अखंड "हिंदू" राष्ट्र संकल्पनेचे जनक म्हणून वीर सावरकरांकडे पाहिले जाते. सावरकरवाद्यांना याबाबत साहजिकच सावरकरांबद्दल पराकोटीचा आदर असतो. रा. स्व. संघ आजही अखंड हिंदुस्तानचा राग गात असतो. युवा पिढ्यांना हिंदुत्वाचे वेड लावायला ही संकल्पना चांगलीच कामी येत असते. हिंदुत्वाचे वेड म्हणजे मुस्लिम द्वेष हे ओघाने आलेच. आज विशिष्ट समाजघटकांत जी कट्टरता ओसंडून वाहतांना दिसते तिच्या मागे "अखंड हिंदू राष्ट्र" ही संकल्पना प्रबळ असते. तसे नकाशेही हिरिरीने मिरवले जात असतात. असो. येथे आपल्याला सावरकरांचे अखंड हिंदू राष्ट्राचे नेमके काय स्वप्न होते व ते साकार करण्याची त्यांची नेमकी काय योजना होती हे तपासून पहायचे आहे.
सर्वप्रथम नमूद केले पाहिजे ते म्हणजे सावरकर आणि रा. स्व. संघाचा तिरंग्याबद्दलचा अनादर. प्रसिद्ध समाजवादी नेते ना. ग. गोरे १ मे १९३८ रोजीच्या एका प्रसंगाचे साक्षीदार होते. त्यात हिंदू महासभा आणि रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी कामगार दिनाच्या संचलनावर हल्ला करून तिरंगा फाडुन टाकत सेनापती बापट आणि गजानन कानिटकरांना मारहाण केली. ना. ग. गोरे लिहितात, "हेडगेवार आणि सावरकर यांनी आपल्या अनुयायांना मुस्लिमद्वेष, कोंग्रेस द्वेष आणि तिरंग्याचा द्वेष शिकवला आहे. त्यांचा स्वत:चा भगवा ध्वज असून अन्य ध्वजाला ते मानीत नाहीत." म्हैसूर हे हिंदू संस्थान होते. या संस्थानात कोंग्रेसी सत्याग्रहींनी तिरंग्याला अभिवादन केले म्हणुन २६ सत्याग्रहींना संस्थाने पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले. यावर १७ एप्रिल १९४१ रोजी सावरकरांनी शिमोगा येथील हिंदू महासभेच्या कार्यकारिणीला पत्र लिहिले, त्यात स्पष्टपणे म्हटले कि, "म्हैसूर राज्य हिंदू सभेने हिंदू संस्थानिकांचे बळ वाढविण्यासाठी प्रयत्न करत अहिंदू अथवा वाट चुकलेल्या राष्ट्रवादाचे सोंग आणना-या हिंदुंना विरोध केला पाहिजे." याच वर्षी, म्हणजे २२ सप्टेंबर १९४१ रोजी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांसाठी जारी केलेल्या निवेदनात सावरकर म्हणाले, "हिंदूडम (हिंदू जगत) उद्घोषित करणारा कुंडलिनी-कृपाणांकित ओम आणि स्वस्तिकासहितच्या भगव्या ध्वजाखेरीज अन्य कोणता राष्ट्रध्वज असू शकतो? हिंदू महासभेच्या सर्व शाखांवर हाच ध्वज फडकला पाहिजे...तिरंगी झेंडा खादी भांडारांवरच काय तो शोभेल!"
खरे तर इंग्रजांचे बगलबच्चे असलेले हिंदू (आणि मुस्लिमही) संस्थानिक काही अपवाद वगळता स्वातंत्र्य चळवळीच्या सातत्याने विरोधात होते. आपल्या सर्वाधिकारांना आव्हान देवू शकेल अशी कसलीही चळवळ त्यांना आपल्या संस्थानांत नको होती. परंतू जे संस्थानिक हिंदू होते त्यांच्याबाबत सावरकरांना विशेष ममत्व होते. त्याहीपेक्षा त्यांचा नसर्गिक ओढा हा राजेशाहीकडे झुकणारा होता व किंबहुना त्याच पद्धतीवर त्यांचा विश्वास होता. नेपाळची हिंदू राजेशाही त्यांना नेहमीच भुरळ घालणारी व आदर्शवत वाटत असे. हिंदू महासभा आणि रा. स्व. संघ हिंदू संस्थानिकांना हिंदुंचे "शक्तिस्थान" मानीत असत. १९ जुलै १९३८ रोजी सावरकरांनी जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट म्हटले होते कि "हिंदू संस्थानिकांच्या राज्यातील अंतर्गत कारभारात इंग्रजांनी कसलाही हस्तक्षेप करू नये.संस्थानिकांचे बळ घटेल वा त्यांच्या अधिकारांवर गदा येईल असे कृत्य करू नये."
