इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात. १ फेब्रुवारी १६८९ ते ११ मार्च १६८९ या कालातील छ. संभाजी महाराजांबदल मराठी इतिहास असाच मौन पाळुन बसला आहे. ढोबळ व संक्षिप्त माहिती व्यतिरिक्त हातात काहीच लागत नाही. एका सार्वभौम राजाची अटक ते निघृण हत्या घडल्याची अति-अपवादात्मक घटना घडली असतांनाही असे घडावे याचे आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. असो. तरीही आपल्याला कालक्रमानुसार ही संपुर्ण घटना नजरेखालुन घालायची आहे व उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. या उत्तरांतुन अजुन काही प्रश्न निर्माण होतील याची मला जाणीव आहे...पण उत्तरे शोधण्याचा प्रयत्न एक अभ्यासक म्हणुन निकोपपणे करणे मला आवश्यक वाटते.
मराठी रियासत भाग दोनमद्धे येणारा कालक्रम असा...
१) २१–४-१६८० रोजी राजारामास गादीवर बसवण्यात आले
(२) ६-५-१६८० राजारामाचे मंचकारोहण
(३) १८-६-१६८० संभाजी रायगडावर आला
(४) २०-७-१६८० संभाजीने मंचकारोहण केले
(५) १६-१-१६८१ संभाजीचा राज्याभिषेक
(६) १-२-१६८९ संगमेश्वर मुक्कामी असताना छत्रपती संभाजी महाराज व कवि कलशास शेख निजाम यांनी ( जवळच्याच खटोले गावी ) पकडले.
(७)९-२-१६८९ राजारामाचे मंचकारोहण रायगडावर
(८) शेख निजाम याने संभाजी महाराज व कलुशास १५ फेब्रुवारी १६८९ रोजी बहादुरगड (पेडगांव, जि. अहमदनगर) येथे औरंगजेबासमोर उपस्थित केले.
(९) ११-३-१६८९ संभाजीचा वध कोरेगावच्या छावणीत
(१०) २५-३-१६८९ झुल्फिकारखानाचा रायगडास वेढा
(११) ५-४-१६८९ रायगड सोडून राजारामाचे प्रतापगडास आगमन
(१२) ऑगस्ट १६८९ राजारामाचे प्रतापगड सोडून पन्हाळ्यास प्रयाण
(१३) ३-११-१६८९ रायगड किल्ला झुल्फिकारखानास हस्तगत
संभाजीमहाराजांविषयी जेधे शकावली आणि करीनामध्ये आलेली माहिती खालीलप्रमाणे :-
१) जेधे शकावली
(१) वैशाख शुध ३ त्रितीयेस राजारामास आनाजी पंत सुरणीस यांनी मंचकी बैसवीले
(२) आशाड शुध २ शुक्रवारी संभाजी राजे रायेगडास आले राज्य करू लागले राजाराम कैदेत ठेविले
(३) श्रावण शुध ५ पंचमी संभाजी राजे मंचकाराहोन जाले
(४) माघ सुध ७ रायेगडी संभाजी राजे सिव्हासनी बैसले
(५) माघ वद्य ७ शुक्रवासरी संभाजीराजे व कविकलश रायेगडास जावयास संगमेस्वरास आले असता सेक निजाम दौड करून येऊन उभयेतांस जिवंतच धरून नेले वरकड लोक रायेगडास गेले
(६) फालगुण शुध ३ राजारामास रायेगडचा किल्लेदार चांगोली काटकर व येसाजी कंक याणी माघ वद्य ३० अदबखानाहून काढून बाहेर आणून मंचकी बैसविले मानाजी मोरे व वरकड सरकारकून धरिले होते ते सोडिले ज्याचे कार्य भाग त्यासी देऊन राजाराम राज्य करू लागले येसजी व सिदोजी फर्जद यास कडेलोट केले
(७) फालगुण वद्य ३० अवरंगजेब तुलापुरी संभाजी राजे व कवि कलश यास जिवे मारून सिरच्छेद केले
(८) चैत्र शुध १५ अवरंगजेब जुलपुकारखानास पाठऊन रायगडास वेढा घातला चैत्र वद्य १० शुक्रवारी राजाराम पळोण प्रतापगडास गेले.
