दबलेले...दाबुन टाकलेले, खोट्या भ्रमात ठेवले गेलेले, सर्वस्वी लुटले गेलेले समाज कधी न कधी जागे होत असतात. मग ते अन्यायकर्त्यांना जाब विचारु लागतात. आम्हाला धार्मिक असो कि आर्थिक कि राजकीय स्वार्थाच्या मागे लागणा-यांनी का नागवले हा प्रश्न विचारु लागतात. कुवतीपेक्षा कोणी पुढे जात नाही हे मान्य करुनही जेंव्हा कुवतीच छाटल्या जातात तेंव्हा जो मानसिक आकांत होतो त्याला अन्यायकारक व्यवस्था निर्माण करणारेच जबाबदार असतात. धर्मसत्तेकडे बोट दाखवत त्यांनाच स्वत:ही टार्गेट करणारे नेहमीच स्वत:ला सामाजिक टीकेपासुन स्वत:ला दुर ठेवायचा प्रयत्न करत पुन्हा सर्वसामान्यांना नागवण्याच्या उद्देशाला पुढे रेटत असतात. सत्ताधारी कोणत्याही जातीचा/धर्माचा असो, या नागवणुकीपासुन तेंव्हाच सर्वसामान्यांची सुटका होवू शकते जेंव्हा सत्तेचे वितरण न्याय्य पद्धतीने सर्वच समाजघटकांत होते...व ते कदापीही वंशपरंपरागत न बनता सर्वांत फिरते राहते. सरंजामशाहीला सलाम करणारी प्रजा कधीही खरी लोकशाही आणु शकत नाही. भारतातील लोकशाही हा एक भ्रम आहे. आता हे वास्तव सर्वसामान्यांना समजावून घ्यावे लागनार आहे. धर्मसत्तेने सत्ताधिशांकडे वा सत्ताधिशांनी धर्मसत्तेकडे बोट दाखवत आजवर जे शोषण केले ते त्यांनी थांबवायचे असेल तर सरंजामदारी मनोवृत्तीला छेद देण्याची गरज आहे.
जागा झालेला, मोहनिद्रेतुन बाहेर आलेला समाज अनेकदा हिंसक बनतो हे जागतीक इतिहासाने आजवर दाखवून दिलेले आहे. ज्याला मुळात गमावन्यासारखे काही उरलेलेच् नसते तो नकळत हिंसेचे वा जहरी द्वेषाचे हत्यार वापरु लागतो. आणि हे कोणत्याही सुसंस्कृत समाजाला परवडणारे नाही. आज धर्मसत्ता नष्टप्राय झाल्यासारखे वाटत असले तरी तीही चहुअंगांनी मानवी जीवन संकुचित करण्यासाठी प्रयत्न करत आहे...पण राजसत्ता मात्र सर्वोपरी होत मानवी जीवनाला किड्या-मकोड्याच्या मानसिक व वास्तव स्थितीला नेत जात मानवी जीवन अत्यंत असुरक्षित व भयावह स्थितीला नेण्यात अग्रेसर बनलेली असल्याचे दिसते.
राजसत्ता आणि लोकसत्ता यातील हा संघर्ष आहे. धर्मसत्तेला मानायचे कि नाही याचे स्वातंत्र्य आहे पण राजसत्तेला मानणे वा न मानणे याचे स्वातंत्र्य आज आपण सारेच...अगदी धर्मसत्ताही गमावुन बसलेली आहे.
आपल्याला हवी आहे खरी निकोप लोकसत्ता. सरंजामशाही सर्वप्रथम लोकशाहीचा गळा घोटत लोकशाहीचेच सोंग आणत सर्व जीएवन व्यापत कशी जाते याची अगणित उदाहरणे याच देशाने दिली आहेत. या सरंजामशाहीच्या भ्रामक जालातुन बाहेर कसे यायचे हाच आता आपल्या लोकशाहीसमोरील खरा प्रश्न असला पाहिजे व त्यावरील उत्तरही आपल्यालाच शोधावे लागणार आहे.