हलकेच तोडत ते तारका गुच्छ
मी करीत आहे आभाळ जरासे रिक्त...
ठेवीन म्हणतो जपून काही पळ
तयांना माझ्या
ह्रुदयाच्या अंधारी
गोदामात
तसेही जगाचे
काय आहे त्यात जात?
मी घेतले आहे सुर्यालाही
झाडायाला
आणि आभाळ स्वच्छ
करायला
समुद्राला आत्म्याच्या चाळणीतून घालत
त्यालाही करतोय जरा शुद्ध
कोण म्हणतोय
मी नव्हतोच कधी प्रबुद्ध?
जरी आभाळ सारे रीते करून ठेवले
माझ्या हृदयातील अंधारी गोदामात
जे पहातच नाहीत कधी त्यांच्या
आंधळ्या दृष्टीला समजेल कसे
त्यांनी क्षणोक्षणी
गमावले काय?
सारे आभाळ मोकळे करून आणि
स्वच्छ झाडुनच मग मी
गोदामातील नक्षत्रगुच्छे आणि तारका
लावणार आहे जरा आभाळात माझ्या पद्धतीने
देतील प्रकाश त्या अशा...
आणि पुरता झाडुन काढलेला सूर्य
कि आंधळ्या पाहणा-यांना कळेल जरा
त्यांनी आजवर केला होता केवढा अनर्थ?
सध्या तरी आभाळाकडे पाहू नका...
विराट मोकळ्या वाटणा-या
सागराकडेही दुर्लक्ष करा...
माझी स्वच्छता मोहिम
पुरती होईपर्यंत!
......तसेही आंधळ्या बघणा-यांना
सागर आणि आकाश
कधी कळले होते तरी काय?