Monday, June 22, 2015

पण योग कोठे राहील?

माझ्या या ब्लोगवरील मित्रांनी मला हा लेख करायला प्रवृत्त केले याबद्दल, आप्पा-बाप्पां सहित सर्वांचे आभार. खरे तर मी याबाबत फेसबुकवर अत्यंत त्झोडक्यात लिहिले होते. ते असे

"दिन साजरे करायची पाश्चात्य पद्धत "आम्हीही त्या स्पर्धेत मागे नाही." हे दाखवण्यासाठी सुरु केली जात आहे हे समजावयास हरकत नाही. व्ह्यलेंटाईन डे अर्थात प्रेमदिवसाला विरोध करणारेच योगदिवसाचे जागतिक आयोजक आहेत हे विशेष. प्रेमदिवस साजरा केल्याने संस्कृती डुबते असे समजणा-यांना योगदिवस साजरा केल्याने संस्कृती वाढते असे एकाएकी वाटू लागले असेल त्यांचा योगशास्त्रावर काडीमात्र विश्वास नाही हे सरळ आहे. रामेदावाचार्यांच्या योगाने किती संस्कृती वाढली आणि योगाचे किती वाटोळे झाले हे कपाळभाटी या मुळात अस्तित्वात नसलेल्या अयोग्यशास्त्राने सिद्धच केले आहे. यांच्या प्रवर्तक प्रधानसेवकांना साधे पद्मासन घालता येत नाही हे त्यांनीच झळकावलेल्या अनेक छब्यांमधुन दिसते. याउलट योगशास्त्री अय्यंगारांनी ख-या योगाला प्रवर्तीत केले, पण झटपट योगी होऊ पाहत सारे रोग दूर करु इच्छिणा-यांच्या पचनी तो कठीण योग कसा पचनी पडायचा? त्यांना कशी प्रसिद्धी लाभायची? बरे, योग व्यायामाच्या पायरीपुरता आणि श्वासांवरील नियंत्रणाच्या पातळीपर्यंतच ठेवायचा कि त्यातील आध्यात्म हा जो मुख्य हेतू आहे, चित्त-वृत्ती-निरोधादि, त्यावर लक्ष द्यायचे हे लाखो शाळांतुन शिक्षकांना आणि कार्यालयिन कर्मचा-यांना, पार सैनिकांनाही, वेठीला धरुन हे कसे सांगितले जाणर आहे? हा कोणता अभिनव "वेठयोग" साधला जातोय?

मी व्यक्तिश: योगाला "आत्मयोग" मानतो. ही सामुदायिक बाब नाही. योगदिन साजरा करणे म्हणजे योगाला त्याच्या पातळीपासून घसरवणे. योग ही निरंतरची प्रक्रिया आहे...जशी प्रेम.

प्रेमदिन काय आणि योगदिन काय...प्रेमाची आणि योगाची प्रतिष्ठा घसरवणारे दिवस आहेत!

योग हे बाह्य नव्हे तर आंतरिक प्रक्रिया आहे हे या अयोगशास्त्र्यांना माहित तरी आहे काय?"

यावर जी मोदीभक्तांनी आणि वैदिक असलेल्या व योग आपल्याच पुर्वजांची मालमत्ता आहे हे समजणा-या "भाविक" सनातन्यांनी जी खडाजंगी उडवून दिली त्याची कल्पना तुम्ही करु शकता.

योग हा वैदिक नाही हे तर उघड आहे. ऋग्वेद ते अन्य ब्राह्मणांपरयंतच्या वैदिक साहित्यात योग डोकावतही नाही. ऋग्वेदाच्या काळापुर्वीच किमान १००० वर्ष योग हा सिंधू संस्कृतीत प्रचलितच नव्हता तर शिव योगमुद्रेत ध्यानस्थ बसलेला दाखवला जात होता. योगावर पहिला सखोल ग्रंथ पातंजलींनी लिहिला. पातंजली हा शिवाच्या ओंजळीतून जन्माला आला म्हणून त्याला पातंजली नांव पडले अशी आख्यायिका लोकप्रिय आहे. ते वास्तव नसणार हे उघड आहे. पण आद्य योग शिवाने मानवजातीला दिला ही जनधारणा वैदिकही बदलवू शकले नाहीत हे वास्तव आहे.

