Friday, December 12, 2025
अनिश्चिततेवर हेलकावणारे मानवी भविष्य!
पुढील काळात मानवाचे जीवन कसे असेल, कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्याचे मानवजातीवर होणारे संभाव्य परिणाम याची चर्चा आपण या लेखमालिकेत केलेली आहे. समजा मानवी जीवन अत्याधुनिक तंत्रद्न्यानाने झाकोळले गेले आणि बव्हंशी मानवी हातांना शारीरिक किंवा बौद्धिक श्रमाचे कामच उरले नाही तर एकुणातील व्यवस्था कशी ढासळेल यावर आपण गेल्या लेखात विचार केला. यात दुसरी संभावना अशी आहे की आज आपण कल्पना करूही शकत नालेली नवीन कामे निर्माण होतील आणि एकुणातील मानवी व्यवस्था आधी थोडी अव्यवस्थित होऊन नव्या व्यवस्थेशी जुळवून घेत एका वेगळ्या व्यवस्थेत जगू लागतील. रोजगाराचे प्रमाण आज वाटते तसे ढासळू शकणार नाही. किंवा तंत्रज्ञानाच्या विकासावरच सरकारे बंधने घालत समाजवादी तत्वानुसार सर्वांच्या स्वाभिमानाने जीवन जगण्याच्या नैसर्गिक अधिकाराचे जतन करतील. त्यासाठी अर्थात नीतीसिद्धांत हे मानवाभिमुख करावे लागतील व तसे कायदे बनवून त्याचे कठोर पालन करावे लागेल. तेव्हा संभावना खूप आहेत हे खरे असले तरी त्यासाठी मानवी प्रवृत्ती, म्हणजे लालसा, लोभ, मक्तेदारीची भावना इ. दुर्गुणांचा समूळ नाश करावा लागेल. सध्याची स्थिती तरी मक्तेदारीकडे जात छोटे-मध्यम उद्योग संपवण्याची आहे आणि सरकारे अतिश्रीमंतांच्या व शक्तीशाली जातसमूहांच्या कच्छपी लागनले असल्याने असे खरेच होईल काय याचे उत्तर देता येणे अशक्य आहे. याचे कारण मानवी समाजाच्या जीवनातील अनिश्चितता.
अनिश्चिततेचे तत्व जसे सूक्ष्मयामिकी शास्त्राला जसे कवटाळून बसले आहे त्याहीपेक्षा या तत्वाने आदिम कालापासून मानवी जीवनाला जास्त ग्रासून टाकले आहे. अनिश्चिततेच्या हेलकाव्यांवर आपले जीवन झुलत असते. पुढच्या क्षणी काय होईल याचे भाकीत अगदी योजनाबद्ध कृती केली तरीही वर्तवता येणे अशक्य असते. मुळात जीही काही कृती केली ती जे परीणाम घडवते ती स्थितीच अनिश्चित आणि प्रतिक्षणी बदलणारी असते त्यामुळे परिणामही वेगवेगळी रुपे घेतात आणि अपेक्षित रूपे मात्र कवेत येतच नाहीत. काही वेळा कृतीचे अपेक्षित परिणाम दिसतात हे खरे असले तरी ते अपेक्षित परिणाम पुन्हा अनपेक्षित शक्यतांना जन्म देतात हेही आपल्या अनुभवाला येत असते. पण अनपेक्षिततेत अपेक्षितता आणायचा प्रयत्न असतो आणि कोणतीतरी शक्ती अपेक्षित असेच घडवू शकेल या अपेक्षेतून ईश्वरासकट ज्योतिष नावाचे भविष्य अशास्त्रसुद्धा डावाला लावले जाते. जेथे शास्त्रातच मुळात अनिश्चिततेचे तत्व राज्य करीत असताना, किंवा ती अनिश्चितता हीच निश्चितता आहे की नाही हेही सध्या तरी कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. थोडक्यात भविष्य हे नेहमीच अनिश्चित असते आणि ते काटेकोरपणे घडेलच असे नाही.
कारण विज्ञानाचेच म्हणाल तर अनिश्चितता सूक्ष्म स्तरावर जशी लागू पडते तशीच ती वैश्विक स्तरावरही लागू पडते. भाकिते मर्यादित काळचौकटीच्या परिप्रेक्ष्यात सापेक्षतेने केली गेलेली असतात. पण सूक्ष्म स्तरावरच नव्हे तर व्यापक स्तरावरही अनिश्चितता हे तत्व अबाधित राहत असून विश्व हे एकच ठरलेल्या नियमांप्रमाणे चालते असे म्हणणे चुकीचे होऊन जाईल. मग माणसाचे काय?
