मानवी मनाला पुरातन काळापासून पडलेले प्रश्न म्हणजे हे विश्व काय आहे, त्याच्या असण्याचे कारण काय आहे आणि म्हणुनच माझ्याही अस्तित्वाचे मूलकारण काय आहे? थोडक्यात "मी" कोण आहे?
आजवरच्या तत्वज्ञानाची, अध्यात्माची आणि विज्ञानाचीही उत्पत्ती या प्रश्नांच्या शोधासाठी झालेली आपल्याला आढळते. भौतिकवादी अंगाने तत्वज्ञाकडे पाहणारे ग्रीक तत्वज्ञ असोत कि गूढवादी भारतीय (पौर्वात्य) तत्वज्ञ असोत, सर्व तत्वज्ञानांचा मुळ गाभा वरील प्रश्नांभोवतीच फिरतो हे आपल्या लक्षात येईल. विज्ञानही आजही झटून विश्वनिर्मितीचे गुढ उलगडण्यासाठी अनेकविध सिद्धांत व त्यांच्या सिद्धतेच्या अवाढव्य प्रयत्नांत लागलेले आपल्याला दिसते.
विश्वाची निर्मिती कोणी केली? धर्मवाद्यांनी शोधलेले वरवर वाटणारे सोपे उत्तर म्हणजे "इश्वराने". पण जागतीक धर्मेतिहासही लक्षात घेतला तर लक्षात येते कि एकमेव इश्वराचा शोधही असंख्य वेड्यावाकड्या मार्गाने व मानवी मनाच्या अथक शोधक प्रवृत्तीमुळे लागलेला आहे. इश्वर ही संकल्पना मुळात एका धर्माची उपज नाही तर सर्वच मानवी समुदायांच्या संयुक्त प्रतिभेने तिची निर्मिती केलेली आहे. अनेकदेवतावादातून ज्यु धर्माने यह्वे (एल-अल) हा एकमात्र इश्वर स्वीकारला व पुढे एल (अल) या ज्युंच्या यहवेला सर्वश्रेष्ठ अरबांचाही अनेकदेवतावाद टाळत एकमात्र निर्माता "अल्लाह" पर्यंत नेवून पोहोचवला ही अनेकवाद सोडून एकवादापर्यंत नेण्याची पायरी होती. भारतात त्याही पुर्वी, इसपू साडेतीन हजार वर्षांपुर्वी द्वैतदेवतावाद होता...म्हणजे शिव आणि शक्ती, त्यातच पुढे दोहांचे एकाकारत्व कल्पत शिव हा शिव+शक्ति यांचे एकाकारत्व म्हणजे शिवलिंग या स्वरुपात विकसीत होत "इश्वर" या पदास पोहोचला. वैदिक धर्मियांनीही पुढच्या कलात अनेकदेवतावाद असतांनाही "एक: सत, विप्र बहुदा वदंति" म्हणत एकेश्वर वादाचा उद्घोष केला.
पृथ्वी स्थिर असून तारकामंडले तिच्याभोवती फिरतात या मुळच्या अबोध सिद्धांतापासून पृथ्वी गोल आहे, ती स्वत:भोवती फिरते ते ती सुर्याभोवतीही अनेक ग्रहांसह फिरते हे ज्ञान व्हायला मानसाला लक्षावधी वर्षे लागली. सुर्यही स्थिर नसून तो ग्रहांचे लटांबर समवेत घेत आपल्या आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरत असतो ते आकाशगंगाही स्थिर नसून त्या न मोजता येण्याएवढ्या असून त्याही स्थिर नाहीत हे ज्ञान होत माणसाने विश्वाची निर्मिती एकाच कोनत्यातरी तत्वापासून झाली आहे हा वैज्ञानिक नि:ष्कर्ष गणिती पातळीवर सिद्ध केला व त्याच्या सिद्धतेसाठी नीरिक्षणे ते प्रयोग ही साधने वापरायला सुरुवात केली.
