Monday, February 23, 2015

वैश्विक संस्कृतीचा माणुस !

अलीकडेच माझे मित्र सौरभ वैशंपायन यांनी आज जगभरचे जवळपास सर्वच वंश, धर्म, जाती यांच्यावर पोस्टींचा पाउस पाडत त्या-त्या धर्म-वंशातील ब-या-वाईटाबद्दल जे लिहायचे ते येथेच लिहा असे म्हटले होते. (त्यात वैदिक धर्म नव्हता असे मला वाटते...त्यांच्या पोस्टच इतक्या झाल्या कि सर्वच वाचता आल्या नाही.) असो.

यामागे उद्विगनता असली तरी हा विषय काढून वैशंपायन यांनी अशा स्वरुपाच्या चर्चांना वेगळेच वळण द्यायचा प्रयत्न केला आणि म्हणून ते कौतुकास पात्र आहेत. इंडो-युरोपियन भाषागटाच्या नांवाखाली युरोपियन वर्चस्वतावाद निर्माण करणारे काय आणि मग त्याला प्रत्युत्तर देण्यासठी सेमेटिक भाषागटवाल्यांचे सिद्धांत काय...., आर्य येथलेच म्हणणारे काय आणि ते बाहेरुन आले म्हणनारे काय, एकच गोष्ट सिद्ध करते, एनकेन प्रकारेन, प्रसंगी इतिहासाचे मुडदे पाडून, त्याला हवा तसा वाकवून एखाद्या जातीचे, धर्माचे, वंशाचे अथवा भाषागटाचे पुरातनत्व सिद्ध करणे आणि जागतिक संस्कृतीत आपलेच कसे योगदान थोर वगैरे आहे एवढेच नव्हे तर आम्हीच संस्कृत्यांचे निर्माते हे सिद्ध करत बसतात. कोणी नसलेल्या वंशाचा अभिमान बाळगतो किंवा कोणी आम्हीच भाषा देणारे असा गर्व बाळगतो. कोणी आम्हीच जगातल्या सर्व विज्ञानाचे जनक आहोत असा अभिमान बाळगतो किंवा कोणी आम्ही हरलेले पराजित म्हणत न्युनगंड बाळगत कोणाचा तरी द्वेष करतो.

थोडक्यात इतिहास हा कोणालातरी ग्रेट आणि कोणालातरी दुय्यम बनवण्यासाठी लिहिला जातो. पण इतिहास तसा असतो काय? तो भुतकाळातील संघर्षांचे तटस्थ चित्रण करण्यासाठी असतो कि वांझ अहंकार किंवा न्युनगंड जोपासण्यासाठी असतो? खरे तर जागतिक संस्कृतीचे निर्माते सर्वच आहेत. भाषा एकाएकी कोणी बनवत नसतो. ती विकसित होते ती अगणित मानवी समुदायांच्या एकत्रित प्रयत्नांतुन. जी-ती संस्कृती विकसीत होते ती त्या त्या प्रदेशातील सर्वांच्याच सहभागातुन. कोण कल्पक माणसाला नवी गोष्ट सुचते, सारे ती स्विकारतात, उपयुक्ततेमुळे आणि त्यात विकासच करतात. उपयुक्त संशोधने वेगाने पसरत जातात...एवढ्या कि हजारो वर्षांनंतर तुइचा मुळ कल्पक संशोधक कोण हे बापाजन्मातही सांगता यायचे नाही.

अहंकार आणि गर्वाने, विशेषत: युरोपियनांच्या, ही घृणास्पद लागण आता सर्वांतच होऊ लागली आहे. कोणी म्हणतो भारतीय संस्कृती वैदिकांपासून सुरु होते, ते अडाणी आहेत. कोणी म्हणतो एके काळी भारत बौद्धमय होता तो थापा मारत असतो. द्राविडियन म्हणतात, आम्हीच सिंधू संस्कृतीचे निर्माते. जो तो केवळ वर्चस्वतावादासाठी थापाच मारत असेल तर जैनांनी काय पाप केलेय? तेही पुढे सरसावतणारच कि! पण या भुलथापांच्या, सोयिस्कर इतिहासांच्या बाहेर येत वास्तव पाहिले पाहिजे.

वंश ही कल्पना नष्ट झाली तरी हे वर्चस्वतावादी जेनेटिक सायंसचा आधार घेतात. यातही एवढ्या कोलांटौड्या आहेत की कोणाचीही मती गुंग होऊन जावी. सायंस अंतिम असेल तर कोणालाही ते नाकारता येता कामा नये. म्हनजे ज्या कारणासाठी आज जेनेटिक्स वापरले जाते तो मार्गच सायंटिफिक नाही, म्हणुन निष्कर्शही सायंटिफिक नाहीत. बामशाद पासून आजतागायतपर्यंत भारतात जेवढी परिक्षणे नोंदवली गेलीत त्यांचे निष्कर्ष एकमेकांशी ताळमेळ घालत नाहीत. पण काही मुर्ख मुलनिवासीवाद सिद्ध करायला तो वापरतात तर काही लोक वैदिकवाद सिद्ध करायला वपरतात. युरोपियन तर यात सर्वात पुढे. कालकालपर्यंत इसपु २००० वर्षंपुर्वी पुरा-इंडो-युरोपियन भाषा बोलणा-या अंड्रोनोवो संस्कृतीच्या लोकांना या भाषांचा प्रसार होण्याचे श्रेय देणारे आता जेनेटिक्सचाच आधार घेत युरोपियन संस्कृतीचा जन्म इसपू ७०००० वर्षांपुर्वीच कसा झाला हे सिद्ध करण्यासाठी वापरत. म्हणजे शास्त्रज्ञांतही एकमत नाही. मग किमान त्याला सध्या तरी सायंस का म्हणावे?