संस्थानांतर्गत कारभार हा संस्थानिकांच्या मर्जीवर चालत असे. त्यामुळे सामान्य नागरिकांना ब्रिटिश सत्तेखाली असणा-या नागरिकांना जे अधिकार उपलब्ध असत त्यापासून वंचित रहावे लागे. कोंग्रेसने संस्थानांतील नागरिकांना मानवाधिकार व लोकशाही हक्क बहाल केले जावेत यासाठी विविध प्रजा मंडळांमार्फत मोठी चळवळ उभी केली होती. पण २७ एप्रिल १९३९ रोजी सावरकरांनी निवेदन जारी केले कि, "त्रावणकोर, जयपूर, राजकोट आणि अन्य हिंदू संस्थानांच्या कारभारात हस्तक्षेप करुन त्यांना दुर्बल केले जाण्याला हिंदू महासभेचा विरोध आहे. हिंदू संस्थानांना दुर्बल करू शकणा-या कसल्याही चळवळींना हिंदू महासभेचा विरोध राहील." थोडक्यात सावरकर हे सर्वसामान्य जनतेच्या हितांपेक्षा हिंदू रजवाड्यांच्या हितांना प्राधान्य देत होते.
यानंतर १९४० साली भरलेल्या हिंदू महासभेच्या बाविसाव्या सत्रात सावरकर म्हणाले, "हिंदू रजवाड्यांनी हिंदू महासभेच्या कार्यात दाखवलेली रुची उत्साहवर्धक आहे. यातून Pan-Hindu (हिंदू जगत) विचारसरणीला प्रोत्साहन मिळत आहे. हिंदू रजवाड्यांच्या अंगातून आमच्या महान पुर्वजांचे रक्त खेळत आहे. आता त्यांनी आम्हाला फक्त सहानुभुती दाखवू नये तर हिंदू चळवळीचे नेतृत्व करावे." १९४५ साली बडोदा येथे भरलेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनातही सावरकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना "हिंदू संस्थानांना दुर्बल करू शकतील असल्या कोणत्याही आंदोलनात सहभाग घेवू नये" असे जाहीर आवाहन केले.
संस्थानांतील अंतर्गत कारभार हा सर्वसामान्य हिंदूनाच मारक असुनही सावरकर हिंदू संस्थानिकांच्या मागे सातत्याने ठामपणे उभे राहिले. संस्थाने जरी ब्रिटिश इंडियाच्या अंकित असली तरी अंतर्गत कारभारात ब्रिटिशांचा विशेष रोल नव्हता. त्यामुळे इंग्रजी प्रदेशांत (जेथे जनतेवर ब्रिटिशांचे राज्य होते) लोकांना अनेक नागरिकाधिकार मिळाले होते त्यापासून संस्थानी प्रजा वंचीत होती. या काळात संस्थानांत आणि संस्थानिकांत राष्ट्रीय प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य कोंग्रेस करत होती. प्रजा समित्यांच्या मार्फत नागरिकाधारासाठीची आंदोलने जोर पकडीत होती. कोल्हापुर, औंध, बडोद्यासारखी अनेक संस्थाने कायदेमंडळांत नागरिकांना प्रतिनिधित्वही देवू लागली होती. अनेक संस्थाने स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन व्हायलाही तयार होती. तर काही संस्थाने (मग ती हिंदू असोत कि मुस्लिम) मात्र पारंपारिक बुरसटलेल्या विचारांना चिकटून बसलेली होती अणि स्वातंत्र्याची आंदोलने दडपून टाकण्यात अग्रेसर होती. या परिस्थितीत सावरकर मात्र हिंदू संस्थानिकांना स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याचा उपदेश करत देशभर फिरत होते.
