसत नाही. वैश्विक दृष्टीकोन बाळगत मराठी लेखकाला नोबेलची स्वप्ने दाखवत फक्त मराठीच्या प्रांगणात दंग राहु नका तर अन्य भाषांतही आपले साहित्य न्या असे गेली २०-२५ वर्ष सांगणारे एक द्रष्टे समीक्षक. फक्त पुस्तकांची समीक्षा करणे हेच समीक्षकाचे काम नव्हे तर साहित्यिक घडवण्यातही महत्वाचे योगदान देणारे एकमेव समीक्षक. स्वत: साहित्त्यिक. येथेच त्यांचे कर्तुत्व संपत नाही. समीक्षेच्या गंभीर प्रांगणात वावरत असतांनाही लहान मुलांसाठी तब्बल २० रंजन करणा-या अद्भुत-कथांची पुस्तके लिहिणारे सर्जक लेखक. सारडांच्या साहित्यकर्तुत्वाला सीमा नाहीत.

शंकर सारडांनी आजवर साडेपाच हजार पुस्तकांवर लिहिले आहे. हा एक जागतीक विक्रमच आहे. शक्यतो प्रसिद्ध लेखक वा गाजवलेल्या पुस्तकांवर लिहायची आपली खास मराठी समीक्षकी रीत. परंतु सारडांनी असा भेदभाव केला नाही. अगदी पहिले-वहिले पुस्तक लिहिणा-या पण गुणवंत लेखकालाही त्याच्या पुस्तकावर लिहुन नवीन...अधिक उत्तम लिहायला प्रेरणा देणारे एकमेव समीक्षक. त्यामुळे असंख्य लेखक प्रसिद्धीच्या झोतात आले. आज त्यातील अनेक प्रथितयश सहित्त्यिक बनले आहेत. आजचे प्रसिद्ध साहित्त्यिक आणि साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदासाठीचे उमेदवार ह. मो. मराठे "नि:ष्पर्ण वृक्षवर भर दुपारी" या कादंबरीने प्रसिद्धीच्या झोतात आले. खरे तर ही कादंबरी त्या काळी अत्यंत स्फोटक.  तिच्या प्रकाशनासाठी कोणी पुढे येणे अशक्य. अशा काळात शंकर सारडांनी १९६८ साली ही कादंबरी साधनाच्या दिवाळी अंकात अतिथी संपादक या नात्याने प्रकाशित करण्याचे धैर्य दाखवले आणि मराठी साहित्याला नवे धुमारे फुटले. सारडांचा मुळात दृष्टीकोनच व्यापक. जवळपास अर्धे जग पालथे घातले असल्याने व जागतिक वाड्मयीन चळवळींशी संपर्क आल्याने माय मराठी कोठे खुरटते आहे याची जाण त्यांना न येती तरच नवल. पण या जाणीवेला त्यांनी प्रत्यक्ष कृतीत बदलवले आणि हे फक्त सारडाच करु शकले. याच रितीने विद्या सप्रे ते विश्वास पाटील अशा असंख्य लेखकांना सारडांनी प्रकाशाच्या झोतात आणण्याचे मोलाचे कार्य केले. नुसती समीक्षाच नव्हे तर प्रकाशनपुर्व संपादन संस्कारही सारडांनी अनेक लेखकांच्या हस्तलिखितांवर करुन, कधी संपुर्ण पुनर्लेखन करुन घेवून, त्या लेखनाचे साहित्यमूल्य वाढवले. लेखक-समीक्षकाचे सख्याचे नाते निर्माण करणारे सारडा हे एकमेव समीक्षक आहेत असे म्हटले तर वावगे होणार नाही. त्यामुळेच कि काय वसंत कानेटकर, रमेश मंत्री, ह. मो. मराठे, शं. ना. नवरेंसारख्या अनेक दिग्गज लेखकांनी सारडांना आपल्या कृती अर्पण केलेल्या आहेत. सारडा महाराष्ट्र टाईम्सच्या रविवार पुरवणीचे संपादक असतांना जी. एं. सारखे उत्तुंग लेखकही आपल्या पुस्तकावर सारडा काय लिहितात याची आवर्जुन वाट पहात असत...यात सारे काही आले.

पत्रकार म्हणुन सारडांची ओळख मोठी अहे. महाराष्ट्र टाइम्सच्या रविवार पुरवणीला प्रतिष्ठा मिळवुन देण्याचे कार्य त्यांनी १९६२ ते १९६९ या काळात केले...त्यावेळी सारडा अवघ्या तेविशीत होते हे लक्षात घ्यावे लागते. त्यानंतर त्यांनी ऐक्य, लोकमत, (रविवार आवृत्ती) ललित, देशदूत ई. पत्रांचेही संपादन केले. पण केवळ लेखक, समीक्षक, पत्रकार एवढीच सारडांची ओळख नाही. मराठी साहित्यातील त्यांचे एक सृजनशील संयोजक-कार्यकर्ता म्हणुनही मोलाचे योगदान आहे. सातारा येथे १९९३ साली भरलेल्या साहित्य संमेलनाचे सारडा कार्याध्यक्ष होते. या संमेलनाइतकी आजवरच्या एकाही संमेलनाला एवढ्या साहित्यिक मुल्यांची व नीटस संयोजनाची उंची गाठता आली नाही. सारडा तसे आजवर अनेक  साहित्य सम्मेलनांचे स्वागताध्यक्ष, कार्याध्यक्ष झाले आहेत. सावंतवाडी येथे भरलेल्या बाल-कुमार साहित्य-संमेलनाचे ते अध्यक्षही होते. पण मराठीची अविश्रांत एवढी साहित्यसेवा करुनही त्यांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळु शकले नाहीत. सारडांना त्याची खंत नाही हे मला माहित आहे, पण मला निश्चित खंत आहे. मराठी माणुस किती कृपण आणि कृतघ्न असतो हे मी या प्रकरणी पाहिले...अनुभवले. "एका मारवाड्याला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनवायचे काय?" याच मुद्द्यावर सारडांची योग्यता अन्य कोणाही साहित्य-समिक्षकापेक्षा मोठी असतांनाही पराभव करण्यात आला. हे मराठीचे व मराठी माणसाचे दुर्भाग्यच आहे.

