स्मृतीबाईंचा शिक्षणनामा
अलीकडेच स्मृती इराणींच्या स्वतःच्या शिक्षणाबद्दल वादळ उठलं होतं आणि त्या टीकेच्या लक्षही झाल्या होत्या. खरं तर त्यांचं शिक्षण हा काही वादाचा मुद्दा नाही. असूही नये. कर्तबगारी ही शिक्षणावर अवलंबून नसते हे आपल्याच शिक्षणपद्धतीने सिद्ध केलेलं आहे आणि या सरकारमध्ये त्यांना स्वतःची बुद्धिमत्ता वापरण्याचीही आवश्यकता नसल्याने त्यांचं शिक्षण अथवा शिक्षणक्षेत्रातील त्यांचं योगदान याबद्दलही चर्चा होण्यात अर्थ नाही. याचं कारण म्हणजे त्यांना फक्त रा.स्व. संघाचा तयारच असलेला शैक्षणिक अजेंडा राबवायचा आहे.
नरेंद्र मोदींनी शपथ घेतल्यानंतर त्यांना रा. स्व. संघाचे शिक्षणपद्धतीतील तज्ज्ञ (विद्या भारती) प्रत्यक्ष भेटले होते. त्यांनी भारतीय संस्कृती, इतिहास, विज्ञान, तत्त्वज्ञान वगैरेंतील भारतीयांचं योगदान अभ्यासक्रमात असायला हवं यासाठी त्यांना आपला कार्यक्रम दिला. त्यानंतर काही दिवसांत मानव संसाधन खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर स्मृती इराणींनी काय केलं असेल तर अभ्यासक्रमात वेद-उपनिषदं, प्राचीन हिंदू भारतीयांचं विज्ञान, सामाजिक शास्त्र, तत्त्वज्ञान, व्याकरण आणि भाषा यातील योगदान समाविष्ट करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली असून तसे निर्देश अधिकार्यांना दिले गेले आहेत.
वरकरणी पाहता समस्त हिंदुंना यात आनंदच अधिक होण्याची शक्यता आहे. पण हा ‘हिंदू’ अजेंडा आहे काय हे हिंदुंनाही माहीत असणं गरजेचं आहे. पराभूत मानसिकतेत गेलेल्या, गुलामी सहन केलेल्या हिंदुंना आपला ‘गौरवशाली इतिहास’ शाळांतून शिकवला गेला तर चांगलंच वाटेल. पण खरं तर अभ्यासक्रमांत कोणत्याही धर्माच्या दृष्टिकोनातून कसल्याही प्रकारचा इतिहास येणं हे चूकच आहे. पण तरीही आपण आधी हा हिंदू अजेंडा म्हणजे काय आणि त्याचं पर्यावसन कशात होणार आहे हे समजावून घेऊयात.
मुख्यतः एक बाब लक्षात घ्यायला हवी ती ही की याचं लेबल हिंदू असं केलं गेलं असलं तरी प्रत्यक्षात हा ‘वैदिक’ अजेंडा आहे. आजवर रा. स्व. संघ हा वैदिक अजेंडा सातत्याने राबवत हिंदू नव्हे तर वैदिक वर्चस्वतावाद निर्माण करत आला आहे, हे त्यांची प्रकाशनं आणि त्यांनी चालवलेल्या शाळांतील अभ्यासक्रम जरी पाहिला तरी सहज लक्षात येईल.
सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की वैदिक धर्म हा सिंधू संस्कृतिपासून चालत आलेला मूर्तिपूजक हिंदू धर्मापासून सर्वस्वी वेगळा आहे. रा. स्व. संघ जर स्वतःला हिंदू समजत असता तर सिंधू संस्कृती वैदिकांनीच निर्माण केली असे दावे अलीकडे करू लागला नसता. आजही अवैदिक हिंदू तेच शिवादी देव पूजतात जे सिंधू काळी पूजलं जात होतं. त्याचे व्यापक पुरावेही मिळालेले आहेत. असं असताना कसलाही वैदिक पुरावा नसतानाही सिंधू संस्कृतिचे निर्माते वैदिक होत असे आटोकाट प्रयत्न करून, पुराव्यांची उलथापालथ करून सिद्ध करण्याचा चंग त्यांनी का बांधला असता?
