Tuesday, November 4, 2025

एस.एस. रामदास: एक शोकांतिका

 

एस.एस. रामदास: एक शोकांतिका

-संजय सोनवणी




       

      शेख सुलेमान इब्राहिमची आजची पहाट घरातल्या कटकटीनेच उगवली. त्याची मनोरुग्ण बायको कधीही उठून कोणालाही, अगदी अनाम लोकांना-जगाला उद्देशून शिव्यांचा पट्टा सुरु करायची. तिच्या कर्कश्य आवाजात झोप पुरी होणे कठीण जायचे. सुलेमानही पूर्वी आरडाओरडा करून तिच्या दुप्पट आवाज चढवायचा. पण नंतर त्याने नाईलाजाने तेही सोडून दिले होते. एका कानाने ऐकणे आणि दुसऱ्या कानाने सोडून देण्याची कला तो शिकला होता. तिला तलाक देऊन टाकावा असा विचार त्याने केला नव्हता असे नाही. पण तिच्या कुटुंबाचा मृत्यू दंगलीत झाला असल्याने झालेली तिची उध्वस्त मनोवस्था हे या तिच्या उद्रेकी वागण्याचे कारण आहे असे डॉक्टरने सांगितल्याने त्याने तलाकचा विचार रद्द केला होता आणि आहे ते जगणे मनोमन स्वीकारून टाकले होते.

      तो उठून बसला आणि तिच्या आरड्या-ओरड्याकडे दुर्लक्ष करून कामावर जायला तयार होऊ लागला.

      आता भारताच्या स्वातंत्र्याला जवळजवळ एक महिना बाकी होता. सर्वत्र उत्साहाचे आनंदाचे वातावरण असले तरी हिंदू-मुस्लीम तणावाने कळस गाठला होता. अनेक ठिकाणी दंगली होत होत्या. माणसे मरत होती. एकीकडे स्वातंत्र्याच आनंद आणि दुसरीकडे हा तणाव. सारे जग एका महायुद्धाच्या तणावातून बाहेर येत असताना हा दुसरा तणाव भारतात उद्रेकू लागला होता. सुलेमान घरातील आणि बाहेरील वातावरण या दोघांच्या कात्रीत सापडलेला होता. तो अस्वस्थ होता. गांधी बिचारे सर्वत्र प्जीरात शांती आणण्यासाठी प्रयत्न करत असले तरी अन्य भागात विशेह फरक पडत नव्हता. तो जिनावर चिडून होता, पण काही उघडपणे बोलायची सोय नव्हती. खरे तर त्याला याबाबत कोणाशीतरी बोलावे वाटत होते पण त्याचे सगेवालेच हिंदूंविरुद्ध संतप्त असल्याने त्यांच्याशी काही बोलण्यात अर्थ नव्हता. कामावर असला की त्याला बरे वाटे,कामात गुंतला की त्रासिक विचार करायला वेळही मिळत नसे. त्यात तेथलीही अवस्था बिघडू लागलेली होती.

      सुलेमान इंडियन कोऑपरेटिव्ह स्टीम नेव्हिगेशन कंपनीचा कर्मचारी होता. तो मुंबईहून गोवा आणि वाटेत असलेल्या बंदरांवर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसएस रामदास बोटीचा कॅप्टन होता. सहाशे प्रवाशांची क्षमता असलेली ही बोट आता दहा वर्षाची झालेली होती. आधी ही बोट इंग्रजांनी दुसऱ्या महायुद्धातही वापरलेली होती. त्याच्या कंपनीने ती बोट लिलावात स्वस्तात विकत घेऊन आता प्रवासी बोटमध्ये रुपांतर केले होते. पण आता तीही दुरुस्तीला आलेली होती. सुलेमान रोज काही ना काही तक्रारी घेऊन वरिष्ठांकडे जात होता पण देखभाल-दुरुस्तीवर खर्च करायला कंपनी तयार नव्हती. सुलेमान त्यामुळेही निराश होता. ही बोट शक्यतो खोल समुद्रात न जाता किनाऱ्यानेच प्रवास करत असल्याने कधी काही भीषण आपत्ती येईल याची कल्पनाही करू नका अशी बतावणी त्याच्या वरिष्ठांनी केली होती. मुळात मुस्लिमांकडे पाहण्याचा सध्याचा दृष्टीकोन दुषित विखारी असल्याने सुलेमानलाही ते म्हणतील ते ऐकणे भाग होते.

      आज १७ जुलै १९४७. महिन्याभरात आपला देश स्वतंत्र झालेला असेल. नंतर हे सध्याचे वातावरण हळू हळू शांत होईल आणि पूर्वीसारखीच बंधुभावाची परिस्थिती येईल अशी त्याला आशा होती. त्याच्या सोबतचे अनेक मुसलमान पाकिस्तानात जाणार होते, पण त्याला त्याचा कसलही मोह नव्हता. तो येथेच लहानचा मोठा झाला होता आणि मुंबईचे वातावरण आणि समुद्र हे त्याचे जीवन बनलेले होते. ते सोडून परमुलुखात जायची त्याची मुळीच इच्छा नव्हती,

      बाहेर पडताच त्याने सवयीने आधी आभाळाकडे पाहिले. पावसाळा सुरू झाल्यामुळे त्याला हवामानाची चिंता असायची. आता आभाळात ढग दाटलेले असले तरी पावसाची त्याला आज शक्यता वाटत नव्हती. त्याने सुटकेचा निश्वास सोडला. माझगाव बंदराकडे जातांना त्याला शहरातील तणाव जाणवत होता. त्याला शहरातील वाढत्या धार्मिक जातीय तणावाची जाणीव होत होती. पण आपल्याला काही धोका होईल असे त्याला वाटले नाही. कारण एक तर तो कॅप्टनच्या ड्रेसमध्ये होता आणि दुसरे म्हणजे

तणाव असला तरी अजून या भागात हिंसेचे लोन पसरलेले नव्हते.

