Monday, April 14, 2014

तू असतासच तर!

परमेश्वरा
तू कधीतरी
किमान माणसाच्या
त्याच्या मुलभूत
अडाणचोटपणामुळे का होईना
भावविश्वाचा अटळ भाग होतास
तेंव्हा तरी किमान
खोट्या का होईना
आशेचा तू एक भाग होतास...
तुच वाईटातून चांगले घडवशील असा
ठाम विश्वासही होता!

आता कोणी तुला रिटायर केले आहे
तर कोणी
तू मयत झाल्याचे घोषित
केले आहे
हरकत नाही
जो नव्हताच त्याला रिटायर तरी
कोण करणार
आणि मारणार तरी कोण?

तुझे अस्तित्व असण्याचे
मुळात प्रमाणही नाही
आणि
प्रयोजनही,,,
या विश्वाच्या व्यवहारात...

पण वाटते खरे
असतास तू
तर जरा बरे झाले असते
तुझे अस्तित्व मानणा-यांचे
आणि न मानणा-यांचे
जरा भले झाले असते
त्यांच्या मेंदुंत जरा अधिक
विचारस्त्राव झरले असते
आणि सर्वांनीच एकमताने मग
तुझे अस्तित्व नाकारले असते...

झुंडींचे गणित जरा
बदलले असते...
मानवतेचे श्वास जरा फुलले असते!


आणि तुझ्या असण्यातील
नसतेपण
तुलाही साजरे
करता आले असते...

तू असतासच तर!

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...