भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षांनिमित्त यापुढे १४ एप्रिल 'राष्ट्रीय बंधुत्व व समरसता दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. अर्थात वरकरणी हा निर्णय स्तुत्य वाटत असला तरी केंद्रीय निर्णय हे बव्हंशी वादच निर्माण करण्यासाठी केले जातात कि बाबासाहेबांचे विचार पोचवण्यासाठी हा प्रश्न तत्काळ उपस्थित होणे हे स्वाभाविक होते. तसे झालेही. "समरसता" या संघाच्या लाडक्या संकल्पनेमुळे समरसता शब्द चक्क बाबासाहेबांच्या जयंते दिनात घुसवल्याने येथेच बाबासाहेबांच्या विचारांची हत्या केली आहे अशी तीव्र प्रतिक्रिया उठणे स्वाभाविक होते. मीही जय महाराष्ट्र वाहिनीवरील चर्चेत या शब्दाचा तीव्र धिक्कार केला आहे.
समरसता हा शब्द संघीय अत्यंत भाविकपणे वापरत असतात. "समरसता" या शब्दात सर्व समाजांनी एकजीव, एकविचारी आणि एकध्येयी बनत आपले अस्तित्व पुर्णपणे समाजात विसर्जित करावे असा अर्थ अभिप्रेत आहे. वरकरणी कोणालाही यात वावगे वाटणार नाही. आदिवासींना संघ "वनवासी" म्हणतो. यातही कोणाला वावगे वाटेल असे वरकरणी तरी दिसणार नाही. समरसता मंचातर्फे संघ अनेक उपक्रम राबवत असतो हे सर्वांना माहितच आहे.
समरसता या शब्दात, सामाजिक परिप्रेक्षात पाहिले तर हा शब्द किती घातक आहे हे सहज लक्षात येईल. समरसतेत मानवी व्यक्तीस्वातंत्र्याची आहुती द्यायची असते. कशात? तर संघाने ठरवलेल्या, मानलेल्या राष्ट्रीय व सांस्कृतिक ध्येयात. समरसतेत व्यक्तीला स्वतंत्र अस्तित्व उरत नसून कोणत्या तरी विचारप्रणालीत (येथे संघाच्या) स्वत:ला विसर्जित करणे अभिप्रेत असते. म्हणजे व्यक्तीने स्वतंत्र आचार/विचार करायचा नाही. नेता (वा संघप्रमूख) सांगतील तोच आचार आणि तोच विचार. लोकशाहीचा अंत घडवणे म्हणजेच समरसता जपणे होय.
यामुळेच संघाची वैचारिक/बौद्धिक वाढ झालेली नाही हे आपल्या सहज लक्षात येईल. समरसतेत स्वतंत्र विचारच अभिप्रेत नसल्याने वैचारिक वृद्धीचा संबंधच येत नाही. वैचारिक वृद्धीसाठी पुर्व अट म्हणजे विचार कलह. वैचारिक संघर्ष झाल्याखेरीज विचार पुढे जात नसतात. वैचारिक संघर्षांसाठी व्यक्तीचे स्वतंत्र अस्तित्व जपावे लागते. तशी व्यवस्था आणावी लागते. तेंव्हा व्यक्ती निर्भयपणे विचार मांडू शकतात, ऐकू शकतात. ही निर्भयता समरसतेत अभिप्रेतच नाही. कारण मुळात "स्वतंत्र विचार" ही संकल्पनाच समरसतेत बाद होते.