 

      तो सकाळी लवकर भाउच्या धक्क्यावर पोहोचला. एसएस रामदास बोट किनार्यावर दिमाखात हेलकावे खात उभी होती. आठ वाजता ती बोट प्रवासी घेऊन सुटणार होती. आज बंदरावर तुफान गर्दी होती. कोकणातील गटारी अमावस्य्येचा मुहूर्त साधण्यासाठी गिरणी कामगार ते श्रमिक-मजूर आपल्या गावी जाण्यास आतुरलेले होते. गर्दीवर नजर टाकत त्याने आपल्या नेहमीच्या औपचारिकता पूर्ण केल्या.

      पण हातात जशी प्रवाशांची यादी आली तसा तो चमकला. बोटीची क्षमता होती फक्त सहाशे आणि प्रवासी नोंदवले गेले होते साडेआठशे.

      तो चमकून म्हणाला,

      हे ओझे तर फार होईल. एवढे प्रवासी घेऊन बोट हाकारता येणे शक्य नाही. तुम्ही ही यादी कमी करा,,,”

      ते आता शक्य नाही. आणि लक्षात घ्या, यंदाच नाविक अधिकार्यांनी या बोटीचे तपासणी केलीय आणि ती तंदुरुस्त् असल्याचे प्रमाणपत्रही दिलेय.”

      पण या बोटीची क्षमता असेल तेवढेच प्रवासी जातील ना?. बोट तंदुरुस्त आहे म्हणून तुम्ही काय तिच्यावर आक्ख्खा सह्याद्री ठेवाल की काय?” सुलेमान आता चिडला होता.

      वरिष्ठही जरा नरमला आणि म्हणाला,

      हे बघा सुलेमानसाहेब, हे लोक चाललेत ते त्यांचा सण साजरा करायला. एखाद्या दिवशी नियम धाब्यावर बसवल्याने असे काय होणार आहे? ही बोट अधिक वजन पेलायला समर्थ आहे. तुम्ही चिंता करू नका. तुमचा नकार बोर्डाला आवडणार नाही. शेवटी तुम्हाला ही बोट किनाऱ्यानेच न्यायची आहे. आज हवामानही प्रसन्न आहे. तुम्ही अनुभवी कप्तान आहात. तुम्हाला एखाद्या दिवसासाठी असे करण्यास काय हरकत?”

      मला हे पसंत नाही हे मी नोंदवून ठेवू इच्छितो. बोटीवर आधीच सुरक्षा जॅकेटस कमी आहेत. लाईफ बोट तर एकही नाही आणि एकही वायरलेस सेट नाही. ही ट्वीन क्र्यू फेरी बोट आहे हे विसरता तुम्ही. एकाही पंख्याला दुखापत झाली तर सारे जहाज कलंडेल. हा धोका मी आधीच अनेकदा सांगितलेला आहे. आता पुन्हा सांगतो. माझ्या लॉग बुकमध्येही तशी नोंद करतो. मी आताच सांगतो की बोटीतले प्रवासी कमी करा. नाही केल्यास बोट हाकारणे धोकेदायक राहील.”

      वरिष्ठ अधिकारी, जो खाजगीत तिरळा म्हणून संबोधला जात असे, त्याने घाईने मान डोलावली.

      आजचा दिवस विशेष आहे कॅप्टनसाहेब. सण आहे. लोक घरी जायला आतुर आहेत. शेवटी त्यांच्या भावनांची कदर करायला नको का? समजा हा तुमचा सण असता तर तुम्ही अशीच भूमिका घेतली असती काय? बघा, तुम्ही घ्याल जमवून. शेवटी अनुभवी आहात तुम्ही.” तो म्हणाला.

      आता तेथे थांबण्यात अर्थ नव्हता. बोटीत प्रवासी चढवण्याची सुरुवातही झालेली होती.

      तो चिंतीत होऊन बोटीवर चढला खरा, पण प्रवासी कमी केले जातील याची त्याला अजूनही आशा होती. अर्थात त्याला कंपनीच्या मालकांची लोभी वृत्तीही माहित होती. खर्चात कटौती म्हणजे लाभात वाढ हा मंत्र ते नको त्या ठिकाणी वापरत आहेत याची त्याला जाणीव होती. आपण त्यात कसलीही भूमिका बजावू शकत नाही ही दुर्दैवी जाणीव त्याल बोचत असली तरी काही इलाज नव्हता.

      त्याने जहाजाच्या अन्य किमान आवश्यकता पूर्ण होतात की नाही हे पाहण्यासाठी नियमित तपासणी केली. इंधन पातळी व्यवस्थित होती. हवाही अनुकूल होती. ढगाळ हवामान असले तरी वादळाची शक्यता दिसत नव्हती. समुद्र करडा आणि शांत दिसत होता.

      त्याला जरा बरे वाटले.

      पण एवढे ओझे जहाज पेलू शकेल?

      त्याला शंका होती.

      किमान बंदरावरचे मारी टाईम अधिकारी एवढे प्रवासी घ्यायला मना करतील एवढीच काय ती आशा त्याला होती.

      पण बंदरांवर, त्याच्या कंपनीचेच अधिकारी परवानगीपेक्षा जास्त प्रवाशांना बसवण्यासाठी अधिकाऱ्यांना लाच दिली आहे याची त्याला कल्पना असण्याचे काहीच कारण नव्हते. खरे तर आजवर असे काही झालेले नव्हते. पण स्वातंत्र्य जवळ आल्याने पुढे आपले स्थान काय असणार या विवंचनेत असलेले सरकारी देशी अधिकारी आता लाच घेऊ लागले होते. पुढे याचा उद्रेक होत जाणार हेही सुलेमानला माहित असण्याचे काही एक कारण नव्हते.

