राष्ट्र: राष्ट्रवाद आणि विश्ववाद
राष्ट्र म्हणजे नेमके काय यची सर्वमान्य होईल अशी व्याख्या आजही अस्तित्वात नाही. तरीही आपण राष्ट्राबाबत (व राष्ट्र-राज्याबद्दल) वेळोवेळी केल्या गेलेल्या काही व्याख्या पाहुयात.
१. समान वंश, भाषा, संस्कृती, आणि इतिहास असणा-या लोकांचा समुदाय म्हणजे राष्ट्र होय. (या व्याख्येनुसार भौगोलिक सीमा असण्याचे बंधन नाही.)
२. जोसेफ स्ट्यलीनच्या व्याख्येनुसार (१९१३) "राष्ट्र म्हनजे वंश अथवा जमात नसून ऐतिहासिक दृष्ट्या संघटित लोकांचा समुदाय होय."
३. वर्ल्ड बुक शब्दकोशानुसार, अ. "समान देशात (भूभागात) राहणारे, एकाच शासनाखाली संघटित झालेले व साधारणतया समान भाषा बोलणा-या लोकांचे मिळुन राष्ट्र तयार होते." ब. "सार्वभौम राज्य म्हनजे राष्ट्र होय. क. समान भाषा व पुर्वज असलेली जमात अथवा वंश म्हनजे राष्ट्र होय."
४. विविध वंश, एक अथवा अनेक संस्कृती एकाच शासनाखाली संग्रहित होतात तेंव्हा त्यांचे राष्ट्र बनते." (Collins English Dictionery.)
५. राजकीय इतिहासकार कार्ल ड्युशच्या मते, " राष्ट्र म्हणजे इतिहासाबाबतच्या गैरसमजातुन व शेजा-याच्या द्वेषातून एकत्र आलेले लोक म्हणजे राष्ट्र."
६. बेनेडिक्ट अंडरसन यांच्या मते राष्ट्र म्हणजे एक काल्पनिक राजकीय बंधयुक्त समुदाय.
७. राष्ट्र-राज्य म्हणजे जागतीक समुदायाकडुन मान्यताप्राप्त विशिष्ट भुभागावर अस्तित्वात आलेले सार्वभौम राजकीय अस्तित्व असलेले अस्तित्व ज्यात राष्ट्राचे सर्व किंवा काही वैशिष्ट्ये अंगभूत आहेत.
अशा रितीने राष्ट्राच्या अनेक व्याख्या करण्याचा प्रयत्न झाला आहे व या व्याख्यांत काळानुसार उत्क्रांतीही झालेली आहे असे आपल्या लक्षात येईल. अनेकदा राष्ट्र व राष्ट्र-राज्य हा शब्द समानार्थी घेतला जात असल्याने (मीही या लेखमालेत राष्ट्र हा शब्द राष्ट्र-राज्य या अर्थानेच वापरला आहे.) राष्ट्र या शब्दाच्या व्याख्याही तदनुषंगिक वेगवेगळ्या अर्थछ्टा सुचवत असतात हेही येथे लक्षात घ्यायला पाहिजे. सर्व व्याख्यांचा विचार करता आपण खालील निष्कर्ष काढु शकतो...
१. जेंव्हा आपण फक्त निखळपणे "राष्ट्र" हा शब्द वापरतो तेंव्हा विशिष्ट भौगोलिक, राजकीय बंधनातीत विशिष्ट वंशीय, भाषिक अथवा धार्मिक समुदायाचे मिळुन राष्ट्र होते असे म्हणु शकतो. भारतातील स्वातंत्र्यपूर्व कालातील द्विराष्ट्रीय सिद्धांत हा भारतात हिंदू व मुस्लिम ही दोन राष्ट्रे आहेत या गृहितकावर आधारीत होता असे आपण पाहु शकतो. त्यात भाषा, वंश व संस्कृत्यांचा विचार केला गेलेला दिसत नाही, अन्यथा अनेकराष्ट्र सिद्धांत अस्तित्वात येणे सहज शक्य होते. युरोपात राष्ट्र व वंश, भाषा, संस्क्रुतीचा एकत्रीत विचार करता येणे सहज शक्य होते. याचे मुख्य कारण वांशिक सिद्धांताविषयकच्या तत्कालीन अज्ञानात होते असेही आपण आता म्हणु शकतो. पाकिस्तान हे वांशिकदृष्ट्या (वांशिक सिद्धांत मान्य केला तर) एकसमान नसूनही पाकिस्तानला राष्ट्र-राज्य मान्यता आहे तशीच ती भारतालाही आहे. जगात अशी अनेक राष्ट्रे आहेत जेथे समान वंश संकल्पना राबवता आलेली नाही.
