Thursday, January 15, 2026
मानवी जीवनाला स्थैर्य देणारा शेतीचा शोध!
शेतीचा क्रांतीकारी शोध हा सुरुवातीच्या शिकारी मानवांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा होता. त्याआधी इ.स.पू. २०,००० पर्यंत पशुपालक आणि शिकारी अशा मिश्र समाजात मानवजात रूपांतरित झालेली होती. जीवन भटक्या स्वरूपाचे आणि अनंत धोक्यांनी भरलेले होते. आपण अन्नाच्या शोधात भटकण्यापेक्षा आपणच अन्नाचे निर्माते व्हावे असे जेव्हा मानवाला वाटले तेव्हाच या क्रांतीकारी शोधाचा जन्म झाला. अर्थात हिमयुग आणि त्यानंतर आलेले उबदार युग त्याला जगण्यासाठी आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणायला संधी मिळाली. शेतीच्या शोधाने मानवाचे जीवन नाट्यमयरित्या बदलले. उत्खननात मिळालेल्या पुरातत्वीय पुराव्यांमुळे असे मानले जाते की, शेतीचा शोध इ.स.पू. ९००० च्या सुमारास झाग्रोस पर्वतरांगेत लागला, तरी प्रत्यक्षात कृषी युग यापेक्षाही काही हजार वर्षे आधी सुरु झालेले असू शकते.
पशुपालक लोकांच्या मनात नेमके कधी आले की त्यांना अन्न आणि चाऱ्यासाठी भटकावे लागणार नाही, तर ते स्वतःच त्याचे उत्पादन करू शकतात? त्यांनी अनेक युगे निसर्गाचे चक्र पाहिले असेल, बियांपासून त्याच प्रकारची वनस्पती नव्याने उगवताना पाहिली असेल. आपल्या शिकारी अथवा अन्नसंकलन करण्याच्या प्रदीर्घ काळात त्यांना गहू, मका किंवा इतर तृणधान्याच्या जंगली वनस्पती आढळल्या असतील. त्यांनी त्यांचे सेवनही केले असेल. पण त्याला जीवनावश्यक व्यवसायात आपण बदलवू शकतो हे सावकाश त्याच्या लक्षात आले असावे. तसे सुकून वाळलेल्या, धराशायी झालेल्या वनस्पती बीजापासून पावसानंतर पुन्हा नव्याने वाढतात हे ज्ञान त्यांना प्राचीन काळापासून मिळाले असावे. त्यांनी बिया पेरून फळे देणाऱ्या झाडांवरही हा प्रयोग केलाही असेल आणि निसर्गाने साथ दिल्यास, अनेक वर्षे आश्चर्याने त्यांची वाढही पाहिली असेल. तथापि, त्यांना असे वाटले नाही की ते पद्धतशीर लागवडीद्वारे अन्न उत्पादन करू शकतात. याचे कारण म्हणजे शिकार व अन्नसंकलनाची त्याला लागलेली काही लक्ष वर्षांची सवय. त्या काळात त्याने काही शोध लावलेच! म्हणजे दगडी हत्यारांचे शोध, कातडी कमावण्याचा शोध, कृत्रिम पण तात्पुरत्या निवार्यांचा शोध, चकमकीने आग पेटवायचा शोध...अशा अनेक शोधांनी त्याचे बिकट जीवन थोडे सुसह्य केले असले तरी शेतीच्या शोधाने संपूर्ण मानवी जीवनात एक विलक्षण क्रांती घडून आली. समाज व्यवस्था, भाषा, धर्म कल्पना, काव्य, मिथके यांचे स्वरूप अधिक व्यामिश्र आणि अर्थपूर्ण झाले. आजचा आधुनिक मानव शेतीच्या शोधाच्या पायावरच उभा आहे असे म्हणायला हरकत नाही.
सुरुवातीची शेती ही निव्वळ कुतूहलातून व भटक्या स्वरूपातच होत असली तरी हिमयुगानंतर तिच्यात नाट्यपूर्ण बदल हाले. सुमारे दहा-बारा हजार वर्षांपूर्वी, जगभरात शेतीच्या पद्धतींमध्ये अचानक वाढ झाल्याचे दिसते. मेहरगढ आणि झाग्रोस ही पुरातत्वीय स्थळे सर्वात प्राचीन शेतीच्या पद्धतींची उदाहरणे आहेत. याहूनही जुने पुरावे असू शकतात, परंतु ते काळाच्या ओघात नष्ट झाले असावेत. पण जवळजवळ सर्व जमाती शेतीकडे वळण्याची तत्कालीन कारणे काय असावीत? शेती हा काही एकाएकी लागलेला नवीन शोध नव्हता. पद्धतशीर लागवडीकडे वळण्यापूर्वी, त्यांनी कदाचित अनौपचारिकपणे, गंमत म्हणून शेती केलीही असेल. पण त्यांनी उपजीविकेचे साधन म्हणून तिचा वापर केला नाही असे दिसते. शेतीच्या शोध स्त्रियांनी लावला असेही एक लोकप्रिय मत आहे आणि त्यात तथ्यही आहे. पण शेवटचे हिमयुग सरासरी बारा हजार वर्षांपूर्वी संपून उबदार युग सुरु झाले आणि शेती तंत्राचा विस्फोट झाला असे आपल्याला दिसते.
