
घग्गर-हक्रा म्हणजे सरस्वती नदी?
जरथुष्ट्राच्या काळाबाबत आपण मागील लेखात चर्चा केली असून ऋग्वेदातील त्याच्या उल्लेखांबाबतही पाहिले आहे. येथे आपल्याला वैदिक धर्म आणि झोरोस्ट्रियन धर्म यांचाही तुलनात्मक अभ्यास कर्मकांड आणि भाषिक अंगाने करायचा आहे. जरथुष्ट्राचा "अहूर" (असूर) धर्माचा जन्म होण्यापुर्वी इराणमद्धे "देव" नामक बहुदैवतीय धर्म अस्तित्वात होता व त्याची प्रतिक्रिया म्हणुन जरथुष्ट्राने अहूर धर्म प्रचलित केला हे मत चुकीचे असल्याचे डा. सुभाष काक सिद्ध करतात. काक पुढे म्हणतात कि "दएवा" (दैवा) आणि वैदिक "देव" यात गफलत केली जाते. प्रत्यक्षात देव, असूर आणि दैवा (वा दएवा) या तीन विभिन्न बाबी आहेत. त्यासाठी ते काश्मिरी परंपरा आधाराला घेतात. (काश्मिरी परंपरागत लोककथांत देव, दैव आणि असूर असे त्रैत आहे) या बाबी कोणत्याही परिप्रेक्षातुन पाहिल्या तरी इराणी आणि वैदिक परंपरांत संकल्पनात्मक विरोधाभास असला तरी भाषिक दृष्ट्या साम्ये गोंधळ निर्माण करनारी आहेत हे उघड आहे.
डा. काक येथे हे विसरत आहेत कि मुळात वैदिक धर्मही अहुर (असूर) परंपरेचा होता. ऋग्वेदाच्या प्राचीन मानल्या जाणा-या भागांत "असूर" हे संबोधन वारंवार वरुण, इंद्र, अग्नी इ. देवतांना आदरार्थी वापरले गेले आहे. त्यामुळे देव विरुद्ध असूर ही संकल्पनाच जरथुष्ट्राच्या अथवा वैदिकांच्या मुळ धर्मसंकल्पनांच्या विरोधात जाते. जरथुष्ट्राला ज्याप्रमाने असूर (अहूर) हे श्रेष्ठ तत्व वाटत होते तसेच वैदिकांनाही वाटत होते हे उघड आहे. इराण (विशेषत: ब्यक्ट्रिया) भारतीय भुभागाला लागून असल्याने स चा ह, ग चा क असे उच्चारण बदलत होते हे स्पष्ट होत असले तरी भाषिक अंगाला फारसा बाध लागत नव्हता. पण देव, असूर, दएवा (अथवा दैवा) या मुलभुत संकल्पनांतील अर्थबदल मात्र विस्मयकारक आहे.
उदा. देव हा अहूर धर्म अस्तित्वात येण्यापुर्वी अस्तित्वात होता तर इरानलगतच्या वैदिक रहिवाश्यांनी असूर धर्म सोडून देव धर्म कसा स्वीकारला याचे उत्तर यातून मिळत नाही. आणि येथील रहिवाश्यांनी जर आपल्याच दैवतांना असूर हे विशेषण आदरार्थी सुरुवातीला का होईना का वापरले याचेही उत्तर यातून मिळत नाही. यापेक्षा सर्वात महत्वाची बाब अशी कि "देव" हा शब्द संपुर्ण ऋग्वेदात अल्पांशाने येतो पण ब्राह्मण ग्रंथांत मात्र तो विशेषत्वाने येतो. ऋग्वैदिक इंद्रादि देवता आराध्य, स्तोतारं असल्या तरे ते देव आहेत असे आविर्भाव आढळत नाहीत.
