खरे पहायला गेले तर प्रश्न हा भ्रष्टाचाराचा नसून स्वता:शी आपण किती प्रामाणिक आहोत याचा आहे. स्वत:शी प्रामाणिक नसलेला कोणताही माणुस पैसा खाओ अथवा न खाओ...भ्रष्टच असतो. पैशांचा भ्रष्टाचार विघातक असतो हे खरेच आहे...पण स्वत:शी भ्रष्टाचार करणे हे जगाला तर सोडाच स्वत:लाच अधिक विघातक असते. नव्हे विनाशक असते. नीतिभ्रष्टता नेहमीच स्वविनाशाला जन्म देते.
आपला समाज दुर्दैवाने नैतिक भ्रष्टतेच्या दु:श्चक्रात अडकला आहे. आपण भ्रष्ट म्हणून नाईलाजाने आपले नेते भ्रष्ट आहेत. आणि आपणच निर्माण केलेल्या भ्रष्टांच्या दलदलीत आपण रुतलो म्हणुन आक्रोश करायचा जसा आपल्याला अधिकार नाही तसाच श्री. विजय बळीराम पांढरे या मर्दाचा गौरव करण्याचाही नैतीक अधिकार नाही. कृष्णा खो-यापासून सुरु झालेल्या भानगडी आम्हा नागरिकांना माहित नव्हत्या काय? आम्ही काय केले? आज विजय पांढरेंना संरक्षण द्या म्हणतो...कोणाला? सरकारला? ज्या सरकारनेच हे सारे भ्रष्टाचार राजरोसपणे आपल्या डोळ्यांसमोर केले त्या सरकारला? मग आम्ही काय करत होतो? आम्ही काय करत आहोत? हे ताजे आहे म्हणुन उदाहरण दिले.
खैरनारांना मिडियाने प्रसिद्धीची चटक लावुन हद्दपार करुन टाकले. आता जे खैरनार दिसतात ते अस्तित्वाच्या शोधातील खैरनार. मी त्यांच प्रवास जवळुन पाहिला आहे. त्यांचे आत्मचरित्र "एकाकी झुंज" मीच प्रकाशित केले आहे. त्या आत्मचरित्राच्या प्रकाशनामुळे मला दोन वर्ष पोलिस संरक्षणात रहावे लागले आहे. पण खैरनार अज्ञातवासात गेले त्याची पर्वा महाराष्ट्राने केली नाही. उद्या पांढरेही अज्ञातवासात्त...महाराष्ट्र साफ विसरुन गेला तर मला आजिबात आश्चर्य वाटनार नाही...
कारण मुळात आपणच भ्रष्ट आहोत. आपली नैतिकताच संशयास्पद आहे. आपल्याला पांढरेंना वा खैरनारांना वा अन्य महनीय लोकांना एक सामाजिक अपवाद म्हणुनच पहावे लागनार आहे...सैतानांच्या झुंडींत अपवादाने जन्माला येणारी अशी सूर्यफुले...त्यांचे कवतुक सैतान करतात ते केवळ स्वार्थापोटीच!
आपणच असे सैतान आहोत हे आपल्याला कबुल करायला हवे!