चीनने लदाखमधील भारतीय हद्दीत घुसखोरी करत चौकीही उभारली. इतकेच नव्हे तर त्यांच्या हेलिकोप्टर्सनी भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन करत पत्रके व खाद्यपदार्थांचा वर्षाव केला. आपले सेनाधिकारी चीनी सेनाधिका-यांसोबत वाटाघाटी करत आहेत...परंतु या वाटाघाटींची तिसरी फेरीही निर्णायक ठरलेली नाही. संसदेत गदारोळ झाला असला तरीही भारतातर्फे नेहमीप्रमाणेच ठोस भुमिका घेतली जात नाहीय. येथे प्रश्न कोंग्रेस अथवा गैरकोंग्रेस सरकारांचा नसून भारतीय मानसिकतेचा आहे. दोन हजार वर्षांपुर्वी कुशाण वंशीय कनिष्काने चीनवर हल्ला करून चीनवर विजय मिळवला होता व चीनी राजपुत्राला ओलीस म्हणुन तो राजपुत्र मरेपर्यंत काश्मिरात ठेवला होता. कुशाण वंश हा भारतीय नव्हता म्हणुणच कदाचित तो असले साहस करू शकला असावा.
चीनचे भारतीय सीमा उल्लंघायचे प्रयत्न आजचे नाहीत. १९६२ च्या युद्धात चीनने जवळपास ५० हजार चौरस किलोमीटरचा अक्साई चीनमधील प्रदेश व्यापला. भारताचा या युद्धात दारुण पराभव झाला. या पराभवानंतर संसदेने चीनने जिंकलेला इंच ना इंच प्रदेश परत मिळवु असा एकस्वरात ठराव पास केला होता. त्याचे विस्मरण झाले. फक्त चर्चांचा न संपणा-या फे-या सुरु राहिल्या.
अक्साई चीनच नव्हे तर चीनने अरुणाचल प्रदेश व अन्य पुर्वोत्तर राज्यांत घुसखो-या करण्याचे प्रयत्न सुरुच ठेवले आहेत. तेथील फुटीरतावाद्यांना चीनचे सक्रीय सहकार्य आहे हे जगजाहीर आहे. वीसेक वर्षांपुर्वी चीनने अरुणाचल प्रदेशातील आपल्या भागात हेलीप्यड बांधले तरीही भारत सरकारला त्याचा पत्ताच नव्हता. एका खासदाराने संसदेत हा गौप्यस्फोट केला तेंव्हा सरकारला जाग आली होती हे मला स्मरते.
१९६३ म्द्ध्ये पाकिस्तानने भारताचाच व्यापलेला काही भाग चीनला परस्पर देवून टकला. चीनने या भागातुन पाकिस्तानला जोडनारा रस्ताही बनवला. म्हणजे भविष्यात भारत-पाक युद्ध झाले तर चीनची कुमक तात्काळ या रस्त्याने पाकला मिळु शकते. भारताने याबाबत काय केले?
म्यकमोहन सीमारेषा चीनने आधीपासुनच नाकारली आहे. वास्तव हे आहे कि आजचा भारत हा ब्रिटिश इंडिया आहे. वांशिक-भाषिक असे कसलेही साम्य नसलेले प्रदेश आज भारतात आहेत ते इंग्रजांमुळे हे विसरता येत नाही. अखंड भारत अशी वल्गना आपण करत असतो तेंव्हा आपण ब्रिटिश भारताची अखंडित मागणी करत असतो. प्रत्यक्षात आम्ही स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाचे नागरिक म्हणुन सीमावर्ती राज्यांशी सांस्कृतीक नाळ जोडण्यासाठे कसलेही विशेष प्रयत्न केले नाहीत. लेह-लद्दखला आजकात पर्यटणासाठी भारतीय जावू लागले असले तरी आजही या भागात येणारे ७०% पर्यटक हे विदेशी असतात हे वास्तव लक्षात घ्यावे लागणार आहे. असो.