योग हा तंत्रशास्त्राचा एक भाग आहे. योगाला, विशेषत: नाथपंथियांनी, प्रेअतिष्ठा मिळवून दिली. पातंजल योगात आसने हा भाग अत्यंत दुय्यम आहे. योग ही संकल्पना अतिव्यापक आहे. गीतेत संन्यासयोग, ज्ञानयोग, सांख्ययोग, कर्मयोगादि प्रकार सांगितले आहेत ते तर राम्देवबाबा नामक "योगौद्योजक" विदुषकाच्या कानीही नसावे.  योग ही मानसिक आरोग्याची वृद्धी करत मनाला सर्वव्यापी विश्वात्मकतेशी जुळवण्याची प्रक्रिया आहे. योग हा शब्दच मुळात "युज" या धातुपासून बनला असे मानले जाते. युज म्हणजे जुळवणे. थोडक्यात व्यक्ती आणी विश्व यांत तादात्म्य स्थापन करणे हा योगाचा प्रमूख उद्देश्य आहे. ब्रह्मसुत्रे सांगतात कि द्रष्टा आणी दृष्य हे जेंव्हा एकाकार होतात तेंव्हा योग साधला जातो.

योगासने म्हणजे योग नव्हे. ती पहिलीही पायरी नाही कि अंतिमही नाही. ज्यांना आपण योगासने समजतो ती सौम्य व्यायामाची पद्धत आहे. व्यायामाचे म्हणून जेही फायदे होतात ते यांतही होतात. त्यात जगावेगळे काही नाही. पातंजलींनी आसनांना महत्व दिले नाही ते यामुळेच.

योग म्हनून जो सध्या मार्केटिंग केला जात आहे तो योग नाहीच. उत्तम संभोगासाठी जशी अनेक आसने कल्पिली गेली आहेत तशीच आरोग्यासाठीची ही आसने आहेत. यातील अर्थ योग या उदात्त आणि उच्च संकल्पनेशी लावत जर कोणी स्वत:ला योगी समजू लागत असेल तर त्याची कीव करायला हवी. योगासनांपेक्षा इतर अन्य उत्तम सौम्य व्यायामपद्धतीही आहेत.

योगाचा धर्माशी संबंध आहे काय? याचे उत्तर स्पष्टपणे नाही असेच द्यावे लागेल. योग हे तत्वज्ञान आहे, एक आध्यात्मिक जीवनमार्ग आहे...धर्म नाही. आणि तत्वज्ञानाला आपली मिरासदारी मानत २२ इंची छात्या फुगवत चिनी चटयांवर योगासने करत धर्मप्रेम-राष्ट्रप्रेम जागवत बसतात ते तर मुळीच धर्मप्रेमीही नाहीत कि राष्ट्रप्रेमीही.

शिव हीसुद्धा संकल्पना आहे. सृजनाची. निर्मितीची. निर्मितीच्या संकल्पनेतच योगाचा अर्थ सामावला आहे. निर्मिती वैश्विउक आहे. निर्माता आणी निर्मितीतील अद्भूत ऐक्य योगाद्वारे साधण्याचे प्रयत्न् होतात.

अर्थात तेही प्रयत्नच राहतात. हजारो वर्ष जगलेल्या योग्यांच्या धादांत खोट्या कथा चवीने चघळल्या जातात. भारतीय माणसाला स्वनिर्मित लबाड्यांत जगायला आवडते. येथेही तेच होते...एवढेच खरे.

उथळ-योग तसाही विकला जातच होता. आता फार तर या योगाला स्वच्छता अभियानाप्रमाणे काही दिवस "अच्छे" येतील. योगगुरू म्हणुन मिरवणारे अधिक झळकतील.

पण योग कोठे राहील?



6 comments:

  1. योग हा अपुरा व्यायाम प्रकार आहे !!!

    या नावाचा लेख काही वर्षांपूर्वी वाचण्यात आला होता, त्यामध्ये योगाबद्दल खूप सुंदर माहिती वाचायला मिळाली होती. योग हा काही रोग बरा करण्यावरचा इलाज नसून शुल्लक व्यायाम प्रकार आहे. या व्यतिरिक्त अजून काहीही नाही. वयोवृद्ध योगाचे अभ्यासक आणि शिक्षक अभ्यंकर यांच्या संदर्भातील माहिती सुद्धा या लेखात दिली होती, रामदेव बाबाने केलेले योगाचे मार्केटिंग पाहून अभ्यंकर यांना खूप वाईट वाटल्याचे सुद्धा त्या लेखात लिहिले होते. हा लेख पुण्याच्या प्रभाकर नानावटी यांनी लिहिला असावा!

