Tuesday, March 24, 2015

....एक लुहार की!

पुरातन काळी भारत तंत्रज्ञानात आघाडीवर होता कि नव्हता याबाबत अनेकदा उलट-सुलट चर्चा आणि तीही हिरीरीने होत असते. वेदांत जगातील आजचे सारे विज्ञान आहे असे दावे अनेकदा केले जातात. अगदी अणूबांब, क्षेपणास्त्रे ते उपग्रह अंतराळात सोडणे हेही पुर्वजांना माहित होते असे नुसते दावे केले जात नाहीत तर त्यावर चक्क पुस्तकेही लिहिली गेलेली आहेत. अलीकडेच "वैदिक विमान" प्रकरण गाजले. चांगल्या कारणासाठी गाजले असते तर बरे झाले असते, पण हे प्रकरण गाजले ते दाव्यातील हास्यास्पदपणामुळे.

यामुळे असे झाले कि जे खरे मानवोपयोगी शोध अथवा त्यातील तंत्रकौशल्यातील प्रागतिकता  भारतियांनी साधली त्यावर मात्र चर्चा कधी केली जात नाही, याचे कारण म्हणजे   ही प्रागतिकता साधणारे वैदिक नव्हते. अर्थातच त्यांना मग "वैदिक प्रगती" कसे म्हणता येणार? त्यामुळे फक्त लबाड कल्पोपकल्पित दावे केले गेले ते कधी सिद्ध झालेले नाहीत. पण ज्यांचे प्रत्यक्ष पुरावे आजही उपलब्ध आहेत ते मात्र दुर्लक्षीत राहिले.

खरे म्हणजे भारतियांनी लोथलचे कृत्रीम बंदर, नगररचनाशास्त्र, वास्तुकला, विणकाम, तांबे ते लोहकाम अशा अनेक क्षेत्रात तत्कालीन जगातील कोणत्याही संस्कृतीपेक्षा पार दहाव्या शतकापर्यंत जे वर्चस्व गाजवले त्याबाबत अभावानेच् लिहिले गेले.

आपल्या पुरातन पुर्वजांनी इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर जीवनोपयोगी जे शोध लावले ते पाहून आपण अचंबित होतो. लोहाचा शोध हा एक असाच अत्यंत महत्वाचा टप्पा. लोहयुगाचे सुरुवात ही मानवी विकासाच्या टप्प्यातील एक क्रांतीकारी घटना मानली जाते. सनपूर्व तीन हजार वर्षांपुर्वी मानवाला लोहाचा शोध लागला असे पुरातत्वविद मानतात. लोहयुग सुरु होण्याच्याही खूप आधी मध्यपुर्वेत अशनींत मिळणारे शुद्ध लोह-निकेलचे गोळे वापरात आनले जात असत. भूपृष्ठावर मिळणा-या लोह खनिजात अशुद्ध धातू व अधातु जवळपास ३० ते ३५% असतात. शिवाय धातुकाचे ओक्सीडीकरण झालेले असते. लोह वितळवण्यासाठी आवश्यक असलेले उच्च तापमान कृत्रीमरित्या निर्माण करणे व शुद्ध लोह वेगळे करणे ही क्रिया सुरुवातीला अशक्य अशीच होती. त्यामुळे लोह वितळवून धातूरस साच्यात घालुन वेगवेगळ्य वस्तु निर्माण करत येत नसत. त्यामुळे सुरुवातीला लोखंडाचे गोळे तापवून, नरम करुन त्याला ठोकून निरनिराळ्या वस्तू बनवल्या जावू लागल्या. कालांतराने मानवाने भट्ट्यांत तांत्रिक सुधारणा केली व लोहाचा रस निर्माण करण्यासाठी आवश्यक तापमान निर्माण व्हायला सुरुवात झाली.