थोडक्यात समरसता ही हुकुमशाहीची आवश्यक पहिली पायरी आहे. समरस झालेले विरुद्ध स्वातंत्र्य जपणारे याच्यातील हा कलह स्वाभाविक आहे. ताजे उदाहरणच घ्यायचे तर आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कलवर केली गेलेली कारवाई. ही कारवाई विचार स्वातंत्र्य नाकारणारी आणि हुकूमशाही वृत्तीची द्योतक आहे हे उघड आहे. आगरकर म्हणाले होते, "विचारकलहाला का भीता?" संघ विचारकलहाला भितो हे उघड आहे आणि भेकडांनी कधी संस्कृती घडवली आहे असे उदाहरण जगात नाही. तरी हे लोक संस्कृतीच्या गप्पा हाकत कल्पोपकल्पित संस्कृतीचे चित्र निर्माण करत स्वत:ची आणि लोकांचीही फसवणूक करत असतात. एक उदाहरण देतो. घग्गर नदीला मारुन मुटकून वैदिक सरस्वती घोषित करण्याचा संघाचा उद्योग सुरु आहे. अलीकडे घग्गरच्या सुकलेल्या पात्रात पाच-पंचविस फुटाचे खोदकाम केले. पाणी लागले तर लगोलग संघविद्वानांनी (?) पुरातन सरस्वतीने उसळुन दर्शन दिले असे प्रवचन सुरु केले. हे एवढे मुर्ख आहेत कि कोणत्याही नदीच्या सुकलेल्या पात्रात खोदले तर पाणी लागणारच कि, एवढे समजायचे भान यांना नाही एवढे वैदिकतेचे भूत यांच्या डोक्यात घुसलेले आहे. आता समरसता मानली कि तुम्हाला सिंधू संस्कृती वैदिक होती, घग्गर हीच सरस्वती हे मानणे भाग पडतेच कि!
तर ही समरसता अशी आहे.
भारतीय घटनेने स्वातंत्र्य-समता-बंधुता ही तीन उदात मुल्ये स्विकारली आहेत. समता व बंधुता कशी तर प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून. यात मानवी स्वतंत्र प्रेरणांना उच्च स्थान दिलेले आहे. नुसते देशाचे स्वातंत्र्य नव्हे तर गांधीजींच्या शब्दात मानवांचेही स्वातंत्र्य यात अभिप्रेत आहे. बाबासाहेबांनी म्हटलेय कि सामाजिक लोकशाही ही राजकीय लोकशाहीची पहिली अट आहे. समरसतेत लोकशाहीचा कसलाही संबंध येत नाही. समता हा शब्द संघ नाकारतो कारण त्यांना लोकशाहीच मुळात अभिप्रेत नाही. एकचालकानुवर्ती पंतप्रधान ते संघचालक हे याच तत्वज्ञानाचे अपत्य आहेत. त्यामुळे संघातील अथवा भाजपातील (संघातून आलेले) मंत्री-संत्री चुकुनही स्वतंत्र विचार मांडणार नाहीत...मांडतही नाहीत. याला मी लोकशाहीच्या अंताच्या दिशेने सुरु झालेली वाटचाल म्हणतो. आंबेडकर-पेरियार स्ट्डी सर्कलवरील कारवाई त्याचीच निदर्शक आहे.
आम्हाला समता हवी आहे. समरसता नाही. सत्तेचे तुकडॆ मिळतील या आशेने आंबेडकरवादी म्हणवणारे राजेंद्र गवईं किंवा नरेंद्र जाधवांसारखे विकावू लोक दिमतीला घेतले म्हणजे भारतीय जनमानसांत आपली चांगली प्रतिमा निर्माण होईल हा संघाचा/सरकारचा भ्रम आहे. यांची नैतिक लायकी सर्वांना माहित आहे.
बाबासाहेबांचे विचार पुढे नेणे तर दुरच पण त्या विचारांनाच हे लोक हरताळ फासत बाबासाहेबांचा एका परीने "समरसता" शब्द जोडत अवमान करत आहेत. सांस्कृतिक अपहरणे करत महनीय व्यक्तींची अपहरणे करण्याचा वैदिक धंदा आजचा नाही. व्यास-वाल्मिकीपासून ते कृष्ण आणि बुद्धाचेही ज्यांनी अपहरण करण्याचे घाट घातले ते आधुनिक काळात थांबतील असा भ्रम कोणीही बाळगू नये. मागे त्यांना काही असले धंदे पचून गेले असतील...पण आपण आज वर्तमानात ज्ञानजगात आलो आहोत. वरकरणी निरुपद्रवी वाटणारे शब्द वापरुन लोकांची दिशाभूल होईल या भ्रमात संघानेही राहू नये. आदिवासी ऐवजी वनवासी शब्द का यामागेही सांस्कृतीक कुटील कारस्थान आहे. वैदिक आर्य बाहेरचे नसून येथलेच आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी जगभर वापरला जाणारा आदिवासी हा शब्द टाकत वनवासी हा शब्द जाणीवपुर्वक घेतला. थोडक्यात संस्कृत्यांचे अपहरण करण्याच्या नादात ते संस्कृत्यांचा इतिहासही बदलत आहेत.
