Monday, May 6, 2013

ज्ञानाच्या भांडवलाची उभारणी का फसली?





मागील लेखात आपण भांडवलनिर्मितीत कसे अक्षम ठरलो आहोत यावर काही विचार केला होता. भांडवलनिर्मितीची सुरुवातच मुळात ज्ञाननिर्मितीतुन होत असते. किंबहुना ज्ञान हाच भांडवलाच्या निर्मितीचा मुलाधार असतो आणि आपले सध्याचे शिक्षण म्हनजे ज्ञान नव्हे हे आम्हाला आधी समजावून घ्यायला पाहिजे. किंबहुना आमची शिक्षणपद्धती हीच रोजगारनिर्मितीचे मुलभूत साधन मानली जात असल्याने ती भांडवल निर्माण करण्यात नव्हे तर एकुणातील राष्ट्रीय भांडवलाचे भक्षण करणारी पद्धत बनली आहे. आपली शिक्षणपद्धती एकार्थाने बेरोजगारांची संख्या वाढवण्याचे साधन बनली आहे हे आपण उपलब्ध नोक-या आणि नोक-या मागणा-यांची एकुणातील संख्या यातील पराकोटीचे व्यस्त प्रमाण पाहिले तर लक्षात येईल.

लोर्ड थोमस मेकाले हा भारतीय शिक्षण पद्धतीचा पाया घालणारा आद्य पुरुष. त्या शिक्षणपद्धतीत आता १८० वर्षांनंतरही बाह्यात्कारी काही बदल सोडले तर आम्ही काहीएक बदल केला नाही. आपल्या शिक्षणपद्धतीवर भाष्य करायचे असेल तर आधी आपल्याला मेकाले समजावून घ्यावा लागेल. मेकाले भारतात आला तो खरे तर इंडियन पिनल कोड लिहिण्यासाठी. (आजही ब-यापैकी प्रचलित असलेल्या इंडियन पिनल कोडचा तो शिल्पकार आहे.) तो भारतात आला जून १८३४ मद्ध्ये. त्याने २ फ़ेब्रुवारी १८३५ रोजी तत्कालीन गव्हर्नर जनरल लोर्ड विल्ल्यम बेंटिक यांना एक टिपण (Minutes)  सादर केले. हे टिपण म्हणजे भारताच्या शैक्षणिक पद्धतीचा पाया होय. खरे तर ईस्ट इंडिया कंपनीने डिसेंबर १८२३ पासुनच भारतात युरोपियन भाषा-शास्त्र आणि साहित्याचा प्रचार-प्रसार करणारी यंत्रणा बनवली होती तसेच संस्कृत, पर्शियन व अरेबिक महाविद्यालयांना अर्थिक मदत व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या द्यायला सुरुवात केलेली होती. जवळपास वार्षिक एक लक्ष रुपये कंपनी सरकार या भाषांवर खर्चत असे.

आता मेकाले आपल्या टिपणात काय म्हणतो ते आपण थोडक्यात समजावून घेवूयात. मेकाले म्हणतो संस्कृत, अरेबिक आणि पर्शियन भाषा या उपयुक्त ज्ञानाअभावी व्यर्थ आहेत. कंपनी सरकार दरवर्षी या भाषांतील पुस्तके छापण्यासाठी वीस हजार रुपये खर्च करते परंतु एक हजार रुपयांचीही पुस्तके विकली जात नाहीत, याचा अर्थ एतद्देशियांनाच त्या भाषांबद्दल आस्था अथवा ममत्व नाही. त्यामुळे या भाषांवर खर्च करणे हा न भरुण निघणारा तोटा (Dead Loss) आहे. संस्कृत, पर्शियन आणि अरेबिकमधील सारे ग्रंथ एकीकडे ठेवले आणि इंग्लंडमधील एका सामान्य ग्रंथालयातील पुस्तकांची जरी तुलना केली तर त्या ग्रंथालयाचेच पारडे वरचढ ठरेल. मिल्टनसारखा कवि, जोन लोकचे अधिभौतिकशास्त्र तर न्युटनचे भौतिकीशास्त्र याचा परिचय येथील लोकांना होणे आवश्यक आहे. मृत भाषांवर कंपनी सरकारने खर्च करू नये. येथील बोलीभाषा या साहित्यिक आणि वैज्ञानिक गुणांनी अत्यंत अपरिपक्व आहेत.