२. राष्ट्र संकल्पनेत समान संस्कृतीचा वैशिष्ट्यपुर्ण आग्रह असतो. एकाच संस्कृतीच्या लोकांना एकमेकांबद्दल एक समान आत्मबंधाची भावना असते असे गृहितक या तत्वामागे आहे. परंतु इतिहास या तत्वाला मान्यता देत नाही. रोमन संस्कृती ही ग्रीक संस्कृतीचीच पडछाया होती असे म्हणने वावगे ठरणार नाही, तरीही इटली व ग्रीस हे ऐतिहासिक काळापासून सर्वस्वी पृथक राजकीय अस्तित्वे म्हणुणच राहिलेली आहेत. दुसरे असे कि कोणतीही सर्वस्वी स्वतंत्र संस्कृती पुराऐतिहासिक काळापासून अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. जरी प्रादेशिक म्हणुन काही वैशिष्ट्ये जागतिक संस्कृत्यांनी जपली असली तरी त्यावर कोणत्या ना कोणत्या बाह्य संस्कृतीचा प्रभाव पदलेला आहे. कधी कधे तो एवढा पडलेला आहे कि मुळच्या संस्कृत्या त्या प्रभावात वाहून गेलेल्या आहेत. भारतापुरते पहायचे तर सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, बौद्ध संस्कृती म्हणुन ज्याही संस्कृत्या येथे जन्मल्या त्या कालौघात एवढ्या बदललेल्या आहेत कि मूळ संस्कृत्यांचे अवशेष शोधावे लागतात. जपानचेच उदाहरण घेतले तर जपानी संस्कृतीवर चीनी संस्कृतीचा अमिट प्रभाव आहे. चीनवर बौद्ध संस्कृतीचा प्रभाव आहे. ग्रीक संस्कृतीचा प्रभाव आजही युरोपियन राष्ट्रांच्या संस्कृतीवर (व म्हणुन जागतीक संस्कृतीवर) आहे. थोडक्यात संस्कृत्या या परिवर्तनीय असतात व त्या सर्वस्वी स्वतंत्र अशा कधीच नसतात. त्यामुळे "समान संस्कृती" हे तत्व राष्ट्र या संकल्पनेला पुरेसे लागू पदत नाही.
३. एक धर्म हे तत्व राष्ट्र (व म्हणुन राष्ट्र-राज्य) संकल्पनेचा पाया ठरु शकतो काय यावरही विचार करायला हवा. जगात सर्वात आधी गौतम बुद्धाने सर्व जगभर आपला धम्म प्रस्थापित करण्याची आकांक्षा बाळगली. अर्थात त्यात राजकीय भाग नव्हता. ख्रिस्ती धर्माने तशी स्वप्ने पाहिली व काही प्रमाणात यशस्वीही केली असे वरकरणी दिसते. मुस्लिमांनी त्यावर कडी केली. तुर्कस्थानच्या खलिफाला आपला सार्वभौम सम्राट मानत जगभरच्या वेगवेगळ्या प्रदेशांत मुस्लिम सत्ता प्रस्थापित झाल्या. भारतातही मोगल सम्राट ते पार टिपू सुलतानापर्यंत खलिफाकडुन वस्त्रे घेण्याची प्रथा होती...म्हनजेच एकार्थाने ते खलिफातर्फे राज्य करत असत. आधुनिक काळात मौलाना जमालुद्दिन अफगानी यांनी तर विश्व-इस्लामवादाची संरचना केली. (यावर आपण स्वतंत्र विचार नंतर करणार आहोत.) शिया-सुन्नी विभागणीमुळे इस्लामी राष्ट्र-राज्यांतही कसा संघर्ष पेटत असतो हे आपण आताही पाहत आहोत.
धर्म हे एकमेव राष्ट्र-राज्याचे कारण असू शकत नाही हे आपण प्रत्यक्ष उदाहरनांवरुन पाहु शकतो. आज युरोपियन युनियन ही ढोबळपणे ख्रिस्ती राष्ट्रांची मिळुन बनलेली दिसते. परंतु त्यांच्यातील आंतरकलह हे "एक धर्म" या तत्वाने मिटत नाहीत हेही आपल्याला दिसते. म्हणजे एकधर्मतत्व हे कोणत्याही सध्याच्या सार्वभौम राष्ट्राच्या अस्तित्वासाठीचे एकमेव प्रेरक कारण आहे असे दिसत नाही अन्यथा सध्याच्या एकुणातील राष्ट्रांची संख्या ब-यापैकी घतल्याचे चित्र आपल्याला दिसले असते.