मी चेम्बूर येथे झालेल्या भारतीय साधनसंपत्ती परिषदेत बोलतांना अवैदिकांनी आपल्या सांस्कृतिक अभ्यासाकडे आता तरी डोळसपणे वळाले पाहिजे हे आवाहन केले होते. आपल्याला संस्कती पळवली गेलीय आणि तिला वैदिकतेची पुटे चढवलेली आजच पहायला मिळत आहेत.
मग बाबासाहेबांच्या विचारांशी, घटनात्मक मुल्यांशी ज्या विचारसरणीचा काडीमात्र संबंध नाही, त्यांनी बाबासाहेबांचेही "समरसीकरण" केले आणि काहे दशकांनंतर तेच कायम राहिले तर नवल वाटायचे काहीएक कारण नाही.
आम्हाला स्वातंत्र्यासहितची समता आणि बंधुता हवी आहे....
समरसता नव्हे!
आप्पा - अरे हो रे बाप्पा . किती सुंदर विचार मांडतोय आपला संजय .
ReplyDeleteबाप्पा - आता अवैदिकाणी पटापट सुरूच केले पाहिजे आपल्या धर्माचे पुनरुथ्थान
आप्पा - ते कस करायचं ?
बाप्पा - अगदी सोपे आहे !जे जे उत्तम उद्दात उन्नत महन्मधुर ते ते शैवच असणार !
आप्पा - असे कोड्यात बोलू नकोरे बाबा , स्पष्ट सरळ आणि सोपे करून सांग नमः शिवाय हे संस्कृत आहे का ?जे संस्कृत ते त्याज्य मग मंत्र काय म्हनायचा ? तो पण अवैदिक असला पाहिजे - सांगा लवकर सांगा संजयजी !- आम्हाला शंकराचा जप करायचा असतो रोज . का तेपण अवैदिक आहे ?
बाप्पा - आणि बेल वहायचा की नाही ?शैव शंकराला तिसरा डोळा आहे का ?
आप्पा - मला कैलासराणा शिव चंद्र मौळी - हे म्हणायला फारच आवडते . ते चालेल का ?
बाप्पा - शंकराला दूध मी दर सोमवारी अभिषेक करतो - ते बरोबर आहे ना ?
आप्पा - हे म्हणजे तुझे फारच झाले , शिवाजी बद्दल जसे काहीही बोलण्या पूर्वी संभाजी ब्रिगेड चा सही शिक्का घेतलेला बारा असे हल्ली म्हणतात तसेच हे झाले !
बाप्पा - मला एक सांग - क्रिकेटची टी २० म्याच बघायची का वन डे का फक्त टेस्ट ? शैव धर्म काय सांगतो ?तसे वागायला - नाही का ? का फक्त हॉकी शैवांची आहे ?श्रीकृष्ण विटीदांडू खेळायचा , म्हणजे क्रिकेट - म्हणजे शैवाना निषिद्ध असे तर नाही ना ? सांगा संजय सर -
आप्पा - आणि शैवांची भाषा आणि लिपी कोणती ? आम्हाला तर फारच ओढ लागली आहे , संजय काय सांगेल ते समजले तर मग ठरवता येईल , कसे कसे वागायचे ते !
बाप्पा - आणि ते समरसता चे काय इतके अवडंबर माजवतो आहे संजय ? समरसता म्हणजे तद्रुपता , एकजीव होणे - तन्मय होणे !मी माझ्या संसाराशी समरस झालो आहे , मी माझ्या वर्गातल्या मित्रांशी समरस झालो आहे , मी आमच्या गल्लीतल्या लोकांच्या सुखदुःखांशी समरस झालो आहे , मी संकटात सापडलेल्या नेपाळच्या लोकाना मदत करताना त्या देशाच्या लोकांच्या भावनांशी समरस झालो आहे - असे म्हणणे पाप आहे का ?
आप्पा - आता शिवाजी महाराज हायज्याक झालेच आहेत संत तुकाराम आणि बहुतेक सार्व संत जातीनिहाय वाटणी करून झाले आहेत , आता कोणी कधी आणि कधी कोणाला हार घालायचा तेपण ठरून गेले आहे ,
आप्पा - म्हणजे समाज दुभांगालाय असेच म्हणतोस की काय तू ?