झोरोस्ट्रियन धर्मातील श्रेष्ठ देवता म्हणजे "अहूर माझ्दा". माझ्दा हा शब्द "मेधा" (बुद्धी) याशी निकटचा आहे असे मानले जाते. हे तात्पुरते खरे मानले तर "असूर बुद्धी" असे त्याचे शब्दश: भाषांतर होईल. तो निर्मिक आहे, अदृष्य आणि पवित्र आहे अशी त्या धर्माची (जरथुष्ट्राची) श्रद्धा आहे. (यष्ट-१). ऋग्वैदिक "पुरुष" या संकल्पनेशी ही असूर् बुद्धी संकल्पना मेळ खाते असे डा. काक सिद्ध करतात. पण पुरूष हा शब्द झोरोस्ट्रयिन साहित्यात कोठेच येत नाहीत. किंबहुना पुरुषाने विश्व निर्माण केले नसून पुरुषाच्या आद्य बळीतून विश्व (व वर्णव्यवस्थेचीही) निर्मिती झाली असे ऋग्वैदिक सिद्धांतन मानते. हा तात्विक विभेद नीट अभ्यासला व समजावून घेतला जायला हवा.
ऋग्वैदिक यज्ञ आणी झोरोष्ट्रियन यस्न यात साधर्म्य फक्त अग्नीकांडाचे आहे. जरथुष्ट्राच्या यस्नात (?) अहोम (सोम) व अन्नधान्य चालते...वैदिक यज्ञाप्रमाणे पशुबळी नाही हा विभेद आहे.
येथे "हरहवती" आणी वैदिकांची "सरस्वती" याचाही विचार महत्वाचा आहे. सध्याची घग्गर-हक्रा नदी म्हणजेच पुरातन सरस्वती नदी असे म्हणण्याचा प्रघात आला आहे. जरथुष्ट्राच्या गाथा "हप्त हिंदु" असा उल्लेख करतात हे खरे आहे, पण हरवहती नदी मात्र स्वतंत्र इराणी नदी आहे. सप्तसिंधुंतील महत्वाच्या एकाही नदीचे नांव (अगदी ऋग्वेदापासून) आजतागायत जर बदललेले नाही तर सरस्वती नदीचे नांव घग्गर-हक्रा कसे झाले? कारण ती तर त्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाची नदी (अगदी आजही...सरस्वती वंदनांची सक्ती उगा होते कि काय?) उलट हरवहती (अथवा हरक्स्वैती... आजची हेल्मंड ) नदी ऋग्वैदिक सरस्वती नदीशी संबब्ध असू शकते कारण सरस्वती नदीबाबत जी वर्णने ऋग्वेदात सापडतात तशीच ती झोरोस्तरीयन गाथांतही "हरह्वती" बद्दल सापडतात. त्यांतील साम्ये पाहता घग्गर-हक्रा म्हणजे सरस्वती नदी ही संकल्पना टिकत नाही. उलट गंगा-यमुना-सरस्वती (ज्यात सरस्वती अदृष्य मानली जाते) याचा वेगळा सांस्कृतिक व ऐतिहासिक अर्थ शोधावा लागेल.
या लेखापुरता पहायचा तर अहूर आणि असूर याचा मुख्य विचार करायला हवा कारण जरथुष्ट्राचा धर्म आणि मुळचा वैदिकांचा धर्म यांत तात्विक भेद नव्हता हे स्पष्ट आहे कारण दोहोंनी असूर तत्वाला प्राधान्य दिलेले दिसते. देव ही धर्मकल्पना प्रारंभीची नसून वैदिक व उत्तरकालीन आहे हेही या दोन्ही धर्मांच्या तुलनेतून लक्षात येते. म्हणजेच झोरोस्ट्रयिन धर्माची पुढची विभेदात्मक अवस्था म्हणजे ऋग्वैदिक धर्म होय असे उपलब्ध पुराव्यांनुसार म्हनावे लागते. याचाच अर्थ असा कि ऋग्वैदिक धर्म हा झोरोस्ट्रीयन धर्माच्या समांतर चालत उत्तरकालीन प्रागतिकतेत पोहोचला. सरस्वती म्हणजे घग्गर हक्रा सिद्ध होत नसेल तर या धर्माचा जन्मही भारतीय सीमांच्या आसपास झाला असला तरी म्हणुन त्याला संपुर्ण भारतीय धर्म म्हणता येत नाही.