याची प्रतिक्रिया म्हणुन जे हिंदू संस्थानिक करण्यास आतूर होते (म्हणजे स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र अस्तित्व जपणे) ते मुस्लिम संस्थानिकही करणार हे उघड होते. सावरकरांच्या हिंदू संस्थानिकांना असलेला पाठिंबा व त्यांना काही हिंदू संस्थानिकांकडून मिळत असलेले अर्थसहाय्य यामुळे प्रतिक्रियास्वरुप मुस्लिम संस्थानिक मुस्लिम लीगला अर्थबळ पुरवू लागले. एका परीने इंग्रजांचे छुपे हेतू साध्य करण्याचेच हे कार्य होते. या कार्यपद्धतीने अखंड हिंदुस्तान कसा बनणार होता? सुदैवाने तोवर (१९२० नंतर ते सावरकर कार्यरत होईपर्यंत) सर्वच संस्थानांतील नागरिकांत राष्ट्रवाद आणि स्वातंत्र्याची ज्योत पेटली असल्याने भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवता येईल काय याबाबत संस्थानिक साशंक होऊ लागले होते. नवानगरच्या महाराजांनी तर पार मुस्लिम लीगशी संधान सांधून आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी मदत मागीतली होती.
काश्मिर जरी मुस्लिम बहूल राज्य असले तरी तेथील महाराजा हिंदू असल्याने सावरकरांना त्यांच्याबद्दलही ममत्व होतेच. काश्मिरने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे हे समजताच सावरकरांना अत्यंत आनंद झाला. १० जुलै १९४७ रोजी सावरकरांनी हरीसिंगांना लिहिले कि "नेपाळप्रमाणेच काश्मीरचे महत्व आहे म्हणुंन काश्मीरमद्धे केवळ हिंदुंचे सैन्य उभारून त्यांनी नेपाळची मदत घेत आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षण करावे. त्याने आपले स्वातंत्र नामधारी हिंदी संघराज्याच्या अंकित ठेवणे धोक्याचे ठरेल." हे वाचून बडोद्याचे महाराज व अन्य संस्थानांचे प्रतिनिधीही त्यांना भेटले. सर्वांना सावरकर आपले सैन्यबळ वाढवायला सुचवित होते...स्वतंत्र अस्तित्व टिकवायला सांगत होते...पण ते तसे काही करत नसल्याने सावरकर निराशही होत होते.
यानंतर स्वत: महात्मा गांधी १ आगष्ट १९४७ रोजी श्रीनगरला गेले व हरीसिंगांना भेटले. तेथे ते चार आगष्टपर्यंत होते. शेख अब्दुल्लांना मुक्त करा, राजा म्हणुन पायउतार व्हा आणि भारतात विलीन व्हा असे सांगितले ही बाबही येथे लक्षात घेतली पाहिजे.
त्रावणकोर संस्थानाबाबतही सावरकरांची भुमिका काश्मीरप्रमाणेच होती. त्रावनकोरचे दिवान सी. पी. रामस्वामी अय्यर यांनीही त्रावणकोर संस्थान भारतीय संघराज्यात सामील करण्यास विरोध केला होता. ११ जुन १९४७ रोजी त्यांनी त्रावणकोरचे स्वातंत्र्यही घोषित केले. हे वृत्त समजताच सावरकरांनी त्यांना लिहिले, "अखंड हिंदुस्तानच्याच हिताच्या दृष्टीने त्रावणकोर हे स्वतंत्र हिंदू संस्थान ठेवण्याच्या तुमच्या नि महाराजांच्या दूरदृष्टीच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. निज़ामाने त्याच्या स्वातंत्र्याची घोषणा पुर्वीच केली असून इतर मुसलमान संस्थानिकही तसेच करण्याची शक्यता आहे. हिंदू संस्थानिकांनी तात्काळ एकत्र येवून आपले सैनिकी सामर्थ्य बळकट करून बाहेरुन येणा-या हिंदूविरोधी आक्रमकांचा प्रतिकार करण्यास आणि आतून होणारा विश्वासघात नष्ट करण्यास सिद्ध व्हावे. हिंदुविरोधी नेत्यांच्या हाताखाली काम करनारी सध्याची घटना समिती हिंदू जगताचा विश्वासघात करून मुस्लिमांचा आणखी मागण्या मान्य करण्याची शक्यता आहे." (जुलै ४७) येथे एक बाब नमूद करणे आवश्यक आहे ती म्हणजे त्रावणकोर संस्थानाने स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत २० जून ४७ ला जिनांनी त्रावनकोरच्या या कृतीचे स्वागत केले. त्रावनकोरनेही पाकिस्तानसाठी आपला स्वतंत्र राजकीय प्रतिनिधी (राजदूत) नेमला.
