Friday, August 16, 2013

"संत ज्ञानेश्वर पुरस्कार" देण्याची गोष्ट!



 १९९६-९७ ची गोष्ट असेल. त्या वर्षी कविवर्य विंदा करंदीकरांना बहुदा मध्य प्रदेश सरकारचा पुरस्कार मिळाला होता. आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातर्फे परभाषिक साहित्यिक-कवींना कसलाही पुरस्कार दिला जात नाही अशी खंत व्यक्त केली होती. वृत्तपत्रांतून ती वाचून तात्काळ माझ्या मनात कल्पना आली कि आपणच तशी सुरुवात का करु नये? मी माझ्या मित्रांना निमंत्रीत केले व संत ज्ञानेश्वरांच्या नांवाने परभाषिक एका साहित्यिकाला रु. एक लाख व सन्मानचिन्ह असा पुरस्कार द्यायचे ठरवले. एवढेच नव्हे तर साताठ दिवसांत संत ज्ञानेश्वर प्रतिष्ठानाचीही स्थापना केली. दरम्यान ही बातमी सर्व वृत्तपत्रांनी व दूरदर्शननेही उचलली. विंदांचा माझा कसलाही परिचय नव्हता. त्यांनी कोठूनतरी माझ्या कार्यालयाचा पत्ता शोधून माझे पत्र पाठवून अभिनंदनही केले व यामुळे आपली खंत दूर होणार असल्याचेही आवर्जून नमूद केले.  यामुळे महाराष्ट्राबद्दलची आत्मियता अन्य भाषिक जनतेत वाढेल असेही त्यांनी नमूद केले ते अर्थातच आम्हाला मान्य होते.

आम्ही विश्वस्तांनी ठरवले कि सर्वप्रथम महाराष्ट्राच्या सीमांना लागून असलेल्या राज्यांतील लेखकांपासून सुरुवात करुयात. कन्नड साहित्यिकापासून सुरुवात करायचेही ठरवले. आता निवडप्रक्रियेचे काय? मी चार गट करायचे ठरवले...वाचक, लेखक (जो स्वत:ला नामांकित करणार नाही) समिक्षक व साहित्य संस्था. प्रत्येक गटाच्या मतांना चढत्या क्रमाने वजन द्यायचे ठरवले. याच काळात श्री. हेगडे म्हणुन बालभारतीत कन्नड विभाग सांभाळणारे सद्गृहस्थ होते. पहिला ज्ञानेश्वर सन्मान कन्नडला दिला जाणार यामुळे ते हरखून गेले होते. त्यांनी आमच्या निवेदनांना कन्नडमद्धे अनुवादित करुन दिले. आम्ही ते कर्नाटकातील सर्व वृत्तपत्रे, साहित्यसंस्था व ज्यांचे पत्ते मिळाले त्या लेखकांना पाठवले. ती व्यापकपणे प्रसिद्धही झाली. तशीच ही बातमी इकडे मराठीतही प्रसिद्ध झाली. आणि खरा खेळखंडोबा येथून सुरू झाला.

मान्यवर मराठी साहित्यिकांनी मला प्रत्यक्ष भेटुन वा फोन करून या योजनेला तीव्र नापसंती दाखवली. त्यांचे म्हणणे होते कि...१) कन्नड भाषाच कशी निवडली? ही बनचुकवेगिरी (होय हाच शब्द) झाली. सर्व भारतीय भषा विचारात घेऊन प्रत्येक भाषेतील तज्ञांच्या समित्या बनवायला हव्यात व त्यांच्या शिफारशी मागायला हव्यात...३) या शिफारशींवर विचार करून अंतिम निवड करणारी एक सर्वोच्च समिती हवी. या समितीच्या शिफारशीनंतरच पुरस्कार घोषित व्हावा!

येथे एक लक्षात घ्या...मी काही टाटा-बिर्ला नव्हतो. त्यांच्या पद्धतीने किमान २५ भाषा जरी विचारात घेतल्या तर त्यांच्या समित्यांचा शिफारशी करेपर्यंतचा खर्चच कोटभर रुपये होत होता. फुकटात कोणी काम करणार नव्हते. एक लाखाच्या पुरस्कारासाठी कोटभर खर्च करुन शेवटी मला जे साध्य करायचे होते तेच साध्य होनार होते कारण अखेरीस पुरस्कार कोणत्यातरी एका भाषेतील लेखकाकडेच जाणार होता. आणी पुरस्कारकर्ता ठरअणे ते पुरस्कार वितरण यांत या पद्धतीने होऊ शकनारा प्रतिवर्षी दीड कोटी रुपयांचा खर्च माझ्या सर्वस्वी आवाक्याबाहेरचा होता. हे लक्षात न घेता परंतू या लोकांनी विंदांचेही कान भरले. त्यांचे मला एक पोस्टकार्ड आले...(आधी आंतरदेशीय पत्र आले होते) त्यांनीही आधी एक भाषा ठरवून त्या भाषेतील लेखकाला पुरस्कार देण्याची योजना नाकारली. मला वाइट वाटले. पण तोवर कर्नातकातून अक्षरश: हजारो शिफारस करनारी पत्रे येऊन पडू लागली होती. कन्नड भाषा येणा-यांना कामावर ठेवावे लागले...प्रत्येक पत्रातील मत नोंदवण्यासाठी. अनेक पत्रे तर दिवंगत लेखक-महाकविंच्या शिफारशी करणारीही होती. हेच काम सुमारे दोन-तीन महिने चालले.