बाप्पा - नुसता दुभांगलाय असे नाही , अनेक छिलके झाले आहेत , आणि त्या त्या जातीची अस्मिता टिकवायची तर त्याना तसेच वागले पाहिजे , मग संत तुकाराम किंवा संत ज्ञानेश्वर काहीही सांगोत , चोखोबा किंवा एकनाथ काहीही बोलोत , यांना आपली जातीची छिलके नाचवतच जगायचे आहे . अस्तित्व आणि अस्मिता यांचा जेंव्हा आरक्षणाशी तिढा घातला जातो तेंव्हा दुसरे काय अपेक्षित असणार ?
आप्पा - संजयचा हा विचार मात्र विनोदी आहे समरसता हि हुकुमशाहीची पहिली पायरी आहे ! पत्नी पतीशी समरस होते , संगीत शिकताना शिष्य गुरुच्या विचारांशी समरस होतो , चित्रकार चित्र काढताना आपल्या कामात समरस होतो , बालकवी भोवतालच्या विश्वाशी समरस होतात आणि बोल उमटतात - "श्रावणमासी मासी हर्ष मानसी हिरवळ दाते चोहीकडे "
बहिणाबाई समरसूनच म्हणतात , " अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर "
बाप्पा - जाऊ दे रे , आता असेच होत रहाणार , प्रत्येक शब्द आणि अक्षरांची वाटणी होण्याचा ध्यास घेतले गेलेले संजय सारखे लोक असेच आंधळे शरसंधान करत बसणार आणि स्वतःला एकलव्य म्हणवणार !, एकलव्य गुरूशी समरस झाला होता हे त्याना माहित नाही . गुरु शिष्याशी गैर वागला हे सत्य मान्य करावेच लागते , पण तीच महाभारताची शोकांतिका आहे . पत्नीला द्युतामध्ये उभे करणारे कसे काय क्षत्रीय ? आणि अबलेला विवस्त्र करणारे कसे काय बलवान ?
दुध म्हणून पीठ पाण्यात कालवून पिणारा अश्वत्थामा कोणाकडे न्याय मागणार ?
आप्पा - असा भाव विवश होऊ नकोस , आणि घाबरू तर अजिबात नकोस -चार खुर्च्या ठेवल्या आणि एक टेबल ठेवले की संजय सारखे पैशाला पासरी मिळतात , त्यांच्याकडे काय अपेक्षा करणार आपण ?
बाप्पा - योगा दिनानिमित्त किती हल्लागुल्ला झाला पाहिलेस ना ?
समता :
ReplyDeleteसर्व मानव जन्मत: समान आहेत; त्यांना समान संधी व अधिकार मिळाला पाहिजे; ह्याची दयोतक एक संज्ञा-संकल्पना. सर्व मानवी नागरी हक्कांना प्राथमिक न्याय देणारे एक सामान्य तत्त्व आहे. समानतेविषयी दोन भिन्न दृष्टिकोन प्राचीन काळापासून आढळतात. जगातील सर्व व्यक्ती शारीरिक, बौद्धीक व मानसिक दृष्टया निसर्गत: भिन्न असतात. जीवशास्त्र, मानसशास्त्र व बुद्धीमापन कसोटया यांनीही ही असमानता मान्य केली आहे. त्यासाठी निसर्गातील वैचित्र्याचा, विषमतेचा दाखला दिला जातो आणि अखेर निसर्गाप्रमाणेच मनुष्यातील विषमताही एक नैसर्गिक घटना आहे व म्हणून ती बदलणे शक्य नाही, असा निष्कर्ष काढला जातो. अशा स्थितीत समतेचा आगह धरणे, निसर्गकमाविरूद्ध आहे, असा हा दृष्टिकोन आहे.याउलट साधुसंतांनी सर्वांभूती परमेश्वर, हे तत्त्व मांडले आणि सर्व प्राणि माविषयी प्रेम व समभाव ठेवावा, असे आपल्या शिकवणुकीतून प्रतिपादिले आहे. येथे स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगताना त्यांची समदृष्टी गृहीत धरलेली आहे.