    ReplyDelete
  2. आप्पा - संजयचे मनापासून अभिनंदन !
    बाप्पा - आम्ही नेमके हेच अपेक्षित असतो रे संजय !
    आप्पा - जितके स्पष्ट आणि बेधडक लिहिशील तितके चांगले
    बाप्पा - काँग्रेस ने जशी म .गांधींची आणि त्यांच्या मूल्यांची वाट लावली तशीच फालतुगिरी बीजेपी करत आहे . एकाला लागली चट उठले बारा भट अशी गम्मत आहे .
    आप्पा -जसे सूतकताई हा काँग्रेस चा विनोदी कार्यक्रम झाला होता तसेच बीजेपी चा योगाचा !बट्याबोळ झाला आहे सगळा . .
    मी तर म्हणतो की थेट सरकार गरीबी कधीच दूर करू शकणार नाही , त्यासाठी स्वतः हातपाय हलवायला पाहिजेत ,अगदी तसेच योगाचे आहे . सरकारी योजना म्हणून राबवली कि हे असेच होणार . प्रत्येक माणसाच्या अवती भोवती चटई , टॉवेल , रुमाल पाण्याची बाटली दिसत होती , अगदी एकसारखे , हे आले कुठून ? म्हणजे सगळा दिखावा ! हा पैसा कुठून आला ?
    बाप्पा - आजकाल जरा कुठे दुःखद घटना घडली की मिडीया मोहीम उघडते . तो पैसा खरोखरच त्या ठिकाणी पोचतो का ?नटनट्या , सेलिब्रिटीज क्यामेऱ्या समोर नुसता शो करत असतात .
    आप्पा - चर्च मध्ये योगा साजरा झाला , काश्मीर मध्ये मुलगी सांगते की रमझान चे रोझे असून योगा करताना तिला त्रास बिलकुल झाला नाही - अमृतसर मध्ये सरदारजी आसन करत होते -हे सगळे काय आहे ? तमाशा ! नाहीतर काय ?आणि त्यातून सिद्ध काय करायचे आहे ?
    बाप्पा - कोणीही सत्तेवर आला कि असाच बिघडतो , का ? कारण काय ?
    आप्पा - कारण देश चालवण्याचे काम सरकार करत नसते . आपली इकनोमी बडे उद्योग सांभाळत असतात . आणि सत्ताधारी लोकांच्या डोळ्यात अशी धूळफेक करत राज्य करत असतात . शेम शेम . आम्ही खोचक लिहित असू कारण संजय ने कधीही असे तडका फडकी उत्तर दिलेले नाही , म्हणून आम्हाला थोडेसे तिखट लिहावे लागते , पण आज संजयाने धडाडी दाखवली - अभिनंदन !
    बाप्पा - हा सरकारी आचरटपणा जनतेच्या पैशाने चालतो हे पण दुःख आहेच !
    आप्पा - किती अपेक्षा होत्या या सरकार कडून ? सगळ्याची माती करताहेत . !
    बाप्पा - मुंबईत तर शिवसेना पावसाबद्दल निर्लज्जपणे खुलासे करत असते . यावार्पण संजयाने साधार लिहिले तर फार बरे होईल .इतकी वर्षी हातात सत्ता असताना शिवसेना असे खुलासे करते म्हणजे काय म्हणावे ?
    आप्पा - भारतात लोकशाही हि भांडवलदारांनी सोयीची म्हणून टिकवली आहे हे सत्य मांडले पाहिजे . आणि भारत देश पण त्यांनीच टिकवला आहे . त्यांचा धंदा तोट्यात गेला कि ते दुसर्या मिनिटाला देशाचे तुकडे करतील . कारण सगळे एकाच लायकीचे आहेत .