मी दुस-यांचे ऐकण्याच्या बाबतीत जरा बहिरा आहे. मी ठरवलेल्या पद्धतीनेच काम करत आलो आहे व त्याचे खूप फटकेही खाल्ले आहेत. आम्ही नि:ष्कर्षापर्यंत अद्याप पोहोचायचो होतो कि पुरस्कार कोनाला जानार...तोवर एक महान साहित्त्यिक नवी योजना घेऊन काही लेखकांसहित आले. मला म्हणाले..."संजय, पुरस्कार कोणाला द्यायचा ही तू ठरवलेली पद्धत अत्यंत चुकीची आहे. वाचक-लेखकांचा काय संबंध...संबम्धित विषयांच्या तज्ञांना ठरवू देत कि!" यावर मी म्हणालो कोण तज्ञ याचे निकष काय? मी कन्नडमधील एकाही लेखकाला अथवा समिक्षकाला ओळखत नाही. वाचकमताला, समिक्षकमताला आम्ही द्यायचे तेवढे वजन देतच आहोत...पण सर्वांची मते विचारात घेतल्याखेरीज कोणी पुरस्कार देण्यात काय अर्थ?" त्यावर भरपूर मनस्तापकारी चर्चा झाली. त्यांनी मग अचानक प्रस्ताव ठेवला...म्हनाले..."तू पाच लाख रुपये दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे जमा कर अथवा तेवढे व्याज येईल एवढी ठेव ब्यंकेत जमा कर. कोंणाला पुरस्कार द्यायचा हे महामंडळ ठरवील..."

यावर मात्र मी भडकलो. येथवर एकही मराठी माईचा लाल या उपक्रमाला आर्थिक मदतीचा शब्दही न काढता मलाच उपदेश करत आला होता. तेथवर मी जवळपास पन्नास-साठ हजार रुपये प्रक्रियेवर घालवलेलेच होते.  माझ्या भावना, विंदांबदलचा आदर व त्यांची खंत दूर करण्यासाठीचे माझे व्यक्तिगत प्रयत्न हेच भाकड लोक धुळीला मिळवायला सज्ज झालेले होते. मी त्या रात्रीच त्यांना सुनावले..."मला पुरस्कार द्यायचाच नाही. मी काही एकट्याने संस्कृतीचा ठेका घेतलेला नाही. जे करतोय त्याला पाठबळ देत भविष्यात ते व्यापक करण्याच्या ऐवजी आजपासुनच ही बदबड चालू आहे ती मला अमान्य आहे. महाराष्ट्र कोणा अन्य भाषिक साहित्यिकाला पुरस्कार देण्याइतपत लायक बनलेला नाही."

आणि खरेच आहे. मी त्यावेळी हे संतापून बोललो होतो. मी पुरस्कार बासनात बांधून ठेवला. (ही माझी चूक होती हेही खरे कारण मी या बांडगुळांना महत्व द्यायला नको होते.)

पण नंतर थोडक्याच कालात महाराष्ट्र शासनानेच "संत ज्ञानेश्वर" याच नांवाने पुरस्कार परभाषिक साहित्यिकांना देण्याची घोषणा केली. मला वाटले चला हे तरी एक फलित...

पण आजतागायत हा पुरस्कार कोणालाही दिला गेल्याची नोंद नाही. असो.

अजुनही वेळ गेलेली नाही. अजुनही मराठी भाषकांत भाषाभगिनींबद्दलचे प्रेम जागे असेल तर हा पुरस्कार खरेच सुरू करता येवू शकतो...नव्हे तो सुरु झालाच पाहिजे...महाराष्ट्र साहित्यकृपण लोकांचे राज्य नव्हे हे दाखवून द्यायला पाहिजे.

जगाचे भविष्य आमच्याच हातात!

मानवी जीवन विलक्षण आहे याचा परिचय आपल्याला नेहमी होत असतो, पण या विलक्षणातील दडलेले धोके मात्र आपल्याला पहायचे नसतात. भविष्यातील जग कसे ...