एवढंच नव्हे तर घग्गर-हक्रा नदी म्हणजेच वैदिक सरस्वती नदी असं सांगण्याचा अट्टाहासही त्यांनी केला नसता. तसे दावे करून ते सिंधू संस्कृतिवरही आपली मालकी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्यक्षात घग्गर-हक्रा म्हणजे वैदिक सरस्वती नव्हे. या नदीच्या पात्रात झालेल्या भूवैज्ञानिक संशोधनांनी ही नदी सिंधू काळातही मोठी नदी नव्हती हे सिद्ध केलेलं आहे. त्या नदीतील जलप्रवाह हा तेव्हाही मान्सूनवरच अवलंबून होता. ही नदी ऋग्वैदिक सरस्वतीप्रमाणे हिमालयातून उगम पावत नाही. एवढंच नव्हे तर ऋग्वेदातील सरस्वती नदीची वर्णनं आणि भूगोल घग्गर-हक्राच्या पुरातन आणि वर्तमान वास्तवाशी कसलाही मेळ खात नाही. खरं तर सध्या अफगाणिस्तानमध्ये असलेली हरक्स्वैती (सध्या याच नदीला हेल्मंड असं म्हटलं जातं) हीच वैदिक सरस्वती होय असं डॉ. राजेश कोचर यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. असं असतानाही घग्गर-हक्रा म्हणजेच वैदिक सरस्वती आणि म्हणून या नदीच्या काठावरील सिंधू संस्कृतिचे अवशेष हे वैदिक संस्कृतिचे अवशेष असे दावे केले जात आहेत आणि तेच पोकळ, अशास्त्रीय दावे संस्कृतिच्या नावाखाली अभ्यासक्रमात येण्याची साधार शंका आहे.
आणि वैदिक म्हणजेच हिंदू असं जर असेल तर सिंधू संस्कृतितील धर्मकल्पनांचे जे पुरावे आढळलेत ते सरळ हिंदू पुरावे म्हणून त्यांनी ग्राह्य धरायला हवे होते. सिंधू संस्कृतिचे लोक हे मूर्ती/प्रतिमापूजक होते याचे अक्षरशः हजारो पुरावे उपलब्ध आहेत. वैदिक धर्मात मूर्तिपूजा नाही, किंबहुना मूर्ती/प्रतिमापूजेचा निषेध आहे हे वास्तव लक्षात घ्यायला हवं. हे वैदिकांना माहीत नाही असं नाही, पण हिंदू लेबलखाली त्यांना वर्तमानात आणि पुढील पिढ्यांवरही वैदिक वर्चस्वतावाद बिंबवायचा आहे. ही सांस्कृतिक फसवणूक असून अवैदिक हिंदुंनी सावध रहायला हवं.
रा. स्व. संघ अशारितीने सांस्कृतिक भेसळ करत वैदिकतेचा घोष मिरवण्यात स्थापनेपासून आघाडीवर राहिलेला आहे. यांचं सामाजिक शास्त्र म्हणजे सर्व स्मृत्या आल्या. या स्मृत्यांतील चातुर्वर्ण व्यवस्था कशी वैज्ञानिक होती हे बिंबवायचं कार्य ते करतच आलेले आहेत. ते अभ्यासक्रमात यावं असं भारतीयांना खरंच वाटतं की काय?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे भारतात जवळपास १४ हजार शाळा-विद्यालयं चालवली जातात. डॉ. वेंकटेश रामकृष्णन त्यांच्या Hindutva Institutions in Education : The spreading network of RSS या लेखात म्हणतात, रा. स्व. संघाची विद्या भारती ही शैक्षणिक शाखा असून त्यातर्फे चालवल्या जाणार्या शाळांत नेहमीच्या अभ्यासक्रमाबरोबरच ‘संस्कृती ज्ञान’ हा एक मध्यवर्ती अभ्यासक्रम आहे. त्यात शारीरिक शिक्षणाबरोबरच भारताची प्राचीन संस्कृती शिकवली जाते. नेमका यातूनच वैदिक अजेंडा राबवला जातो. गोहत्या कशी चुकीची आहे हे शिकवताना गाय ही सर्व प्राणिमात्रांची जन्मदात्री असून गायीत सारे देव राहतात, अयोध्येच्या बाबरी मशिदीच्या जागी पुरातन राममंदिर कसं होतं, वैदिक ऋषिंनी विमानांपासून ते आरोग्य शास्त्रापर्यंत मूलभूत शोध कसे लावले वगैरे माहिती आवर्जून समाविष्ट असते. यज्ञ केल्याने वातावरण शुद्ध होऊन पर्यावरणाचं कसं रक्षण होतं हेही सांगितलं जातं. याला कसलाही पुराव्यांचा आधार नसला तरी संस्कृतिच्या नावाखाली वैदिक संस्कृतिचं खोटं गुणगान निष्पाप विद्यार्थ्यांच्या माथी मारलं जातं.