या वरील माहितीवरून काय नि:ष्कर्ष निघतो? कसले अखंड हिंदुस्थान सावरकरांना हवे होते? उलट ते तर हिंदु संस्थानिकांना स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याचा, संस्थानांतील लोकशाहीवादी स्वातंत्र्य चळवळी दडपण्याच्या पक्षात १९३८ पासुनच दिसतात. हिंदू संस्थानिकांना देशभर स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याची आवाहने करतांना त्याची प्रतिक्रिया मुस्लिम संस्थानिकांत काय उमटेल याची त्यांना जाणीव नसावी असे म्हणता येत नाही. संस्थानी ऐशोरामात आयुष्य घालवलेल्या संस्थानिकांना आपले अधिकार विसर्जित करण्याची इच्छा असने शक्य नव्हते. पण त्याला अपवाद होतेच. भोर, कोल्हापूर, बडोदा ही संस्थाने त्या दृष्टीने आघाडीवर होती. अन्य संस्थानांत नागरिकांवर अनन्वित अन्याय व अत्याचार होत असतांना, नागरिकांना साधे मानवाधिकारही बहाल होत नसतांना "राजेशाही प्रवृत्तीचे" आकर्षण असनारे सावरकरांनी हिंदू संस्थानांनी स्वतंत्र रहावे असे वाटने स्वाभाविक वाटले तरी ते त्यांच्याच "अखंड हिंदुस्थानाच्या" भुमिकेच्या विरोधात जात नव्हते काय? हिंदू संस्थानिकांच्या पावलावर पाउल ठेवत मुस्लिम संस्थानिकांनीही स्वतंत्र रहायचा निर्णय घेतला असता तर भारतात ५६५ राष्ट्रे निर्माण झाली नसती काय?
सर्वात महत्वाची बाब म्हणजे ते सावरकर काश्मीर ते त्रावणकोरच्या राजांना सैनिकी शक्ती वाढवा असे का सांगत होते याचे उत्तर रामस्वामींना लिहिलेल्या पत्रातच आहे. ते भारतीय संघराज्यालाच हिंदूविरोधी मानत होते. म्हणजे हा लढा ते म्हणतात त्याप्रमाने राष्ट्रीय सीमांपारचा नसून स्वतंत्र हिंदू संस्थानांच्या सीमांपारचा होता. घटना समितीलाही ते हिंदूविरोधीच मानत होते. म्हणजे स्वातंत्र्यानंतर हिंदू संस्थानांनी भारतीय संघराज्यावर व मुस्लिम संस्थानांवर हल्ला करत ती जिंकावीत आणि मग त्यांच्या स्वप्नातील अखंड हिंदू राष्ट्र निर्माण करावे असे त्यांचे विचार होते असे स्पष्ट दिसते. यामुळे भारतात यादवी पेटेल (कारण संस्थाने, हिंदू असोत कि मुस्लिम, ही देशभर विखुरलेली होती) याचे त्यांना भान मात्र नव्हते हेही दिसून येते. काश्मीरबाबतची त्यांची भुमिका तर अत्यंत गोंधळाची दिसते. मुस्लिमबहूल राज्यात केवळ हिंदूची सेना उभारण्याचा व स्वातंत्र्य टिकवण्याचा त्यांचा सल्ला कोणते अखंड राष्ट्राचे स्वप्न दर्शवतो? उलट विखंडित, पण केवळ हिंदुंच्या, विखुरलेल्या अनेक राष्ट्रांचे संकुचित हिंदुत्ववादी स्वप्न त्यांच्यासमोर होते हे १९३८ पासुनच्या (म्हणजे १९३७ साली इंग्रजांनी त्यांना बिनशर्त मुक्त केल्याच्या काळापासून) त्यांच्या विचारांवरून दिसून येते. खरे तर गांधीहत्येची बीजे याच