जीवन खूप सुंदर आहे. ते खूप सोपे, सहज आणि सहनशीलतेत औदार्याची भावना बाळगत सृजनशीलही आहे. ते तसेच प्रतिक्रियावादीही आहे. म्हणजे त्यावर आघात झाला तर प्रतिक्षिप्त प्रतिक्रियेप्रमाणे तेही प्रत्युत्तरासाठी उभे ठाकते...पण तेवढ्यापुरतेच. पुन्हा जीवन जीवनात रममाण होते...
मी जीवनावर अनिवार प्रेम करतो. किंबहुना जीवन हाच धर्म, जीवन हाच श्वास आणि जीवन हेच मृत्यू म्हणावे एवढा जीवनाचा महिमा आहे.
आम्ही लहाणपणी वरुडे गांवात असता आंबे खाण्याच्या श्रीमंतीचे नव्हतो. उकिरड्यावर श्रावणसरींत कोंभावलेल्या लागलेल्या आंब्याच्या कोयांना जमा करत आम्ही त्याच्या शिट्ट्या बनवायचो. पण कधी कधी त्या कोयांतून ताम्र-पालवी वर आलेली दिसायची...आम्ही हरखून जायचो...उकिरड्यातून उचलून विनम्रपने आणि बालसूलभ आनंदाने नवीन ओलसर खड्डा खोदून त्यांची नवजीवनप्रक्रिया सुरुही ठेवायचो. रोज किती वाढतो हे तासंतास जाऊन बघायचो. आंबे खाण्याचा आनंद आम्हाला तेंव्हा मिळाला नसेल...पण लोकांनी खाल्लेल्या आंब्यांच्या कोयांना आम्ही स्वरांतून म्हणा कि पालवीस्वरांतून म्हणा... जीवनाच्या धाग्याशी जोडत राहिलो हे खरेच आहे.
पावसाळा मला खूप आवडतो. किंबहुना सृजनाचा हा महाऊत्सव असतो. कधी कधी तो आम्हाला हुलकावणी देत आमच्या अजरामर आशांना वांझही ठरवतो, रडवतो हेही खरे आहे. पण तो कधी येणारच नसतो असे नाही. तो येतोच. रित्या झोळी भरभरून भरतो...इतका चिंबवतो...इतका कि आम्हीच पावसाळा बनून जातो...
मी पावसाळ्यावर जेवढे प्रेम करतो तितकेच जीवनावरही प्रेम करतो. किंबहुना पावसाळा मला जीवनाचे एक अजरामर प्रतीक वाटते.
जीवन हे निरामय, निर्विकल्प आणि भावरहित असते तसाच हा पाऊस...आपल्या कोठे आणि कधी कोसळण्याने काय होणार याची पर्वा न करता वाटेल तेंव्हा आणि वाटेल तेथे कोसळनारा...आपण कोसळतो जेथे काटे उगवणार कि खडकांवर शेवाळ साचणार कि जीवनाचे मळे फुलणार...कि जीवच घेतले जाणार...कसलीही पर्वा न करणारा हा निर्विकारतेत सनातन सौंदर्य बाळगणारा पाऊस...
जीवनही तसेच...ते येते सर्वांत अत्यंत बेपर्वाईने...ते प्रियच असेल हे जसे तुला माहित नाही कि मला...तसेच ते त्यालाही माहित नाही...ते अप्रियही असू शकते...जगणा-यांना जीवन समजत नाही म्हणुन ते जीवनात जीवन जगत नाहीत एवढेच. प्रिय आणि अप्रिय हा असतो भावनिक खेळ हे समजत नाही...
म्हणुन जीवन उमगत नाही.
माझे जीवनावर अपरंपार प्रेम आहे
जसे पावसाळ्यावर
जसा पाऊस असतो कधी स्नेहमय...कधी क्रूर तर कधी फक्त वाट पहायला लावनारा...
जीवनही तसेच...
हवे वाटते तेंव्हा ते असतेच असे नाही...
असते तेंव्हा त्याचे मोल समजतेच असे नाही
ते जाते तेंव्हा हव्यासाचा आक्रोश ते ऐकतेच असेही नाही...
आम्हाला पाऊस हवा असतो तसेच जीवनही...
पण भरभरून पाऊस आला तरी आम्ही जसे बावरतो..."नको नको रे पावसा" अशा आळवण्याही करतो...कारण ओसंडुन येणा-या आभाळातला आत्मा आणि संदेश आम्हाला समजलेला नसतो...
तसेच जीवनही जेंव्हा अनिवार ओसंडून येते...
त्या जीवनालाही नाकारत जाणारे आम्हीच असतो...आम्हाला जीवन हवे असते पण आम्हाला हवे तसे...पण जीवन फक्त जीवन असते तुमच्या नि माझ्या भावनांपलीकडचे...
ते जसे आहे तसे झेलण्यात...स्वीकारण्यात आणि मनसोक्त जगण्यात जीवनाचा अननुभूत आनंद भरलेला आहे.
पाऊस असण्यात जेवढा पावसाळा आहे...तेवढाच पावसाळा पाऊस नसण्यात आहे...
जेवढे जीवन जगण्यात आहे तेवढेच जीवन मरणात आहे...
माझ्या आत्मनांनो...पावसाळा फक्त चिंब-भिजल्या मनांत असतो
जीवन फक्त मनसोक्त जगण्यात असते...
जगण्याची ही मोहक वाटचाल
अनादि आणि अजरामर...
मनसोक्त जगुयात...