२) जेधे करीना
(१) ..... शेख निजाम यास फौजेनसी राजश्री संभाजी राजे याजवरी रवाना केले त्याणे संगमेश्वरास येऊन राजश्री संभाजी राजे व कविकलश यास माघ वद्य ७ शुक्रवारी सेख निजामाने धरून तुलापुरास नेले तेथे पातशाहानी उभयतांस जिवे मारिले राजश्री राजाराम रायेगडी अटकेत होते ते बाहेर काढून मंचकावारी बैसऊन राज्याभिषेक केला शके १६११ शुक्ल संवछरी जुलपुकारास रवाना केले राजश्री राजाराम निघोन रायेगडीहून प्रतापगडास आले.
शकावली व रियासती तसेच मुस्लिम साधनांतील माहितीनुसार वर येणारा कालक्रम बरोबर आहे असे दिसते.
वरील घटनाक्रमावरुन पहिली ठळक नजरेत भरणारी बाब म्हणजे इकडे संभाजी महाराज अटकेत पडले असतांनाही मंत्री व अन्य सरदारांनी राजाराम महाराजांची तात्काळ सुटका करुन ९ फेब्रुवारी रोजी त्यांचे मंचकारोहन केले. म्हणजे ही सुटका संभाजी महाराजांच्या अटकेनंतर दोनेक दिवसांतच झाली असण्याची शक्यता आहे. मंचकारोहनचा सरळ अर्थ असा कि राजाराम महाराजांना नवा राजा म्हणुन घोषित करण्यात आले. या समारंभास अर्थातच सर्व मंत्री व महत्वाचे सरदार हजर असले पाहिजेत.
याचा अर्थ असा होतो कि संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा राजाराम महाराजांना नवा राजा म्हणुन घोषित करण्यात मंत्रीगण व सरदारांना अधिक रस होता. राजाराम महाराजांनी सिंहासनावर बसताच येसाजी व सिदोजी फर्जंद या संभाजी महाराजांच्या समर्थकांना कडेलोट करण्यात आले. सिदोजी फर्जंद हा संभाजी महाराजांचा विश्वासु अधिकारी होता. त्याने संभाजी महाराजांच्या वतीने पोर्तुगीजांना पाठवलेली दोन पत्रे (२४ डिसेंबर १६८४ व १० मार्च १६८५ )उपलब्ध आहेत. तत्पुर्वी संभाजी महाराजांनी अटकेत टाकलेल्या चांगोली काटकर व येसाजी कंक यांना मुक्त केले.
म्हनजेच राजा म्हणुन राजाराम महाराजांनी कार्यभार तर घेतलाच पण संभाजी महाराजांच्या विश्वासु अधिका-यांना ठार मारले व ज्यांना अटकेत टाकले होते त्यांना मुक्त केले व सवतंत्र कारभार सुरु केला.
बखरकार संभाजी महाराजांवर अन्याय करतात हे खरे मानले तर राजाराम महाराजांचे हे दिलेले दोन हुकुम (बखरकार राजाराम महाराजांचे पक्षपाती असल्याने) तत्कालीन वास्तवाकडे बोट दाखवतात.
हे सगळे संभाजी महाराज अटक झाल्यापासुन अवघ्या नऊ दिवसांत झाले आहे हे विशेष. राजाराम महाराजांनी राज्यकारभार हाती घेतल्यानंतर संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी सरदारांना कसलाही हुकूम दिलेला दिसत नाही. झुल्फिकारखानाचा रायगडास वेढा २५-३-१६८९ रोजी पडलेला आहे. संभाजी महाराजांची हत्या तत्पुर्वीच झालेली होती. त्यामुळे मोगलांच्या कोकणातील प्राबल्यामुळे मराठ्यांना हालचाल करायला अवधी मिळाला नाही या म्हनण्यात तथ्य नाही.