वैदिकांचा सांस्कृतिक इतिहास म्हणजे थापांचं अवाढव्य पोतडं आहे. महाविस्फोट सिद्धांत ऋग्वेदातच प्रथम सांगितला होता, प्राचीन काळीच वैदिक ऋषिंनी क्षेपणास्त्रांचा शोध लावला होता, वैदिक गणित हे जगात श्रेष्ठ आहे, संस्कृत भाषेचा उपयोग संगणकाच्या भाषेसाठी अमेरिकन करणार असून नासात संस्कृतचा विशेष अभ्यास केला जातो वगैरे भुलथापांचं प्रमाण एवढं आहे की आपल्याला चाट पडायला होतं. रा. स्व. संघ त्यांच्या निगडित आणि अनिगडित प्रकाशन संस्थांमार्फत अशाप्रकारची धादांत असत्यं पसरवणारी वैदिक महत्तेची वर्णनं सातत्याने प्रसृत होत असतात.
डॉ. रामकृष्णन म्हणतात की, खोट्या माहितीच्या जोरावर रा. स्व. संघ आपला हिंदुत्ववादी अजेंडा पुढे नेत असतो. आता त्यांचं सरकार आल्याने त्याचा समावेश सर्वच अभ्यासक्रमांत होणार याची पूर्वसूचनाच स्मृती इराणी यांनी दिली आहे. कारण भारताचा जोही पुरातन इतिहास आहे तो केवळ वैदिकांचाच असून इतर सारे समाजगट निर्बुद्ध होते आणि म्हणून त्यांचं काय योगदान असं नकळत बिंबवण्यासाठीची ही वैदिक मोहीम आहे, ती हिंदू मोहीम नव्हे हे सत्य सर्वांनीच लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
भारताच्या गौरवशाली परंपरांना इतिहासात स्थान मिळालं पाहिजे असा रा. स्व. संघाचा हट्ट असतो. जे खरं आहे ते मान्य करण्यात कसलीही हरकत असण्याचं कारण नाही. जगभरचे विद्वान घग्गर म्हणजे सरस्वती नव्हे हे सर्व पुराव्यांनिशी उच्चरवाने सांगत असताना मात्र आता तर सिंधू संस्कृतिचं नाव ‘सारस्वत’ संस्कृती करा अशा छुप्या मागण्या सुरू आहेत. या गौरवशाली परंपरांत चातुर्वर्ण्य अगदी चपखल बसतो म्हणून त्यामागील समाजशास्त्रही वैदिक मंडळी हट्टाग्रहाने सांगत असतात. आता तर त्यांचं सर्वस्वी बहुमतातील सरकार आहे. त्यामुळे हा तथाकथित गौरवशाली इतिहास, परंपरा, खोटं विज्ञान आणि थापांनी भरलेल्या वैदिक महत्ता यांना सरळ अभ्यासक्रमातच स्थान मिळण्याची शक्यता आहे.
नव्हे स्मृती इराणी यांनी त्याचंच सुतोवाच केलेलं आहे. त्यांचं कार्य एवढंच की रा.स्व.संघाने तयारच करून ठेवलेला अभ्यासक्रम शिक्षण पद्धतीत घुसवायचा आहे. आता कोणी विरोध करायलाही नसल्याने त्यांना आपल्या मनिषा सहज साकारता येतील असं चित्र आहे. म्हणूनच त्या म्हणाल्या की, ‘शास्त्र, गणित, सामाजिक शास्त्र, भाषा, व्याकरण यातील पुरातन भारतीयांचं योगदान अभ्यासक्रमात घेतलं जाईल.’