      त्यामुळे जेव्हा त्याने पाहिले की आठशेहून अधिक प्रवासी बोटीत भरलेले आहेत, तेव्हा मात्र तो संतापून बोटीतून खाली उतरला आणि त्याच्या कंपनीच्या वरिष्ठांशी बोटीमध्ये जास्त भार टाकल्याबद्दल वाद घालू लागला.

      हे धोकेदायक ठरू शकते हे तुम्हाला समजत कसे नाही?”

      अधिकाऱ्याने सांगितले, “कॅप्टन, बहुतेक प्रवासी अलिबागजवळच्या रेवास बंदरात जात आहेत. हे अंतर काही विशेष नाही. एवढे थोडे अंतर एवढे प्रवासी घेऊन जाता येणार नाही असे तुमचे म्हणणे असेल, तर तुम्ही घरी जा आणि आराम करा. आम्ही पर्यायी कप्तानाची सोय करू.”

      एवढे उद्दाम उत्तर ऐकल्यावर कितीही संताप आला असला तरी त्याला तो गिळणे भाग होते.

      आज कामावर नसणे म्हणजे आपल्याला कंपनी हाकलून देणार हे स्पष्ट होते आणि त्याला तर नोकरीची गरज होती आणि दुसरी कधी मिळेल याची शाश्वती नव्हती.

      परिस्थितीत अडकलेल्या सुलेमानकडे पर्याय राहिला नाही. हताश आणि संतापलेल्या अवस्थेत तो बोटीवर पुन्हा चढला आणि निघायची तयारी करू लागला.

      बहुतेक प्रवासी गिरणी कामगार आणि मजूर होते. त्यात काही परदेशी लोकही होते. आहेत. त्यात एक तरुण जिज्ञासू महिला मिशेल सुलेमानकडे आली आणि बोटीतील दाटीबद्दल तक्रारी करू लागली.

      सुलेमानला आता अशा तक्रारींना तोंड द्यावे लागेल याची कल्पना होती.

      मॅडम, फक्त रेवासपर्यंत हे सहन करा. बहुतेक लोक तेथे उतरतील. मग अगदी निवांत मोकळेपणा मिळेल तुम्हाला.” तो समजावणीच्या स्वरात म्हणाला आणि इंजिन्स सुरु करण्याची आणि नांगर उचलण्याच्या सूचना देऊ लागला.

      बोटीवर गर्दी उसळली असली तरी एक आनंदी वातावरण होते. प्रवासी आधीच उत्सवाच्या मूडमध्ये होते. आरोळ्या गाणीबजावणी याचे सुरुवात आताच झाली होती.

      सुलेमानने आपल्या सहकार्यांशी थोडक्यात चर्चा केली, दोन्ही पंखे व्यवस्थित काम करत होते. हवामानाचा धोका दिसत नव्हता. तशीही धक्क्यावर हवामान माहिती प्रणाली नव्हतीच. सारे काही अनुभवी अंदाजांवर चालायचे. काही वेळाने हॉर्न वाजून बोट धक्क्यावरून बाहेर पडण्याचा संकेत दिला गेला. प्रवाशांनी एकाच जल्लोष केला.

      सकाळच्या प्रकाश सर्वत्र पसरला होता. सूर्यदर्शन होण्याची मात्र शक्यता दिसत नव्हती, वारे शांत होते. सुलेमानचा अनुभव त्याला सांगत होता की समुद्र राखाडी आणि आकाश ढगाळ दिसत असले तरी, जहाज सुरळीतपणे हा प्रवास करू शकेल. फारतर वेगावर नियंत्रण ठेवावे लागेल.

      बोटीचे इंजिन जोरात घोंघाउ लागले. त्याने हळूहळू बोट धक्क्यावरून बाहेर काढली. त्याने आता मार्ग निश्चित केला आणि उपकप्तानाकडे सुकाणू सोपवत काही सुचना दिल्या. आता तो जरा तणावमुक्त झाला होता. तो आपल्या केबिनमध्ये आला आणि आरामात बसणार तेवढ्यात  मिशेल तणतणत आली आणि एका क्र्यु मेंबरबद्दल तक्रार करू लागली.

      काय झाले?” त्याने तिला शांत करत विचारले.

      त्याने मला धक्का दिला...” ती संतापून म्हणाली.

      आपण भाउच्या धक्क्यावरून निघालोत. या गर्दीत धक्का ही नॉर्मल बाब आहे...” तो तणाव कमी करण्यासाठी विनोदाचा आधार घेत म्हणाला. पण तिचा संताप कमी झाला नाही.

      तुम्हाला समजते का? अहो मी गर्भवती आहे. अशा दाटीत जीव गुदम्रतोय माझ्या पोटातील बाळाचा. त्यात तुमची क्र्यू मेंबर मला धक्का देतो? इडियट!” ती उद्वेगुन म्हणाली.

      सुलेमानच्या लक्षात ती स्थिती आली.

      तुम्ही रेवास येईपर्यंत बाहेरच्या केबिनमध्ये थांबा, पण तुम्ही अशा अवस्थेत हा प्रवास का करताय?”

      गोव्याला चाललेय. माझ्या हरवलेल्या नवऱ्याच्या शोधासाठी. या महायुद्धानंतर सारेच बदललेय. माझ्या नवरा 1945 साली शेवटच्या पोस्टिंगवर अरबी समुद्रातील ब्रिटीश ताफ्यात होता एवढीच माहिती मला मिळाली सरकारकडून. पण त्य ताफ्याचे आणि त्यावरील नौसैनिकांचे नेमके काय झाले याचे माहिती मात्र कोणीही देत नाही. त्याला मी आफ्रिकेच्या किनार्यावर शोधले आणि आता भारताचे किंणारे पालथे घालायला आले आहे. कोठे ना कोठे तो सापडेल मला याची खात्री आहे मला.”