पुढे मेकाले म्हणतो, लोकांना ज्या भाषेतून शिकावे वाटते त्या भाषांत शिकवण्यासाठी आपण का खर्च करायचा? आणि त्याची आपल्याला उपयुक्तता काय? एतद्देशियांना इंग्रजीतच शिक्षण दिले गेले पाहिजे. तुलनेने कितीतरी पट बौद्धिक असलेल्या राज्यकर्त्यांनी आपल्या अदानी प्रजेला आपल्याच भाषेत शिक्षण द्यायला हवे. संस्कृत, पर्शियन अथवा अरेबिकमद्धे कसलेही आधुनिक ज्ञान नसून इंग्रजी हीच येथील ज्ञानभाषा व म्हणुनच संपर्कभाषा बनवली पाहिजे. संस्कृत महविद्यालयांतून शिक्षण घेणा-यांना आज रोजगार उपलब्ध होत नाही हे वास्तवही लक्षात घेतले पाहिजे. थोडक्यात जरी येथील माणसे रक्त व वर्णाने भारतीय असले तरी त्यांच्या अभिरुची इंग्रजी बनल्या पाहिजेत.

मेकालेच्या या टिपणातुन ठळकपणे दिसनारी बाब म्हनजे त्याला भारतियांचे सांस्कृतीक ख्रिस्तीकरण अथवा पाश्चात्त्यिकरण करायचे होते. भारतीय संस्कृतीत एक इंग्रजी उप-संस्कृती त्याला निर्माण करायची होती जी इंग्रजांना येथे प्रशासन चालवायला सोपी तर जाईलच परंतू प्रशासकीय पातळीवर नोकरांचीही उपलब्धता होईल. असे लोक बंड अथवा क्रांतीची भाषा करणार नाहीत असा त्याचा होरा होता.

पण  भारतीय शिक्षणाचे पाश्चात्यिकरण करावे हे मत मांडणारी पहिली व्यक्ती मेकाले नव्हे हेही येथे लक्षात घ्यायला हवे. राजा राममोहन राय यांनी मेकालेपुर्वी दहा वर्ष आधीच, म्हणजे ११ डिसेंबर १८२३ रोजी, इंग्रज सरकारला निवेदन पाठवून भारतात सर्वच संस्कृत, अरबी व पर्शियन विद्यालये बंद करून सरसकट इंग्रजी शिक्षण सुरू करावे अशी मागणी केली होती. मेकालेने त्यांच्या मागणीचा अधिक विस्तार केला एवढेच फार तर म्हणता येईल.

मेकालेला खंदा विरोधक भेटला तो जगप्रसिद्ध भाषाविद प्रिंसेपच्या रुपाने. प्रिंसेप यांनी मेकालेच्या धोरणाला कडाडुन विरोध केला. त्यांनी कोणतीही भाषा थोपणे अयोग्य व अनैतीक असल्याचे मत व्यक्त करत बोलीभाषा (मातृभाषा) याच शिक्षनाचे माध्यम बनायला हव्यात आणि त्यातुन उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जावू शकते असे नमूद केले. इंग्रजी ही स्वैच्छिक भाषा असावी. बोली भाषांना महत्व मिळाले तर संस्कृत-पर्शियन इ. भाषा आपोआप मागे पडतील असेही प्रिंसेप यांनी आपल्या निवेदनात आवर्जून नमूद केले.

लोर्ड बेंटिंक यांनी किरकोळ बदल करून मार्च ३५ मद्धेच अध्यादेश काढून नवीन शिक्षणपद्धतीचा एल्गार केला. या अध्यादेशानुसार जरी संस्कृत, पर्शियन व अरेबिक महाविद्यालये बंद करण्यात आली नसली तरी त्यांना वित्तदान व शिष्यवृत्त्या बंद केल्या. प्रिंसेपचा मतांचा आदर ठेवत बोलीभाषांना शिक्षणात स्थान देण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतांनाच इंग्रजी ही मात्र सर्वेसर्वा भाषा बनवण्यात आली. संस्कृत-पर्शियनला डच्चू मिळला यात खेद वाटुन घेण्याचे कारण नाही कारण त्यातून मिळणारे तथाकथित ज्ञान हे धार्मिकच अधिक तर जेही काही अन्य ज्ञान होते ते कधीच कालबाह्य झालेले होते. बोलीभाषांना महत्व दिले गेले हे प्रिंसेप यांचे श्रेय आहे हे आवर्जून नमूद केलेच पाहिजे.

यातून जी शिक्षणव्यवस्था आकाराला आली ती साम्राज्यवादी धोरणाला पुरक असल्याने शिक्षणाचे मुलभूत तत्वज्ञान विसरले गेले. किंबहुना त्यावर फारसा विचार करण्याची गरजच कोनाला वाटली नाही. परंतू महात्मा गांधींनी मात्रुभाषेतील शिक्षण हेच सर्वोपरी आहे व पारंपारिक शिक्षणपद्धतीनुसारच मुलांना शिक्षण द्यायला हवे याचा आग्रह धरला. याला गुरुकुल पद्धती न म्हणता "ग्राम-गुरुकुल" पद्धती असे म्हणता येईल. म्हणजे शिक्षक एकच असेल...वरच्या यत्तांत जातील त्या विद्यार्थ्यांनी खालच्या यत्तांतील विद्यार्थ्यांनाही शिकवावे अशी ही पद्धत. म्हणजे विद्यार्थी हाच शिक्षकही बनवणारी ही पद्धत. आधुनिक भारतात यावर फारशी चर्चा नंतर कधी झाली नाही. पण आपंण पुढे अनेक शिक्षण-विचारांसोबत महात्माजींच्याही सिद्धांताचा विचार करुयात.

