Monday, May 19, 2014

मानवी स्वातंत्र्याच्या प्रेरणा....

मी जेंव्हा "राष्ट्रवादी" हा शब्द वापरतो तेंव्हा मला अन्य राष्ट्रांशी शत्रुभाव जपत, त्याच प्रेरणांना जपत द्वेषभाव वाढवणारे आणि त्या राष्ट्रांतील धर्मियांचा ही द्वेष करत आपल्या राष्ट्रातील पण त्याच धर्माच्या लोकांशीही आकस व शत्रूभाव ठेवणारा राष्ट्रवाद मुळीच अभिप्रेत नसतो. राष्ट्रवाद ही व्यापक संज्ञा असून ती जगभरच्या मानवी समुदायांबद्दल तेवढीच आत्मीयता ठेवत आपल्या देशातील सर्वांचेच समतेच्या पातळीवर कसे उत्थान होईल ते पाहणारा राष्ट्रवाद अभिप्रेत असतो. मला वाटले मलालाला खुप कोवळ्या वयात हा राष्ट्रवाद समजला आहे. महात्मा गांधींचा राष्ट्रवाद आपल्याला कधीच समजला नाही तो दूर देशीच्या एका मुलीला समजला. मार्टिन ल्युथर किंग, आइंस्टाईन, मंडेला, ते आजही जगभर अन्यायाच्या विरोधात समतेसाठी लढतात त्यांना समजलेला आहे. भविष्यातही म. गांधी हेच शोषनाविरुद्ध व शोषकांविरुद्ध उभे ठाकणा-यांचे एकमेव प्रेरणास्थान असतील. ज्याही कोणाला वास्तुंची अथवा इतिहासाची पाडापाड, खुनाखुनी (सरकारी असो कि व्यक्तिगत) यातच रममाण व्हायचे आहे त्यांची नोंद इतिहासात खलनायक म्हणुणच होईल. त्यांना कितीही बेगडी राष्ट्रप्रेमाचा मुलामा दिला तरी कोणीही स्वातंत्र्यवीर होऊ शकत नाही.

ज्यांना स्वातंत्र्याचा अर्थच समजला नाही, मानवी स्वातंत्र्याच्या प्रेरणा या दुस-यांचे स्वातंत्र्य हिरावून भागत नाही हे समजत नाही त्यांना कोणतेही जग कधीही डोक्यावर घेत नाही...घेणार नाही. क्षमा हा सर्वात मोठा गूण आहे...तो पाळायला अवघड जातो हे खरे आहे...पण तो प्राप्त करण्याची प्रेरणाही आम्हाला गांधीजीच देतात...सुडबुद्धीने जातीय हिंसाचारांचे समर्थन करनारे नव्हेत!

मनोविकृत हिंसाचा-यांची संख्या जगात नेहमीच अधिक राहिली होती...केवळ आणि केवळ हिंसा हा फक्त भेकडांचा मार्ग असतो...सबलांची अहिंसाच तेवढी वंदनीय असते हे आम्हाला गांधीजींनी शिकवले आणि ते सत्यात येतांनाही पाहिले. आम्हाला वीरांचा देश हवा आहे...भेकड हिंसकांचा नव्हे.

होय...आम्ही वैश्विक राष्ट्रवादाचे समर्थक आहोत. आम्ही समतेचे समर्थक आहोत. शाश्वत अर्थव्यवस्थेतुनच मानवतेचे चिरंतन कल्याण होनार आहे...बुभुक्षितपणे धरतीतील साधनस्त्रोतांना अविरत लुटना-या अशाश्वत अर्थव्यवस्थेचे नव्हे...आम्ही कोणी केवळ एका जातीचा अथवा धर्माचा आहे म्हणुन द्वेष करनारे नव्हेत...ज्याचा इतिहासच नाही, एक मित्थक असलेल्या रामाचे आम्हीही भक्त आहोत पण त्याचा कोठे खरेच जन्म झाला होता व तो ऐतिहासिक व्यक्ती होता असे मानणा-या बेवकुफांच्या रांगेत आम्ही नक्कीच नव्हेत! मित्थके आणि इतिहास यातील फरक आम्हाला समजतो! हिंसेचा आगडोंब उसळवणा-यांच्या आम्ही नेहमीच विरोधात राहू...आणि त्यातच आमचा राष्ट्रवाद प्रकट होत राहील!

व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...