      सुलेमान चकित झाला.

      मॅडम, तुमची तूमच्या नवऱ्याशी अखेरची भेट झाले तरी कधी? तुम्ही फार तर चार महिन्यांच्या प्रेग्नंट दिसताय...”

      प्रेग्नंट व्हायला नवराच हवा काय? महाशय, या महायुद्धाने साऱ्या जुन्या नैतीकतांचा अंत केलाय आणि नवेच जग निर्माण केलेय. असे जग ज्याचा अंत काय असेल हे कोणीच सांगू शकत नाही. पण मझ्या मनात माझ्या शूर नवऱ्याबदल अजूनही अभिमान नि प्रेम आहे. हर तो सापडला तर तो या मुलाचा सहर्ष स्वीकार करेल याची खात्री आहे मला.”

      सुलेमान हे ऐकून बधीरच झाला होता, पण त्याने कसेबसे स्वत:वर नियंत्रण मिळवले आणि समजल्यासारखी गंभीरपणे मान डोलावली.

      तेवढ्यात आत आला तो रुबिन ससून. या तरुणाने खूप सोसले आहे हे त्याच्याकडे पाहूनच कळत होते.

      आता तुमच्याशी काय झाले?” सुलेमानने विचारले.

      जगात ज्यूंवर अत्याचार केला नाही असे तुमचे हे एकमेव राष्ट्र. म्हणून हिटलरच्या पंजातून जसा सटकलो तसा कसाबसा भारतात पोचलो. काय यातना मला जर्मनीत आणि नंतरच्या प्रवासात सोसाव्या लागल्या ही वेगळीच कथा आहे. वाटलं होतं येथे तरी शांतता असेल...पण नाही. हे जगच अशांत झालेय. या बोटीवर बाहेर हिंदू-मुसलमानांत भांडणे सुरु झाली आहेत त्याचे आधी काहीतरी करा...नाहीतर येथेच तिसरे महायुद्ध सुरु होईल.”  रुबिन आवेशात म्हणाला तसा सुलेमान खाडकन उठला.

      त्याने ही शक्यताच विचारात घेतलेली नव्हती.

      तो बाहेर पडला. डेकवर खरेच प्रचंड गोंधळ मजला होता. तो बोटवरील कर्मचाऱ्यांना तेथे तातडीने यायला सांगू लागला. कारण प्रवाशांत दोन स्पष्ट तट पडलेले होते.

      जिंजीला जाणारे मुस्लिम प्रवासी आणि रेवास (अलिबाग) ला जाणारे हिंदू प्रवासी यांच्यात वादविवाद तीव्र झाला होता. एकमेकान्विरुद्ध हिंसक घोषणा दिल्या जात होत्या. सुलेमानला वाटले की हे येथेच दंगलीत बदलेल आणि रक्तपात होईल.

      हे असे होणे कोणालाही परवडनारे नव्हते.

      शांत व्हा...आपापल्या जागेवर बसा, नाहीतर मी जहाज मागे वळवेन.” तो ओरडत होता, पण कोणी ऐकण्याच्या स्थितीत दिसत नव्हते.

      सुलेमानला प्रसंगी कठोर होऊन स्थिती नियंत्रणात आणणे आवश्यक होते. वजनाच्या विभागणीमुळे जहाजाचा तोल जाणे परवडणारे नव्हते. आणि बोटीवर अगदी चार-पाचच रक्षक होते. त्यांना या एवढ्या लोकांना ताब्यात आणता येणार नाही याचीही त्याला जाणीव होती.

      त्याने त्यांच्या सोबत दोन्ही गटांच्या मधोमध येत सर्वांना शांत करायचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात एक जण ओरडला,

      स्साला हाही लांड्या आहे. ठोका याला...”

      आणि हिंदू प्रवासी त्याच्यावर चालून येऊ लागले तसे मुस्लीम प्रवासीही सुलेमानला वाचवायला पुढे सरसावू लागले.

      तेवढ्यात रुबिन मध्ये घुसला आणि खिशातून पिस्तुल काढत हवेत गोळीबार केला. ते पाहताच दोन्ही गट घाबरून मागे सरकले.

      तुम्हा प्रत्येकात हिटलर पाहतो आहे मी. त्यांने वंशाच्या नावावर ज्यूंचे शिरकाण केले, तुम्ही लोक धर्माच्या नावावर करताय. शरम करा...”

      त्याचे इंग्रजी कोणाला समजले नसले तरी त्याच्या हातातील पिस्तुल जास्त बोलत होते.

      सुलेमानने त्याच्याकडे कौतुकाने पाहिले आणि मग म्हणाला,

      बोटीत आहात तोवर कोणीही कोणाशी वाद घालणार नाही. घातला तर मी त्यांना इंजिन रूममध्ये कोंडेल. नंतर पोलिसांच्या हवाली करेल.”

      यावर पुन्हा वाद सुरु होणार तेवढ्यात अचानक सारे कोलमडले. कोसळले. काय झाले हेही कोणाला समजेना. आणि तेवढ्यात जोराचा पाऊस सुरु झाला. डोंगराएवढ्या लाटेने बोटीला भिरकावले होते.. सुलेमानच्या तत्क्षणी लक्षात आले की हा वाद सुरु असतानाच अचानकपणे हवामान पूर्णपणे बदलले आहे आणि पाऊस वेड लागल्यासारखा कोसळू लागला आहे. वादळाने त्याचे क्रूर रूप दाखवायला सुरुवात केली आहे. उंच लाटा बोटीला त्याच्या इच्छेनुसार फेकून देत आहेत. प्रवासी आता घाबरले आहेत आणि आधारासाठी धावत आहेत. आताच एकमेकांच्या जीवावर उठलेले लोक आता जिवंत कसे रहायचे या एकाच प्रश्नाने भेडसावलेले गेले आहेत. काहीतरी भयंकर घडणार असल्याची ही पूर्वसूचनाच होती जशी.  