एवढेच नव्हे तर ९ तारखेला राजाराम महाराज स्वत:च सत्ताधीश बनल्यामुळे औरंगजेबाशी स्वराज्याच्या वतीने संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी तह करण्याचे अधिकार आता सरळ राजाराम महाराजांकडे आले होते. संभाजी महाराजांच्या हाती काही उरलेलेच नव्हते. त्यामुळे धर्मांतर, किल्ल्यांची व खजिन्याची औरंगजेबाची मागणी याबाबत फारसी सधनांनी जे लिहुन ठेवले आहे ते विश्वसनीय मानता येत नाही. औरंगजेबाचे हेरखाते प्रबळ होते. काही मराठा सरदारही त्याचे हेर म्हणुन काम करत होते. असदखानाला औरंगजेब लिहितो कि...."मुकर्रबखानास पन्हाळा घ्यायला पाठवले आहे. त्यास ताबडतोब कळवा कि त्यांनी ताबडतोब तेथील जहागिरदारावर (संभाजीवर) चालुन जावे. तो जहागिरदार एकटाच रायरीवरुन खेळण्यास गेला आहे. त्याचे कारण म्हणजे शिर्क्याशी भांडण देणे हे आहे....." (रुकायत-ई-आलमगिरी)
म्हणजे औरंगजेब संभाजी महाराजंची प्रत्येक क्ल्हबर ठेवत होता. एवढी संवेदनशील माहिती त्याच्यापर्यंत पोहोचत होती याचाच अर्थ असा कि रायगडावरही घरभेदे होते. जेधे शकावलीनुसार खेम सावंत, शिर्के, नागोजी माने ई. मंडळी औरंगजेबाला सामील झाली होती व तेच संभाजी महाराजांची वित्तंबातमी औरंगजेबाला पुरवत होते.
दुसरी महत्वाची बाब अशी शंभुराजे संगमेश्वराला आले १ फेब्रुवारीला...किंवा तीन दिवस आधी. पण त्यांच्या सोबत फक्त ४०० ते ५०० भालाईत होते. मुकर्रबखान अवघ्या ६०-७० मैलांवर कोल्हापुरी आहे हे संभाजी महाराजांना माहित असावे. तरीही एवढ्या अल्प सैन्यासह ते कसे हा प्रश्न उद्भवतो. मोगल येथेवर येणार नाहीत एवढे गाफिल संभाजी महाराज राहतील असे वाटत नाही कारण शिवाजे महाराजंच्या निधनापासुन अनेक कटकारस्थानांचा त्यांना सामना करावा लागला होता. बरे ही तुकडी होती फक्त भालाइतांची. मोठ्या लढाइला अनुपयुक्त. त्यांच्या सोबत सरसेनापती म्हाळोजी व संताजी घोरपडॆ हे पितापुत्र व खंडोजी बल्लाळही होते. (यात जेधे शकावली फारशी विश्वसनीय धरता येत नसली तरी संताजी राजांसोबत होता हे स्पष्ट दिसते.) असे सेनानी बरोबर असतांना त्यांचे सैन्य मात्र बरोबर नव्हते. मुकर्रबखानाने दोन हजार घोडदळ व हजार पदाती यांच्या बळावर एक फेब्रुवारीला अचानक हल्ला चढवला. या अनपेक्षीत हल्ल्यामुळे राजांचे सैन्य फारसा प्रतिकार करु शकले नाही. ते पळुन गेले. अधिकारीही पळाले. अटक झाले ते संभाजी महाराज आणि कवि कलश व काही वरकड लोक. यात संताजीचे नांव दिसत नाही म्हणजे तेही पळुन जाण्यात यशस्वी झाले असे दिसते. ही पळालेली मंडळी सरळ आसपसच्या किल्ल्यांच्या आश्रयाला निघुन जाण्यात यशस्वी झाली.
आता संभाजी महाराज मद्याच्या वा कवि कलशाच्या अनुष्ठानच्या नादात पकडले गेले हे बखरकारांचे म्हणणे मान्य करताच येत नाही. कसल्याही परिस्थितीत ही अटक अपरिहर्यपणे अटळ बनली होती. संभाजी महाराजांना सापळ्यात तर अडकावले गेले नाही ना हाच प्रश्न उपस्थित होतो. य प्रश्नाकडॆ वरील घटनाक्रम पाहता निकोपपणे पहायला हवे.
