Friday, January 2, 2015

प्राचीन भारतीय विमानशास्त्र?

पक्षांप्रमाणे उडता यावे हे माणसाचे पुरातन स्वप्न. जगभरच्या पुराकथांमद्ध्ये मनुष्य देवाने दिलेल्या सामर्थ्याने यंत्र बनवुन, अन्यथा कृत्रीम पंख लावून उडतो अशा कल्पना आढळतात. याचा सर्वात जुना लेखी आणि चित्रांकित पुरावा सनपुर्व ३००० ते २४०० या काळात क्युनेफार्म लिपीत लिहिल्या गेलेल्या ब्यबिलोनियन "एपिक ओप्फ़ ऎटना" या काव्यात येतो. त्या प्रसंगाचे शिल्पांकनही केले गेले होते.

 

ग्रीक पुराकथांतील डीडेलस आणि त्याचा मुलगा इक्यरसची कथा प्रसिद्धच आहे. डीडालसने दोन विमाने बनवली...एक स्वत:साठी तर दुसरे आपला मुलगा इक्यरससाठी. एजियन समुद्रावरुन उड्डान भरत असतांना इक्यरस तारुण्याच्या उत्साहात वडिलांनी दिलेल्या सुचना पाळत नाही. तो अधिक उंच उडायला जातो आणि उष्णतेने पंखांना लावलेले मेण वितळल्याने समुद्रात कोसळून मरतो.
 

कोलंबियातही विमानसदृष्य पक्षांच्या प्रतिमा सापडलेल्या आहेत. (सन १००० ते १५००) चीनमद्ध्ये सम्राट चेंग तांगने (इसपू १७००) पहिले उडणारे विमान बनवले होते पण ते त्याने उडायचे शास्त्र कोणी चोरु नये म्हनून नष्ट करुन टाकले असे म्हणतात. चीनमद्ध्येच इसपूच्या तिस-या शतकात कवि च्यू युनने विमानातुन गोबीच्या वाळ्वंटाचे निरिक्षण केले असाही वृत्तांत येतो.

अशाच लोककथा नेपाळमद्ध्येही आहेत. पेरुमधील नाझ्का रेषांवरुन त्या संस्कृतीच्या लोकांना विमाने माहित होती अथवा परग्रहवासियांनी त्या रेषा बनवल्या असे मानणारे खूप आहेत.

भारतीय पुरानकथांतही विमानांचे उल्लेख येतात. रामायणातील पुष्पक सर्वांना माहितच आहे. समरांगन सुत्रधार या भोजाच्या (अकरावे शतक) ग्रंथात वास्तुशास्त्र, विहिरी/बारव कसे बांधावेत हे वर्णण करतांना लाकडापासून ते पा-याचा उपयोग करत पाणी/जमीन व आकाशात प्रचालित होईल अशा विमानांचा उल्लेख येतो. ज्या ग्रंथाबद्दल फारच चर्चा असते ते "वैमानिक शास्त्र" हे पुस्तक मात्र १९१८ ते १९२३ या काळात दाक्षिणात्य विद्वान सुब्बराया शास्त्री यांनी लिहिले. याच काळात "ब्रुहद विमान शास्त्र" हे पुस्तक ब्रह्ममुनी पारिव्राजक यांनी लिहिले, पण प्रसिद्ध झाले १९५९ मद्ध्ये. सुब्बराया शास्त्रींनी त्यांच्या पुस्तकात दावा केलाय की ऋषी भारद्वाजांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन देवून विमानशास्त्राचे ज्ञान दिले. या ग्रंथावर आधारीत (कसे ते माहित नाही कारण पुस्तकच मुळात फार नंतर लिहिले गेले.) अथवा ऋग्वेदातील काही ऋचांवर आधारीत १८९५ मद्ध्ये शिवकर बापु तळपदेंनी "मरुत्सखा" नामक विमान बनवुन दादर चौपाटीवर उड्डानाचे प्रात्यक्षिक सादर केले व त्याला टिळकही उपस्थित होते असे दावे केले गेले. या दाव्यांना पुष्टी देईल असा कोणताही पुरावा नाही. ते असो.

 
इंडियन इंस्टिट्युट ओप्फ़ सायन्सच्या (बेंगळुरु) डा. एच. एस. मुकुंदा व अन्य ३ शास्त्रज्ञांनी १९७४ साली या ग्रंथांचे अध्ययन करुन खालील निरिक्षणे "सायंटिफिक ओपिनियन"च्या.अंकात नोंदवली आहेत.