      सुलेमानने सुकाणूकडे वेगाने धाव घेतली.

      सुलेमानने कंट्रोल केबिनमध्ये प्रवेश केला. त्याचा सहकारी दिशा नियंत्रित करण्याच्या प्रयत्त्नात घामेघूम झाला होता.

      सर, हवामान अत्यंत अनपेक्षितपणे बदललेय. पुढचे काही दिसत नाही. होकायंत्र नीट काम करत नाहीय. आणि या उंच लाटा आपल्याला खेळण्यासारख्या इतस्तत: फेक्ताहेत....”

      माझ्याकडे सुकाणू दे, डेकवर जा आणि प्रवाशांना दोन्ही बाजू समान वजनाच्या राहतील अशा पद्धतीने थांबव.” सुलेमान घाईने म्हणाला आणि सुकाणू आपल्या ताब्यात घेतले.

      वादळ, पाउस आणि बोटीचे जास्त प्रवाशांमुळे नेमके आजच वाढलेले वजन यामुळे त्याला जहाजाच्या दिशेवर नियंत्रण आणणे कठीण होत होते. पण किमान त्याला हा मार्ग तरी माहित होता. असेच पुढे फेकले गेलो तर एलेफंटा बेटाला धडकण्याची शक्यता होती. ते टाळायला लागणार होते.

      त्याने घाई केली. आपली शक्ती पुरेपूर वापरत उसळत येणार्या लाटेला बगल दिली आणि दक्षिणेकडे जहाज वळवले. एलेफंटा बेटाच्या भोवती पसरलेल्या खडकांना टाळण्यात त्याला कसेबसे यश मिळाले. पण पुढे अजून काय काय धोके आहेत हेही त्याला माहित होते. पण वादळ त्याला दिशांवर नियंत्रण आणू देत नव्हते. दोन पंखे असूनही त्यांची शक्ती कमी पडत होती. त्याला पावसामुळे दूरवरचे पाहताही येत नव्हते. आपण नेमके कोठे होत याचा असला तर फक्त अंदाज होता. निश्चिती नव्हती कारण त्यासाठी आवश्यक साधनेच बोटीवर नव्हती.

      आता त्याचा एवढाच प्रयत्न होता की काहीही करून प्रथम रेवास बंदरावर पोहोचावे आणि हवामान स्वच्छ झाले तरच पुढे प्रस्थान करावे.

      त्याला अजून समजत नव्हते की आज हवामान अचानक कसे बदलले.

      आपण किनाऱ्याकडे सरकतोय...तेथे पाण्यात खडक आहेत...आपल्या जहाजाच्या तळाला ते घासु शकतात...आपण संकटात आहोत...”

      तो आकांताने म्हणाला. सुकाणू पुन्हा उजवीकडे वळवले पण राक्षसी लाटांनी त्याचे पर्यंत यशस्वी होऊ न देण्याचा जसा चंग बांधला होता.

      उजवीकडील पंखा बंद करा...जहाज आपोआप वळेल...”

      तो ओरडला. त्याचा चेहरा घामाने भिजला होता.

      त्याची आज्ञा पाळली गेली. जसे पंखा फिरवणारे इंजिन बंद झाले तसे डावीकडचा एकाच पंखा जहाजाला किनाऱ्यापासून बाजूला नेऊ लागला.

      तेथील पत्थरांशी बोटीच्या तळाची धडक टळली. ती झाली असती तर जहाजाचा तळ फाटला असता...जहाज काही क्षणांत बुडाले असते.

      सुटकेचा श्वास सोडत त्याने आता दिशा आता योग्य आहे हे पाहताच पुन्हा बंद केलेला पंखा पुन्हा चालू करायची कमांड दिली.

      आता जहाज सरळ दिशेत जाऊ लागले.

      प्रवासी आता धार्मिक शत्रुत्वाकडे दुर्लक्ष करून कसे जगायचे याचा विचार करत होते. खरे तर ते निसर्गाच्या प्रकोपामुळे समूळ हादरून गेले होते. लाटा इतक्या उंच होत्या की पाणी डेकवर फेकले जात होते. त्या तडाख्यामुळे सारे त्यांचे जेही इष्ट असेल त्याची प्रार्थना करू लागले होते. लाटांनी बोट इकडे तिकडे अनियंत्रितपणे फेकली जात होती. लोक धड बसू शकत नव्हते.  इकडे तिकडे फेकले जात होते.

      मिशेल घाबरून खांबाला धरून बसली होती. रुबिन ससून तिला धीर देत आधार द्यायचा प्रयत्न करत होता.

      आता सर्व काही संपले आहे अशीच भावना सर्वांमध्ये निर्माण झाली होती.

      सुलेमान अजून समाधानी नव्हता. वादळ थांबायचे नाव घेत नव्हते. काहीही दिसत नव्हते. त्याने नकाशावर नजर फिरवली. आपण नेमके कोठे आहोत याचा अंदाज येत नव्हता, पण अजून एक धोका टाळावाच लागणार होता.

      काशाच्या या धोकेदायक खडकांना कोणत्याही प्रकारे टाळले पाहिजे...सुलेमान त्याच्या क्र्यूला ओरडला.

      पण आपण नेमके कोठे आहोत हेच आपल्याला माहित नाही...” एक क्र्यू म्हणाला.

      सुलेमानने कंपनीच्या कंजूसीला शिव्या घालत, सर्वत्र् पाहत आपली स्थिती निश्चित करण्याचा प्रयत्न केला. पण आकाश दाट भरलेले होते. तुफानी पाउस कोसळत होता. विजा कडाडत होत्या. लाटांवर जहाज इकडे-तिकडे फेकले जात होते. प्रवाशांचे भयकारी आकांत त्याचे हृदय भेदून जात होते.

