Sunday, January 11, 2026

विज्ञान साहित्य लोकाभिमुख होण्यासाठी!

ज्या समाजात जीवनाकडे पाहण्याचा विज्ञानवादी दृष्टीकोन नसतो असा समाज कधीही ऐहिक आणि मानसिक प्रगती करू शकत नाही. मराठी विश्व हे विज्ञानच काय पण अन्य साहित्याकडे वा वैचारिक लेखनाकडे सहसा उपेक्षेनेच पाहत असल्याने मराठी समाजात वैचारिक वादळे झालीत, गहन चर्चा घडून आल्या आणि समाजाला नव्या दृष्टीने जगाकडे पाहता आले असे क्वचितच घडले. त्यात मराठी सामीक्षकानी काही साहित्यप्रकारांना साहित्य मानायलाच नकार दिल्याने विज्ञान साहित्याला सामाजिक प्रतिष्ठा कधीच मिळू शकली नाही. अपवाद फक्त डॉ. जयंत नारळीकर यांच्या विज्ञानकथांचा. पण त्यांनाही प्रसिद्धी मिळाली ती स्वत: नारळीकर जागतिक कीर्तीचे संशोधक होते म्हणून. त्यांच्या विज्ञान कथांमुळे अथवा त्यांनी मराठीत वैद्न्यानिक माहिती पुरवणारे मूलगामी लेखन केले म्हणून नाही. मराठीत विज्ञानकथा लिहिल्या जाण्याचा इतिहास फार जुना आहे. भा. रा. भागवत यांनी ज्युल्स व्हर्नच्या अनेक वैद्न्यानिक काल्पनिका मराठीत आणून आता जमाना लोटला. या कादंबऱ्या खूप लोकप्रियही झाल्या होत्या. ज्युल्स व्हर्नची भविष्यवेधी आणि रंजनात्मक कथन शैली आणि त्याला साजेशी विलक्षण कथा याचा त्यात फार मोठा वाटा होता. पुढे स्वतंत्ररीत्या विद्न्यानाधारीत कथा, कादंबरी आणि लेखनाचे मार्ग खुले झाले. पण यातील बहुतेक साहित्य हे परकीय लेखनावर आधारित होते. डॉ. बाळ फोंडके, डॉ. संजय ढोले हे स्वत: विज्ञानाची पार्श्वभूमी असलेले लेखक. पण कादंबरी अथवा कथेत विज्ञान किती असावे आणि त्याला रंजक कथेची साथ किती असावी यात या मंडळीला फारसा मेळ घालता आल्याचे दिसून येत नाही. रंजकतेशिवाय वाचक अशा साहित्याकडे फिरकत नाहीत हे साहित्यिक म्हणून मराठी लेखकांनी लक्षात घ्यायला हवे होते. त्य्यामुळे अच्युत गोडबोले यांच्यासारखे लेखक वैद्न्यानिक माहिती कथात्मक स्वरूपात न आणता सोप्या भाषेत पुरवत वाचकांना अधिक विज्ञानाभिमुख करण्यात यशस्वी झाले असे म्हणावे लागते. “केलाटाची हाक” ही चंद्रकांत मराठे यांची महाकादंबरी मी माझ्या पुष्प प्रकाशनातर्फे प्रसिद्ध केली होती. ही एक आंतरग्रहीय विज्ञान कादंबरी होती. तिला मात्र चांगले यश मिळाले कारण मराठे यांनी एका परग्रहावरील समाजाच्या अत्यंत रंजक वेध घेतला होता. अलीकडेच प्रगती पाटील या तरूण लेखिकेने “त्रिकोणी साहस” ही अशीच एका दूरच्या ग्रहावर घडणारी महाकादंबरी लिहिली. ती वाचकांत लोकप्रियही आहे. पण दुर्दैवाने मराठी समीक्षकांनी त्यांच्याकडेही दुर्लक्ष केले. अशी उदासीनता असेल आणि अमुक म्हणजेच साहित्य असा दृष्टीकोन समीक्षक बाळगत राहतील तर मराठी विज्ञान साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोहोचेल? नव्या प्रतिभा असे साहित्य कशाला लिहितील? ही घोर उपेक्षा मराठी