सध्या देशभर अनेक नेत्यांच्या डिग्र्यांबद्दल बरीच वादंगे होत आहेत. काहींच्या डिग्र्या बोगस आहेत तर काहींबाबत संशय आहे. माझे म्हणने जरा वेगळे आहे.
अपवाद वगळता भारतातील बहुसंख्य विद्यापीठांच्या डिग्र्या बोगसच आहेत. त्या विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे मिळवल्या म्हणून त्या डिग्र्यांचे महत्व काडीएवढेही वाढत नाही. त्या कचराकुंडीच्या फेकायच्या लायकीच्या असतात. नोक-या मिळवायच्या तर या डिग्र्या शिडीसारख्या कामाला येतातही, पण नोकरी मिळवायला स्पर्धा परिक्षा द्याव्याच लागतात. याचाच अर्थ डिग्र्यांमुळे विद्यार्थी सक्षम व ज्ञानवंत-ज्ञानार्थी होतो हे खुद्द सरकारलाच मान्य नाही.
मी पुणे विद्यापीठाचा एम. कोम. चा डिग्री होल्डर आहे. त्या पदवीचा मला जीवनातील उपयोग शुन्य. मला या पदवीने कणभरही व्यवहारज्ञान शिकवले नाही. म्हणजे ती कुचकामीच कि!
पदव्या हव्या असतात कारण समाज अकारण त्याला महत्व देतो. व्यक्तीची प्रतिष्ठा त्याच्या पदवीने ठरवतो.
आम्ही आमची दृष्टी स्वच्छ केली तर कोणि अशा लबाड्या मुळात करणार नाही. आमची शिक्षणपद्धतीच मुळात बोगस आहे...त्याचे काय करायचे हा आमच्यापुढील खरा प्रश्न असला पाहिजे!