      तो त्याचे कौशल्य पुरेपूर वापरत होता. नेव्हिगेशनची साधने अपुरी असल्याने दुसरा  पर्यायही नव्हता.

      पण एके ठिकाणी लाटांची खळबळ केंद्रित झालेली आहे हे त्याच्या पावसांच्या अलोट धारांतही लक्षात आले. आपण काशा या खडकाळ बेटाच्या आसपास कुठेतरी आहोत याची त्याला भयकारी जाणीव झाली.

      त्याने जहाजाला दूर नेण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न केला. पण बोट वळाली नाही. उलट एका उंच लाटेने त्यांना पुन्हा किनाऱ्याकडे भिरकावले. बोट एखाद्या खेळण्यासारखी उसळली. सारे प्रवासी घाबरून बोटीच्या डाव्या बाजूला धावले. वजनामुळे बोट त्या बाजूला कलंडली आणि अवघे प्रवासी खाली कोसळले. क्थाद्याने वाचले नाहीतर जलसमाधी निश्चित होती. पण बोट मात्र असंतुलित झाली.

      सुलेमानच्या हे लक्षात येताच तो बाहेर धावला. “अरे, असे करू नका, आपल्या जागा कोणत्याही स्थितीत सोडू नका...” तो वादळी पावसात घसा ताणून ओरडला पण त्याचा आवाज प्रवाशांपर्यंत पोचणे शक्यच नव्हते. भयचकित कोलाहल आता टोकाला गेला होता. हतबुद्ध होऊन तो कंट्रोल्सकडे धावला. मध्येच कोसळला. बोट आता दुसऱ्या बाजूला कलंडत आहे हे त्याच्या लक्षात आले. तो जीवाच्या आकांताने बाजूचा आधार घेत उठला आणि तोल सांभाळत धावू लागला.

      पण तो कंट्रोल केबिनमध्ये पोहोचेपर्यंत अजून एक राक्षसी लाट बोटीवर आदळली.

      बोट फेकली गेली. प्रवासी एकमेकांवर आदळले. एकमेकांना ढकलत, हिंसक होत आपले प्राण कसे वाचतील याचीच पर्वा करू लागले.

      रुबिन ससून शर्थीने प्रयत्न करत मिशेल कशी सुरक्षित राहील याची काळजी करत होता, पण आता त्याचेही नियंत्रण सुटले. मिशेल वेगाने फेकली गेली नि रुबिन शेपटाच्या दिशेने घरंगळत गेला कारण पुढचा भाग नव्वद अंशाच्या कोनात वर उचलला गेला होता आणि पुन्हा तेवढ्याच वेगाने खाली येत होता.

      लोकांचे चित्कार उठले. कित्तेक प्राणांतिक घायाळ झाले. निसर्गाचा हा असला प्रकोप त्यांनी कधीच पाहिला नव्हता.

      जहाजाचा आता पुढचा भाग पाण्यात घुसत चालला होता तर मागचा भाग उंचावत चालला होता. अशात आभाळ हिंस्त्र स्वरात गडगडले. विजांचे तांडव एकाच वेळेस सुरु झाले. ही भयाचे परिसीमा होती. सुलेमान जहाज वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होता. पण निसर्गावर मात करण्याचे कोणतेही साधन त्याच्याकडे नव्हते.

      आणि पाण्यात घुसणारा पुढचा भाग एका खडकावर आदळला.

      बरेच लोक पाण्यात फेकले गेले. ज्यांना अजून शुद्ध होती त्यांनी मिळेल ते लाईफ जॅकेट ओरबाडून सरळ पाण्यात उड्या घ्यायला सुरुवात केली. आक्रोश उंचावत चालला होता. जगण्याचा संघर्ष विकोपाला गेला होता. पाण्यात ज्यांनी उड्या घेतल्या त्यातील अनेक लाटांनी गिळंकृत केले अथवा खडकावर आपटून त्यांच्या चिंधड्या उडाल्या. बाकीचे लोक त्या लाटांतून वाट काढत पोहण्याचा आणि जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. बाकीचे अजूनही लाईफ जॅकेट मिळवण्याच प्रयत्न करत होते. हाणामाऱ्या होत होत्या. पण लाईफ जॅकेट संपली होती.

      ससूनने भयभीत मिशेलला त्य्ही अवस्थेत गाठले आणि तिचा हात धरून खवळलेल्या समुद्रात उडी घेतली.

      बोट आता बुडणार याची कल्पना सुलेमानला आली. तो कसाबसा आपल्या पाण्याने भरत असलेल्या केबिनमधून बाहेर आला. आता बोट आणि प्रवाशांना वाचवण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही याची विदारक जाणीव त्याला झाली होती. प्रवासी एक तर पाण्यात पोहत होते किंवा बुडून मेले होते.

       सुलेमानकडे आता बोट सोडून स्वतःचा जीव वाचवण्याशिवाय पर्याय नव्हता. काही वेळातच जहाजावर क्र्यूसाठी राखीव असलेल्या काही लाईफ जॅकेट मधून एक घेऊन त्याने क्र्यूलां बोट सोडण्याची आज्ञा दिली. त्याने त्याच्या क्र्यू मेंबर्ससह त्या उसळत्या पाण्यात उडी मारली.

      पोहताना तो शक्य तितके लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होता.

      वेळ जीवघेण्या धीम्या गतीने व्यतीत होत होता.

      तो थकलेला होता.

      तेवढ्यात त्याची नजर मिशेल आणि ससूनवर पडली. ते लाटांशी संघर्ष करत तरंगत राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. त्याने त्यांच्या दिशेने हात मारायला सुरुवात केली. कसेबसे अंतर पार केले आणि आपला विचार न करता आणि मिशेलच्या त्याही अवस्थेतल्या निषेधाला न जुमानता त्याचे जॅकेट मिशेलला दिले आणि पोहत राहिला.