भारतीय सीमा हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. १९६२ नंतर नेहरू ते कृष्ण मेनन यांना पराभवाचे गुन्हेगार ठरवत चिखलफेक करणारे आजही कमी नाहीत. परंतू आपण हे विसरलो आहोत कि कोणाचेही सरकार असते तरी तो पराभव अटळ असाच होता. स्वातंत्र्य मिळुन उणेपुरी १५ वर्षही न झालेला बाल्यावस्थेतील देश चीनशी लढून जिंकणे अशक्यप्राय होते. त्यात कम्युनिस्टांनी घेतलेली राष्ट्रद्रोही भुमिका फारशा टीकेचे लक्ष कधी बनली नाही.
चीनचा साम्राज्यवाद अनेक घटनांमधून उफाळुन येत असतो हे आपण कोरीयाप्रकरणातही पाहू शकतो. भारताला सर्वकश युद्ध परवडणारे नाही आणि तशी मानसिक इच्छाशक्तीही नाही याची जाणीव चीनला चांगलीच आहे. ही इच्छाशक्ती फक्त सत्ताधा-यांची नव्हे तर आम्हा सर्वच भारतीय जनतेचीही नाही. चंगळवादाला सरावलेले आम्ही लोक फारतर गळे काढू शकतो...आणि त्यापार आम्ही कधी काय केले आहे?
मी चीनमद्धे २००२ साली गेलो होतो. गुंआंगडांगच्या विमानतळावरून सर्व चौकशा आणी कागदपत्रांची पुन्हा पुन्हा तपासणी करत सोडला गेलेलो मी शेवटचा प्रवासी होतो. भारतीयांबाबत चीनी लोकांना विशेष प्रेम नाही. डा. कोटनीस तेथे आजही आठवले जात असले तरी म्हणुन त्यांच्या भारताबाबतच्या जनभुमिकेत विशेष फरक पडलेला नाही. अपवाद आहेत...पण ते सौहार्दाच्या पातळीवर आलेले नाहीत.
कधी येणारही नाहीत.
चीनने नक्षलवाद्यांच्या माध्यमातून भारताशी अघोषित युद्ध सुरु करुन इतकी दशके उलटली तरीही आम्ही भारतीय पुरोगामी आणि विद्रोहाच्या नांवाखाली लक्षलवादाला समर्थन देतो यासारखा आमचा अक्षम्य अपराध नाही. नक्षलवाद्यांचा बिमोड लष्करी वापर केल्याखेरीज होणार नाही असे मी मागे एका लेखात लिहिले होते तर कम्युनिस्टांच्या बगलबच्चांना राग आला होता. नक्षलवाद आता आमच्या दारापर्यंत आलाय तरीही आम्ही जागे होत नाही. नक्षलवाद्यांना सहानुभुती म्हणजे चीनला पाठिंबा आहे हे आम्ही कधी लक्षात घेणार? कधी देशात आपक्ल्याच लोकांच्या माध्यमातुन घुसलेला शत्रू दूर हटवणार? कि येथे रस्त्या-रस्त्यांवर युद्ध होत नाही तोवर आम्ही नेहमीप्रमाणेच झापडे बांधून बसणार आहोत?
भारत सरकार त्याच्या पातळीवर जे करायचे ते करत राहील.... पण देशाचे नागरीक म्हणुन आम्ही या क्षणापासून चीनी वस्तु-उत्पादनांवर तात्काळ बहिष्कार घातला पाहिजे...मग त्या इलेक्ट्रोनिक वस्तू असोत कि अन्य काही. किमान आमचे राष्ट्रप्रेम..(जर असलेच तर...) प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले पाहिजे. नक्षलवादी विचारसरणीला समुळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी सक्रीय व्हायला हवेत.
नुसत्या वांझ निषेधांनी काहीएक भागणार नाही.
संजय सोनवणी
हाही लेख (पुर्वी वाचला असला तरी पुन्हा वाचावा!)
http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_4581.html