वैश्विक दृष्टीकोन...

शंकर सारडा हे मराठी साहित्याचा परिघ विश्वव्यापी कसा होईल याचा व्यापक विचार करणारे, तशी सातत्याने मांडणी करणारे पुन्हा एकमेव समीक्षक. मराठी साहित्य इंग्रजीत अनुवाद होवून जगभर पसरावे हा त्यांचा प्रयत्न. मी १९९८ साली इंग्रजी प्रकाशन विभाग काढुन अनेक पुस्तके सातासमुद्रापार नेली त्याची प्रेरणा सारडाच होते. आता तर अनेक मराठी प्रकाशकांनी इंग्रजी प्रकाशन विभाग सुरु केले आहेत. मराठीत नोबेलच्या तोडीची कलाकृती निर्माण होईल तेंव्हा होईल परंतु मराठी साहित्याने पाश्चात्य जगात अनुवादित स्वरुपात चंचुप्रवेश केला आहे ही बाब दिलासादायक आहे.
 
मराठीत विषय-वैविध्याची नेहमीच वानवा होती. वैज्ञानिक घ्या कि समाजशास्त्रीय...अशा विषयांवर सहसा कादंब-या लिहायला कोणी सहसा तयार नसे. पण सारडांनी चंद्रकांत मराठेंकडुन  "केलाटाची हाक" सारखी भव्य विज्ञान कादंबरी लिहुन घेतली. मला आनंद वाटतो कि मराठीतील ही पहिली स्वतंत्र विज्ञान कादंबरी मी प्रकाशित केली. पुढे रेखा बैजल या नवलेखिकेलाही त्यांनीच विज्ञान कथा-कादंब-या लिहायला प्रोत्साहन दिले. त्याचे एक पुस्तक मीही प्रकाशित केले. याचे कारण म्हणजे सारडांच्या वैश्विक दृष्टीकोनाशी मी पुर्ण सहमत होतो. मराठीतील साहित्य बाहेर जावे असा त्यांचा आग्रह होता तसाच जगात गाजलेल्या वैशिष्ट्यपुर्ण लेखनाचा/लेखकांचा परिचय मराठी वाचकांना व्हावा म्हणुन त्यांनी असंख्य लेख लिहिले. मराठीत स्त्रीवाद ही संकल्पना नुकतीच कोठे चर्चेत आली तेंव्हा त्यांनी जगात गाजलेल्या स्त्रीवादी कादंब-यांवर लेखन केले. पुढे ते सर्व लेख "स्त्रीवादी कादंब-या" या शिर्षकाखाली मीच प्रकाशित केले. त्याला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला व मराठीतील महिला लेखिकांनाही नवी दिशा मिळाली. दुरदेशचे प्रतिभावंत, काही लेखक:काही पुस्तके, पुस्तकांचे जग अशी त्यांची पुस्तके आपल्याला जागतीक साहित्याच्या प्रांगणात अलगद नेवून ठेवतात. आपली मराठी नेमकी कोठे कमी पडते याची जाणही होते आणि तशाच भव्य पण या मातीच्या कृती निर्माण करण्याचे बळ देते.

वर्तमानाशी नाळ जुळवत भविष्याचा वेध घेणे हे त्यांची खासियत. आता ते ई-पुस्तके, ई-मार्केटिंग या आधुनिक संज्ञा मराठी प्रकाशक-लेखकांसमोर ठेवत  बदलत्या कालाशी जुळवून घ्यायला शिकवत आहेत...मार्गदर्शन करत आहेत. कोण म्हणेल सारडा पंचाहत्त्रीचे झाले?

सारडा चिरतरुण आहेत. त्यांच्या कामाच्या झपाट्याला खंड नाही. पुस्तकांतच जगणारा हा थोर माणुस. मला त्यांच्या मैत्रीचा ( हो...मित्रच...त्यांच्याशी मैत्रीत वयाची अडचण कोणालाच येत नाही...) अभिमान आहे. त्यांची सर्वाधिक पुस्तके मला प्रकाशित करता आली याचा मला नितांत अभिमान आहे.

सारडा सर...आपणास उदंड आयुष्य लाभो...अजुन तुम्हाला पुढील पिढीतील साहित्त्यिक घडवायचे आहेत. शिवशंकराचे आशिर्वाद आपल्याला आहेतच...माझ्या आपणास पंचाहत्तरीनिमित्त अनंत शुभेच्छा!

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...