    ReplyDelete
  3. संजय सोनावणी यांनी तत्परतेने त्यावर टिपण लिहून प्रकाश टाकला याबद्दल ते कौतुकास पात्र आहेत

    सर्व साधारणपणे असे दिसते की एखादी संघटना सरकारी आश्रयाने वाढू लागते त्यावेळेस तिचा मूळ हेतू पराभूत होतो . सर्वोदय , अंत्योदय , खादी ग्रामोद्योग , अशी उदाहरणे देता येतील . या योजना मांडणारे कालाच्या पडद्याआड जातात , आणि महामंडले स्थापन होऊन उरते फक्त निष्क्रिय कारकुनी चिखल करणारे आणि नोकरशाहीच्या चक्रात अडकलेले पांढरपेशे !
    दुसरा मुद्दा कुणीतरी आधीच मांडला आहे ,तो म्हणजे क्रांती किंवा समाज सुधारणा अशी सरकारी यंत्रणेतून कधीही होत नसते .
    आपल्याकडे सतीची चाल आणि केशवपन कशामुळे बंद झाले ? समाज जागृतीमुळे ? ती जागृती कोणी केली ? इंग्रजांच्या सान्निध्यात आल्यामुळे जे नाव विचार रुजले त्याची ती फलश्रुती नव्हे का ?
    तो पर्यंत शेंडीवाले म्हणतील तीच विद्या , आणि ती ज्याला पाठ तो सर्वश्रेष्ठ ! अशी जी समाज रचना होती त्याला इंग्रज साहेबानी सुरुंग लावला . सत्ता गमावल्यामुळे इंग्रजी शिकून अधिकाराची पदे मिळवून नोकरशाहीतून सत्ता उपभोगण्याची हुशारी ब्राह्मण समाजाने दाखवली .
    त्या काळात किंवा आजच्या काळात माझ्या वाचनात किंवा पाहण्यात कुणीही योगाचे इतके गुणगान सरकारी पातळीवर गायलेले दिसत नाही . मग आजच हा उमाळा कशामुळे ?
    हिंदू संस्कृती आणि हिंदू विचारांचा विजय आणि प्रसार हा प्रकारच समजून घ्यायला पाहिजे . त्यामुळे संघाचे खरे दुखणे समजून घेता येईल !
    हे निर्विवाद आहे की चर्च आणि मशिदी यांना परदेशातून वित्तीय पुरवठा होत असतो .
    संघाचे नेहमी म्हणणे असे असते कि हिंदू धर्म हा या मातीतून जन्माला आला त्यामुळे त्याची प्रत्येक गोष्ट या मातीशी निगडीत आहे . हे मान्य करायला काहीच हरकत नाही , कारण वरील दोन धर्मांच्या निष्ठा परदेशात आहेत , त्यातील मुस्लिम जास्त कडवे आहेत त्यांनी भारतावर १००० वर्षे राज्य केल्याने ते अजूनही स्वतःला इतःले सत्ताधीश समजतात . हे पण सत्य आहे . त्यामुळे ते नेहमी कुराणाचा आधार घेताना दिसतात .
    प्रश्न असा आहे की योग हे सर्वावरचे औषध नाही . योगा केल्याने आपल्या संस्कृतीचा विजय झाला असे होत नाही . तसे समजणे खोटे आहे .
    मग नेमके काय झाले पाहिजे ?
    पहिली गोष्ट म्हणजे हि सार्वजनिक बाब नाही . श्रद्धा आणि आचार या वैयक्तिक गोष्टी आहेत .
    दुसरी गोष्ट सरकारी यंत्रणेला अशा कामाला जुंपणे अगदी अयोग्य आहे . इतका जमाव , इतकी सामुहिक शक्ती दुसऱ्या विधायक कामाला वापरता नक्कीच येईल त्यातले ९०%लोक दिखाऊ असतात हेतर उघडच आहे . मागच्या वर्षीच्या मुंबईच्या पावसात शबाना आझमी सारख्या खोटारड्या समाज सेविका कुठे लपून बसल्या होत्या ?सिनेनट आणि नट्या किंवा कावळ्याच्या छत्रीप्रमाणे उगवणारे सेलिब्रिटीज हे स्वार्थापोटी अशा कामात सहभागी होत असतात . कोणतीही चळवळ ही सरकारी आश्रयाने कमकुवत होते त्यात मरगळ येते .
    अगदी बारीक अभ्यास केला तर संघाची अवस्था काय आहे ?
    आपले इंटरेस्ट जपायला संघाचे कार्य केले की मदत होते असा सुप्त मतप्रवाह आहे .
    उद्या समजा एक सिद्धांत म्हणून असा विचार केला की संपूर्ण भारत एका रात्रीत हिंदू झाला . तर ? तर मग त्या सर्वांचीही एक जात नक्कीच बनणार ?हिंदू - आणि - बिञ्जातॆचा हे या धरतीवर शक्यच नाही ! मग संघ काय करेल ?संघाला जातीयवाद मान्य नाही ना ?
    राजकारणातून समाजकारण साधण्याची हि प्रयत्नांची खेळी काँग्रेस लाही जमली नाही आणि भाजपलाही जमणार नाही ,कारण ते निसर्ग नियमा विरुद्ध आहे . अशी चळवळ लोकप्रिय होत नाही . संघाची एकाच चळवळ लोकप्रिय झाली . ती म्हणजे विवेकानंद शिला स्मारक .त्यातून त्यांनी सत्तेचे राजकारण केले नाही म्हणून आजही स्व रानडे यांचे नाव लोक आदराने घेतात .
    अयोध्येचे राम मंदीर हा राजकारणाचा भाग झाल्यामुळे त्याचे हसे झाले .
    आणि योगदिनाचेही हसेच झाले .

