भारतीय संस्क्रुती ही विश्वातील एक अतिप्राचीन आणि कालौघातील बदल पचवत आजही टिकुन राहिलेली संस्क्रुती आहे. त्याबाबत यथोचित अभिमान बाळगणे योग्यही आहे. परंतु अनेकदा अन्य प्राचीन जागतीक संस्क्रुत्यांबद्दल आपण उदासीन असतो. मग ती सुमेरियन, अक्काडियन, इजिप्शियन माया-इंकादि संस्क्रुती असो कि अगदी अरबी आणि ग्रीक संस्क्रुती असो. मराठीत कोशवाद्मय विपुल असले तरी त्याने अन्य संस्क्रुत्यांबद्दल आपल्याला त्यांनी अनभिद्न्यच ठेवले आहे असे म्हणावे लागते. परंतु हिंदीत कमल नसीम यांनी "ग्रीस पुराण कथा-कोश" लिहून एक अमुल्य कामगिरी केलेली आहे.
ग्रीक संस्क्रुतीशी भारताचा पुरातन काळापासुन व्यापारानिमित्त संबंध आला आहे...इतका कि ग्रीक भाषेत अनेक भारतीय शब्द सापडतात. इतकेच नव्हे तर ग्रीकांचा मुख्य देव झेउस आणि आपल्या ईंद्रात कमालीचे साधर्म्य आहे. झेउसचे वज्र, चिलखत, त्याचे देवतामंडळासह ओलिंपस पर्वतावर राहणे, मानवी जीवनात अकारण (?) हस्तक्षेप करणे...मानवी भाव-भावना बाळगणे ई. साम्ये चकित करणारी आहेत. असे असले तरी स्वत: खास ग्रीक संस्क्रुतीचे अवगुंठण त्यावर आहेच. म्हणजे झेउस हा पित्याची हत्या करुन देवसम्राट बनलेला आहे तर त्याची सहोदर भगिनी हेरा ही त्याची पत्नी आहे. याच प्रकारे अन्य अनेक ग्रीक दैवतांशी भारतीय दैवतांशी साम्य-विभेद या कोशात सापडतात.
मला हा कोश आवडण्याचे कारण तो मुळात रुढार्थाने कोश नाही. कोशात एरवी अकारविल्हेप्रमाणे नोंदींची सोय लावली जाते असला प्रकार यात नाही. कोशवाद्मयात एरवी असणारा कोरडेपणा तर मुळीच नाही. ग्रीक महाकाव्ये वा नाट्यांत असनारी अत्यंत जीवंत काव्यमय आणि खुद्द हिंदी भाषेलाही नवे आयाम देणा-या भाषेत पुरातन ग्रीक पुरा-कथांपासुन सुरुवात करत एकेक दैवी व मानवी व्यक्तित्व जीवंत करणारी अद्भुत शैली कमल नसीम यांना साधली आहे. "कोश असाही असु शकतो..." ही नवीच द्रुष्टी हा कोश देतो आणि हे त्याचे अनुपम वैशिष्ट्य आहे.
पुरातन मानवी निर्मल मनाचा आरसा म्हनजे त्या-त्या संस्क्रुतीतील पुराणकथा होत असे नमुद करत कमल नसीम या कोशाची सुरुवात करतात. आणि ते किती खरे आहे हे येथे वेगळे सांगण्याची गरज नाही. स्रुष्टीच्या आरंभाबाबतच्या ग्रीक संकल्पनांपासुन हा कोश सुरु होतो ते पुरातन देवता, त्यांच्याशी निगडीत कथा, आख्याने, महाकाव्ये, प्रेमकथा ते ग्रीक वीर नायकांचा सर्वकश आढावा घेत हा कोश संपन्न होतो. संपुर्ण ग्रीसचा भुगोल या पुराकथांत कसा सामाविष्ट केला गेलेला आहे हे पाहुन आपण विस्मित होतो. या कोशात टेंटेलास, थेसटीज, ईडिपस, एपिगनी, पुराणप्रसिद्ध राजा मिडास, ओडिसियस अगममेनन यांच्या धीरोदात शोकांतिकाही येतात. ग्रीक मन हे प्राय: नियतीवादी होते. आपल्या श्रेष्ठ साहित्त्यिक जी.एं. वर या ग्रीक नियतीवादाचा अद्भुत पगडा होता. प्रस्तुत कोशलेखकाने प्रत्येक कथा देतांना वा व्यक्तिमत्वे चितारतांना पिंडार, होमर, इस्खिलुस, हीसियड, ओविड, रोडस, ल्युसियन आदि असंख्य ग्रीक कवी, लोककवी, नाटककार यांच्या द्रुष्टीकोनातले फरकही अत्यंत समर्पकतेने दाखवलेले आहेत.
कोशकार हा नुसता कोरडा विद्वान नसतो. तो स्वत: एक तत्वचिंतकही कसा असतो हे पहायचे असेल तर हा कोश वाचायलाच हवा. जागतीक पुराकथातद्न्यांनी पुराकथांचा उगम कसा होतो यावरील विविध मतांचा वेध घेत मानवी आदिम प्रेरणांचे स्रुष्ट-दुष्ट भावनांचे कथात्मक/काव्यात्मक प्रकटीकरण म्हणजे पुराकथा होत या मुलभुत सिद्धांताला या कोशात सबळ केले आहे, हे या कोशाचे अधिक एक वैशिष्ट्य होय. मराठी कोश हे प्राय: माहितीपर व रुक्ष असतात, त्यामुळे अनेकदा वाचक त्याकडे वळतही नाही. ही अभिनव कोशशैली मराठीत येणे मला गरजेचे वाटते.
पुराकथा ही आपल्या पुर्वजांची एक अनमोल ठेव आहे याची जाणीव करुन देत जर आपल्याला वैश्विक मानव व्हायचे असेल तर जागतीक पुराकथा कशा आणि का अभ्यासाव्यात याचा नवा द्रुष्टीकोन हा कोश देतो. ग्रीक संस्क्रुतीची आजही पाश्चात्य साहित्य-कलांवर व अगदी तत्वद्न्यान-विद्न्यानावरही अमिट छाप आहे. आपण भारतीयही कळत-नकळत ग्रीकांच्या मोहपाशात असतोच. त्याचे मुळ समजावून घ्यायचे असेल तर हा, कोश नव्हे, एका पुरातन अद्भुत दैवी व मानवी विश्वाची खरी ओळख करुन देणारा ग्रंथ वाचायलाच हवा. या ग्रंथाची भाषा हिंदी आहे...पण ती एवढी काव्यमय आहे कि कोणालाही सहज समजेल.
ग्रीस पुराण कथा कोश
ले. कमल नसीम
प्रकाशक: अक्षर प्रकाशन प्रा. लि., नवी दिल्ली (१९८३)
राजकमल प्रकाशन प्रा. लि., नवी दिल्ली (आव्रुती २००८)
प्रुष्ठसंख्या ५२३. मुल्य: रु. २५०/-