मानवी संस्कृतींच्या उत्कर्षात आणि ऱ्हासात हवामानातील बदलांचा जवळचा संबंध आहे. यामुळे केवळ मानवांना त्यांच्या जगण्याच्या पद्धतीच नव्हे, तर सांस्कृतिक पद्धतीही बदलण्यास भाग पाडले आहे. त्या काळातील मानवांनी एका हिमयुगाचा अनुभव घेतला होता. तो काळ जगण्यासाठी अत्यंत प्रतिकूल आणि कठीण होता. हिमयुगामुळे लोकसंख्या आकुंचित झाली असावी असेही दिसते. परंतु हिमयुगाच्या काळात आणि त्यानंतरही लोक फार स्थलांतरे न करता प्रतिकूल स्थितीला तोंड देत मोठ्या प्रमाणावर त्याच भागात राहत होते, हे कोस्टेंकी मानवाच्या डीएनएवरून स्पष्ट होते. हा डीएनए मध्य सायबेरियामध्ये सापडलेल्या २४,००० वर्षांपूर्वीच्या एका मुलाच्या डीएनएसारखाच होता. हे वास्तव सूचित करते की प्रतिकूल हवामानाची परिस्थिती असूनही लोक त्यांच्या परिचित प्रदेशांमध्ये अधिक रुजलेले होते.
सुमारे १२ हजार वर्षांपूर्वी किंवा त्यापूर्वी होलोसीन युगाची सुरुवात झाली. हे एक उष्ण युग होते. बर्फ वितळल्यामुळे समुद्राची पातळी सुमारे ११५ फुटांनी वाढली. काही महाकाय प्राणी प्रजाती नामशेष झाल्या कारण त्या हवामान बदलाशी जुळवून घेऊ शकल्या नाहीत. हवामान बदलाच्या संक्रमण काळात लोकसंख्येची घट झाली असावी. हिमयुगाने मानवजातीला आपली जीवनशैली बदलण्यास भाग पडले. जगण्याच्या नैसर्गिक इच्छेने त्यांना उपजीविकेचे नवीन मार्ग शोधायला लावले. आपल्या पूर्वजांची आधुनिक मानसिकता तयार व्हायला हिमयुगच कारण झाले. त्यांनी हिमनदीच्या युगाचा अनुभव घेतला होता आणि त्यानुसार त्यांनी आपली जीवनशैली जुळवून घेतली होती.
तथापि, निसर्गातील बदलामुळे मानवाला जगण्यासाठी नवीन मार्ग शोधण्यास भाग पाडले असावे. मानवाने आपली वस्ती पूर्वीच्या निर्जन प्रदेशांमध्ये हलवली असावी, कारण हिमयुगाच्या समाप्तीमुळे बर्फाच्या थरांनी झाकलेले अनेक प्रदेश रिकामे झाले असावेत. नव्याने पुन्हा फोफावणार्या वनस्पतींनी या पुरा-मानवाच्या कल्पनाशक्तीला अजूनच प्रोत्साहन दिले असावे.
शेती-जीवनाची सुरुवात होलोसीन युगाच्या (उबदार युग) सुरुवातीशी जुळते. याचा अर्थ या युगाला आपल्या प्राचीन इतिहासात महत्त्व आहे. शेतीमुळे सुरुवातीच्या शेतकऱ्यांना त्यांच्या संबंधित प्रदेशांमध्ये, जिथे ते कायमस्वरूपी शेती करू शकत होते, तिथे स्थायिक होण्यास मदत झाली. पाण्याची खात्रीशीर उपलब्धता आणि सुपीक जमिनींसाठी नदीखोऱ्यांची निवड नैसर्गिक होती. हा मानवी इतिहासातील एक क्रांतिकारक टप्पा होता. यामुळे त्याची जीवनशैली आणि सामाजिक संदर्भ नाटकीयरीत्या बदलले. खऱ्या अर्थाने, मानव जमिनीशी जोडला गेला. शेतीमुळे तो स्थिर झाला. त्याची मानसिकता नाट्यमय रूपाने बदलली. ज्या प्रदेशात तो स्थिर झाला त्या प्रदेशाच्या भूगर्भीय रचनेमुळे त्याच्या सामुहिक मानसिकतेत मोठा बदल झाला. वैशिष्ट्यपूर्ण प्रादेशिक संस्कृतींचा उदय त्यातूनच झाला. त्याची भटकंतीची आवश्यकता संपली. पण हे सोपे नव्हते. काही मानवसमूह अजूनही पशुपालक राहिले. त्यांची भटकायची उर्मी कमी झाली नाही. एकीकडे स्थिर होऊ पाहणारी नवी संस्कृती आणि आदिम भटकी संस्कृती यांच्यात दीर्घकाळ वैचारिक-मानसिक संघर्ष झाला असणे स्वाभाविक आहे. या संघर्षाचे अवशेष आपल्याला प्राचीन मिथककथांतून मिळतात. यात शेवटी कृषी संस्कृतीनेच आपले वर्चस्व प्रस्थापित केले असेही आपल्याला दिसते.
अर्थात या शोधाने मानवी जीवनाला स्थैर्य दिले एवढेच त्याचे महत्व नाही. मानवी जीवनाला आकार देणारे अनेक पूरक शोधही त्यामुळेच लागत गेले. ते पुढील भागात!
-संजय सोनवणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
मानवी जीवनाला स्थैर्य देणारा शेतीचा शोध!
शेतीचा क्रांतीकारी शोध हा सुरुवातीच्या शिकारी मानवांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा होता. त्याआधी इ.स.पू. २०,००० पर्यंत पशुपालक आणि शि...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...
No comments:
Post a Comment