भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षांनिमित्त यापुढे १४ एप्रिल 'राष्ट्रीय बंधुत्व व समरसता दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. अर्थात वरकरणी हा निर्णय स्तुत्य वाटत असला तरी केंद्रीय निर्णय हे बव्हंशी वादच निर्माण करण्यासाठी केले जातात कि बाबासाहेबांचे विचार पोचवण्यासाठी हा प्रश्न तत्काळ उपस्थित होणे हे स्वाभाविक होते. तसे झालेही. "समरसता" या संघाच्या लाडक्या संकल्पनेमुळे समरसता शब्द चक्क बाबासाहेबांच्या जयंते दिनात घुसवल्याने येथेच बाबासाहेबांच्या विचारांची हत्या केली आहे अशी तीव्र प्रतिक्रिया उठणे स्वाभाविक होते. मीही जय महाराष्ट्र वाहिनीवरील चर्चेत या शब्दाचा तीव्र धिक्कार केला आहे.
समरसता हा शब्द संघीय अत्यंत भाविकपणे वापरत असतात. "समरसता" या शब्दात सर्व समाजांनी एकजीव, एकविचारी आणि एकध्येयी बनत आपले अस्तित्व पुर्णपणे समाजात विसर्जित करावे असा अर्थ अभिप्रेत आहे. वरकरणी कोणालाही यात वावगे वाटणार नाही. आदिवासींना संघ "वनवासी" म्हणतो. यातही कोणाला वावगे वाटेल असे वरकरणी तरी दिसणार नाही. समरसता मंचातर्फे संघ अनेक उपक्रम राबवत असतो हे सर्वांना माहितच आहे.
समरसता या शब्दात, सामाजिक परिप्रेक्षात पाहिले तर हा शब्द किती घातक आहे हे सहज लक्षात येईल. समरसतेत मानवी व्यक्तीस्वातंत्र्याची आहुती द्यायची असते. कशात? तर संघाने ठरवलेल्या, मानलेल्या राष्ट्रीय व सांस्कृतिक ध्येयात. समरसतेत व्यक्तीला स्वतंत्र अस्तित्व उरत नसून कोणत्या तरी विचारप्रणालीत (येथे संघाच्या) स्वत:ला विसर्जित करणे अभिप्रेत असते. म्हणजे व्यक्तीने स्वतंत्र आचार/विचार करायचा नाही. नेता (वा संघप्रमूख) सांगतील तोच आचार आणि तोच विचार. लोकशाहीचा अंत घडवणे म्हणजेच समरसता जपणे होय.
यामुळेच संघाची वैचारिक/बौद्धिक वाढ झालेली नाही हे आपल्या सहज लक्षात येईल. समरसतेत स्वतंत्र विचारच अभिप्रेत नसल्याने वैचारिक वृद्धीचा संबंधच येत नाही. वैचारिक वृद्धीसाठी पुर्व अट म्हणजे विचार कलह. वैचारिक संघर्ष झाल्याखेरीज विचार पुढे जात नसतात. वैचारिक संघर्षांसाठी व्यक्तीचे स्वतंत्र अस्तित्व जपावे लागते. तशी व्यवस्था आणावी लागते. तेंव्हा व्यक्ती निर्भयपणे विचार मांडू शकतात, ऐकू शकतात. ही निर्भयता समरसतेत अभिप्रेतच नाही. कारण मुळात "स्वतंत्र विचार" ही संकल्पनाच समरसतेत बाद होते.
थोडक्यात समरसता ही हुकुमशाहीची आवश्यक पहिली पायरी आहे. समरस झालेले विरुद्ध स्वातंत्र्य जपणारे याच्यातील हा कलह स्वाभाविक आहे. ताजे उदाहरणच घ्यायचे तर आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कलवर केली गेलेली कारवाई. ही कारवाई विचार स्वातंत्र्य नाकारणारी आणि हुकूमशाही वृत्तीची द्योतक आहे हे उघड आहे. आगरकर म्हणाले होते, "विचारकलहाला का भीता?" संघ विचारकलहाला भितो हे उघड आहे आणि भेकडांनी कधी संस्कृती घडवली आहे असे उदाहरण जगात नाही. तरी हे लोक संस्कृतीच्या गप्पा हाकत कल्पोपकल्पित संस्कृतीचे चित्र निर्माण करत स्वत:ची आणि लोकांचीही फसवणूक करत असतात. एक उदाहरण देतो. घग्गर नदीला मारुन मुटकून वैदिक सरस्वती घोषित करण्याचा संघाचा उद्योग सुरु आहे. अलीकडे घग्गरच्या सुकलेल्या पात्रात पाच-पंचविस फुटाचे खोदकाम केले. पाणी लागले तर लगोलग संघविद्वानांनी (?) पुरातन सरस्वतीने उसळुन दर्शन दिले असे प्रवचन सुरु केले. हे एवढे मुर्ख आहेत कि कोणत्याही नदीच्या सुकलेल्या पात्रात खोदले तर पाणी लागणारच कि, एवढे समजायचे भान यांना नाही एवढे वैदिकतेचे भूत यांच्या डोक्यात घुसलेले आहे. आता समरसता मानली कि तुम्हाला सिंधू संस्कृती वैदिक होती, घग्गर हीच सरस्वती हे मानणे भाग पडतेच कि!
