Monday, January 28, 2013

समाजाची उभी फाळणी करणारी मानसिकता....


आशिष नंदी यांना सर्व भारतीय नागरिकांप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे प्रथम स्पष्ट करुन या निमित्ताने भारतातील सांस्कृतीक संघर्ष आजही कसा जीवित आहे यावर येथे चर्चा करायची आहे.

आशिष नंदी ओबीसी, एस.सी/एस.टी/भटके विमूक्त यांच्या विरोधात नाहीत असा तर्क त्यांचे समर्थक देत आहेत तर त्याच वेळीस आशिष नंदी यांनी उच्चवर्णीय मनुवादी मानसिकतेचे दर्शन घडवले असून मागासवर्गीयांप्रतेची हीणभावना त्यांनी व्यक्त केली आहे असा मागासवर्गीय नेते व विचारवंतांचा आरोप आहे. नंदी यांच्याविरुद्ध अट्रोसिटीची तक्रार दाखल झाली असून जयपूर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर व्हायचा आदेश काढला आहे असे ताजे वृत्त आहे.

मागासवर्गीयांत अधिक भ्रष्टाचार असून प. बंगालमद्ध्ये मागासवर्गीय सत्तेच्या जवळपासही फिरकले नसल्याने प. बंगाल हे भ्रष्टाचारमूक्त राज्य राहिले आहे असा दावा नंदी यांनी केला आहे. हे त्यांचे विधान वक्रोक्तियुक्त आहे, ती त्यांची शैली आहे ते त्यांना "मागासवर्गीयांना कोणी वाली नसल्याने त्यांच्या भ्रष्टाचारची चर्चा अधिक होते." असे सुचवायचे होते ते नंदी हे जेवढे चांगले लेखक आहेत तेवढेच ते वाईट वक्ते आहेत  अशा विविध पद्धतीने त्यांचे समर्थन केले जात आहे.

खरे तर नंदी बोलले आणि ही चर्चा सुरु झाली असली तरी अशी चर्चा अप्रत्यक्षपणे समाजात मागासवर्गियांना आरक्षण मिळाल्यापासून सुरु आहे. ती प्रकटपणे बोलण्याचे धाडस कोणी केले नव्हते एवढेच. नंदी यांनी ते केल्याने त्याचा स्फोट उडाला आहे एवढेच!

खरा मुद्दा हा आहे कि भारतातील जाती-संघर्षाचे हे एक प्रकट रूप आहे हे लक्षात घ्यायला हवे.  मुद्दा फक्त भ्रष्टाचाराचा नसून एकुणातीलच मागासवर्गियांबद्दल जी उपहासाची, उपेक्षेची आणि आरक्षनामुळे मागासवर्गियांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी मोकळी झालेली द्वारे व त्यापोटी काही समाजघटकांत निर्माण होवू पाहणारी असुरक्षिततेची भावना यातून हा संघर्ष विविधांगांनी सतत सामोरा येत राहिलेला आहे.

नंदी यांचा खुलासा रास्त आहे असे मानले तरी प्रश्न हा उरतोच कि "मागासवर्गियांना कोणी वाली नाही म्हणुन त्यांच्या भ्रष्टाचाराची चर्चा अधिक होते.." या विधानातुनही जातीय संघर्ष आहे व तो मागासवर्गियांच्या विरोधातच आहे असेच स्पष्ट दिसत नाही काय?

म्हणजेच उच्चवर्णीय विरुद्ध मागासवर्गीय अशी जर आपली सामाजिक रचना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे फोफावलेली असेल तर त्याला आपल्याकडे काय उत्तर आहे? महाराष्ट्रात ७०% सत्ताकेंद्रे विशिष्ट जातीच्या हातात एकवटलेली आहेत असा सत्याधरित आरोप गेली काही वर्ष होत आहे. प्रा. हरी नरकेंसारखे विचारवंत त्याविरुद्ध आवाज उठवत आहेत. इतर मागास नसतांनाही जातीचे बनावट  दाखले घेवून निवडनुका लढल्या जातात व मागासवर्गियांच्या ताटातील घटनेने दिलेला घास पळवला जातो, हेही एक वास्तव नाही काय? हा भ्रष्टाचार नाही काय? परंतू तो राजरोसपणे केला जातो कारण मुळात सत्ताकेंद्रेच एकत्र एकवटलेली आहेत. त्यविरुद्ध आवाज उठवणे सोपे नाही. बदल तर फार दुरची गोष्ट राहिली.

हे उदाहरण अशासाठी दिले कि मागासवर्गीय विरुद्ध उच्चवर्णीय यांच्यातील संघर्ष हा विविधांगांनी पाहिला पाहिजे. त्यात जित बाजू कोणती आहे आणि पराजित बाजू कोणती आहे यावरही विचार व्हायला हवा. एकमेकांचा एकमेकांकडे पाहण्याचा, विचार करण्याचा दृष्टीकोन नेमका का वेगळा आहे हेही तपासून पहायला हवे.