समतेविषयीचे हे दोन दृष्टिकोन पाहिल्यानंतर सामाजिक मूल्यांच्या संदर्भात ही दोन्ही टोके व्यवहारात व कृतीत निरूपयोगी ठरतात. व्यक्ति-व्यक्तीतील नैसर्गिक भिन्नता आणि विषमता ही वस्तुस्थिती आहे. ती सकृतदर्शनी नाकारता येणार नाही. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या मिळकतीत कमी - अधिकपणा असू शकतो, यातही काही वावगे मानता येणार नाही; पण धनिक वर्ग, उच्चभ्रू किंवा विशेष सवलती उपभोगू इच्छिणारा समाजगट समाजातील सर्व सोयी, सुविधा, सवलती, धन आणि प्रतिष्ठा आपल्याच पदरात पाडून घेऊ लागला, तर ती असमानता होईल. म्हणून समाजात राखीव सवलती नसणे, तसेच प्रत्येकाला सामाजिक, आर्थिक राजकीय क्षेत्रांत विकासाची पुरेशी समान संधी मिळणे आणि प्रत्येक व्यक्तीच्या अन्न, वस्त्र, निवारा या जीवनविषयक किमान गरजांची पूर्तता करणे, या गोष्टींची अंमलबजावणी म्हणजेच समतेचे तत्त्व प्रत्यक्षात अंमलात आणणे होय.
विसाव्या शतकातील इतिहासाचा अन्वयार्थ म्हणजे समानतेच्या तत्त्वाचा शोध होय. यासाठी लोकांनी लढा दिला, मरण पतकरले आणि हे तत्त्व मिळवून लोकशाही दृढमूल केली. या काळात समता ही सामाजिक चळवळीमागील प्रमुख प्रेरणा होती. तिने यूरोप खंडाला झपाटले आणि पूर्व यूरोपातील देश व चीन यांतील साम्यवादी चळवळीलाही स्फूर्ती दिली. आफ्रिका खंडातील आधुनिक देशांनीही समतेचा पाठपुरावा केला आणि श्वेतवर्णीयांच्या राजकीय व आर्थिक मक्तेदारीला आव्हान दिले. अमेरिकेतही श्वेतवर्णीयांचे श्रेष्ठत्व संपुष्टात आणण्यासाठी नागरी हक्कांची चळवळ उभी केली. कदाचित विसाव्या शतकातील समानतेच्या हक्कासाठी केलेला हा प्रभावी प्रयत्न होता. या चळवळींबरोबर स्त्रियांनी स्त्रीमुक्तिचळवळीव्दारे आपल्याला गौण लेखण्याबद्दल पुरूषांच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रांतील वर्चस्वाला उठाव करून आव्हान दिले आणि पुरूषांबरोबर समान हक्कांची मागणी केली. त्यामुळे त्यांनाही अर्थपूर्ण लाभ मिळाले आहेत. तथापि वांशिक आणि लैंगिक भेदभाव पूर्णत: नष्ट झाले नाहीत. सामाजिक जीवनात, विशेषत: अमेरिकेत अदयापि काळा - गोरा भेदभाव पसंगोपात्त डोके वर काढतो. तसेच स्त्री-पुरूष असा भेदभाव न करता समान संधी देण्याचे समता तत्त्व विधिवत् सर्वमान्य झाले असले, तरी व्यवहारात पूर्ण समानता दिलेली दिसत नाही. अलीकडे त्यातच १९७० नंतर समलिंगी आनंदवादी स्त्री-पुरूषांनी समान हक्कांसाठी चळवळ सुरू केली असून त्यांच्या जीवनपद्धतीला कायदेशीर मान्यता दयावी, अशी मागणी केली आहे.
ReplyDeleteसमता म्हणजे विविधतेचा अभाव नव्हे. समाजात गुणांची, विचारांची, प्रवृतींची आणि आविष्काराची विविधता आवश्यक असते. त्यातूनच प्रगती होते. त्याचप्रमाणे समता म्हणजे निर्जिव साचेबंदपणाही नव्हे. साचेबंदपणामुळे स्वतंत्र विचारांची गळचेपी होते आणि समतेचे उद्दिष्ट विफल ठरते. व्यक्तिव्यक्तीतील बुद्धीमत्ता वा बौद्धीक क्षमता, कार्यकुशलता वगैरे लक्षात न घेता कोणत्या तरी अवास्तव तत्त्वाच्या पायावर आणि भावनात्मक पद्धतीने समतेचे तत्त्व आर्थिक क्षेत्रात लागू करणे, अव्यवहार्य व अशक्य आहे; अशा सर्व व्यक्तींना त्यांच्या कुवतीनुसार व कार्यकुशलतेनुसार वेतन मिळणे, हा हक्क नाकारता येणार नाही. आर्थिक समता रूजविणे, म्हणजे मूलभूत गरजा पूर्ण करण्याची संधी प्रत्येक नागरिकाला मिळाली पाहिजे, हे तत्त्व अनुसरणे होय.