    ReplyDelete
  4. संजय सोनावणी सर
    आपण जे विचार मांडले आहेत ते कोणालाही अंतर्मुख करतील असेच आहेत
    आज प्रत्येक गोष्टीची वर्गवारी करायची घाई काही वर्गाना झाली आहे .
    त्यामुळे
    वैदिक वर्ग योगविद्या ही आपलीच हिंदू समाजाला दिलेली देणगी आहे असे भासवणार . खरेतर हिंदू हे नाव परकीयांनी आपल्याला दिले आहे . आपण नुसते हिंदू कधीच नसतो . आपण हिंदू मराठा असतो , हिंदू ब्राह्मण असतो , हिंदू तेली असतो . आपल्याला जातीशिवाय जगता येत नाही हे सत्य आहे .अगदी सरकारी पातळीवर सुद्धा ! आपले विवाह - आपले समाजातील स्थान त्यावरूनच ठरते हे कटू सत्य आहे .
    आजकाल परिस्थिती झपाट्याने बदलत आहे . ही स्वागतार्ह गोष्ट आहे . त्याला जबाबदार आपले शिक्षण आहे का चित्रपट ,आपला समाज आणि युवावर्ग खरोखरच "नव्या मनुचा नवा शिपाई "आहे का ? हा संशोधनाचा विषय आहे .
    आपण जो सांस्कृतिक वारसा घेतला त्यात योगपण आहे असे सांगितले जाते . पण खरोखर शिवाजी महाराज किंवा राणा प्रताप योगा करत होते का ?आपण असे बरेच वारसे घेतले आहेत असे सांगितले जाते . अहिंसा , अस्तेय , शाकाहार (? ),असे सांगता येईल . पण योगाबद्दल तसे म्हणता येईल का ? तो साधारणपणे साधू आणि तपस्वी यांचा प्रांत म्हणता येईल ,

    आपली ढेरी सावरत इकडून तिकडे मुहूर्त गाठण्याच्या घाईत असलेले पुरोहित कधी योगा करत असतील असे वाटत नाही . तसेच मच्छी मटणावर ताव मारत सदासर्वदा हमरीतुमरीवर येउन रुबाब करणारे जहागीरदार कधी योगाच्या वाटेलाही जात नसतील . उपाशीपोटी गरीबांची तर गोष्टच वेगळी .
    आपल्या समाज रचनेत ती जातीवर आधारीत असल्यामुळे , कोणताही विचार उच्च वर्गाने मान्य केला की त्याची री ओढायची इतकेच् जणू बहुजनांचे काम उरत होते . म . फुले आणि इतर समाज सुधारकांनी त्यात बदल केले .पण त्यांनीही कधीही योगा बद्दल चार शब्द बोलले लिहिले नाहीत
    समाजसुधारक शाहू महाराज , म फुले आगरकर किंवा आंबेडकर यांनी कधीही योगाला जीवनात प्राधान्य दिले नाही . संतानीपण योग शास्त्राला महत्व दिलेले दिसत नाही . मला तरी दिसले नाही , अगदी १ आणा सुद्धा नाही - असे का ?तितकेच महत्वाचे असते तर शिवाजी महाराजांनी एकतरी योग शिकवणारा अष्ट प्रधान मंडळात घेतला असता हे नक्की .
    संघ परिवाराचा एक कार्यक्रम आहे . तो सर्वांच्या गळी उतरवण्याचा वेडेपणा ते दरवेळेस करताना दिसतात .गोहत्या बंदी हापण त्यातलाच प्रकार आहे . खरेतर कुठलेही जनावर धष्टपुष्ट पोसून नंतर त्यांचे मास खायला काहीच हरकत नसावी , कारण तो एक व्यवसाय आहे , परंतु त्यात धार्मिक भावना आणत , त्याला दुसऱ्या दिशेने फरफटत नेण्याचा गाढवपणा संघ करत असतो .
    पूर्वी होम हवन करताना ऋषी मुनी हीच गोष्ट दिवसा ढवळ्या करत असत .
    आज अरोबिक्स आणि तत्सम व्यायाम प्रकारांनी आपणा सर्वांनाच शारीरिक आणि मानसिक फिटनेस चे महत्व सांगितले आहे , पण त्यासाठी हिंदू धर्म आणि परंपरा यांचा उदोउदो करत नाक चिमटीत धरून बसण्याची काहीही गरज नाही . कारण त्यामागून चंचुप्रवेश करणारा धार्मिकतेचा पुराण मतवाद जास्त धोकादायक आहे
    राजपथावर धार्मिक सोहळा असल्यासारखे सार्वजण जमले होते , त्या ऐवजी आरोबिक्स ला वाजवतात तसे संगीत लावत हा कार्यक्रम जास्त समाजाभिमुख आणिलहानथोरात लोकप्रिय करता आला असता.