इथे प्रसिद्ध विचारवंत पु.स. सहस्रबुद्धे काय म्हणाले होते याची आठवण येणं क्रमप्राप्त आहे. ते म्हणाले होते, ‘रा. स्व. संघ हा एक असा पिरॅमिड आहे जिथे परंपरागत अंध विचारांच्या ममीज् साठवून ठेवल्या आहेत.’ या ममीज् आता चालत बाहेर येण्याच्या बेतात आहेत.
सत्याचा स्वीकार करायला हवा. जे वैदिकांचं खरोखरचं योगदान आहे ते नाकारण्याचा प्रश्नच नाही. आर्यभट, वराहमिहिराचं योगदान कोण विसरेल? त्याचा सन्मान ठेवायलाच हवा. वेद रचणारे वशिष्ठ-विश्वामित्राच्या काव्याबद्दल आणि त्यांच्या धर्मश्रद्धांबद्दल आदरही असायला हवा. पण जे काही या देशात चांगलं आहे ते सारं वैदिकांचंच असं कसं चालेल? त्याला ठोस पुरावे तरी हवेत की नकोत? बरं ते हिंदू नाहीत हे तेच वारंवार ‘वैदिक-वैदिक’ करून स्वतःच मान्य करत असतात. वैदिक धर्म हा यज्ञ प्रधान. मूर्ती-प्रतिमा पूजेशी त्याचा काहीएक संबंध नाही. वैदिक नावाचं गणित वैदिक नसून शंभरेक वर्षांपूर्वी ते लिहिलं गेलं आणि त्याला पुरातनतेचा आभास देण्यासाठी वैदिक गणित असं नाव दिलं गेलं. संस्कृतचा अभ्यास नासात कोणी करत नाही. ती संगणकाची भाषा ही तर चक्क भुलथाप आहे आणि अशाप्रकारच्या वैदिक थापा आमच्या पुढच्या पिढ्यांनी शिकून मनं विकृत करून घ्यायची काय यावर कोण विचार करणार?
एक काळ होता जेव्हा बहुजन अडाणी होते. त्यांना वैदिक विद्वान सांगत त्यावरच अवलंबून रहावं लागे, त्यावर विश्वास ठेवावा लागे. आज ती स्थिती राहिलेली नाही. बहुजन आपली पाळंमुळं स्वतंत्रपणे शोधत आहेत आणि त्याचे विपुल पुरावे सर्वत्र विखुरलेले आहेत. त्या सार्या इतिहासाचं श्रेय कोणी लबाडीने घेऊ पाहत असेल तर त्याचा विरोध सर्व पातळ्यांवर होणारच! ज्याचं श्रेय त्याला हा साधा सरळ नियम आहे आणि त्याचं कटाक्षाने पालन होणं गरजेचं आहे.
पण हे झालं सांस्कृतिक लढ्याचं. शिक्षणपद्धतीत आम्हाला असले थेर नको आहेत. किंबहुना आमची शिक्षणपद्धती ही संतुलित आणि निकोप असायला हवी. आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना कोणताही धर्म अथवा त्याधारित संस्कृती शाळांत शिकवली जायला नको आहे. आम्हाला आमच्या पुढील पिढ्यांची मनं खोट्या अभिमानांनी प्रदूषित करायची नाहीत. मुलं मोठी झाली आणि जर त्यांना रस असेल तर ते स्वतंत्रपणे ज्या धर्मात-संस्कृतित रस आहे त्याचा अभ्यास करतील आणि आपली मतं स्वतंत्रपणे बनवतील. आम्हाला त्यांच्यावर कसलेही विचार थोपत त्यांना पंगू करायची इच्छा नाही. काय शिकायचं याचं शिक्षण मुलांनाच घेऊ द्यात. संस्कृती-धर्माच्या वांझोट्या मिथकांनी त्यांना प्रदूषित करू नका. वैदिकच काय पण कोणताही अजेंडा राबवू नका असंच आपल्या सार्यांचं म्हणणं असलं पाहिजे. कोणाचीही वर्चस्ववादी भावना इथे आडवी येता कामा नये.
मला ठाऊक आहे की आपला आवाज क्षीण आहे. इराणींना फक्त रा. स्व. संघाने तयारच ठेवलेला त्यांचा वैदिक शैक्षणिक अजेंडा अंमलात आणायचा आहे. पण तरीही आपण जमेल तसा आपला आवाज उठवला पाहिजे. आपल्याच भविष्यातील पिढ्यांना नासवण्याचा अधिकार यांना कोणी दिला?
- संजय सोनवणी