विज्ञानसाहित्याच्या प्रसाराला बाधक आहे. मुलांसाठी किती विद्न्यानिका आहेत? आकडेवारी पाहिली तर निराशाच दाटून येईल. अजूनही बालसाहित्य म्हणजे जादू-पऱ्याच्या कथा, फुटकळ साहसकथा व बोधकथा असा घोर अपसमज आहे. मुलांना आता त्या वाचण्यात रस उरलेला नाही कारण त्यांच्या भवतालाचे जग अफाट बदललेले आहे. विज्ञान युगाची फळे ते चाखत आहेत. एल विज्ञान समजून घेण्याची त्यांची जिज्ञासा आहे. हे कथांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचवत त्यांच्या नुसत्या जिद्न्यासेचेच शमन नव्हे तर भविष्यकालीन संभावना त्यांच्यासमोर ठेवत त्यांच्या कल्पनाशक्तीला विद्न्यानाधीष्ठीत बळ पुरवणे आवश्यक आहे. यातून विज्ञानवादी पिढी तर घडू शकतेच पण भविष्यातील स्वतंत्र संशोधन करणारे वैज्ञानिकसुद्धा घडू शकतात. युरोप विज्ञानवादी व्हायला ज्युल्स व्हर्न. मेरी शेली, एच. जी. वेल्स यांच्यासारखे खांदे आणि कल्पक विज्ञानकथा लेखक होते. ज्युल्स व्हर्नने आपल्या काल्पनिकांत वर्णन केलेल्या पाणबुडीसारखीच पाणबुडी प्रत्यक्षात तयार करता येईल असा विश्वास संशोधकांच्या मनात आला. आणि ते स्वप्न साकारही झाले. अशा अनेक कल्पना कल्पक लेखकांनी पुरवल्या आणि मग ते स्वप्न सत्यात आणले. मी १९९८ साली उडती आणि रस्त्यावरूनही चालू शकेल अशी हेलीकार बनवण्याचा संकल्प केला होता. तो प्रत्यक्षात यावा यासाठी प्रयत्नही केले होते. माझा प्रयत्न अपुरा राहिला असला तरी जगात आज अनेक संशोधक तशी कार बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी माझ्या विज्ञान कादंबर्यात या कल्पनेचा चपखल उपयोगही केला. पण तो तेथेच संपला, करण कोणा भारतीयाने हे संशोधन पुढे नेण्याचा प्रयत्न केला नाही. आहे त्या विद्न्यानावर आधारित कथा महत्वाच्या आहेतच. त्यातून आहे त्या विद्न्यानामागील अर्थ आणि उपयुक्तता समजून घेता येते. पण भविष्यवेधी विज्ञानकथा मात्र विज्ञानातील भावी प्रगतीच्या संभावना आणि दिशा सांगत असतात. त्या संशोधकांना उपयुक्त ठरू शकतात. मराठीत पाहिले तर मात्र चित्र एवढे समाधानकारक नाही आणि म्हणूनच देशात मुलभूत संशोधकांचीही वानवा आहे. बालसाहित्यापासून ते प्रौढांच्या साहित्याचा आधार विज्ञान (मग ते आजचे असो की भविष्यवेधी) आधाराला घेत रंजक कथा लिहिता येणे म्हटले तर फार सोपे आहे. अट एकाच की स्वत: लेखकच विज्ञानाचा पाया भक्कम असला पाहिजे. त्याच्या अभावात चांगली विज्ञानकथा निर्माण करता येणे शक्य नाही. विज्ञानाच्या पायासोबतच लेखक हा उच्च दर्जाचा प्रतिभाशाली असला पाहिजे आणि त्याने रंजक खिळवून ठेवणारी कथानके बनवून विज्ञानाच्या हातात हात घालून आपली रचना उतरवली पाहिजे. दुर्दैवाने मराठीत असे लेखक किती आहेत याच विचार केला तर हाती निराशा आल्याखेरीज राहणार नाही. विज्ञानाची क्षितिजे अमर्याद आहेत. आताचे संगणक जाऊन लवकरच