Monday, June 22, 2015

पण योग कोठे राहील?

माझ्या या ब्लोगवरील मित्रांनी मला हा लेख करायला प्रवृत्त केले याबद्दल, आप्पा-बाप्पां सहित सर्वांचे आभार. खरे तर मी याबाबत फेसबुकवर अत्यंत त्झोडक्यात लिहिले होते. ते असे

"दिन साजरे करायची पाश्चात्य पद्धत "आम्हीही त्या स्पर्धेत मागे नाही." हे दाखवण्यासाठी सुरु केली जात आहे हे समजावयास हरकत नाही. व्ह्यलेंटाईन डे अर्थात प्रेमदिवसाला विरोध करणारेच योगदिवसाचे जागतिक आयोजक आहेत हे विशेष. प्रेमदिवस साजरा केल्याने संस्कृती डुबते असे समजणा-यांना योगदिवस साजरा केल्याने संस्कृती वाढते असे एकाएकी वाटू लागले असेल त्यांचा योगशास्त्रावर काडीमात्र विश्वास नाही हे सरळ आहे. रामेदावाचार्यांच्या योगाने किती संस्कृती वाढली आणि योगाचे किती वाटोळे झाले हे कपाळभाटी या मुळात अस्तित्वात नसलेल्या अयोग्यशास्त्राने सिद्धच केले आहे. यांच्या प्रवर्तक प्रधानसेवकांना साधे पद्मासन घालता येत नाही हे त्यांनीच झळकावलेल्या अनेक छब्यांमधुन दिसते. याउलट योगशास्त्री अय्यंगारांनी ख-या योगाला प्रवर्तीत केले, पण झटपट योगी होऊ पाहत सारे रोग दूर करु इच्छिणा-यांच्या पचनी तो कठीण योग कसा पचनी पडायचा? त्यांना कशी प्रसिद्धी लाभायची? बरे, योग व्यायामाच्या पायरीपुरता आणि श्वासांवरील नियंत्रणाच्या पातळीपर्यंतच ठेवायचा कि त्यातील आध्यात्म हा जो मुख्य हेतू आहे, चित्त-वृत्ती-निरोधादि, त्यावर लक्ष द्यायचे हे लाखो शाळांतुन शिक्षकांना आणि कार्यालयिन कर्मचा-यांना, पार सैनिकांनाही, वेठीला धरुन हे कसे सांगितले जाणर आहे? हा कोणता अभिनव "वेठयोग" साधला जातोय?

मी व्यक्तिश: योगाला "आत्मयोग" मानतो. ही सामुदायिक बाब नाही. योगदिन साजरा करणे म्हणजे योगाला त्याच्या पातळीपासून घसरवणे. योग ही निरंतरची प्रक्रिया आहे...जशी प्रेम.

प्रेमदिन काय आणि योगदिन काय...प्रेमाची आणि योगाची प्रतिष्ठा घसरवणारे दिवस आहेत!

योग हे बाह्य नव्हे तर आंतरिक प्रक्रिया आहे हे या अयोगशास्त्र्यांना माहित तरी आहे काय?"

यावर जी मोदीभक्तांनी आणि वैदिक असलेल्या व योग आपल्याच पुर्वजांची मालमत्ता आहे हे समजणा-या "भाविक" सनातन्यांनी जी खडाजंगी उडवून दिली त्याची कल्पना तुम्ही करु शकता.

योग हा वैदिक नाही हे तर उघड आहे. ऋग्वेद ते अन्य ब्राह्मणांपरयंतच्या वैदिक साहित्यात योग डोकावतही नाही. ऋग्वेदाच्या काळापुर्वीच किमान १००० वर्ष योग हा सिंधू संस्कृतीत प्रचलितच नव्हता तर शिव योगमुद्रेत ध्यानस्थ बसलेला दाखवला जात होता. योगावर पहिला सखोल ग्रंथ पातंजलींनी लिहिला. पातंजली हा शिवाच्या ओंजळीतून जन्माला आला म्हणून त्याला पातंजली नांव पडले अशी आख्यायिका लोकप्रिय आहे. ते वास्तव नसणार हे उघड आहे. पण आद्य योग शिवाने मानवजातीला दिला ही जनधारणा वैदिकही बदलवू शकले नाहीत हे वास्तव आहे.

