११ एप्रिल ही महात्मा फुले यांची जयंती. येत्या ११ मे रोजी फुलेंना मुंबईतील कोळी समाजाने पुढाकार घेऊन "महात्मा" पदवी दिली होती त्याला १२५ वर्ष पुर्ण होताहेत. काल गुढीपाडवाही होता. त्या निमित्त समस्त मच्छीमार समाज व कोळी महासंघाने माझे व्याख्यान माहिम चौपाटीवर आयोजित केले होते. या प्रसंगी आमदार कपिल पाटील, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील, राजहंस टपके आदी मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.
येथे मी दिलेल्या व्याख्यानातील महत्वाचे मुद्दे:
१. मुंबईच्या आगरी, कोळी आणि अन्य बहुजन कामगार बांधवांनी फुलेंच्या जातिनिरपेक्ष समाजजागृतीच्या कर्याची दखल घेऊन फुलेंना "महात्मा" हा पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार प्रदान झाल्यावर म. फुलेंनी केलेल्या भाषनात ते म्हणाले होते, "शुद्रातिशुद्रांसह भिल्ल -कोळी वगैरे सर्व लोक विद्वान होवून विचार करण्यालायक होईपावेतो ते सर्वसारखे एकमय लोक निर्माण झाल्याखेरीज "नेशन" निर्माण होणे शक्य नाही." आम्ही गेल्या सव्वाशे वर्षांत शिकलो पण विद्वान झालो नाही. आम्हा भारतीयांनी ज्ञानाची कास सोडुन एक सहस्त्रक उलटले. आज आम्ही जागतिकीकरनाच्या लाटेल आलो तरीही आम्हाला आमचे प्रश्न नीट समजत नाहीत आणि ते सोडवण्यासाठी उत्तरे स्वत:च शोधावी वाटत नाही. आम्हाला आमच्या सर्वच प्रश्नांची सोडवणुक शासनाने करावी अशी आमची अपेक्षा असते. पण जे प्रश्न निर्माण होतात त्यामागे आपला एक नागरिक म्हणुन काहीतरी हात असतो हे आपण कधी लक्षात घेणार?
२. जागतिकीकरणात आपला वाटा काय? हजारो वर्ष कोळी बांधवांनी सागरकिनारे राखले. नौकानयन ते विदेशव्यापाराची दारे खुले करुन दिली. एक वैशिष्ट्यपुर्ण सम्स्कृती व धर्मभावना विकसीत केल्या. व्यास-वाल्मिकी सारखे महाकवि कोळी समाजाने दिले. गौतम बुद्धाची माता कोलीय गणाची होती...झलकारीबाईसारखी लढवैय्या महिला याच समाजाने दिली. कबीर कोळी होते. कोलीय/कोळी नांवाची असंख्य गांवे आजही भारतात सर्वत्र आहेत एवढा हा मानवगण विविध व्यवसाय क्षेत्रांत पसरलेला आहे. परंतू मच्चःईमारी करणारे कोळी बांधव आज निर्वासित होवू लागले आहेत. मुंबई-ठाने ते संपुर्ण पाच जिल्ह्यांची किनारपट्टी कोळ्यांच्या हातून जात भांडवलदारांच्या हाती जात आहेत. कारण शिकले असतील पण ज्ञान आले नाही. आपणही भांडवलदार बनावे अशी आकांक्षा जोपासता आली नाही. जमीनी विकल्या. ट्रालर्सवाल्याशी स्पर्धा करता येत नाही. मासळी अजुनही उन्हात वाळवता. जगभर निर्जलीकरणाची सोपी पण यांत्रिक पद्धत वापरली जात असता संपुर्ण देशात एक अपवाद वगळता कोनी आधुनिकीकरण केले नाही. याही उद्योगात एफ.डी.आय. एक दिवस आनायला लावणार आहात काय? आज्मितीला सुक्या मासळीची जागतीक बाजारपेठ ७० बिलियन डालर्सची आहे. यात आपला वाटा काय? कि हेही काम शासनानेच करावे अशी अपेक्षा आहे?
३. आरक्षण हे दिवसेंदिवस कुचकामी होणार आहे. आरक्षणाची मागणी ही विकलांग मानसिकतेचे प्रतीक आहे. नोक-या मागणा-यांच्या यादीत जावून बसू नका तर नोक-या देनारे बना! आणि ते अशक्य नाही. फक्त व्यवसाय पद्धती आधुनिक बनवणे गरजेचे आहे. अणि यालाच ज्ञान आणि विद्वत्तेचे लक्षण म्हणतात. शंभर पुस्तके वाचुन कोणी विद्वान होत नसते तर विद्वत्ता आचरणातून अभिव्यक्त होत असते. आपण जे समाजकारण आणि अर्थकारण विकसीत करतो त्यातून व्यक्त होत असते. आपण एकोणिसाव्या शतकातही अडाने होतो आणि आजही अडानी आहोत. मग आपण महात्मा फुले जर समजुच शकलो नसू, तसे थोडेबहुतही आचरण करुच शकलो नसू तर या जयंत्या साज-या करण्याचा दळींद्रीपना तरी कशाला करता?