    ReplyDelete
  5. आपल्या देशात प्रत्येकगोष्टीचे बाजारीकरण होत जाते . ही अमेरिकन जीवन पद्धती म्हणता येईल . संघ हा पुराण मतवादी असूनही एखाद्या गोष्टीचे उत्तम मार्केटिंग करत असतो . एका विटेला २५ रुपये देत त्यांनी अयोध्येसाठी अब्जावधी रुपये जमा केले.लोकांच्या भावनांशी खेळणे त्याना उत्तम जमते .
    समाजवादी तेच करतात. विषमता आणि गरीबी हे त्यांचे लाडके विषय .
    सरकारी नोकरशाहीने कधी गरीबी हटणार नाही हे त्यांनाही माहित असते .गरीबी हि वैयक्तिक पातळीवर हटवावी लागते . तिसरे कम्युनिस्ट . त्याना सदासर्वदा नकार मजा वाटते . शोषण हा त्यांचा लाडका शब्द . आणि दारिद्र्य हे त्यांचे भांडवल ! सरकारी शिधा ,रेशन, आणि जमीन कमाल धारणा हे त्यांचे क्षेत्र . काँग्रेस ही तर गरीबांचा कैवारी असल्या सारखी वागते . रशियन क्रांतीचा पहिल्या
    पंत प्रधानांवर असलेला प्रभाव आणि त्यांचे विचार यांनी सर्व संस्थांचे सरकारीकरण केले आणि भ्रष्टाचार सुरु झाला . तो वाढतच गेला . यावर सामान्य माणसाला काहीच उपाय दिसत नव्हता . अशा विमनस्क मानसिक परिस्थितीत सामान्याला प्रगती बरोबरच पुराण मतवाद हाच आधार वाटू लागतो संस्कृती बुडते आहे हा नारा सामान्याला भयभीत करतो स्वातंत्र्या इतकेच त्याला देवधर्म प्यारे वाटू लागतात . अपुरे शिक्षण आणि अपरिपक्व सामाजिक जाण यामुळे पांढरपेशा समाज दिशाहीनपणे वागत जातो भान्दावाल्दाराना क्रांतीची तोडफोडीची भीती असते . त्याना हे सोयीचे असतेच ! अशा जुनाट धार्मिक विचारणा खतपाणी घालणे त्याना सर्वाधिक आवडते . अनेक "अक्षर धाम " निर्माण होण्यात त्याना रस असतो .पण सखोल विचार करून योजनाबद्ध रीतीने प्रत्येकाच्या दाराशी त्याना पाणी आणता येत नाही . पुरेशी वीज पुरवता येत नाही . पुरेसे धान्य कोठारात ठेवता येत नाही . कुजून सडून जाते . पण सरकारी नोकरशाहीला शुद्ध नसते !

    ReplyDelete
    Replies
    1. सद्धयाचा योग केवशक्षळ एक भारतीय व्यायाम प्रकार एवढाच मर्यादित आहे. जपान/ चीन मधे कंफु वा ज्युडोलाही अात्मसाधनेचा एक टप्पा समजले जाते.
      योग हा केवळ एक भारतीय व्यायाम प्रकार समजून जर त्या द्वारे रोजगार निर्मीती होत असेल तो लोकप्रीय करावा.

      Delete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...