विज्ञान आणि तत्वज्ञान यातील एकमेव साम्य म्हणजे दोन्ही विश्वनिर्मितीचे मुळकारण एकच एक मुलतत्व आहे हे मान्य करण्याच्या पातळीवर पोहोचले. दोन्ही मार्ग भिन्न आहेत. दोहोंचे अभिप्राय , एक निर्मिती तत्व, एकच आहेत, पण तत्वार्थ वेगळे आहेत. दोन्ही मार्ग सत्य सांगतात कि अजुन दोन्ही मार्ग सत्य गवसल्याच्या भ्रमात आहेत हे अद्याप सिद्ध व्हायचे आहे. खरे तर हा निरंतर शोध आहे. आईन्स्टाईन यांचा सापेक्षतेचा सिद्धांत खरा मानला तर, दोन्ही मार्गांना सापेक्ष सत्य (किंवा अर्धसत्य) सापडले आहे एवढेच म्हणता येईल. आणि सापेक्षता असणे याचाच अर्थ द्वैत असने हा होय...कारण निरिक्षकाच्या अभावात निरिक्ष्य अस्तित्वात येवूच शकत नाही.
म्हणजे पाहणारा आणि पाहिले जाणारे, हे द्वंद्व नेहमीच राहणार आहे.
आणि जर हे द्वंद्व चिरंतन अस्तित्वात असेल तर मग एकेश्वर वाद काय अथवा एकच निर्मितीतत्व काय, दोन्ही सिद्धांतांना फारसा अर्थ उरत नाही.
ब्रह्मसुत्रे म्हणतात कि निरिक्षक आणि निरीक्ष्य यांनी एकमेकांच्या जागा बदलल्या...तर पाहिले जाणारे आणि पाहणारा यांच्यातील भेद नष्ट होईल. येथे प्रश्न असा निर्माण होतो कि या जागा बदलणे म्हणजे नेमके काय? त्यावर ब्रह्मसुत्र म्हणते कि "पाहणारा आणि पाहिले जाणारे" हे एकच आहेत अशी अनुभुती मिळेल. हे उत्तर पुरेसे नाही, याचे कारण म्हनजे अनुभुती ही नेहमीच मानसीक असते. समोरचे झाडही मीच आहे कारण मी त्याला पहात आहे, पण झाडालाही तीच अनुभुती येते काय? त्या झाडाचे भौतिक विश्व वेगळे आहे त्याच्या जाणन्याच्या कक्षा (असल्या तर) वेगळ्या आहेत, मग मी आणि झाड यांत अद्वैत कसे प्रस्थापित होईल?
केवळ मी म्हणतो वा मानतो म्हणून?
नेमक्या याच प्रश्नांत विज्ञानही अदकले आहे. समजा सध्याचा महाविस्फोट सिद्धांत खरा मानला, सोळा-सतरा अब्ज वर्षांपुर्वी संपुर्ण विश्व हे अकाच मुलतत्वात एकाकार शुन्यवत द्रव्यात (यीलम) केंद्रीभुत झाले होते व त्याचा काही कारणांनी विस्फोट झाला व त्यातुन काही सेकंदांत विश्वातील अनेकविध द्रव्ये आणि उर्जांचा जन्म झाला, हे सत्य मानले तरी मग हा विस्फोट नेमक्या कोणत्या कारणाने झाला याचे उत्तर अद्याप तरी आपल्याला माहित नाही. म्हणजे जर या महाविस्फोटाचे काही "कारण" असेल, मग ते त्या एकद्रव्यांतर्गतचे असो कि बाह्य...ते अस्तित्वात असेल तर एकद्रव्य-एक-उर्जा सिद्धांतही अदचणीत येतोच कि! आणि तसा तो आलाही आहे. त्यामुळेच कि काय एकवादाकडुन बहुवादाकडे विज्ञानालाही वळावे लागले आहे. अणुचे अनंत घटक असले तरी द्रव्याला वस्तुमान देनारा मुलकण (हिग्ज-बोसान) अस्तित्वात आहे कि नाही यावर सर्न येथे प्रयोग सुरुच आहेत.
म्हणजे आपण पुन्हा एकवाद कि अनेकवाद या वर्तुळात गोल गोलच फिरत आहोत असे आपल्या लक्षात येईल.
मानसाचे विज्ञान काय किंवा तत्वज्ञान काय, हे मुळात मानवी आहे. ते मानवी आहे म्हणुन मानवी संभावना विज्ञान व तत्वज्ञानावर प्रत्यारोपित केल्या जात असतात. आपण सापेक्षतेतच जगू शकतो कारण सापेक्षता हा आपल्या मानवी स्वभावाचा मुलगाभा आहे.
पण निरपेक्ष होता आले तर?
किंबहुना निरिक्ष्यही नाही आणि निरिक्षकही नाही, भक्तही नाही कि देवताही नाही, निर्माताही नाही आणि निर्मितीही नाही...
