Saturday, April 26, 2014

सिंधू संस्कृतीवरील अप्रतिम लघुपट!

हा सिंधू संस्कृतीवरील एक अप्रतिम लघुपट आहे. तासाभराचा असला तरी पाहिलाच पाहिजे असा.

कोणतीही संस्कृती काही शहरे नष्ट झाली, पर्यावरणीय अथवा आर्थिक अवनतीमुळे शहरे रिती करावी लागली म्हणून समूळ नष्ट होत नसते. सिंधू नदीच्या खो-यात आजही सिंधू संस्कृतीत जशा सपाट तळाच्या नौका वापरल्या जात तशाच आजही वापरल्या जातात. विहिरींच्या, मृद्भांड्यांच्या डिझाईनमद्धे विशेष फरक पडला नाही. तशीच मृद्भांडी आजही बनवली जातात...तशाच विहिरी आजही सर्वत्र सापडतात.

या लघुपटात तत्कालीन संस्कृतीची अनवट रहस्ये उलगडली जातात. त्या काळात आपल्या देशाचे नांव "मेलुहा" असे होते. आपला व्यापार मेसोपोटेमिया, सुमेरिया, अरबस्थान ई देशांशी समुद्रमार्गाने होत असे. सिंधु संस्कृतीने निर्यात केलेल्या अनेक वस्तुंचे अवशेष तिकडे उत्खननांत सापडले आहेत. कसा झाला असेल दोन टोकाच्या संस्कृत्यांतील पहिला संपर्क? कसा त्यांनी संवाद साधला असेल? मानव मुळातच आदिम संवादी प्रेरणांनी भारावलेला राहिला आहे. त्यांनी काहीतरी मार्ग शोधलाच असेल. भाषिक/सांस्कृतिक देवानघेवाणीही झाल्याच असतील यात शंका नाही.

या लघुपटात ढोलवीरा येथील पुरातत्वीय अवशेषांतून अनेक रहस्ये उलगडलेली आहेत. मला सर्वात भारावून टाकले ते तेथील जल-व्यवस्थापन पद्धतीने. कच्छ हा तसा पाण्याच्या बाबतीत दुष्काळी भाग. तेंव्हाही स्थिती वेगळी नव्हती. पण पावसाळ्यातील नदीतून येणारे पाणी अडवून ढोलवीराभोवती बनवलेल्या अवाढव्य अशा ७ टाक्यांत ते पाणी अत्यंत वैज्ञानिक आखणी करून कसे जमा केले जात होते याचे थ्री-डी पुनर्निर्मित आराखड्यातून दिसते आणि आपण थक्क होतो. एवढेच नव्हे तर इमारतींच्या छतांवर जमा होणारे पाणीही या टाक्यांपर्यंत पोहोचवले जात असे. हे पाणी पिण्यासाठी तसेच शेतीला पुरवठा करण्यासाठी वापरले जात असे. आम्हाला आमच्या या महान पुर्वजांकडून आजही खूप शिकण्यासारखे आहे हे खरे.

या लघुपटात चारण लोक अजुनही प्राचीन काळी घग्गर नदी कशी वाहती होती, त्यात मासे कसे खेळत असायचे याची कवने गात असतात. घग्गर नदी सुकून आता जवळपास साडेतीन हजार वर्ष झाली आहेत. संस्कृतीचा प्रवाह जनस्मृतींतून, लोककाव्य-संगीतांतुन कसा हजारो वर्ष अविरत वाहत असतो याचे आपल्याला दर्शन घडते.

वेळ मिळेल तेंव्हा किंवा जमेल तसा हा लघुपट अवश्य पहावा.

http://s1.zetaboards.com/anthroscape/topic/5402193/1/

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...