१. मानवी मन हे एक अथांग, अंधारी आणि तरीही अपार जिज्ञासेने भरलेले गुढतम कुहर आहे. मानवी मनाचा वर्तमानकालीन जागृत भाग हा अत्यंत अल्पांश असून भुतकालातील अर्धजागृत वा सुप्ततेत असणा-या, बव्हंशी असत्यच असणा-या मित्थकांत घोटाळत तर असतेच त्याच वेळीस अगदीच अज्ञात असलेल्या भवितव्यात ते वर्तमानापेक्षाही अधिक रममाण असते.
२. त्यामुळे मनुष्याचा वर्तमान हा वास्तव रहात नाही. भुतकाळाची मिथकरुपी गडद छाया आणि अज्ञात भविष्याची उत्कंठावर्धक आकांक्षा यात त्याचा वर्तमान हा नेहमीच झाकोळुन गेलेला असतो. त्यामुळे जो भुतकाळ बनतो, म्हणजे वर्तमान क्षणाक्षणाने भुतकाळ बनत असल्याने, तोही अवास्तव व रोगट असतो...तर त्याच वेळीस, मुळात भवितव्य हे घडीव, ठशीव, आणि ज्याबाबत पुर्वभाष्य करत येईल आणि जे होणर आहे ते तसेच्या तसे वर्तमानात बदलनारच आहे, असे काही मुळात नसल्याने भवितव्याला कसलाही ठाम मुलाधार नसतोच.
३. वर्तमान हा अत्यंत क्षणिक असतो. तो बरोबर भुतकाळाच्या पात्रात जावुन मिसळत असतो तर तेवढ्याच गतीने भवितव्यही वर्तमानात येत असते. पण भवितव्यातुन वर्तमानात येणारे आणि वर्तमानातुन भुतकाळात मिसळनारे क्षण नेमके कोणती मानवी मानसिक क्रिया-प्रतिक्रिया घडवत असतात?
४. माणुस वर्तमानकालीन जीही कृत्ये करतो त्यांवर भुतकालीन अनुभवांची छाप असते तसेच भवितव्यात इप्सित असे काही घडु शकेल या अंदाजापोटीचे काही आडाखेही असतात हे खरेच आहे. पण भुतकालीन अनुभव आणि त्यावरील आधारित भविष्याचा अंदाज व त्या आधारित वर्तमानात घेतले जाणारे निर्णय हवे तेच भवितव्य निर्माण करतातच असे नाही असेही आपण पाहु शकतो.
५. तरीही मानवी वर्तमान हा मानवी परिप्रेक्षात भुतकाळ आणि भविष्यकाळाने ग्रसित झालेला असतो हे आपण सहज पाहु शकतो.
६. म्हणजेच माणसाच्या वर्तमानाला तसा काही अर्थ नसतो...जसा तो भुतकाळालाही नसतो आणि भविष्यकाळालाही नसतो.
७. म्हणजेच भुतकाळात कोणी काही अचाट कर्मे केली असे समजत आपला भुतकाळ अत्यंत वैभवशाली होता असे जे मानतात तेही चुक करत असतात. कारण भुतकाळातील व्यक्तींचा वर्तमान आपल्याला माहितच नसतो. (म्हणजे ते जेंव्हा जगत होते तेंव्हाचा त्यांचा सापेक्ष वर्तमान) भुतकाळ अथवा इतिहास हा बव्हंशी तथ्यात्मक नसुन आपल्याच आजच्या वर्तमानाचे गत्तैतिहासाचे एक प्रतिबिंब असते. इतिहास आपण तसाच पाहु इच्छितो जसा तो आपल्याला पहायला आवडते.
८. त्यामुळेच इतिहासाबद्दल विवाद होतात, कारण प्रत्येकाला जो इतिहास पहायचा आहे तो तसाच सर्वांनी पहावा असा आग्रह असतो. तीच साधने, तेच पुरावे आणि त्याच धारणा यांचाच आधार घेत जेंव्हा परस्परविरोधी मतांतरे येतात याचाच अर्थ असा असतो कि सर्वच इतिहास खोटा असून तो केवळ आपापल्या वर्तमानकालीन भविष्यकाळाच्या दडपनामुळे/अपेक्षांमुळे आक्रमकेतेने मांडावा लागतो...एवतेव तो इतिहास खोटाच असतो.