लोहयुग भारतात सुरु झाले असावे असे मानण्यास अनेक कारणे आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे भारतात भूपृष्ठावरील लोहखानींचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे अशनीतुन लोह मिळवत बसण्यापेक्षा सरळ अशुद्ध लोहाला शुद्ध करत ते वापरात आणणे सोपे होते. मुंड या आदिवासी समाजाने भारतात सर्वप्रथम लोहधातुकापासुन लोह बनवायला सुरुवात केली असावी असे मानले जाते.

भारतात लोहयुग कधी अवतरले याबाबत विद्वानांत अनेक मतभेद आहेत. सिंधू संस्कृती अधिक पुरातन असली तरी तेथे लोहापासून बनवलेल्या वस्तू मिळालेल्या नाहीत. अर्थात लोह हे पटकण गंज पकडणारे असल्याने व सिंधू संस्कृतीच्या क्षेत्रात पर्जन्यमान अधिक असल्याने पुरातन लोहाची अवजारे गंजुन नष्ट झली असल्याचीही शक्यता आहे. ऋग्वेदात लोहाचा उल्लेख येत नाही कारण अफगाणिस्तानात लोह खाने जवळपास दुर्म इळ होत्या. पुढे भारतात आलेल्या वैदिक मंडळीनी लोहशास्त्र आदिवासी मुंड लोकांकडुन घेतले असे मत अ.ज. करंदीकर यांनी व्यक्त केले आहे. संस्कृतात मुंड शब्दाचा अर्थ "लोह" असाच आहे. मुंडायसम, मुंडलोहम अशी नांवे वेदांत वारंवार येतात. त्यामुळे भारतातील लोहाच्या शोधाचे श्रेय मुंड या आदिवासी जमातीला दिले जाते व ते संयुक्तिकही आहे. मुंड आदिवासींच्या वसाहती आजही ज्या भागांत आहेत तेथे लोहखनिजाच्या विपूल खानी आहेत. त्यामुळे लोहाशी त्यांचा प्रथम परिचय झाला असणे स्वाभाविक आहे. सनपूर्व अठराव्या शतकापर्यंत लोह उद्योग भारतभर पसरला होता असे विविध ठिकाणी झालेल्या उत्खननांतुन सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रात विदर्भ भागात तीन हजार वर्षांपुर्वीच्या  महापाषाणयुगातील लोखंडाचे घोड्याचे नाल व खिळे तसेच घोड्याच्या मुखावर बसवण्यासाठी बनवलेला तांब्याच्या पत्र्यापासून बनवलेल्या व लोखंडी खिळ्यांनी ठोकलेला अलंकार मिळाला आहे.

पुढे मात्र लोहक्षेत्रात भारतियांनी खुपच मोठी क्रांती घडवली. शुद्ध लोह मऊ असल्याने हत्यारांसाठी त्याचा उपयोग होत नसे. पण धातुरसात कर्ब मिसळला तर कठीण असे पोलाद तयार होते असे लक्षात आले. बैलगाडीच्या चाकांना लोखंडी धाव बनवणे ही फारच मोठी तंत्रकौशल्याची बाब होती. त्यामुळे बैलगाड्यांचे आयुष्य तर वाढलेच मालवाहतुकही सुलभ होत गेली. सिंधु संस्कृतीत लोहाच्या धावा बैलगाड्यांना असत. अशा धावांच्या चाको-याही सापडलेल्या आहेत. पाण्याच्या मोटी, नांदरांचे फाळ, कुदळी, टिकाव, पहारी, खुरपी, घमेली, विळ्या, खिडक्यांचे गज, बांगड्या, प्याले ते थाळ्याही लोहापासून बनू लागल्या.  मानवी जीवनात ही एक मोठी क्रांती होती. मानवी जीवन सुलभ, सुसह्य करण्यात या असंख्य लोहवस्तुंनी हातभार लावला.