अशा शुन्यावस्थेतून विश्वनिर्मिती व आपल्याही निर्मितीकडे पाहिले तर?
विचार करुन पहा, अत्यंत रोचक तथ्ये सामोरी येतील...
तरीही मानवी सापेक्षतेतून आपण विचार करणार असल्याने ती तथ्येही काही प्रमानात का होईना सापेक्षच राहतील...
पण निरपेक्षतेचा किमान विचार करुन का पाहू नये बरे?
आप्पा - बाप्पा ,बाप्पा , वाचवा वाचवा !
ReplyDeleteबाप्पा - अहो आप्पा ,एव्हढे घामाघूम ! आधी घाबरून जाऊ नका बर ! शांत व्हा बरे .सांगा काय झाल तरी काय !
आप्पा - ( धापा टाकत ) - अहो !
बाप्पा - दीर्घ श्वास घ्या बरे ! मी सांगतो तिकडे लक्ष द्या - मन एकाग्र करा .नासाग्र दृष्टी करा -
आप्पा - अहो इतका वेळ नाहीये !
बाप्पा - जगात कुणीच कुणाचे नाही ! दीर्घ श्वास - म्हणा -ओम पूर्णमदः पूर्णमिदम पूर्णात्पूर्ण मुदच्यते -
आप्पा - जाऊ द्या हो - ते तुमचे पुरणाचे रामायण नेहमिचेच आहे ! अहो ते एकवेळ परवडले असते ! पण हे नवीनच लचांड - माहित्ये का ?
बाप्पा - नवीन लचांड ? - कोण गडकरी भेटले होते का ?
आप्पा - नाही हो ! तो बोकड मागे लागला होता ! अनुभूती अनुभूती असे ओरडत होता !
बाप्पा - बोकड नि तुमच्या मागे लागला होता ? तुम्ही इतके शेळपट नाही हो आप्पा ! आज पौर्णिमा आहे ! कदाचित त्यामुळे - - पण मला एक सांगा त्या बोकडाच म्हणण तरी काय ?
आप्पा - अहो ,ऐकायलाच तयार नाही . मी आपला चाललो होतो बाजूबाजूने कोपऱ्या वरच्या मारुतीला.
धाडकन टपकला नि म्हणतो कसा -
संजय सर म्हणत होते आत्ता की झाड आणि माणूस यांनी आपापल्या जागा बदलल्या तर ? वर म्हणतो कसा - मी तरी काय घोड मारलय ?
अहो तो कसायाकडून पळून आलेला बोकड ! आता मी त्याची जागा घ्यायची अदला बदलीत म्हणजे ! - मरणच की हो ! मला वाचवा हो बाप्पा !
तुम्ही म्हणाल ती अनुभूती मला मान्य आहे हो !
बाप्पा - आणि काय म्हणत होता तो बोकड ?
आप्पा - कसली तरी कोण तरी विश्व निर्मिती - निर्मिती म्हणत होता !
बाप्पा - अहो आपली सावंतांची निर्मिती असेल - निर्मिती सावंत - घाबरणारच की हो तो अशाने !
आप्पा - आणि अनुभूती अनुभूती असे पण विव्हळत होता ! मी काहीच नाही केल हो ! वाचवा मला .
बाप्पा- अहो त्याला येऊ द्या तर खरे -
आप्पा - म्हणजे तुम्ही त्याच्याशी लढणार ? मानल बरका बाप्पा तुम्हाला !
बाप्पा -अहो आपण गांधीवादी - आपल्यामुळे ब्रिटीश सुद्धा सातासमुद्री पळून गेले तर या बोकडाची काय कथा !
आप्पा - काय हो बाप्पा - तो बघा - तो तिथेच खुराने माती कुरतडत बसलाय - बेटा -पुढेच येत नाहीये !-अहो तुम्हाला घाबरलाय की काय .
बाप्पा - अहो तोडगाच तसा काढलाय - माझ्या मागे फोटो कुणाचे टांगल्येत त्या भिंतीवर ? बघा बर -
आप्पा - बघू - कमालच आहे - कोण कधी नि कस कामाला येईल सांगता येत नाही या जगात - धन्य हो बाप्पा - तुमची धन्य आहे -
बाप्पा - अहो ही काली माता - किती जणांची मुंडकी हातात धरल्येत बघा - घाबरणारच हो तो बोकड - अहो या महामायेच्या समोर कुणाचे कधी चाललय का ?
धगधगीत ज्वलंत जागृत आहे हो ! मागे एक आख्खा वाघ आला होता - गेला परत शेपटी आपटून - सांगतो कुणाला .