      सुलेमान नजरेआड होताच, ससूनने क्रूरपणे मिशेलकडून लाईफ जॅकेट हिसकावून घेतले आणि तिला तिच्या नशीबावर सोडून पुढे पोहत राहिला.  मिशेलने आता जीवनावरचा विश्वास सोडून दिला आणि अनिवार शरणागततेने एका लाटेचे ती भक्ष झाली.

      जीवन मरणाचा संघर्ष ऐन भरात असतानाच वादळ जसे अचानक सुरु झाले होते तसेच अचानक थांबलेही.

      तोवर किनार्यावरील मच्छीमारांना अपघाताचा अंदाज आला होती कारण एव्हाना अनेक प्रेते आणि एसएस रामदासचे अवशेष किनाऱ्याला लागले होते.

      मच्छीमार आपल्या होड्या घेऊन बचाव कार्याला पुढे सरसावले. जमतील तेवढे जीव त्यांनी वाचवले. काही पोहत कोठे न कोठे किनाऱ्यावर पोचले.

      सुलेमान आता पोहून थकलेला होता. आता स्वच्छ झालेल्या आसमंतात त्याच्या लक्षात आले की तो मुंबईकडे जात आहे पण आपल्याला एवढे तो अंतर टिकता येईल का हा प्रश्न त्याला छळत होता. तो निराश झाला होता. खचला होता. पाण्यावर हात न मारता तरंगत असताना त्याला भ्रम ग्रासू लागले. घरातली वेडसर बीबीची याद येऊ लागली. त्याच्या संवेदना गोंधळलेल्या होत्या. आपण जिवंत का हाच प्रश्न त्याला छळत होता.

      काही वेळाने त्याचे भ्रम विरले आणि तो शुद्धीवर आला तेव्हा, ढगाळ दुपार होती. त्याने सर्वत्र पाहिले. मुंबई फार दूर नव्हती. गेटवे ऑफ इंडियाची धूसर आकृती दिसत होती.

      आसपास सर्वत्र अनेक मृतदेह त्तरंगतांना आणि लाटांवरून वाहत किनाऱ्याकडे जातांना दिसत होते. त्याला रडू कोसळले.

      हुंदके आवरत त्याने पुन्हा शक्ती एकवटून पोहायला सुरुवात केली.

      तो गेटवे ऑफ इंडियावर पोहोचला आणि बेशुद्ध होऊन कोसळला. किनाऱ्यावरच्या लोकांनी सुलेमानची अवस्था पाहताच त्याला उचलून रुग्णालयात नेले.  

      तोवर अनेक प्रेते तेथील किनाऱ्याला लागू लागलेली होती. काहीतरी भयंकर घडले आहे याची जाणीव लोकांना जशी झाली तशीच तटरक्षक दल आणि माझगाव गोदीलाही झाली. त्यांनी बचाव कार्य हाती घेतले खरे पण आता वाचवण्यासाठी कोणीही नव्हते. जे वाचले होते ते किनार्याला पोहून तरी लागले होते किंवा मच्छीमारांनी तरी वाचवले होते.

      सुलेमानवर उपचार सुरु होते.

      सुलेमानचे मन अजून स्थिर नव्हते.

      आपल्या बोटीचा विनाश त्याच्या डोळ्यांसमोर भेसूर नृत्य करत होता.

      दुसऱ्याच दिवशी त्याच्या इंडियन कोऑपरेटिव्ह स्टीम नेव्हिगेशन कंपनीचे दोन अधिकारी  त्याला भेटायला आले.

      सरकारने हे प्रकरण फर गंभीरपणे घेतलेय. सातशे लोक मेलेत. आता चौकशी सुरु होईल. सरकार तुझ्यावरच आरोप ठेवणार आहे. कंपनीला तू गोवू नयेस हे उत्तम. मग तू काय साक्ष देणार आहेस?”

      सुलेमानचा संताप उसळून आला.

      तुम्ही हरामखोरांनी माझ्या सुचना ऐकल्या असत्या तर कशाला एवढे लोक मेले असते? साधा रेडीओ नाही की पुरेशी लाईफ जॅकेट नाहीत. नेव्हिगेशनची साधने अपुरी...हीच साक्ष देणार ना मी?”  तो त्यांच्यावर ओरडला.

      ही अशी साक्ष दिलीस तर आम्ही संपलो. तुही संपलास. कंपनीही बुडेल. एसएस रामदास बुडाली तशी.” एक अधिकारी म्हणाला.

      हे बघ...आम्ही कागदोपत्री सारे व्यवस्थित दाखवणार. बोट तर समुद्रात बुडालेली आजे. ती काही आता सापडत नाही. बोटीवर काय स्थिती होती हे पडताळून पाहण्याचे कोणतेच साधन नाही. तू सारे व्यवस्थित होते पण वादळाने हा दुर्दैवी अपघात झाला एवढेच सांगायचे आहेस. तू वाचशील. आम्हीही वाचू.” तो अधिकारी आपली चिकाटी न सोडता म्हणाला.

      ते शक्य नाही. अरे, एवढे लोक मेलेत त्याची तरी शरम वाटू द्यात!” तो म्हणाला आणि त्यांना कटवले.

      अजून दोन दिवसात त्याला डिस्चार्ज मिळाला. घरी जायचीही त्याला भीती वाटत होती. बीबीच्या नेहमीच्या कटकटीला सामोरे जायची त्याची हिम्मत नव्हती. वादळाचे राक्षसी आवाज आणि मृतांचे आक्रोश अजुनही त्याच्या  कानात घुमत होते. त्यात वेडसर बीबीच्या निरुद्देश्य शिव्या ऐकायच्या?