खरे तर रायगडावर व सह्यद्रीच्या रांगांतील किल्यांच्या किल्लेदारांपर्यंत ही बातमी अवघ्य दोनेक दिवसात पोहोचली असनार. मुकर्रबखानाचे एकुण सैन्य होते फक्त तीन हजार. बादशहा त्यावेळी होता तीन-चारशे किलोमीटर दुर अकलुजला. संगमेश्वरपासुन राजांना घेवून मुकर्रबखान बहादुरगड्ला (पेडगांव, जि. अहमदनगर) पोहोचला तो १५ फेब्रुवारीला. हे अंतर काटायला त्याला तब्बल पंधरा दिवस लागले. हा प्रवास त्याने चिपळुन, खेळना, पन्हाळा ते बहादुरगड असा पुर्ण केला. या मार्गावर मराठ्यांच्या ताब्यात अनेक किल्ले होते. सह्याद्री घाटात तर मराठ्यांना मुकर्रबखानावर हल्ला चढवण्याची संधी होतीच. पण असा एकही प्रयत्न झाला नाही. त्यांनी तसा काही प्रयत्न करु नये अशी काही आज्ञा तर नसेल?
आपल्य राजाचे सर्वतोपरी रक्षण करणे व त्याला योग्य ते संरक्षण पुरवणे ही जबादारी प्रधानमंडळाची असते. बखरी विश्वसनीय मानल्या तर सेनापती म्हाळोजी (मालोजीराजे) राजांसोबतच होते...आणि फक्त चार-पाचशे भालाइत? तेही ते शिर्क्यांचा तंटा सोडवायला गेले असतांना? छ. शिवाजी महाराजांचे स्वत:चेच अंगरक्षक दल हे दोन हजार कसलेल्या सैनिकांचे असायचे. यातुन दोनच तर्कनिष्ठ अर्थ निघू शकतात...एक म्हणजे संभाजी महाराजांना मुकर्रबखान चालुन येतो आहे ही बातमीच एरवी चाणाक्ष व तरबेज असलेल्या हेरखात्याने काही कारणास्तव दिली नाही. अरण्यातुन कितीही लपत प्रवास केला तरे हा प्रवास तीन हजार शत्रूसैन्याचा होता...तोही तीन दिवस चाललेला....त्यांचे अस्तित्व हालचाल कोणाच्याही लक्षात येणार नाही हे मला तरी संभवनीय वाटत नाही. दुसरा म्हणजे संभाजी महाराज पकडले जावेत हीच सरदार-मंत्रीगणाची इच्छा होती म्हणुन हा घटनाक्रम घडवण्यात आला असे समजायला बराच वाव आहे. अगदी समजा संभाजी महाराज नशेच्या अंमलामुळे बेसावध राहिले...पण त्यांचे हेरखाते वा सरदार वा अगदी भालाइतही अचानक हल्ला होईपर्यंत बेसावध होते असे मुळीच म्हणता येत नाही. राजाराम महाराजांनी तात्काळ सिंहासनावर बसणे, अधिकार वापरायला सुरुवात करणे पण संभाजी राजांच्या सुटकेसाठी एकही युद्धाची आज्ञा जारी न करणे, औरंगजेबाकडे एकही मुत्सद्दी व वकील तडजोड/तहासाठी न पाठवणे या गोष्टी काय सुचवतात? राजाराम महाराज ५ एप्रिल १६८९ रोजी झुल्हिकारखानच्या वेढ्यातुन निसटतात पण महाराणी येसुबाईं व संभाजीपुत्र बाल शिवाजी (शाहु महाराजांचे मुळ नांव) मात्र झुल्फिकारखानाने रायगड जिंकल्यावर ३ नोव्हेंबर १६८९ पर्यंत रायगडावरच अडकुन पडतात व शेवटी मोगलांचे कैदी होतात....त्यांना मात्र आधीच किल्ल्याबाहेर काढले जात नाही वा तसा एकही प्रयत्न होत नाही याचाही अर्थ कसा लावायचा?
मला असे वाटते संभाजी महाराजांना आपल्याला सर्वांनी त्यागल्याचे अटकेच्या काही दिवसांतच समजुन चुकले असावे म्हणुन ते मृट्युला धीरोदात्तपणे सामोरे जायला सज्ज झाले.
असो...या काही प्रश्नांचे व तर्कांचे अजुनही काही पैलु आहेत...ते पुढील भागात...