- अहो मी सगळ्याना जवळ केलाय.शंभू महादेव आहे,कृष्ण आहे ,दुर्गा आहे ,राम आहे ,खंडोबा आहे.कुणाला सांगू नका , उशाखाली बायबल नि शिवापुर च्या दर्ग्याचा पण फोटो आहे. असू दे .झाल तर अक्कलकोट गाणगापूर शेगाव नि शिर्डी आहेच .
बाप्पांचा घरातल्याकपाटाच्या आरशात बोकडाला कसायाचे प्रतिबिंब दिसत होते म्हणून तो पुढे येत नव्हता !
पण हे रहस्य त्या खाटकाला नि बोकडालाच माहित -
कुठल्याच देवाला , महाराजाला व बाप्पाना माहित नव्हते !
असे असते जीवा शिवा चे नाते .
आप्पा - कसाई नि कालीमाता बघून घेतील आपापसात .बघा बघा बाप्पा - तो बोकड गेला सुद्धा -सुटलो बुवा एकदाचा !
बाप्पा - जा त्या पारावरच्या मारुतीला माळ घाला एक छान रुइची ! .
आणि त्या संजयला सांगा हात जोडून कुणीतरी - म्हणाव अस भलत सलत लिहू नकोस -
सापेक्षता नाही नि निरपेक्षता तर त्याहून नाही म्हणावे ! आमच्या जिवाला विनाकारण घोर !
तू माझ्याकडे आलास म्हणाव हात पसरून तर मी नाही हो त्याला बधायचा - यांची धुणी कोण धुणार - हे मिरवणार स्वतः तत्वज्ञानी म्हणवत ! आणि आपण यांना धा धा मिनिटाला चहा करून द्या - ते नाही जमणार ! अहो हे तत्वज्ञानाचे नि विश्व निर्मितीचे उद्योग हे पेन्शनरांचे काम .आपले नव्हे - काय आप्पा .
आप्पा बाप्पा मनापासून हसले !
तसेच आपण सर्व सापेक्षतेने किंवा निरपेक्षतेने हसु या ! ही साठा उत्तराची कहाणी - - - -
Bhannat!
Deleteसर
ReplyDeleteआपल्याला कधीना कधी तरी आपल्या मनाला याचा खुलासा द्यावाच लागेल.
मी काय म्हणत्ये ते बघा.
संजय सर , आपले ओळीने लिहिलेले विषय पाहिले तर असे दिसते की,जातपात शेती,नष्ट होणारी चराउ कुरणे आणि पाणी,पाकिस्तान,विश्वनिर्मिती असे विविध विषय आपण लिहित आहात.
आपले लेखन म्हणजे कादंबरी नाही - तर थोडेसे नवनीत ,अमृत या सारखे रीडर डायझेष्ट सारखा आपला पसारा असतो.समाज प्रबोधन हि भूमिका असते.
विषय मांडणी हे एक शास्त्र आहे हे मला मान्य ! त्यासाठी शब्द रचना -वाक्य रचना संकेताना आणि अर्थाला धरून करावी लागते - हे पण मान्य !
पण आपण थोडीशी घाई करता !. लेखक लेख लिहितो. नि त्याचे काम संपते- पण ब्लोग लेखकाचे काम थोडेसे वेगळे असते -
लेखन हे करीयर असलेला प्रोफेशनल लेखक त्याचे लेखन थेट त्याच्या शैलीत मांडत असतो.पुस्तकाचा खप आणि त्याचा वैयक्तिक इमेज याचे भान त्याला ठेवावेच लागते - ना.सी.फडके हे वि.स.खांडेकर होत नाहीत हा जितका तत्वाचा भाग असतो तितकाच इमेज चा असतो.त्यांनी कितीही आव आणला तरी मूलतः तो मार्केट चा भाग असतो.याचे भान लेखक ठेवत असतोच !
इथे ब्लोग लेखक मात्र निखळ समाज प्रबोधनाचे काम करत असतो ! (अशी एक सर्व साधारण धारणा आहे )त्याला जास्तत जास्त लोकांना आपल्या लेखातील विचारांचा आस्वाद घेऊन त्यांच्या मनात विचारांची अपेक्षित आवर्तने सुरु व्हावीत असे वाटत असते हे इथे गृहीत धरले आहे !. त्याला शाबासकीची आकांक्षा नसते ,उलट त्याच्या लेखनावर गरमागरम चर्चा त्याला अपेक्षित असते !