दृष्टीकोन वेगळे असण्याचे कारण काय आहे? गतकालातील दबलेले वर्ग आपल्या बरोबरीला येत आहेत, जीवनाच्या सर्व क्षेत्रांत स्पर्धक बनत आहेत याबद्दल स्वागतार्ह भुमिका न घेणारे लोक आपला वर्चस्वतावाद वर्तमानातही जीवित ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करतात म्हणुन त्यांचा दृष्टीकोन वेगळा आहे.

तर जो वर्ग या खुल्या आभाळाखाली येत नवीन जगाशी नाळ जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतांना, त्यासाठी स्वत:शी आणि परिस्थितीशी संघर्ष करत असतांना जर येथेही उपहास, उपेक्षा आणि वर्चस्वतावाद वाट्याला येत असेल तर त्यांचाही दृष्टीकोन उच्चवर्णीयांबाबत निकोप राहू शकत नाही. क्षेत्र कोणतेही असो.

अपवाद अर्थातच असतात. आहेत. पण ते अल्पसंख्याहुनही अल्पसंख्य असल्याने, या संघर्षाचे संपुर्ण आकलन व सर्वैक्यासाठी उपाययोजना यात आपण खुपच कमी पडलेलो आहोत हे उघड आहे.

नंदी यांचे विधान (ते केले असेल अथवा नसेलही, पण त्यामुळेच संतप्त प्रतिक्रिया उठलेल्या असल्याने) त्या दृष्टीने पुन्हा पहायला हवे. "मागासवर्गीय अधिक भ्रष्टाचारी आहेत..." हा संदेश माध्यमांमार्फत देशभर दिला गेला आहे हे एक वास्तव आहे. मागासवर्गीय भ्रष्ट असतात असा समज खाजगीत अनेकदा व्यक्त केला जात असतो. त्यामुळे नंदींनी उपरोक्त विधान केलेले नाही असे मानले तरी असा समज पसरवल गेला आहे हे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे ही चर्चा फक्त नंदींपुरती मर्यादित ठेवता येत नाही.

असे समज एखाद्या समाजवर्गाबाबत का पसरवले गेले असतील? आजही त्याची व्यापक प्रसिद्धी एखाद्याला प्रवक्ता मानत का केली जात असेल?

मल वाटते आपण एक अत्यंत धोकादायक वळणावर येवून पोहोचलो आहोत. मागासवर्ग विरुद्ध उच्चवर्णीय यांच्यातील आजवर अप्रकट राहिलेल्या संघर्षाची ही प्रकट परिणती आहे. याचे रुपांतर भारतीय समाजात उभे दोन तट पडण्यात होण्याची शक्यता या मागासवर्गियांबाबतच्या उच्चवर्णिय मानसिकतेमुळे निर्माण झाली असून मागासवर्गियांचा उच्चवर्णीयांबाबतचा दृष्टीकोन दिवसेंदिवस नितळ होण्याऐवजी पुरेपूर गढुळण्याची वेळ या एकंदर प्रकरणाने आणली आहे.

आणि दुर्दैव म्हणजे नंदी यांचीच पाठराखन करण्यात बव्हंशी उच्चवर्णीय विचारवंत धन्यता मानत आहेत व नंदी असे बोलले अथवा नाही किंवा त्यांची नेमकी भूमिका कोणती यावरच जोर देत ख-या दुखण्याकडे दुर्लक्ष करत आहेत ही निषेधार्ह बाब आहे. उच्चवर्णीय दृष्टीकोन मागासवर्गियांबाबतचा एकुणात कसा आहे हेही या निमित्ताने स्पष्ट होते आहे. हा दोन संस्कृतींमधील संघर्ष पेटवण्याचे लक्षण आहे.

आणि हे अत्यंत विघातक आहे. परस्परांबद्दलचा दृष्टीकोन नितळ होण्याच्या मार्गात ही सर्वात मोठी धोंड उभी केली गेली आहे. याचे निराकरण न करता, एकुणातील सर्वच समाजाची मानसिकता बदलण्यासाठी कसलाही प्रयत्न करण्याऐवजी ती मानसिकता परस्परविरुद्ध करत नेण्याची ही एक चाल आहे. यातून पुढे अजून काय सामाजिक अभिसरण घडेल याचे भाकित वर्तवता येत नसले तरी अनेक समीकरणे बदलू लागण्याची चिन्हेही आजच्या वास्तवात दडलेली आहेत.

भ्रष्टाचाराला जात नसते कि धर्म नसतो. उच्चवर्णीय उच्चवर्णीयांकडुन लाच घेत नसतील असे नाही. पैशांची हाव जात-पात बघत नसते. तसेच इतरांचेही आहे. भ्रष्टाचार ज्या प्रवृत्ती/विकृती आणि अर्थजाणीवांच्या असंमजसपणातून निर्माण होतो, त्याचे निराकरण कसे करायचे हा खरा प्रश्न आपल्यासमोर असतांना ते बाजुला ठेवत समाजाची उभी फाळणी करनारी मानसिकता देशात असावी ही अत्यंत खेदाची बाब आहे.  

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...