क्वांटम संगणक येतील अशी चिन्हे आहेत जे जगाचा चेहरामोहरा बदलून टाकती. त्याच्या भल्या-बुर्या सामर्थ्याचे व्यापक चित्रण मी “भविष्य नावाचा इतिहास” या कादंबरीत केले. पण आपले विज्ञान कथाक्षेत्र अध्याप तेथवरही पोचलेले नाही. न्यानो (Nano) तंत्रज्ञान आता सर्व क्षेत्रे काबीज करू लागले आहे. यात मानवी जगाला सुख देणार्या आणि भयभीत करणार्या अनेक भावी संभावना आहेत. त्याबाबतही अत्यंत उत्कृष्ठ कथा निर्माण होऊ शकतात. मी स्पेस ब्राव्हो या कादंबरीत त्याचा भविष्यवेधी उपयोग केला आहे. भारतातील प्राचीन तंत्रज्ञान हाही आज फार चर्चेचा विषय आहे. पण त्या कल्पना आज सत्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या सत्यात आल्या तर आजचे जग कसे असेल यावरही लेखन व्हायला हवे होते. ते झालेले नाही. मी शेवटी “"The Astronaut Who Crashed In From Space" या शीर्षकाखाली या विषयावर कादंबरी लिहिली, पण इंग्रजीत. मराठीत माझ्या अन्य विज्ञान कादंबर्यानी जी उपेक्षा सहन केली ती पुन्हा सहन करण्याची माझी इच्छा नव्हती एवढेच. मराठी वाचकांना विद्न्यानाभिमुख साहित्य्याकडे वळवणे शक्य तेव्हाच होईल जेव्हा या विषयावर अनेक साहित्यिक विज्ञानाचा मुलगर्भ आणि भावी संभावना समजून घेऊ शकतील आणि रंजक कथेच्या माध्यमातून विपुल लेखन करत राहतील तेव्हा. वैज्ञानिक साहित्यच पुरेसे उपलब्ध नसेल तर लोक त्याकडे कसे वळणार? आणि समीक्षकांनी ते साहित्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपली लेखणीच उचलली नाही तर काय होणार? साहित्य कोणतेही असो, त्याच पहिला निकष म्हणजे ते रंजक व वाचनीय असले पाहिजे. अनेक लेखक विज्ञान कादंबरी अथवा कथा लिहिताना वैद्न्यानिक माहितीचा किचकट भाषेत एवढा मारा करत जातात की विज्ञानही हरवते आणि कथाही निरस बनते. असे टाळले गेले पाहिजे. विज्ञानकथा लेखक विज्ञानातील जाणकार तर असलाच पाहिजे पण तो प्रतिभाशाली साहित्यिकही असला पाहिजे. तरच विज्ञान-साहित्य लोकाभिमुख बनू शकते. शेवटी हा विषय लेखक-प्रकाशक आणि समीक्षकांचा आहे. विज्ञान साहित्यच निरस आहे, छद्म-विज्ञानाचे दर्शन घडवत आहे किंवा कोणाचीतरी नक्कल आहे असे काही झाले तर ते समाजाला आपले वाटणार नाही. ते लोकाभिमुख होण्याची तीळमात्र शक्यता नाही हे लक्षात घ्यावे लागेल. शेवटी लेखकांनाच आपली कंबर कसावी लागेल. वाचकांना दोष देऊन फारसा उपयोग नाही कारण वाचक शेवटी जे उपयुक्त आहे किंवा रंजक आहे तेच वाचणार हे लक्षात घ्यावे लागेल. (अखिल भारतीय मराठी साहती संमेलनाच्या "अटकेपार" या स्मरणिकेत प्रसिद्ध झालेला लेख) •

No comments:

Post a Comment

विज्ञान साहित्य लोकाभिमुख होण्यासाठी!

ज्या समाजात जीवनाकडे पाहण्याचा विज्ञानवादी दृष्टीकोन नसतो असा समाज कधीही ऐहिक आणि मानसिक प्रगती करू शकत नाही. मराठी विश्व हे विज्ञानच काय ...