१. विमानोड्डानासाठी आवश्यक असलेल्या अनेक ज्ञानशाखांपैकी कशाचेही दर्शन यात दिसून येत नाही.

२. विमानासाठी जी भौमितीक रचना  या पुस्तकांत गृहित धरण्यात आली आहे ती विमान प्रचालनासाठी वापरता येणे अशक्य आहे. शिवाय विमानाची डायमेंशन्स गोंधळाची व वारंवार बदलणारी आहेत...त्यात सातत्य नाही.

३. विमानाचे प्रचालन व नेव्हीगेशन कसे होणार हेही या पुस्तकांत उल्लेखले गेलेले नाही.

४. विमानात पाणी झिरपु नये म्हणुन दुधवस्त्र (क्षीरपट) वापरावे असे सांगितले आहे. विमान बांधणीसाठी "रजलोह" हा धातू वापरावा असेही सांगितले आहे.

५. दोन्ही ग्रंथ संस्कृतात असले तरी त्यांची भाषा अर्वाचीन आहे. वैदिक संस्कृतशी त्या भाषेचा संबंध नाही.

६. प्रत्यक्ष उड्डानासाठी विमानाचे वजन जसे हवे त्यापेक्षा हे कितीतरी पट जड असल्याने प्रत्यक्ष प्रयोग करुन प्रात्यक्षिक घेता येणार नाही.

 ७. डायमेंशन्स देतांना विती, अंगुली अशी अशास्त्रीय परिमाने वापरली आहेत.त्यांचा प्रत्यक्ष उपयोग नाही.


जे. बी. हेअर म्हणतात, या दोन्ही पुस्तकांत असे काहीही नाही जे ज्युल्स व्हर्न आपल्या विज्ञानिकांत सांगत नव्हता.एका काल्पनिकेपलीकडे त्याकडे लक्ष देता येत नाही. या पुस्तकांना विज्ञान म्हणता येणार नाही. ही दोन्ही पुस्तके राइट बंधुंच्या प्रत्यक्ष विमानोड्डानानंतर लिहिली गेलेली आहेत. तळपदेंच्या प्रयोगाचे पुरावे उपलब्ध नाहीत.

 

ऋग्वेदात विमानशास्त्र आहे हा दावा तर अत्यंत विनोदी या सदरात टाकता येण्यासारखा आहे. ऋग्वेदकालीन वैदिकांना भाजलेल्या वीटा माहित नव्हत्या, कापुस व त्यापासुनची वस्त्रे माहित नव्हती, लोह माहित नव्हते, (लोहयुगच तेंव्हा आलेले नव्हते.), मग बाकी मिस्र धातू माहित असणे तर दुरची बाब. असो.

हे निमित्त यामुळे झाले कि मुंबई येथील इंडियन सायंस कोंग्रेसमद्ध्ये चक्क "प्राचीन भारतीय उड्डानशास्त्र" या विषयावर लेक्चर ठेवायचा बेत आखला गेला. या विरोधात नासातील तसेच अन्य भारतीय शास्त्रज्ञांनी आवाज उठवला आहे. हायकोर्टात याचिकाही दाखल झाली आहे. वैज्ञानिक अधिवेशनांत शुद्ध विज्ञानावरील व नवीन संशोधनांवरील सैद्धांतिक चर्चा अभिप्रेत असते. त्याला हरताळ फासणारा हा अवैज्ञानिक आचरटपणा भाजपावालेच करु जाणे. जगभर हास्यास्पद होण्याचा हा शास्त्रीय मार्ग असला तरी अगा जे अस्तित्वातच नव्हते, ते मित्थ्याविज्ञान, काल्पनिका आहे तो विषय जगभरच्या शास्त्रज्ञांच्या परिषदेत आणायचा प्रयत्न व्हावा हे निषेधार्हच आहे. विमानांच्या अशा रंजक काल्पनिका जगभर आढळतात, म्हणून कोणत्याही देशाने असला "चावटपणा" केल्याचे ऐकिवात नाही, ते तेवढे सुज्ञ आहेत...पण भारतियांच्या अक्कलेचे दिवाळे निघाल्याची अशी जागतिक उद्घोषणा करुन "भारतीय अक्कलेचे विमान कधीच उडू शकणार नाही." हे "वैज्ञानिक" पातळीवर सिद्ध करुन काय साधले जात आहे?

भारतियांना विज्ञाननिष्ठ/चिकित्साप्रधान बनवायचे कि मि्त्थकांच्या जाळ्यात अडकवत त्याला कालांधारयुक्त अज्ञानाच्या खाईत लोटायचे?

आवरा!

व्रात्य कोण होते?

  हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...