तर ही समरसता अशी आहे.
भारतीय घटनेने स्वातंत्र्य-समता-बंधुता ही तीन उदात मुल्ये स्विकारली आहेत. समता व बंधुता कशी तर प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून. यात मानवी स्वतंत्र प्रेरणांना उच्च स्थान दिलेले आहे. नुसते देशाचे स्वातंत्र्य नव्हे तर गांधीजींच्या शब्दात मानवांचेही स्वातंत्र्य यात अभिप्रेत आहे. बाबासाहेबांनी म्हटलेय कि सामाजिक लोकशाही ही राजकीय लोकशाहीची पहिली अट आहे. समरसतेत लोकशाहीचा कसलाही संबंध येत नाही. समता हा शब्द संघ नाकारतो कारण त्यांना लोकशाहीच मुळात अभिप्रेत नाही. एकचालकानुवर्ती पंतप्रधान ते संघचालक हे याच तत्वज्ञानाचे अपत्य आहेत. त्यामुळे संघातील अथवा भाजपातील (संघातून आलेले) मंत्री-संत्री चुकुनही स्वतंत्र विचार मांडणार नाहीत...मांडतही नाहीत. याला मी लोकशाहीच्या अंताच्या दिशेने सुरु झालेली वाटचाल म्हणतो. आंबेडकर-पेरियार स्ट्डी सर्कलवरील कारवाई त्याचीच निदर्शक आहे.
आम्हाला समता हवी आहे. समरसता नाही. सत्तेचे तुकडॆ मिळतील या आशेने आंबेडकरवादी म्हणवणारे राजेंद्र गवईं किंवा नरेंद्र जाधवांसारखे विकावू लोक दिमतीला घेतले म्हणजे भारतीय जनमानसांत आपली चांगली प्रतिमा निर्माण होईल हा संघाचा/सरकारचा भ्रम आहे. यांची नैतिक लायकी सर्वांना माहित आहे.
बाबासाहेबांचे विचार पुढे नेणे तर दुरच पण त्या विचारांनाच हे लोक हरताळ फासत बाबासाहेबांचा एका परीने "समरसता" शब्द जोडत अवमान करत आहेत. सांस्कृतिक अपहरणे करत महनीय व्यक्तींची अपहरणे करण्याचा वैदिक धंदा आजचा नाही. व्यास-वाल्मिकीपासून ते कृष्ण आणि बुद्धाचेही ज्यांनी अपहरण करण्याचे घाट घातले ते आधुनिक काळात थांबतील असा भ्रम कोणीही बाळगू नये. मागे त्यांना काही असले धंदे पचून गेले असतील...पण आपण आज वर्तमानात ज्ञानजगात आलो आहोत. वरकरणी निरुपद्रवी वाटणारे शब्द वापरुन लोकांची दिशाभूल होईल या भ्रमात संघानेही राहू नये. आदिवासी ऐवजी वनवासी शब्द का यामागेही सांस्कृतीक कुटील कारस्थान आहे. वैदिक आर्य बाहेरचे नसून येथलेच आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी जगभर वापरला जाणारा आदिवासी हा शब्द टाकत वनवासी हा शब्द जाणीवपुर्वक घेतला. थोडक्यात संस्कृत्यांचे अपहरण करण्याच्या नादात ते संस्कृत्यांचा इतिहासही बदलत आहेत.
मी चेम्बूर येथे झालेल्या भारतीय साधनसंपत्ती परिषदेत बोलतांना अवैदिकांनी आपल्या सांस्कृतिक अभ्यासाकडे आता तरी डोळसपणे वळाले पाहिजे हे आवाहन केले होते. आपल्याला संस्कती पळवली गेलीय आणि तिला वैदिकतेची पुटे चढवलेली आजच पहायला मिळत आहेत.
मग बाबासाहेबांच्या विचारांशी, घटनात्मक मुल्यांशी ज्या विचारसरणीचा काडीमात्र संबंध नाही, त्यांनी बाबासाहेबांचेही "समरसीकरण" केले आणि काहे दशकांनंतर तेच कायम राहिले तर नवल वाटायचे काहीएक कारण नाही.
आम्हाला स्वातंत्र्यासहितची समता आणि बंधुता हवी आहे....
समरसता नव्हे!