४. आज घरी जाल तेंव्हा आपण आपल्या योग्यतेपेक्षा अधिक उच्च जागी आहोत की खालच्या यावर निरपेक्ष विचार करा. जर तुम्हाला आहे ती स्थिती समाधानकारक वाटत असेल तर तुम्ही गुलाम होण्याच्याच योग्यतेचे आहात असे खुशाल समजून चाला. पण जर एक क्षणही तुम्हाला असे वाटले, कि नाही, मी मागे आहे...तर पेटुन उठा...आणि स्वत:चे स्थान निर्माण करण्याच्या मागे हात धुवून लागा. समुद्रकिनारे आणि खुद्द समुद्र ही तुमची प्राधान्याची संपती आहे. तिच्यावरचा हक्क जपायचा तर सागरी संपत्तीचेही नीट नियोजन करावे लागेल. बेसुमार मासेमारी आणि त्या प्रमानात पुनर्भरणी न केल्याचे दुष्परिणाम आताच दिसू लागले आहेत. शेतक-यांनी जी चूक केली ती तुम्ही तरी करू नका. शासनाने शेतक-यांची मानसिकता मतांच्या लाचारीसाठी एवढी विकलांग केलीय कि चा-यापासून पाण्याचे प्रश्न सरकारनेच सोडवावेत अशी अपेक्षा ठेवून असतात...पण स्वत: कसलेही नियोजन करत नाहीत. चारा आणि मासे मंत्रालयांत उत्पादित होवू शकत नाहीत...ते काम शेवटी गरजवंतांनाच प्रामाणिकपणे करावे लागते. आपण त्यात अपेशी ठरलो आहोत...म्हणुन आपण अज्ञानी आहोत हे समजून चालावे.
५. म. फुलेंने "एकमयता" हा शब्द अत्यंत विचारपुर्वक वापरला आहे. जात-जमात कोनतीही असो, आपण सारेच एका एकजिनसी समाजाचे व्यावसायिक कौशल्यांच्या विभागणीमुळे विभक्त झालो आहोत. एकाच घरातील भावंडे जबाबदा-या वाटुन घेतात तसे. पण आपण कोळ्यांच्या प्रश्नाशी शिंप्यांचे काय घेणे? धनगरांच्या प्रश्नांशी कुणब्यांचे काय घेणे? अशा भयंकर मानसिकतेत आजही आहोत. जाती सोडा...पोटजाती/शाखांतही ऐक्य नाही. मग सर्व-सामाजिक एकमयता कोठुन येणार? महादेव कोळ्यांच्या प्रश्नांसाठी मच्च्छीमार कोळी पाठीशी उभा राहणार नसेल तर मग तुम्हाला व्यास-वाल्मिकीचा वारसा सांगायचा कोणता हक्क पोहोचतो? धनगर आणि कोळ्यांचे समान प्रश्न असतांना त्या प्रश्नांसाठी सर्व अन्य जाती आवाज उठवणार नसतील तर कोणती एकमयता येणार आहे? विखंडीत समाज, विचार न करणारा समाज हा नेहमीच राजसत्तेला प्रिय असतो. ती मग कोणत्याही जातीची असो. राज्यकर्ते आणि धर्मलंड नेहमीच विचारांना घाबरतात. म्हणुन कोणीतरी काल्पनिक शत्रु द्यायचा आणि समाजाला त्यापाठी लावून द्यायचे हे उद्योग होत असतात. आता तरी सावध व्हा. एकमयतेचा रस्ता सहृदयता आणि इतिहासाची वास्तव जाण यातून जातो. स्वत:चे हक्क हवे असतात तर जबाबदा-यांचे पालनही करावे लागते.
६. म. फुले म्हनतात...या वरील अटी पुर्ण झाल्या नाहीत तर आपण "नेशन" होणार नाही. आज आपण जरी भारतीय संघराज्य म्हणत असलो तरी आपल्या देशाला "नेशन" म्हणता येणे अशक्यप्राय आहे...कारण एकमयताच नाही. डा. आंबेडकर जसे म्हनतात कि सामाजिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही व्यर्थ आहे...त्याचा अन्वयार्थ हाच आहे. आम्ही राजकीय लोकशाहीत आहोत म्हणुनच आम्ही सरंजामदारशाहीत आहोत...खरी लोकशाही आम्ही कधी पाहिलेलीच नाही. आणि आम्ही एकमय झालो नाही तर ती कधी आम्हाला पहायला मिळनारही नाही.
आम्ही शासनासाठी नव्हे तर शासन आमच्यासाठी तेंव्हाच होवू शकेल जेंव्हा आम्ही एकमयता आणत सामाजिक लोकशाही प्रस्थापित करू. आम्ही महामानवांच्या मुलभूत तत्वज्ञानांवर स्वत:च काळीमा फासला आहे. चरित्रांची पारायणे करून काही साध्य होनार नाही तर त्यांचे तत्वज्ञान कृतीत आनायला हवे. महात्मा फुलेंनी एकोणिसाव्या शतकात जो द्रष्टेपणा दाखवला त्याचा आम्ही अंगिकार केलाच नाही. अजुनही वेळ गेलेली नाही. आपल्याला ख-या लोकशाहीचा लढा लढायचा आहे...आमच्याच गुलाम मानसिकतेतून बाहेर यायचे आहे!