      पण घरी जाणे भाग होते. अन्यथा जाणार तरी कोठे? सर्व वातावरणात एक विखार भरला होता. रामदास बुडाल्याची वार्ता आता देशभर पसरली होती. मृतांच्या नातेवाइकाकडून रामदासच्या खलाशांवरही हल्ले होत होते. कॅप्टन तर मुसलमान. त्यात देशातले हिंदू-मुसलमान वातावरण पूर्ण हिंसक झालेले. त्याच्यावरही मृतांच्या संतप्त नातेवाईकांचा हल्ला होणार हे नक्की होते. त्याला ते टाळायचे होते.

      त्यात त्याच्यावरच बोट बुडायला जबाबदार असल्याचा गुन्हा नोंदवला गेलेला.

      अशात कोण आश्रय देणार होते त्याला?

      तो घरी गेला आणि नेहमीच्या शिवराळ  भाषेचा सामना करत आपली सारी कागदपत्रे जमा करू लागला.

      गुन्हे दाखल होणार आणि चौकशी होणारच हे त्याला माहित होते. आपली बाजू मांडण्यसाठी त्याला त्याने कंपनीशी केलेला सारा पत्रव्यवहार गोळा करायचा होता.

      आणि समन्स आले. मारीटाईम कोर्टाचे.      

      न्यायालयाने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतलेले आहे असे त्याचे सहकारी त्याला सांगत होते. कार्रवाही सुरु झाली आणि त्याची कंपनी कसा बचाव करते आहे हे त्याच्या लक्षात आले. दरम्यान भारत स्वतंत्रही झाला आणि सारेच वातावरण बदलले. लोकांचे वर्तन बदलल्याचा त्याला भास होऊ लागला. एवढी मोठी दुर्घटना पण तीचे आधी वाटलेले गांभीर्य पाहता पाहता विरून गेले. खटला सुरु होताच त्याला कंपनीने कामावरून काढून टाकले.

      नैराश्याने तो पार हताश झाला.

      मृतांचे चेहरे त्याला छळू लागले.

      त्याने न्यायालयात कंपनीच्या सर्व दोषांवर बोट ठेवले. जहाज वापरण्यायोग्य नसतानाही वापरात ठेवले ही तर सर्वात मोठी चूक.  बोटीवर लाईफबोट्स नसणे आणि  लाईफजॅकेट आणि रेडिओ सेटची कमतरता त्याने ठासून सांगितली.  स्वार्थी डॉक अधिकाऱ्यांमुळे आणि कंपनीच्या लोभामुळे सातशे लोकांना आपले प्राण गमवावे लागले, असे त्याने अक्षरश: रडत न्यायालयाला सांगितले.

      पण परंतु कंपनीच्या वकिलाने साळसूद दावा केला की अचानक भयंकर वादळ आल्याने जहाज काशा बेटाच्या खडकांवर आदळले आणि फुटले त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीसाठी कंपनीला जबाबदार धरता येणार नाही. कंपनी कोणालाही नुकसान भरपाई द्यायलाही बांधील नाही.

      आणि खटला संपला.

      न्यायालयाने आदेश दिला तो सर्वच प्रवासी बोटींवर वायरलेस सेट आणि सुरक्षा साधने बसवायचा. रामदासच्या अपघाताबाबत सुलेमानवर ठेवल्या गेलेल्या सर्व आरोपांतून त्याला निर्दोष मुक्त केले गेले. कंपनी मात्र नामानिराळीच राहिली.

      सुलेमान आता पुरेपूर एकाकी, अपमानित आणि बेरोजगार झालेला होता. तो न्यायालयाच्या दारात हताश होऊन कितीतरी वेळ बसला होता.

      हा काही न्याय म्हणता आला नसता!

      आपल्यालाही वेड लागेल की काय असे त्याला वाटायला लागले.

      तो पुरता निस्त्राण होऊन घरी परत गेला.

      आणि काही दिवसांत त्याच्या बायकोने वेडाच्या भरात आत्महत्या केली.

      आता तो भ्रमिष्ठ व्हायचाच काय तो बाकी होता.

      बुडणाऱ्या लोकांचे आक्रोश त्याच्या रूहच्या चिंध्या चिंध्या करत होते.

·          

      समुद्र अजूनही त्याला खुणावत होता. त्या लोकांच्या आक्रोशाने आणि मरणभयाने प्रत्येक लाट ओथंबलेली असेल याची त्याला जाणीव होती. पण सारे आयुष्य समुद्रात गेलेला सुलेमान फार काळ समुद्रापासून दूर कसा राहू शकत होता?

      त्या सायंकाळी त्याची पावले त्याला समुद्राकडे खेचत घेऊन गेली. त्याचे मस्तक आता शून्य झालेले होते. लाटा दिसताच त्याला वाटले की सारे आक्रोशच मिळून किनाऱ्याकडे झेपावत आहेत.

      तो चालत राहिला. पाण्यात पावले पडली आणि एक लाट त्याचे पाय धुत मागे सरली. तो पुढे चालतच राहिला. हळूहळू लाटा त्याच्या छातीवर आदळू लागल्या. जणू मृतात्म्यांचे आक्रोश त्याच्यावर आदळत होते. त्या पाण्यात फक्त मृत्यू भरला होता. सातशे माणसे...मुले...त्याने पाण्याला सलाम केला. “वाचवू नाही शकलो तुम्हाला...मला तुमच्यात सामावून घ्या...काय द्यायची ती शिक्षा द्या...”

      आणि तो पाण्यात दिसेनासा झाला.

 

·          

No comments:

Post a Comment

एस.एस. रामदास: एक शोकांतिका

  एस . एस . रामदास : एक शोकांतिका - संजय सोनवणी               शेख सुलेमान इब्राहिमची आजची पहाट घरातल्या कटकटीनेच उगवली . त्याची मनोरुग...