विश्वाच्याच वर्तनाचे भाकीत जेंव्हा अशक्य आहे तेंव्हा जागतिक मानवी जीवनाचे भाकीत करता येईल असे म्हणणे चूक जरी असले तरी संभाव्यतेच्या नियमाप्रमाणे काही अंदाज बांधता येतात आणि संपूर्ण व्यवस्था मानवी हितासाठी विशिष्ट दिशेने नेण्यासाठी प्रयत्न करता येतातानी तशी दिशाही देता येऊ शकते. शेवटी आपण माणूस आहोत आणि आपले मानव म्हणूनचे जे स्वातंत्र्य आहे ते जतन करण्यासाठी आजच्या स्थितीत दडलेली विषारी पाळेमुळे उखडून टाकण्याचे प्रयत्न होऊ शकतात. विज्ञानालाही किती प्रगत होऊ द्यायचे याची सीमा आखून देता येऊ शकते.
आजच्या जगात विषमता पराकोटीची वाढलेली आहे. वंचित आणि शोषितांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडते आहे. अशात कृत्रिम बुद्धीमत्ता आणि रोबोटिक्स माणसाचे स्थान घेणार असतील तर जागतिक अर्थव्यवस्थाच कोलमडून पडेल. यातून अराजकाची भयंकर स्थिती उत्पन्न होईल आणि मनुष्य विरुद्ध कृत्रिम मनुष्य यात संघर्ष पेटेल. मक्तेदार कंपन्या स्वत:चा फायदाही सोडू शकणार नाहीत पण जर मनुष्याची खरेदी शक्तीच संपली तर ते उत्पादने कितीही श्रेष्ठ बनवली तरी विकणार कोणाला? म्हणजे ग्राहकच उरले नाहीत तर कोणत्याही कंपनीला फायदा होणार नाही. यातून जी आर्थिक आपत्ती कोसळेल त्यातून सरकारेही वाचणार नाहीत कारण शेवटी कर कोणाकडून घेणार? लोकांचे त्यासाठी उत्पन्न नको काय? उत्पन्नविरहित प्रजा झाली तर सरकारे आणि कॉर्पोरेटस क्षणभरही तग धरू शकणार नाहीत. त्यामुळे हा तंत्रद्न्यानाचा आधुनिक वारू अधिक उधळू देण्यात कोणाचेही अंतत: हित नाही हे कोणाही सुज्ञ माणसाच्या लक्षात येईल.
जीवनात अनिश्चितता आहे म्हणून माणसाने ईश्वर शोधला. वस्तुत: ईश्वर/देव/प्रेषित या साऱ्या भयभीत माणसाने निर्माण केलेल्या काल्पनिक गोष्टी आहेत हे आता सिद्ध झालेले आहे. तरीही अगणित लोक दैवी शक्तीवर विश्वास ठेवतात. पण या कथित दैवी शक्ती माणसाच्या कामी येत नाहीत हे वास्तव आहे. प्रत्येक मनुष्यच आपल्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाची दिशा ठरवू शकतो. अनिश्चिततेचे तत्व वैश्विक असल्यामुळे ते तत्व माणसालाही लागू पडते. अनिश्चिततेत निश्चितता कशी आणायची आणि त्यासाठी कोणते गुण अंगीकारायचे याबाबत प्राचीन काळापासून तत्वज्ञांनी पोटतिडिकेने सांगितले आहे पण बव्हंशी समाज आजतागायत त्यातून काही शिकलेला नाही. आज माणसाने स्वत: विचारच करू नये यासाठी साऱ्या यंत्रणा चारी बाजूनी प्रयत्नात आहेत. हे आपण समजावून घेण्याची वेळ आता तरी आलेली आहे. येथे विचार करणे थांबवून जर आपण आपल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेवरच अवलंबून राहत जाणार असू तर आपले भविष्यही कृत्रिम, तकलादू आणि कधीही कालांधारात विलीन होऊन जाणारे असेल याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही.
आजचे विज्ञान अतिप्रगत आहे पण ते “संवेदनशील ज्ञानी”नाही. त्याची एक महत्ता आहे हेही नाकारता येत नाही पण जेव्हा संपूर्ण मानवजातीचेच भविष्य डावाला लागलेले असते तेव्हा मात्र विज्ञान हे भस्मासुर होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. सध्या तरी आपण अशी काळजी घेत मनुष्याचे मनुष्यपण जपण्यासाठी काही ठोस पावले उचलत आहोत असे दिसत नाही. “सारे काही फायद्यासाठी” ही आपली जी जागतिक प्रवृत्ती बनली आहे तीच मुळात विघातक आहे. भौतिक फायदा की बौद्धिक/आत्मिक फायदा यात आपल्याला निवड करत एक संतुलन साधण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. ते जर केले नाही तर मनुष्याला कोणीही वाचवू शकणार नाही. म्हणजे मनुष्य असेल पण मनुष्यपण हरवलेला. तसे होऊ नये म्हणून जागृत होण्याची गरज आहे.
-संजय सोनवणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
अनिश्चिततेवर हेलकावणारे मानवी भविष्य!
पुढील काळात मानवाचे जीवन कसे असेल, कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्याचे मानवजातीवर होणारे संभाव्य परिणाम याची चर्चा आपण या लेखमालिकेत ...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...
No comments:
Post a Comment