काही जातींना एवढा टोकाचा जात्युभिमान का असतो कि ज्यामुळे ते आपल्या मुला-सुनांना, (वा मुली-जावयांना) केवळ सुन वा जावई खालच्या जातीचे आहेत म्हणुन चक्क खुन करावासा वाटतो? उत्तरेतील खाप पंचायत काय आणि महाराष्ट्रातील या निघृण प्रव्रुत्तीचे लोक काय, सत्ताधारी समाजातीलच का असावेत? त्यांचे प्रबोधन व्हावे, या वृत्ती नष्ट व्हाव्यात यासाठी प्रयत्न करायला नको काय? मनुस्मृतीचे खरे व खंदे समर्थक मग कोण आहेत? आंतरजातीय विवाहांनी जातीभेद कमी होईल असे बाबासाहेबांना वाटत होते...पण अशा घटनांमुळे उच्च सत्ताधारी जातीयांशी कोण प्रेमविवाह करणार? उलट यामुळे जातीय विभाजणी अजुनच वेगाने होत समाजातील दरी वाढणार नाही काय? बहुजन हा जर एकजिनसी समाज असेल व हीच मंडळी आम्हीही बहुजन आहोत असा दावा करत असतील तर मग बहुजनीय तत्वज्ञानात ही कृरता कोठे बसते? याचा अर्थ असा नव्हे काय कि हे मुळात बहुजनच नाहीत? कोणत्याही प्रेमी जीवाची हत्या कोणत्याही धर्म-पंथाला मान्य नाही. तशी कोणाचीही हत्या मान्य नाही. हे क्रौर्य पाहुन मान शरमेने खाली झुकते...फुले-आंबेडकरी चळवळीला वा आगरकर-लोकहितवादी चळवळीला लागत असलेला हा कलंक आपल्या सर्वच समाजाला मध्ययुगात नेत आहे...यावर आपण सर्वांनीच गहन चिंतन करत मार्ग शोधावा लागणार आहे...
http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=296908&boxid=1152921&pgno=1&u_name=0
महाराष्ट्र पुरोगामी कधीच नव्हता...तो आजही नाही आणि कदाचित असेच चालु राहिले तर कधी होणारही नाही. मुस्लिम मुलांच्या प्रेमात चुकुनही पडु नका असा प्रचार संघवादी करत असतात. तो अवास्तव व गैरवाजवी व भडक आहे हे खरे आहे...पण त्यामागे काही सत्य घटनाही आहेतच. पण अशा अल्प असलेल्या व प्रकाशात येणा-या घटनाही समाजमन विचलित करत असतात. अप्रकाशित घटनांबाबत तर बोलायलाच नको. उदाहरणार्थ माझ्या भावाने मराठा मुलीशी प्रेमविवाह केला. हा विवाह घडावा यासाठी अनेक वादळांना तोंड दिले. माझ्या भावाला मार खावा लागला. पण मी केवळ त्या काळी त्यांच्यापेक्षाही श्रीमंत आणि साहित्यिक दबदबा असल्याने हा विवाह झाला. आजतागायत ते सुखाने नांदत आहेत.
सामाजिक चळवळी कुणात फसलेल्या आहेत. स्वत:च्याच अहंकारी अहंगंडाच्या चिखलात रुतलेल्या आहेत. पुरुषसत्ताक पद्धतीचे उद्दाम चित्र अधिक भडक करण्यात याच चळवळींनी हातभार लावला आहे कि काय हा प्रश्न या निमित्ताने विचारावासा वाटतो. या चळवळीतील किती लोकांनी आंतरजातीय विवाह केले आहेत? किती आंतरजातीय विवाह घडवून आणण्यात हातभार लावला आहे? यात सन्माननीय अपवाद आहेत...पण अपवादांनीच नियम सिद्ध होतो. याचाच अर्थ फुले-आंबेडकरांनी जात्युच्छेदनाची जी घोषणा केली तीच मुळात या पुरोगामी म्हणवणा-याना मान्य नाही.
मला दु:ख वाटते ते हे कि दोन प्रेमी जीव खुद्द मुलाच्या बापाने ठार मारले. आठ महिन्यांचा जीव केवळ नशीबाने वाचला नाहीतर या हैवानाने तो जीवही नष्ट करुन टाकला असता.
आता तरी बदलायचे कि नाही?
कृपया खालील लिंकवरील ताजी बातमी पहावी...
कृपया खालील लिंकवरील ताजी बातमी पहावी...http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=296908&boxid=1152921&pgno=1&u_name=0