योग हा तंत्रशास्त्राचा एक भाग आहे. योगाला, विशेषत: नाथपंथियांनी, प्रेअतिष्ठा मिळवून दिली. पातंजल योगात आसने हा भाग अत्यंत दुय्यम आहे. योग ही संकल्पना अतिव्यापक आहे. गीतेत संन्यासयोग, ज्ञानयोग, सांख्ययोग, कर्मयोगादि प्रकार सांगितले आहेत ते तर राम्देवबाबा नामक "योगौद्योजक" विदुषकाच्या कानीही नसावे.  योग ही मानसिक आरोग्याची वृद्धी करत मनाला सर्वव्यापी विश्वात्मकतेशी जुळवण्याची प्रक्रिया आहे. योग हा शब्दच मुळात "युज" या धातुपासून बनला असे मानले जाते. युज म्हणजे जुळवणे. थोडक्यात व्यक्ती आणी विश्व यांत तादात्म्य स्थापन करणे हा योगाचा प्रमूख उद्देश्य आहे. ब्रह्मसुत्रे सांगतात कि द्रष्टा आणी दृष्य हे जेंव्हा एकाकार होतात तेंव्हा योग साधला जातो.

योगासने म्हणजे योग नव्हे. ती पहिलीही पायरी नाही कि अंतिमही नाही. ज्यांना आपण योगासने समजतो ती सौम्य व्यायामाची पद्धत आहे. व्यायामाचे म्हणून जेही फायदे होतात ते यांतही होतात. त्यात जगावेगळे काही नाही. पातंजलींनी आसनांना महत्व दिले नाही ते यामुळेच.

योग म्हनून जो सध्या मार्केटिंग केला जात आहे तो योग नाहीच. उत्तम संभोगासाठी जशी अनेक आसने कल्पिली गेली आहेत तशीच आरोग्यासाठीची ही आसने आहेत. यातील अर्थ योग या उदात्त आणि उच्च संकल्पनेशी लावत जर कोणी स्वत:ला योगी समजू लागत असेल तर त्याची कीव करायला हवी. योगासनांपेक्षा इतर अन्य उत्तम सौम्य व्यायामपद्धतीही आहेत.

योगाचा धर्माशी संबंध आहे काय? याचे उत्तर स्पष्टपणे नाही असेच द्यावे लागेल. योग हे तत्वज्ञान आहे, एक आध्यात्मिक जीवनमार्ग आहे...धर्म नाही. आणि तत्वज्ञानाला आपली मिरासदारी मानत २२ इंची छात्या फुगवत चिनी चटयांवर योगासने करत धर्मप्रेम-राष्ट्रप्रेम जागवत बसतात ते तर मुळीच धर्मप्रेमीही नाहीत कि राष्ट्रप्रेमीही.

शिव हीसुद्धा संकल्पना आहे. सृजनाची. निर्मितीची. निर्मितीच्या संकल्पनेतच योगाचा अर्थ सामावला आहे. निर्मिती वैश्विउक आहे. निर्माता आणी निर्मितीतील अद्भूत ऐक्य योगाद्वारे साधण्याचे प्रयत्न् होतात.

अर्थात तेही प्रयत्नच राहतात. हजारो वर्ष जगलेल्या योग्यांच्या धादांत खोट्या कथा चवीने चघळल्या जातात. भारतीय माणसाला स्वनिर्मित लबाड्यांत जगायला आवडते. येथेही तेच होते...एवढेच खरे.

उथळ-योग तसाही विकला जातच होता. आता फार तर या योगाला स्वच्छता अभियानाप्रमाणे काही दिवस "अच्छे" येतील. योगगुरू म्हणुन मिरवणारे अधिक झळकतील.

पण योग कोठे राहील?



Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...