मानवी मनाला पुरातन काळापासून पडलेले प्रश्न म्हणजे हे विश्व काय आहे, त्याच्या असण्याचे कारण काय आहे आणि म्हणुनच माझ्याही अस्तित्वाचे मूलकारण काय आहे? थोडक्यात "मी" कोण आहे?
आजवरच्या तत्वज्ञानाची, अध्यात्माची आणि विज्ञानाचीही उत्पत्ती या प्रश्नांच्या शोधासाठी झालेली आपल्याला आढळते. भौतिकवादी अंगाने तत्वज्ञाकडे पाहणारे ग्रीक तत्वज्ञ असोत कि गूढवादी भारतीय (पौर्वात्य) तत्वज्ञ असोत, सर्व तत्वज्ञानांचा मुळ गाभा वरील प्रश्नांभोवतीच फिरतो हे आपल्या लक्षात येईल. विज्ञानही आजही झटून विश्वनिर्मितीचे गुढ उलगडण्यासाठी अनेकविध सिद्धांत व त्यांच्या सिद्धतेच्या अवाढव्य प्रयत्नांत लागलेले आपल्याला दिसते.
विश्वाची निर्मिती कोणी केली? धर्मवाद्यांनी शोधलेले वरवर वाटणारे सोपे उत्तर म्हणजे "इश्वराने". पण जागतीक धर्मेतिहासही लक्षात घेतला तर लक्षात येते कि एकमेव इश्वराचा शोधही असंख्य वेड्यावाकड्या मार्गाने व मानवी मनाच्या अथक शोधक प्रवृत्तीमुळे लागलेला आहे. इश्वर ही संकल्पना मुळात एका धर्माची उपज नाही तर सर्वच मानवी समुदायांच्या संयुक्त प्रतिभेने तिची निर्मिती केलेली आहे. अनेकदेवतावादातून ज्यु धर्माने यह्वे (एल-अल) हा एकमात्र इश्वर स्वीकारला व पुढे एल (अल) या ज्युंच्या यहवेला सर्वश्रेष्ठ अरबांचाही अनेकदेवतावाद टाळत एकमात्र निर्माता "अल्लाह" पर्यंत नेवून पोहोचवला ही अनेकवाद सोडून एकवादापर्यंत नेण्याची पायरी होती. भारतात त्याही पुर्वी, इसपू साडेतीन हजार वर्षांपुर्वी द्वैतदेवतावाद होता...म्हणजे शिव आणि शक्ती, त्यातच पुढे दोहांचे एकाकारत्व कल्पत शिव हा शिव+शक्ति यांचे एकाकारत्व म्हणजे शिवलिंग या स्वरुपात विकसीत होत "इश्वर" या पदास पोहोचला. वैदिक धर्मियांनीही पुढच्या कलात अनेकदेवतावाद असतांनाही "एक: सत, विप्र बहुदा वदंति" म्हणत एकेश्वर वादाचा उद्घोष केला.
पृथ्वी स्थिर असून तारकामंडले तिच्याभोवती फिरतात या मुळच्या अबोध सिद्धांतापासून पृथ्वी गोल आहे, ती स्वत:भोवती फिरते ते ती सुर्याभोवतीही अनेक ग्रहांसह फिरते हे ज्ञान व्हायला मानसाला लक्षावधी वर्षे लागली. सुर्यही स्थिर नसून तो ग्रहांचे लटांबर समवेत घेत आपल्या आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरत असतो ते आकाशगंगाही स्थिर नसून त्या न मोजता येण्याएवढ्या असून त्याही स्थिर नाहीत हे ज्ञान होत माणसाने विश्वाची निर्मिती एकाच कोनत्यातरी तत्वापासून झाली आहे हा वैज्ञानिक नि:ष्कर्ष गणिती पातळीवर सिद्ध केला व त्याच्या सिद्धतेसाठी नीरिक्षणे ते प्रयोग ही साधने वापरायला सुरुवात केली.
विज्ञान आणि तत्वज्ञान यातील एकमेव साम्य म्हणजे दोन्ही विश्वनिर्मितीचे मुळकारण एकच एक मुलतत्व आहे हे मान्य करण्याच्या पातळीवर पोहोचले. दोन्ही मार्ग भिन्न आहेत. दोहोंचे अभिप्राय , एक निर्मिती तत्व, एकच आहेत, पण तत्वार्थ वेगळे आहेत. दोन्ही मार्ग सत्य सांगतात कि अजुन दोन्ही मार्ग सत्य गवसल्याच्या भ्रमात आहेत हे अद्याप सिद्ध व्हायचे आहे. खरे तर हा निरंतर शोध आहे. आईन्स्टाईन यांचा सापेक्षतेचा सिद्धांत खरा मानला तर, दोन्ही मार्गांना सापेक्ष सत्य (किंवा अर्धसत्य) सापडले आहे एवढेच म्हणता येईल. आणि सापेक्षता असणे याचाच अर्थ द्वैत असने हा होय...कारण निरिक्षकाच्या अभावात निरिक्ष्य अस्तित्वात येवूच शकत नाही.