युद्धतंत्रातही या शोधाने मोठी क्रांती झाली. सनपुर्व १००० पासून पोलादी तलवारी, बाणांची टोके, चिलखते पोलादापासून बनू लागली. सैन्याची संहार व बचाव क्षमता वाढली. दैनंदिन वापराच्या वस्तूंपासून ते सैन्यासाठी शस्त्रास्त्रे बनवणे हा एक देशव्यापी अवाढव्य उद्योग बनला. लोह वितळवणे ते त्यापासून विविध वस्तु बनवणे हे एक तंत्र कौशल्याचे तसेच कष्टाचे काम. शिवाय धातुज्ञानाची आवश्यकता. सातयाने उष्नतेच्या धगीत रहावे लागण्याची आवश्यकता. यामुळे इसपू १००० पासुनच हा उद्योग परंपरागत बनत गेला. भारतात निर्माण झालेल्या प्राचीन जातींपैकी ही एक जात. अर्थात या जातीत विविध वंशगटांतील लोक आले. व्यवसाय वैविध्यही त्यामुळेच आले. भारतातील जाळीदार चिलखते ही जगभर नावाजली जात होती, निर्यात होत होती यावरुन लोहशास्त्रात भारतियांनी केलेल्या प्रगतीचे गमक आहे.

भारतातील लोहारांनी धातुशास्त्रात जी प्रगती केली तिला तोड नाही. भारतात बनणा-या पोलादी तलवारी जगात उच्च दर्जाच्या मानल्या जात. निर्यातही मोठ्या प्रमाणावर होत असे. भारतीय तलवारींत न्यनो तंत्रज्ञान वापरले गेले असल्याचे दावे आता होत आहेत. टिपू सुलतानाची तलवार न्यनो तंत्रज्ञानानेच बनवली गेली होती. या सर्व प्रक्रिया लिखित स्वरुपात लिहिल्या न गेल्याने आधुनिक लोहविज्ञानाची मोठीच हानी झाली आहे असे आपल्याला म्हनता येते. परंतु आपापले शोध, तंत्रे पिढ्यानुपिढ्या आपल्याच वंशात जपण्याची आपली पद्धत. त्यामुळे असे होणेही स्वाभाविक होते.

भारतीयांनी अजून एक क्रांती केली ती म्हनजे लोहभुकटी विज्ञानात घेतलेली झेप. अठराव्या शतकापर्यंत जे तंत्रज्ञान युरोपातही शोधले गेले नव्हते ते तंत्रज्ञान भारतीय लोहारांना चांगलेच माहित होते. याचा आजही जिताजागता असलेला पुरावा म्हणजे महरौली येथील २३ फुट उंचीचा व सुमारे सहा टन वजनाचा कधीही न गंजनारा लोहस्तंभ. हा स्तंभ सन चवथ्या शतकात निर्माण केला गेला. हा स्तंभ उघड्यावर असूनही का गंजत नाही ही बाब नेहमीच आश्चर्याची मानली गेली आहे. परंतु आधुनिक पावडर मेटालर्जी तज्ञांनी हा स्तंभ लोहभुकटी विज्ञानाने बनला आहे असे सिद्ध केले आहे.

लोखंडाची अत्यंत बारीक भुकटी करुन, त्यात निकेल, तांबे अशा धातुंची पुड काही प्रमाणात मिसळुन मिश्रधातु बनवणे ही पहिली पायरी. पुढची पायरी म्हनजे हे भुकटी मिश्रण साच्यात दाबुन सरासरी वितळबिंदुच्या खालचे म्हणजे ९०० डिग्री तापमान बाहेरुन देणे. या तापमानाला धातुभुकटीचे कण परस्परसंबब्ध होवून अखंड वस्तू मिळते. या तंत्रज्ञानाला आज सिंटरिंग तंत्रज्ञान म्हनतात. याच पद्धतीने क्रमाक्रमाने हा लोहस्तंभ बनवला गेला आहे. यात असलेल्या अगंज धातुकांच्या भुकटीच्या मिश्रनानेच या स्तंभावर आजतागायत गंज चढलेला नाही. या तंत्रज्ञानाचा पुढे लोप झाला असला तरी तेंव्हा या तंत्रज्ञानापासून अनेक वस्तु बनवल्या जात असतील हे उघड आहे. पण हे तंत्रज्ञान पुढे फारसे वापरात आलेले दिसत नाही. अपवाद असतीलही, पण त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे मात्र उपलब्ध नाहीत. परंतु आजही पाश्चात्य जग धातुभुकटी विज्ञानाच्या शोधाचे श्रेय भारताला देते हा आपल्या लोहविद्येचा मोठा सन्मानच होय.