विचारांत दिसून येतात, कारण गांधीजी संस्थानांच्या विलीनीकरणाबद्दल व लोकशाहीबद्दल सुरुवातीपासूनच आग्रही होते व त्यांना त्यात यशही मिळत होते. पटेलांनी पुढे सर्वच संस्थाने विलीनही करून दाखवली. जुनागढच्या नबाबाला खरे तर पाकिस्तानात सामील व्हायचे होते. पण तेथील ९८% प्रजा हिंदू असल्याने भारताने जुनागढची नाकेबंदी करून नबाबाला भारतात सामील व्हायला भाग पाडले. ही घटना ९ नोव्हेंबर ४७ ची आहे...गांधीजी तेंव्हा हयात होते. स्वामी रामानंद तीर्थांच्या नेतृत्वाखाली १९३८ पासुनच कोंग्रेस निजामाविरुद्ध संघर्ष करत होती. भारताने स्वातंत्र्यानंतर सैन्यदले विसर्जित करावीत असे कधीही म्हटले नसले तरी सावरकर भक्त मात्र सातत्याने तसा प्रचार करत असतात हे त्याहुनही विशेष. खरे तर काश्मिरवर टोळीवाल्यांनी हल्ला केला त्यावेळीस सैनिकी कारवाईला गांधीजींनी संमती दिली होती व याबद्दल प्यारेलाल यांनाही आश्चर्य वाटले होते व ते त्यांनी नोंदवुनही ठेवले आहे..
सावरकरांचे अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न कसे विरोधाभासी आहे हे डा. बाबासाहेब आंबेडकरांनाही माहित होते. त्यांनी आपल्या "Pakistan or Partition of India" या ग्रंथात नमूद केले आहे कि "आधी हिंदू-मुस्लिमांत द्वेष निर्माण करुन सावरकरांना मोठे हिंदू राष्ट्र आणि छोटे मुस्लिम राष्ट्र एकाच घटनेच्या छायेखाली नांदेल असे का वाटते हे समजत नाही."
थोडक्यात सावरकरवादी आणि रा.स्व.वादी सावरकरांच्या कोणत्या आणि कशा अखंड हिंदुस्तानाबद्दल बोलत असतात यावर त्यांनी चिंतन करणे आवश्यक आहे. सावरकरांचे विचार आणि कृती यातील विभेद समजावून घ्यायला हवा. स्वातंत्र्यानंतर सावरकरांनी १५ आगष्टला तिरंगा फडकावला म्हणजे ते भारतीय स्वातंत्र्याविरोधात नव्हते असे सांगत असतांना सावरकरवादी हे सोयिस्करपणे विसरतात कि आधी क्रुपाण-कमंडलुअंकित भगवा फडकावुनच मग तिरंगा फडकावला. तिरंगा सावरकरवाद्यांनी कधीच मनापासून स्वीकारला नाही. हिंदूजगतच्या धर्मांध जाणीवा कोणत्या दिशेने जावू शकत होत्या याचा बोध सावरकरांच्या वरील कृतींवरुन व वक्तव्यांवरून लक्षात यावे.
-संजय सोनवणी
संदर्भ: 1. Veer savarkar: Thought and Action of Vinayak Damodar Savarkar by Jyoti Trehan
2. Making India Hindu by David Ludden
3. Hindu nationalists and Governance by John McGuire
4. Savarkar Myths and facts by Shamsul Islam
5. Divine Enterprise: Gurus & Hindu nationalist Movement by Lise McKean
6. pakistan or Partition of India by Dr. B. R. Ambedkar
7. अखंड हिंदुस्तान लढा पर्व- बाबाराव सावरकर
८. Mahatma Gandhi , the Last Phase, Pyarelal