म्हणजे पाहणारा आणि पाहिले जाणारे, हे द्वंद्व नेहमीच राहणार आहे.
आणि जर हे द्वंद्व चिरंतन अस्तित्वात असेल तर मग एकेश्वर वाद काय अथवा एकच निर्मितीतत्व काय, दोन्ही सिद्धांतांना फारसा अर्थ उरत नाही.
ब्रह्मसुत्रे म्हणतात कि निरिक्षक आणि निरीक्ष्य यांनी एकमेकांच्या जागा बदलल्या...तर पाहिले जाणारे आणि पाहणारा यांच्यातील भेद नष्ट होईल. येथे प्रश्न असा निर्माण होतो कि या जागा बदलणे म्हणजे नेमके काय? त्यावर ब्रह्मसुत्र म्हणते कि "पाहणारा आणि पाहिले जाणारे" हे एकच आहेत अशी अनुभुती मिळेल. हे उत्तर पुरेसे नाही, याचे कारण म्हनजे अनुभुती ही नेहमीच मानसीक असते. समोरचे झाडही मीच आहे कारण मी त्याला पहात आहे, पण झाडालाही तीच अनुभुती येते काय? त्या झाडाचे भौतिक विश्व वेगळे आहे त्याच्या जाणन्याच्या कक्षा (असल्या तर) वेगळ्या आहेत, मग मी आणि झाड यांत अद्वैत कसे प्रस्थापित होईल?
केवळ मी म्हणतो वा मानतो म्हणून?
नेमक्या याच प्रश्नांत विज्ञानही अदकले आहे. समजा सध्याचा महाविस्फोट सिद्धांत खरा मानला, सोळा-सतरा अब्ज वर्षांपुर्वी संपुर्ण विश्व हे अकाच मुलतत्वात एकाकार शुन्यवत द्रव्यात (यीलम) केंद्रीभुत झाले होते व त्याचा काही कारणांनी विस्फोट झाला व त्यातुन काही सेकंदांत विश्वातील अनेकविध द्रव्ये आणि उर्जांचा जन्म झाला, हे सत्य मानले तरी मग हा विस्फोट नेमक्या कोणत्या कारणाने झाला याचे उत्तर अद्याप तरी आपल्याला माहित नाही. म्हणजे जर या महाविस्फोटाचे काही "कारण" असेल, मग ते त्या एकद्रव्यांतर्गतचे असो कि बाह्य...ते अस्तित्वात असेल तर एकद्रव्य-एक-उर्जा सिद्धांतही अदचणीत येतोच कि! आणि तसा तो आलाही आहे. त्यामुळेच कि काय एकवादाकडुन बहुवादाकडे विज्ञानालाही वळावे लागले आहे. अणुचे अनंत घटक असले तरी द्रव्याला वस्तुमान देनारा मुलकण (हिग्ज-बोसान) अस्तित्वात आहे कि नाही यावर सर्न येथे प्रयोग सुरुच आहेत.
म्हणजे आपण पुन्हा एकवाद कि अनेकवाद या वर्तुळात गोल गोलच फिरत आहोत असे आपल्या लक्षात येईल.
मानसाचे विज्ञान काय किंवा तत्वज्ञान काय, हे मुळात मानवी आहे. ते मानवी आहे म्हणुन मानवी संभावना विज्ञान व तत्वज्ञानावर प्रत्यारोपित केल्या जात असतात. आपण सापेक्षतेतच जगू शकतो कारण सापेक्षता हा आपल्या मानवी स्वभावाचा मुलगाभा आहे.
पण निरपेक्ष होता आले तर?
किंबहुना निरिक्ष्यही नाही आणि निरिक्षकही नाही, भक्तही नाही कि देवताही नाही, निर्माताही नाही आणि निर्मितीही नाही...
अशा शुन्यावस्थेतून विश्वनिर्मिती व आपल्याही निर्मितीकडे पाहिले तर?
विचार करुन पहा, अत्यंत रोचक तथ्ये सामोरी येतील...
तरीही मानवी सापेक्षतेतून आपण विचार करणार असल्याने ती तथ्येही काही प्रमानात का होईना सापेक्षच राहतील...
पण निरपेक्षतेचा किमान विचार करुन का पाहू नये बरे?