९. भुतकाळ हा कोणीही...भुतकालीन वर्तमानात असणारेही, कधीही निरपेक्षपणे नोंदवु शकत नाहीत. निर्णयप्रक्रियेत सामील होणा-या-कृत्यांत सामील होणा-या कोणचीही मानसिक प्रक्रिया कधीही नोंदवली जावू शकत नाही. म्हणुन इतिहास फक्त सनावळ्यांची नोंदपुस्तिका बनते ती यामुळेच. आजच्या...या क्षणातील वर्तमानाचा त्याकडे पहायचा दृष्टीकोन पुन्हा ज्याच्या-त्याच्या दुषित (भुत-भविष्यामुळे) वर्तमानावर अवलंबुन राहील. यामुळेच एखाद्याला महायोद्धा वा महापुरुष मानणा-यांना तोच योद्धा कसा कापुरुष आणि खलपुरुष होता हेही तेवढ्याच ताकदीने प्रतिवादार्थ सांगता येवू शकते. यच्चयावत विश्वात कोणी महापुरुष होत नसतो...होत नाही आणि होणारही नाही.
१०. महापुरुष हे समाजाचे त्यांच्या वर्तमानातील असह्य आक्रोशाचे रुप असतात. ते खरे महापुरुष नसतात. कोणात तरी मानवी समाज आपापल्या तत्कालीन व्यथा-वेदनांचे आरोपन करत असतो आणि मग कणाहीण माणसेही महापुरुष बनवले जात असतात, ते मुळात महापुरुष असतात म्हणुन नव्हे.
११. म्हणुनच प्रत्येक कथित महापुरुषाला त्याच्या काळचौकटीचे बंधन आहे. त्यांना वर्तमानात आणण्याचा प्रयत्न केला जातो...पण त्यामागे वर्तमानातल्यांना आपणही तसेच आहोत असे दाखवण्याचा अट्टाहास असतो...पण खुद्द मुळ महापुरुष आजच्या वर्तमानात उतरले तर तेही कदाचित क्षुद्र ठरतील...कारण कोणाचेही महानत्व मुळात वास्तव नसते.
१२. म्हणुन भुतकाळ हा जसा काळसापेक्ष चौकटीत निरर्थक असतो तसेच भवितव्यही, कारण भवितव्याला तर तसे काहीएक भौतिक अस्तित्व नसते. पण आपण वर्तमान मात्र भुतकाळाच्या अज्ञ चौकटीत कोंबत भवितव्याची कामना करत असतो. आणि म्हणुनच मानवी समाज आपले आदिम इप्सित साध्य करु शकलेला नाही.
१३. समाजाला जेंव्हा आराध्यांची गरज वाटते...गतकालीन महामानव यांचेच पाय धरावे व चिंतन मिळवावे असे जेंव्हाही वाटते तेंव्हा याचाच अर्थ असा असतो कि समाज अध:पतीत होण्याचेच हे लक्षण आहे.
१४. जोही समाज गतकालीन वा वर्तमानकालीन कोणालाही आराध्य मानतो व त्याची अंध पाठराखन करतो तेंव्हा त्याची फसवणुक अटळ असते...कारण "आराध्य" हे समाजाचीच उपज असते...कोणी निसर्गता: आराध्य असुच शकत नाही.
१५. आणि आराध्य हवे वाटते याचाच अर्थ व्यक्ती भुत-वर्तमान-भविष्य याचा तोल हरपुन बसलेली असते...नेमके कोणत्या काळात जगायचे याचे भानही नसते...या एकुणतील असमतोलातुन त्या त्या काळातील आराध्ये निर्माण होत असतात. अनेक आराध्ये जी गतकाळातील असतात...तेंव्हा ती आराध्येही नसतात...पण वर्तमान तोषवण्यासाठी तीही आराध्ये बनवली जातात...ही मानवी वंचना आहे.
१६. माणुस हा यच्चयावत विश्वातील अवैज्ञानिक आणि स्थल-कालसापेक्ष किमान ज्ञानापासुन दुरच होता आणि दुरच राहील. याला मुख्य कारण म्हणजे त्याची भावनिकता आणि त्याचे कालसंदर्भचौकटीत रहात असुनही होत असणारे कालसंदर्भातील भावनिक गोंधळ.
17. आणि म्हणुनच माणसाला भुतकाळाबद्दल अधिक बोलायला आवडते...भवितव्याची स्वप्ने पहायला आणि दाखवायला आवडते...मनुष्य कधीच वर्तमानात जगत नाही. आणि म्हणुणच तो दु:खी असतो. म्हणुणच तो कधीही त्याला जसेही हवे वाटते असे भवितव्य घडवु शकत नाही. म्हणुनच मनुष्य एक कणभरही पुढे सरकलेला नाही...भलेही भौतिक प्रगती कितीही साधली गेलेली असो.