ब्लोग लेखक आपल्या लेखनाने सम विचारी लोकाना घडवत तरी असतो किंवा एकत्र तरी आणत असतो.किंवा काही विचाराना समोरासमोर आणत असतो.प्रश्नाना वाचा फोडत असतो !
पण ब्लोग लेखकाने नुसते प्रश्न पेटवून निघून जाऊ नये असे मला वाटते.कोलांट्या उड्या मारू नयेत -
प्रश्नाला सुचलेले उत्तर पण त्याने मांडले पाहिजे.त्यावर वाद होणारच ! आशययुक्त विवाद हा तर विचार मन्थनासाठी आवश्यकच आहे !
प्रत्येक प्रश्नाला काळे पांढरे BLACK OR WHITE असे उत्तर नसतेच !त्याला अनेक पदर GREY SHADES असतात.त्यामुळेच मतभेद निर्माण होत असतात.
आपली सध्याची मांडणी विचारी असण्यापेक्षा भावनिक होत आहे.ओवेसी आणि पाकिस्तान बद्दल लिहिताना आपल्या विचारांना राष्ट्र प्रेमाची चौकट बंदिस्त करते ,आणि समाज प्रबोधन यावर बोलताना आपण शक्यतो ब्राह्मण आणि वेद यावर तुटून पडता ! एकीकडे वेदाना लिखाण म्हणून त्यांचे प्राचीनत्व मान्य करत त्यांच्या विषयी आदर व्यक्त करता , पण पुरोगामित्व दाखविण्यासाठी त्यांची पुरेशी अवहेलानापण करता !
आपण एक विसरता कि स्वातंत्र्य पूर्व काळातील शाळातून राष्ट्रीय शिक्षण मिळावे हा आगरकर टिळकांचा उद्देश होता.आणि समाज प्रबोधन व्हावे हा म.फुले यांचा उद्देश होता.
एकात राजकारण आणि एकात समाज प्रबोधन डोकावत होते . सगळेच सदासर्व काल बरोबर असतात असे थोडेच असते ?
आजच श्री .नंदी यांनी जे मांडले आहे त्यातील आशय तपासायला हवा. - मांडणी चुकली असेल पण आशय विचार करण्या सारखा आहे .
संजय सर , प्रकाश आंबेडकरांनी नुकतीच एक भूमिका मांडली ज्या मध्ये जातीचा उल्लेख कुठेही नसावा - अगदी शाळे पासून अशी त्यांची मागणी आहे त्याची फारशी दाखल मेडिया आठव इतर ठिकाणी घेतलेली दिसत नाही. आपले विचार मांडू शकाल का ? मला तर ती एक क्रांतिकारी भूमिका वाटते.
ReplyDeleteअतिशय छान
ReplyDeleteसंजय सर,
ReplyDeleteआपल्या लिखाणाला आप्पा बाप्पांनी जी उत्स्फूर्त दाद दिली त्यांनी बहार आणली ,
त्यांच्या विनोदाने विषय समजायला सोपा झाला !
धन्यवाद -
संजयजी,
ReplyDeleteभारतीय समाजाचे किंवा त्यांच्या लोक्नेत्यांचे भूगोलाचे ज्ञान इ.स.पू.३५००वर्षे अतिशय अशक्त असावे असे म्हणण्यास जागा आहे.
क्षीरसागर , शेषनाग , वगैरे कथा त्यांचे अज्ञानच प्रकट करतात ! सर्व धर्मात हीच स्थिती दिसते.पिंपळपान आणि जलप्रलय आणि कृष्ण किंवा तत्सम कथा इतर धर्मातून
आपल्याकडे आल्या का इकडून तिकडे गेल्या हा संशोधनाचा विषय आहे !
प्रत्येक समाजाला उत्पत्ती स्थिती आणि लय याबद्दल पूर्वी आणि आजही जबरदस्त बौद्धिक आणि भावनिक आकर्षण असणे स्वाभाविक आहे !.
सामान्य माणसाला त्याच्या आवाक्याचा आढावा घेताना अतिशयोक्ती करण्याचा मोह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काळाच्या कसोटीवर उतरणारे तत्वज्ञान हे सर्वश्रेष्ठ मानावे - जे तत्वज्ञान उद्याचे विज्ञान ठरेल तेच खरे तत्वज्ञान ! हे लॉर्ड बर्त्रोंड रसेल चे वाक्य नजरेआड करता येत नाही !