Saturday, May 17, 2014

निवडणूक आणि मी ...आपण!

अर्थशास्त्रातील एक मुलभूत सिद्धांत असा आहे कि आपल्या गरजा नेमक्या काय आहेत हे कधीच ठरवता येत नाही, त्यामुळे गरजा निर्माण करुन त्यांची आवश्यकता पटवून द्यावी लागते.

मतदारही असाच एक ग्राहक असतो. खरे तर संकल्पनात्मक दृष्ट्या तो जरी मतदाता असला तरी संभाव्य अपेक्षेतील शासकीय संकल्पनांचा नकलत ग्राहक बनत असतो. त्याला नेमके काय हवे आहे हे त्यालाच माहित नसते. त्यासाठी गरज निर्माण करून ती आपणच पुर्ण करू शकतो याचा विश्वास दिला कि मतदार बरोबर त्याच गरजेला शरण जातो.

हे एक मानसशास्त्रीय युद्ध असते. ते मानसशास्त्रीय संकल्पनांवरच खेळले जाते...कधी जाणतेपणे तर कधी अजाणतेपणे. हे युद्ध कधी मोठे असते तर कधी छोटे...पण ते युद्धच असते हे खरे. आणि युद्धात असतात तसे येथेही मतदारांचे आणि मते घेऊ इच्छिना-यांचे अनेक भावनिक पक्ष असतात. हे पक्ष खरे तर या युद्धात ग्राहकच असतात, तरीही यातला सर्वात दुर्बल घटक म्हणजे भावनिक होणारा मतदार हाच मतांच्या बाजारपेठेत हरवून गेलेला ग्राहक असतो. तो कोणाची तरी हिरीरीने तळी उचलत राहतो. तेथे विचार, भवितव्यातील परिणाम याबाबत तात्विक विचार असतोच असे नाही. लाटेवर स्वार होणे किंवा लाटेला विरोध करणे एवढेच काय तो आपल्या दुबळेपणात करू शकतो.

पण हा बाजार आहे याचे भान मात्र सुटलेले असते. मते घेणा-यांना त्याची ब-यापैकी जाणीव असते, पण मतदात्यांना त्याची जाणीव असतेच असे नाही.

आतापर्यंत भारतातील अनेक निवडनूका कधी कृत्रीम तर कधी अनपेक्षित घडलेल्या घटनांमुळे निर्माण झालेल्या लाटांवरच झालेल्या आहेत. कधी लाटांना विरोध करणारे प्रबळ ठरल्याने लाटा अयशस्वीही ठरलेल्या आहेत तर कधी त्या अत्युच्च यशाचे शिखर गाठणा-याही ठरलेल्या आहेत.

आताची लाट ही विशेष आहे. या लाटेला जागतिकीकरणाने निर्माण केलेल्या आशा-आकांक्षांचे जेवढे संदर्भ आहेत तेवढेच धार्मिक संदर्भही आहेत. भौतिक विकासाच्या अपेक्षांच्या ओझ्याबरोबरच जातीय/धर्मीय आकांक्षांचे प्रतिबिंब या निवडणूकीत पडल्याचे दिसते. ते आधी नसे असे नाही, पण यावेळेस दोहोंचेही अगदी आकर्षक प्यकेज बनले आणि ते मतदात्यांना एक भावनिक लाट क्रमश: उत्पन्न करत विकलेही गेले. विक्रयकलेचा, सामाजिक मानसशास्त्राला कालसुसंगत ओळखत त्याचा अत्यंत शिस्तबद्ध वापर केला जाण्याचा हा अभूतपुर्व नमुना आहे याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही.

यातून खरेच काय घडेल हे आज तरी सांगता येणार नाही. पण धर्मप्रधानता येणार याबाबत शंका राहू नये अशी कृती आजच घडलेली आहे. मी हिंदू आहे त्यामुळे मला त्याचे दु:ख असायचे कारण नाही, पण देशाचा कारभार हिंदू पद्धतीत छुप्या अजेंड्यावर चालणार याची खंत नक्कीच आहे.

खरे तर हे लिहिण्याचे कारण नव्हते. पण आज अनेक मित्रांनी फोन करुन, पोक करुन, अथवा मला उद्देशून पोस्टस व प्रतिक्रियाही लिहिल्यामुळे माझी मते मांडणे भाग पडले. मी रा. स्व. संघाच्या विचारधारेचा विरोधक असल्यामुळे त्या विचारधारेचा मी नेहमीच विरोध केलाय आणि करत राहील. रा. स्व. संघाची वैदिक विचारधारा मला कधीही मान्य होणे शक्य नाही.

येथे माझ्या कोणाही मित्रांनी वाचलेय कि नाही माहित नाही, पण माझी "गुडबाय प्राईममिनिस्टर" नांवाची एक कादंबरी होती. राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कालाच्या सरत्या वर्षात ती
सटायर मी लिहिली होती. त्यात मी गांधी यांची प्रचंड खिल्ली उडवली होती. कादंबरी प्रसिद्ध झाली, कोंग्रेसवाल्यांनी माझ्यावर प्रचंड टीका केली...मी टीकेची पर्वा करण्याचे कारण नव्हते. पण दुर्दैवाने त्यांची श्री पेरंबुदूर येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिषण हत्या झाली. कोणी मेल्यानंतर त्यावर टीका करू नये. तोवर कादंबरीच्या तीन-साडेतिनशे प्रती बाजारात संपलेल्या होत्या. मी उर्वरित सर्व प्रती मागवून घेतल्या....त्या पुन्हा कधीच बाजारात गेल्या नाहीत.

त्यानंतर अटलबिहारी वाजपेयींबद्दलही अशीच सटायर लिहायचे मनात आले होते. पण "गुडबाय..." बाजारात आल्यानंतर राजीवजींची हत्या झाली...पुन्हा असला प्रयोग नको म्हणून मी हस्तलिखित अर्धवट सोडून दिले. ही माझी अंधश्रद्धा असेल...पण मी तसा वागलो हे मात्र खरे.

साहित्यकाराची भुमिका वेगळी असते. चिंतकाची भुमिका वेगळी असते. जोवर आपण मतदार असतो तेंव्हा आपली भुमिका वेगळी असते. मतदान ज्या क्षणी संपते त्याक्षणी आपण बाजारु युद्धातून बाहेर पडलेलो असतो आणि सर्वांचे कल्याण व्हावे असे सरकार यावे एवढीच भावना मनात असते. पण आम्ही मतदाराच्या भुमिकेतून बाहेर पडतच नाही. त्याच उन्मादाला कवटाळून बसतो. खरे तर प्रत्येक निवडणूक ही मतदाराची परिक्षा असते आणि त्यालाही आपापल्या पातळीवर विकासाचेच कार्य करत रहावे लागते हे विसरत असतो. शासनच कल्याण करू शकते, आमची काहीच जबाबदारी नाही, या दुर्बळ भावनेतून भारतीय बाहेर कधी पडतील ते पडोत.

असो. ज्या सर्वांनी माझ्याकडून प्रतिक्रियेची अपेक्षा केली होती त्यांना हे उत्तर आहे.

व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...