पुर्वी आपल्याकडे किती मोठे साचे बनूकत असतील? याचे एक उदाहरण आजही जीवित आहे.

रांचीच्या पश्चिमेला दोनेकशे किलोमीटर अंतरावर टांगीनाथ नांवाचे एक प्रसिद्ध शिवक्षेत्र आहे. येथे एक प्रचंड त्रिशुळ असून त्याचे मधले टोक तुटुन पडले आहे. या तुकड्याचेच वजन तीन टन आहे. संपुर्ण त्रिशुळाचे वजन वीस टन असावे असा तज्ञांचा कयास आहे. हा त्रिशूल अखंड साच्यातुन बनवला गेला आहे. अवघ्या जगात असे लोहकामाचे उदाहरण नाही. हा त्रिशुळ किमान दीड हजार वर्ष एवढा जुना आहे. वीस टनी त्रिशूळ बनवायला केवढा मोठा साचा तयार करावा लागला असेल व त्यासाठी नेमके कसे तंत्रज्ञान विकसीत केले गेले असेल याची आज आपण फक्त कल्पनाच करु शकतो.

थोडक्यात भारतियांनी धातु विज्ञानात अद्भुत प्रगती साधली होती. बिल ड्युरांटने "द स्टोरी ओफ सिविलायजेशन" या ग्रंथात भारतीयांनी कास्ट आयर्न बाबत भारतीयांनी केलेल्या प्रगतीचे कौतुक केले असून पाश्चात्य जग भारतीयांपेक्षा किती मागासलेले होते याचे विस्तृत वर्णन करून ठेवले आहे. उत्तरेतील उत्खननांत सनपुर्व १८०० पासुन बनवलेल्या गेलेल्या लोहवस्तु विपूल प्रमाणात सापडल्यात. त्यात शेतीची अस्वजारे जशी आहेत तशीच गृगोपयोगी वस्तुंचे प्रमाणही मोठे आहे. एवढेच नव्हे तर तत्कालीन लोहभट्ट्यांचे अवशेषही मिळालेत. भारतीय लोहभट्ट्यांच्या विशिष्ट रचनांमुळे लोहाची संरचना व अपेक्षीत तापमान गाठता येणे शक्य होत असे. बिल ड्युरांट म्हणतो, "भारत त्या काळात, गुप्तकाळापर्यंत, युरोपिय जगापेक्षा लोह, सिमेंट, चर्मोद्योग ई. क्षेत्रात फारच पुढे होता. तो म्हणतो कि पोलाद तर भारताचा खास शोध!

बाणांच्या टोकांना लोहपाती बसवत मारक क्षमता वाढवण्याचे कार्य भारतात सर्वात आधी झाले. याला ख-या अर्थाचे पुरातन संहारक क्षेपणास्त्र म्हणता येईल! ग्रीक इतिहासकार हिरोडोटसनेही याची नोंद करुन ठेवली आहे. भारतातुन त्या काळात शुद्ध केलेले लोहही निर्यात होत असे. थोरला प्लिनी म्हणतो कि रोमन हत्यारे, चिलखते व घरगुती वापराच्या वस्तू या भारतिय लोहापासून बनवल्या जात.

तत्कालीन जगात भारताने गाठलेली ही लोह तंत्रज्ञनातील प्रगती विस्मयकारक आहे आणि तिचे श्रेय लोहकर्मींच्या पुर्वजांनाच दिले पाहिजे. भारताची तंत्रज्ञानातील झेप पहायची असेल तर एकटे लोहच सर्वांवर भारी पडेल...

म्हणतात ना....एक लुहार की!

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...