स्वातंत्र्यानंतर इंग्रजी आपोआप मागे पडेल असा महात्मा गांधींचा व कोंग्रेसचाही होरा होता. पण ते खोटे ठरले. भारतात इंग्रजी येणारे आणि न येणारे असे दोन देश निर्माण झाले असे शिक्षणतज्ञ डा. व्ही. के. माहेश्वरी म्हणतात ते खरेच आहे. इंग्रजी येणारे उच्चभ्रु तर न येणारे दुय्यम अशी सामाजिक विभागणी आपसूक झाली व त्यातून एक हीनगंड असणारा मोठा समाज तयार झाला. खरे तर भाषेला ज्ञानाशी जोडणे ही एक मोठी चूक होती. भाषा हे एक साधन आहे. तिलाच ज्ञानभाषेत परिवर्तीत करता येते याची जगभर अनेक उदाहरणे आहेत. आपण तशी इच्च्छाशक्ती कधी दर्शवली नाही. मेकालेप्रणित शिक्षणपद्धतीमुळे भारतीय मानसिकतेवर इंग्रजीचे गारूड बसले ते बसले. इंग्रजी शिकू नये असे मला म्हणायचे नाही, पण तिला अपरिहार्य व सर्वोपरी मानणे ही एक चुक झाली हे आतातरी समजावून घ्यावे लागणार आहे.

आजही मातृभाषेत शिक्षण असावे कि नसावे यावर वादविवाद होत असतात. माझ्या मते या वादांत शिक्षणाचे तत्वज्ञान मात्र हरपले आहे. नोक-यांसाठी शिक्षण कि ज्ञानासाठी शिक्षण यावर खरे वाद व्हायला हवे होते. माहिती असने म्हणजे ज्ञान नसते. परंतू आपण माहितीलाच ज्ञान म्हनायची सवय लावली आहे. आपल्या शिक्षणपद्धतीत गुणाधारीत मुल्यांकण पद्धत असल्याने घोकंपट्टीला अवास्तव महत्व आले आहे. स्मरणशक्ती उत्तम असनारे आपल्या शिक्षणपद्धतीत सहज बाजी मारून जातात. ज्या समाजघटकांना परंपरागत पाठांतरांची परंपरा आहे ते समाजघटक या शिक्षणपद्धतीत व्यवस्थित तरुन जात असले तरी त्यामुळेच अगणित विद्यार्थी या स्पर्धेत टिकाव धरत नाहीत. प्राथमिक शिक्षणातुनच गळती होणा-यांचे संख्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे हे वास्तव काय दर्शवते?

आपल्याला आपल्या शिक्षणपद्धतीबद्दलच मुळापासून आता विचार करावा लागणार आहे. ज्ञान हेच खरे भांडवल असते व तेच भांडवल उभारण्यात आम्ही कमी पडत असू तर आमचा देश महासत्ता होण्याचे दिवास्वप्न कधीही पाहू शकत नाही. मेकालेने प्रचलित केलेली शिक्षणपद्धती आणि तिचे तत्वज्ञान जर आमच्या हाडी-माशी आजही रुजलेले असेल तर ती आपल्याला गुलामी मानसिकतेतून बाहेर काढू शकत नाही. तिचा मुलात तसा उद्धेशही नव्हता. भारतीय सांस्कृतिकतेचे कंबरडे मोडत साम्राज्यशाहीला सुसंगत अशी नवसंस्कृती रुजवणे हा तिचा उद्देश्य होता आणि त्यात मेकाले यशस्वी झाला एवढेच म्हणता येईल. प्रिंसेप यांची तगमग आम्ही समजावून घेतली नाही हीसुद्धा एक दुर्दैवी बाब आहे.


(क्रमश:)
Visit this link also...
http://sanjaysonawani.blogspot.in/2013/04/blog-post_30.html

अनिश्चिततेवर हेलकावणारे मानवी भविष्य!

पुढील काळात मानवाचे जीवन कसे असेल, कोणते नवे शोध लागू शकतील आणि त्याचे मानवजातीवर होणारे संभाव्य परिणाम याची चर्चा आपण या लेखमालिकेत ...