मी भारतीय ,
ReplyDeleteसादर वंदन ,
आपण अतिशय ओघवते लिहिले आहे पण ते लेखन म्हणूनच फक्त चांगले आहे
अमेरिकेतही आज रंगभेद आहेच , त्यातच भर म्हणून , आज जी बातमी आहे त्यामुळे (वाल्ड डिस्ने मध्ये सर्व भारतीय जुन्या युरोपियन - अमेरिकन लोकांची जागा घेणार )यामुळे वंश वादात भरच पडेल असे वाटते ) अस्तित्वाचा प्रश्न आला की सर्व तत्व्द्न्याने लुळी पांगली ठरतात असा इतिहास आहे .
आपल्या टिपणात आपण सांगता ,
समाजात राखीव सवलती नसणे, तसेच प्रत्येकाला सामाजिक, आर्थिक राजकीय क्षेत्रांत विकासाची पुरेशी समान संधी मिळणे आणि प्रत्येक व्यक्तीच्या अन्न, वस्त्र, निवारा या जीवनविषयक किमान गरजांची पूर्तता करणे, या गोष्टींची अंमलबजावणी म्हणजेच समतेचे तत्त्व प्रत्यक्षात अंमलात आणणे होय.
म्हणजेच आजच्या काळात आरक्षणाद्वारे जो समाजात भेदाभेद होत आहे तो आरक्षण बंद करून नष्ट करायचा का ?
आरक्षण किती दिवस चालू ठेवायचे ? खाजगी प्रतिष्ठानात आरक्षण असावे का ? त्यामुळे ब्रेन ड्रेन चा धोका उभा राहतो , त्याचे काय ?
भाजप असो किंवा काँग्रेस - मुलायमसिंग असोत किंवा डीएमके - कोणालाही खरेच सवर्णाना दुखवायचे नाही हे उघड सत्य आहे , यावर आपले मत काय आहे ?
धन्यवाद !
मी भारतीय ,
ReplyDeleteसादर वंदन ,
आपण अतिशय ओघवते लिहिले आहे पण ते लेखन म्हणूनच फक्त चांगले आहे
अमेरिकेतही आज रंगभेद आहेच , त्यातच भर म्हणून , आज जी बातमी आहे त्यामुळे (वाल्ड डिस्ने मध्ये सर्व भारतीय जुन्या युरोपियन - अमेरिकन लोकांची जागा घेणार )यामुळे वंश वादात भरच पडेल असे वाटते ) अस्तित्वाचा प्रश्न आला की सर्व तत्व्द्न्याने लुळी पांगली ठरतात असा इतिहास आहे .
आपल्या टिपणात आपण सांगता ,
समाजात राखीव सवलती नसणे, तसेच प्रत्येकाला सामाजिक, आर्थिक राजकीय क्षेत्रांत विकासाची पुरेशी समान संधी मिळणे आणि प्रत्येक व्यक्तीच्या अन्न, वस्त्र, निवारा या जीवनविषयक किमान गरजांची पूर्तता करणे, या गोष्टींची अंमलबजावणी म्हणजेच समतेचे तत्त्व प्रत्यक्षात अंमलात आणणे होय.
म्हणजेच आजच्या काळात आरक्षणाद्वारे जो समाजात भेदाभेद होत आहे तो आरक्षण बंद करून नष्ट करायचा का ?
आरक्षण किती दिवस चालू ठेवायचे ? खाजगी प्रतिष्ठानात आरक्षण असावे का ? त्यामुळे ब्रेन ड्रेन चा धोका उभा राहतो , त्याचे काय ?
भाजप असो किंवा काँग्रेस - मुलायमसिंग असोत किंवा डीएमके - कोणालाही खरेच सवर्णाना दुखवायचे नाही हे उघड सत्य आहे , यावर आपले मत काय आहे ?
धन्यवाद !