४. समान इतिहास हेही एक महत्वाचे तत्व राष्ट्र संकल्पनेत येते. कार्ल मार्क्सच्या मते राष्ट्र ही संकल्पना खोट्या वा भ्रामक इतिहासाच्या जीवावर बेतलेली असते. समान इतिहास अस्तित्वात नसतो असा मतितार्थ काढायचा नाही. परंतू समान इतिहास हा अत्यंत व्यापक परिप्रेक्षात जातो तेंव्हा तो एकार्थाने जागतीक इतिहास बनतो हे आपण लक्षात घ्यायला हवे. बव्हंशी इतिहासाकडे आपण "आमचे व परके यांच्यातील संघर्ष" या दृष्टीकोनातुन पहात जो इतिहास आम्हाला हवासा असतो तो आमचा इतिहास हा समान इतिहास असतो. पण आमचा म्हणजे नेमक्या कोणाचा? जित-विजित घटनांत सामाविष्ट समाजांनी अनेकदा बाजु बदललेल्या असतात. भारतासारख्या खंडप्राय देशात तर असे घडणे स्वाभाविक असते. भारतात हिंदू व मुस्लिमांनी एकार्थाने समान इतिहास उपभोगला आहे. म्हणुन पाकिस्तानची निर्मिती थांबत नाही कारण इतिहासाकडे आमचा व तुमचा ही सरळ विभागणी आहे व दोन्ही बाजु इतिहासाचा अन्वयार्थ आपापल्या हिताचाच काढनार हे उघड आहे. हेच आपण जागतीक पातळीवर पुरातन काळापासून झालेले पाहू शकतो. आपापल्या इतिहासाला सापेक्ष स्वरूप देवून त्याला गौरवशाली, प्रेरक बनवत राष्ट्रभावना वाढवण्यासाठी सर्रास उपयोग केला जातो हे एक वास्तव आहे. त्यामुळेच लोर्ड अक्टन (Lord Acton) म्हणतो कि "राष्ट्राचा सिद्धांत म्हणजे इतिहासाची पीछेहाट आहे." आणि ते खरेच आहे.
इतिहासाचे असे प्रांतनिहाय, देशनिहाय तुकडे पडु शकत नाहीत. नि:पक्षपातीपणे लिहायला गेलो तर सध्याच्या प्रत्येक राष्ट्राचा इतिहास हा जागतीक इतिहास आहे हे लक्षात येईल. तोच खरा समान इतिहास होय. समान इतिहासाच्या तत्वावर राष्ट्र ही संकल्पना उभी रहात नाही याला जगातील अनेक राष्ट्रे साक्षी आहेत.
या व अशा अनेक कारणांमुळे राष्ट्र म्हणजे भाषिक, वांशिक, राजकीय अथवा प्राणिज एकता नसून ती भावनात्मक एकता असते असे जर्मन तत्वज्ञ ओस्वल्ड स्पेंग्लर म्हणतो ते मान्य करावे लागते. एवढेच नव्हे तर बेनेडिक्ट अंडरसन म्हणतो कि राष्ट्र म्हणजे अन्य काही नसून ती एक काल्पनिक भावना आहे. ही भावना नैसर्गिक नसून ती जोपासावी लागते. अनेकदा ती भडकवलीही जाते. राष्ट्रवादाचा अतिरेक आपण फ्यसिस्ट इटली आणि नाझी जर्मनीच्या रुपात पाहिला आहे. वंशवाद, सांस्कृतीकता, भाषा, सीमा ई.च्या आधारावर भावना भदकावणे सोपे असते. त्यामुळे लोक एकत्र येतात व समानतेची भावना जागी करतात हे आपण वारंवार पहात असतो. अनुभवत असतो. एक अर्थव्यवस्था, एक राजकीय सत्ता, समान कायदे व प्रत्यक्ष व काल्पनिक राष्ट्रीय सीमा या भौतिक पातळीवर राष्ट्राचे भावनात्मक अस्तित्व ठरवत असतात. याच भावनांवर राष्ट्रांतर्गतच्याही प्रांतीय अस्मिता जोपासल्या जात असतात. त्यामुळेच तत्वार्थाने कोणतेही सार्वभौम राष्ट्र हे अनेक राष्ट्रांचा समूह असते. भारतासारखा देश हा असंख्य जातींनी बनलेल्या राष्ट्रांचा समुह आहे असेही म्हटले जाते ते यामुळेच.
राष्ट्र ही कृत्रीम भावना आहे. दुस-या महायुद्धानंतर वसाहतींना स्वतंत्र होण्यासाठी राष्ट्रवादाचा उपयोग झाला आहे. साम्राज्यवादी शक्तींशी मुकाबला करणे राष्ट्रवादामुळेच शक्य झाले आहे हे राष्ट्रवादाचे ऐतिहासिक कार्य दृष्टीआड करता येत नाही. तरीही ही नव-स्वतंत्र राष्ट्रे नंतर साम्राज्यवादी शक्तींचेच हस्तक बनली हे वास्तव नाकारता येत नाही. स्वतंत्र धोरणे, संपुर्ण राष्ट्रहित, आर्थिक स्वयंपुर्णता व अन्य राष्ट्रांशी समान पातळीवरील स्पर्धा करु शकणारी राष्ट्रे आज जगात नाहीत म्हटले तरी चालेल. सर्वच राष्ट्रे परावलंबी असून परस्पर सहकार्य (मग त्यासाठी आमिषे, दडपण, प्रत्यक्ष कृती ई. मार्ग वापरोत) असल्याखेरीज कोणतेही राष्ट्र आज आपले अस्तित्व टिकवू शकत नाही. अशा स्थितीत विश्ववाद जोपासत जगाची नवी संरचना करणे आवश्यक आहे. ते कसे शक्य आहे व तसे झाले तर मानवी अस्तित्व नेमके कोणत्या स्थितीत परिवर्तीत होवू शकते यावर पुढे आपण विचार तर करुच पण अडथळ्यांचे कोणती शर्यत सुजाण मानवी समुदायाला जिंकावी लागणार आहे त्यावरही चर्चा करू.