मी या सर्वांना अतोनात मुर्ख म्हणतो. हेतू शुद्ध ज्ञानाचा नसून आपाप्ल्या गटांचा वर्चस्वतावाद रेटण्यासाठी केला जातो आहे. बरे ते तरी खरे आहे काय? खरे तर भौतिक पुराव्यांनुसार सेमेटिक भाषागट हा जास्त पुरातन आहे, इंडोयुरोपियन नाही. पण मग ज्यू-मुस्लिमांना श्रेय द्यावे लागेल...ते कसे देणार? बरे इंडो-युरोपियन भाषागटाचे पुरातन अवशेष/पुरावे मुळातच नाहीत म्हनून त्यो अर्वाचीन असेही कसे ठरवणार? जागतिक इतिहासाला भगदाडे पाडण्याची ही जर प्रवृत्ती, तर एवढेसे महाराष्ट्र...या इतिहासात तर केवळ चिंध्याच शिल्लक राहणार कि! आम्हाला अजुन "शिवाजी कोण होता?" हा प्रश्न जर पडत असेल तर आम्ही त्यांचे नांव घेण्यअचेही अधिकारी कसे? जो तो त्यांच्याशी संबंध जोडतो. एकही जात अपवाद नाही. तेली-शिंपीच कसे नाही अजून आले पुढे सांगायला, कि महाराज आम्हीच बनवलेले तेल वापरत होते आणि आम्हीच शिवलेली देखणी वस्त्रे वापरत होते हे सांगायला? अरे ते वापरणारच आणि यांचीच वापरणार. महाराजांची तलवार असो कि कट्यार असो...कोणा लोहारानेच बनवली असणार...देवाने नक्कीच नाही हे आम्हाला समजत नाही. ते किल्ले, ते वाडॆ वडार-गवंड्यांनेच बांधले असणार हेही आम्हाला मान्य करायचे नसते. जगभरातील आज संस्कृती कळते ती खापरांमुळे, मृद्भांड्यांमुळे...म्हणजेच कुंभारांमुळे कळते हे आम्ही कधी मान्य केले? उलट ज्या भाषांचा प्रत्यक्ष पुरावा नाही त्याबाबत मात्र हेच पुरातत्वीय पुरावे दाखल्याला घेत टुक्कार वर्चस्वतावादाच्या गप्पा हाणणारे काही जगभरचे विद्वान अविद्वानच आहेत हे उघड नाही कि काय? बरे, भाषाही कोण बनवतात? लक्षात घ्या, भाषेच्या विकासाचा थेट संबंध शेती, अर्थव्यवस्था, प्रशासनव्यवस्था, व्यापार आणि प्रत्यक्ष वस्तूनिर्मितीशी आहे, म्हणजेच संपुर्ण मानवी समुदायाशी आहे. कोणा एका उपटसुंभ गटांशी नाही. धर्म आधे बनतो, पुरोहित सर्वात शेवटी येतात हा साधा समाजशास्त्रीय नियम आहे. आणि जो धर्म खुद्द पुरातत्वीय अवशेषांवरुनच समजतो...श्रद्धा समजतात...तरीही ते नाकारत आपापले सांस्कृतिक नसलेले घोडे दामटणारे इतिहासाकारही इतिहासाचे खुनी नव्हेत काय?

कोणताही समाज आभाळातुन पडलेला नाही. जागतिक समाजाच्या पुर्वजांने निरलसपणे शिकत, आपली प्रतिभा वापरत, चुका दुरुस्त करत आपली आजची जागतीक (पण विभागीय) संस्कृती उभी केली, आणि आम्ही त्याचे श्रेय घ्यायला हपापलेली माकडे झालोत याची लाज आम्हाला का वाटत नाही? उलट आम्हीच चुका करत जात नाही आहोत काय?

युरोपियनांपासून ते वैदिकांपर्यंत आपले मुळ दूर कोठेतरी शो्धायची ही बाष्कळ प्रेरणा कोणत्या चुतियाने निर्माण केली? बापजन्मात कोणाचे मुळस्थान सापडणार आहे काय? गेली किमान दीड लाख वर्ष माणूस येथुन तेथे अन्नाच्या शोधासाठी जगभर भटकत होता, टोळ्या शाखांत वाटल्या जात होत्या तर कोठे सम्मिलित होत होत्या...तर स्त्रीया सोडून टोळ्यांतले सारे  मारले जात होते. तो मुळात स्थिर झाला सनपुर्व १५००० ते १०००० या काळात. मग कसले मुळ?

आमचे, या पातकी माणसाचे मुळ, ही इवली पृथ्वी आहे.

कोणता एखादा खंड वा प्रांत नाही.

कोणता एक विशिष्ट वंश नाही कि कोणती टोळी नाही.

आमची संस्कृती आमच्या जागतिक पुर्वजांची देणगी आहे...आम्हीच तेवढे नालायक कि आम्ही ते आमच्या वैश्विक पुर्वजांचे श्रेय नाकारतो, कोणत्यातरी आमच्याच निकट जाती/धर्म/वंशाला द्यायचा प्रयत्न करतो.

म्हणूनच वाद आहेत, लढे आहेत, हिंसा आहे, युद्धे आहेत,

या सगळ्यात कोठेच नाही...

आणि तो म्हणजे या वैश्विक संस्कृतीचा माणुस !

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...